इंग्लंडमध्ये वैज्ञानिकांना आठ लाख वर्षांपूर्वीच्या पाऊलखुणा  सापडल्या असून आफ्रिकेबाहेर सापडलेल्या त्या सर्वात प्राचीन पाऊलखुणा आहेत. पूर्व इंग्लंडमध्ये नोरफोक भागात त्या सापडल्या आहेत. उत्तर युरोपमधील मानवी जीवनाचे पुरावेही त्यामुळे मिळाले आहेत. ब्रिटिश म्युझियम व नॅचरल हिस्टरी म्युझियम तसेच लंडन विद्यापीठ यांनी या पाऊलखुणा शोधल्या असून देशाच्या पूर्व किनाऱ्यावर हप्पीसबर्ग येथे प्राचीन काळातील चिखलात उमटलेली ही पावले आहेत. ब्रिटिश म्युझियमचे वैज्ञानिक निक अ‍ॅशटन यांच्या मते या पाऊलखुणा मानवाच्या पूर्वीच्या नातेवाइकांशी मिळत्याजुळत्या आहेत. या पाऊलखुणा होमो अँटेसेसर या प्रवर्तक माणसाच्या असाव्यात. त्याचे जीवाश्म स्पेनमध्ये सापडले होते व या प्रकारचा माणूस आठ लाख वर्षांपूर्वी मरण पावला होता. ‘प्लॉस वन’ या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. या एकूण ५० पाऊलखुणा असून त्या गेल्या वर्षी मे महिन्यात प्रथम ओहोटीवेळी सापडल्या. फोटोग्रॅमेटरी तंत्राने त्याच्या त्रिमिती प्रतिमा तयार करण्यात आल्या. एकूण पाच व्यक्तींच्या त्या पाऊलखुणा असून त्या लोकांची उंची ०.९ ते १.७ मीटर होती असा अंदाज बांधण्यात आला आहे. आतापर्यंत माणसाच्या सर्वात जुन्या पाऊलखुणा ३५ लाख वर्षांपूर्वीच्या असून त्या लायटोली या टांझानियातील भागात सापडल्या होत्या. केनियात २००९ मध्ये लेरेट येथे सापडलेल्या पाऊलखुणा या होमो इरेक्टसच्या असाव्यात व त्या १५ लाख वर्षांपूर्वीच्या आहेत. नोरफोक येथील पाऊलखुणा या युरोपातील दुप्पट जुन्या पाऊलखुणा आहेत. दक्षिण इटलीत यापूर्वी ज्या पाऊलखुणा सापडल्या होत्या त्या ३ लाख ४५ हजार वर्षांपूर्वीच्या असून त्या ज्वालामुखीच्या राखेत उमटलेल्या असल्याने आता त्या घट्ट खडकात बद्ध आहेत त्यांना डेव्हील्स फूटप्रिंट असेही म्हटले जाते.