गेल्या १५ फेब्रुवारीच्या सकाळी करायचं एकच काम उरलं होतं आणि ते म्हणजे हवामानाचा अंदाज घेणं.  कृत्रिम उपग्रहांनी पाठवलेल्या ढगांच्या छायाचित्रांच्या माध्यमातून आपल्याला आता बऱ्यापकी अंदाज घेता येतो की, आपण जेथून निरीक्षण करणार आहोत त्या जागेवर आकाशात किती ढग असतील.  स्वाभाविकपणे  रात्री आकाशात काही खगोलीय घटना होणार असेल आणि जर ढग असतील तर त्या घटनेचे निरीक्षण घेणे शक्य होणार नाही.  त्या रात्री एक लघुग्रह (अ‍ॅस्टेरॉइड)- ज्याला अजून नावसुद्धा देण्यात आलेलं नव्हतं आणि ज्याला त्याच्या क्रमांकानंच ओळखलं जात होतं असा हा लघुग्रह ‘२०१२ डीए १४’ पृथ्वीच्या खूप जवळून जाणार होता. खूप जवळून म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून फक्त २७५०० कि.मी. अंतरावरून!  आता कदाचित या आकड्याची तुम्हाला खरी जाणीव झाली नसली तर सांगतो, की पृथ्वी हे अंतर फक्त १५ मिनिटात कापते.  आणि काही कृत्रिम उपग्रह पृथ्वीपासून सुमारे इतक्याच उंचीवर असतात. चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर सुमारे ३.२ लाख कि.मी. आहे.
या उपग्रहाचा शोधही एक वर्षांपूर्वी म्हणजे २२ फेब्रुवारी २०१२ रोजी लागला होता. आणि जेव्हा आणखी निरीक्षणे घेण्यात आली तेव्हा दोन गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या.  एक म्हणजे २०१३ साली हा उपग्रह पृथ्वीच्या खूप जवळून जाणार असला तरी त्यापासून पृथ्वीला कुठलाच धोका नाही आणि दुसरी बाब म्हणजे येत्या भविष्यात त्याची पृथ्वीला धडक देण्याची कुठलीच शक्यता नाही.
या लघुग्रहाचा आकार सुमारे ४५ मीटर आखण्यात आला आणि याची गती ताशी २८००० कि.मी. पेक्षा थोडी जास्त होती.  समजा हा लघुग्रह फक्त १५ मिनिटे लवकर आला असता तर त्याची पृथ्वीशी टक्कर निश्चित होती.त्यात जीविताचे आणि संपत्तीचे मोठे नुकसान झाले असते. या सर्व कारणांमुळे प्रसारमाध्यमे या घटनेला उचलून धरणार याची खात्री होतीच.
पण दुपारी एका दुसऱ्याच एका घटनेने मीडिया ढवळून निघाला. मध्य रशियात एक उल्का पाषाणाने (मिटिओराइट) धडक दिली होती आणि जेव्हा पहिली माहिती आली तेव्हा जीविताची हानी झाली नसली तरी सुमारे ५०० जण जखमी झाले होते. (नंतर हा आकडा १००० वर गेला.)  आणि या उल्का पाषाणाचे तुकडे ज्या घरांवर पडले त्या घरांचं पण मोठ नुकसान झालं होतं.  या उल्का पाषाणाचा आकार सुमारे १५ ते १७  मीटर असून त्याचे वस्तुमान १० हजार टन होते.  सुमारे ३० कि.मी. प्रति सेकंद वेगाने त्याने पृथ्वीच्या वातावरणात प्रवास केला आणि मग एका मोठ्या विस्फोटात याचे तुकडे विखुरले गेले. या स्फोटात  सुमारे ३०० किलो टन ऊर्जा उत्सर्जित केली गेली होती.  विस्फोटाचा आवाज इतका जास्त होता की काही घरांच्या खिडक्या तर या आवाजामुळेच तडकल्या होत्या.
ही बातमी वाचताना माझ्यासारख्या अनेकांच्या मनात एक शंका डोकावून गेली आणि म्हणून मी या घटनेचे वेगवेगळे व्हिडिओ वारंवार बघितले. आणि त्यातून जाणवले ते असे की या उल्का पाषाणाचा त्या रात्री आकाशातून जाणाऱ्या लघुग्रहाशी संबंध नव्हता.  लघुग्रहाचा प्रवास दक्षिण-उत्तर होता, तर हा उल्का पाषाण पूर्वेकडून आला होता. नंतर या क्षेत्रात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी हे स्पष्ट केलं की या दोघांचा एकमेकांशी काही संबंध असलाच तर इतकाच की, दोन्ही घटना एका दिवसापेक्षा कमी वेळात झाल्या होत्या.
पण समजा, २०१२ डीए १४ सारख्या एखाद्या लघुग्रहाने पृथ्वीला धडक दिली असती तर.. अशीच घटना सायबेरिया मध्ये १९०८ साली टुंगुश्का भागात झाली होती. तेव्हा तो लघुग्रह फक्त पृथ्वीला स्पर्श करून गेला होता, पण त्याने जवळजवळ २१ हजार वर्ग किलोमीटर भागात मोठे नुकसान केले होते. अर्थात त्या काळातील राजकीय परिस्थितीमुळे या घटनेचा नीट अभ्यास झाला नव्हता. या घटनांना आपण फक्त पृथ्वीच्या सापेक्षात बघितलं तर अशी घटना म्हणजे आपल्याला चिमटा काढण्यासारखीच आहे, पण मानवाच्या दृष्टीने मात्र ही खूप मोठी घटना आहे.  आणि असा उल्का पाषाण जर समुद्रात पडला तर मोठय़ा सुनामी येऊन होणारी हानी त्याहीपेक्षा खूप जास्त असेल. आज आपल्याकडे अशा घटनांची पूर्वसूचना देणारी कुठली यंत्रणा नाही. तसेच, जरी अशा घटनेची पूर्वसूचना  मिळाली तरी आपण त्या जागेवरच्या लोकांना फक्त हलवू शकतो. पण यात एक आशेचा किरण म्हणजे हवाई विद्यापीठात दुर्बणिंची एक अशी यंत्रणा विकसित होत आहे की, ज्यामुळे सुमारे ४५ मीटर आकाराचा लघुग्रह जर पृथ्वीच्या दिशेने येत असेल तर त्याची माहिती आपल्याला सुमारे एक आठवडा आधी मिळेल. या प्रकल्पाचे नाव  Asteroid Terrestrial-Impact Last Alert System (किंवा ATLAS) असे ठेवण्यात आले आहे. यात आठ छोट्या आकाराच्या दुर्बणिी असतील आणि त्या हवाई बेटावरच ठेवण्यात येणार आहेत. हा प्रकल्प २०१५ पर्यत तयार होईल. या प्रकल्पाचे मुख्य डॉ. जॉन टॉरी यांच्या मते ही एक दिवसाची पूर्वसूचना लोकांच्या स्थलांतरणासाठी भरपूर असेल. पण त्याचबरोबर पृथ्वीकडे येणाऱ्या अशा धोकादायक लघुग्रहाची दिशा बदलण्यासाठी यंत्रणा पण विकसित होण्याची गरज आहे.
विज्ञान पानासाठी लेख पाठवण्याचा पत्ता- निवासी संपादक, लोकसत्ता एक्सप्रेस हाऊस प्लॉट नं. १२०५/२/६ शिरोळे रस्ता, शिवाजीनगर पुणे-४ अथवा  rajendra.yeolekar@expressindia.com