अठराव्या शतकातील जंतरमंतर खगोल वेधशाळेत नवी दिल्ली येथे सध्या एक नयनरम्य असा कलापूर्ण कार्यक्रम फ्रान्सच्या सहकार्याने सादर करण्यात आला आहे. विज्ञानातही संगीतसदृश कला व फॅशन यांचा मिलाफ दाखवणारा हा कार्यक्रम जानेवारीत दिल्ली येथे सादर झाला त्याचे प्रयोग देशाच्या इतर भागातही होणार आहेत. भारत व फ्रान्स या देशांचे कलाकार चारशे वर्षे जुन्या असलेल्या या वेधशाळेच्या लाल विटा तसेच चिरेबंदी स्वरूपाच्या भिंतींवर प्रकाशाचा वापर करून कलात्मक असा हा कार्यक्रम सादर केला जात आहे त्याचे नाव आहे ल्युमिनॉसिटी. या वेधशाळेच्या भिंतींवर अनेक वैश्विक मिथके दर्शवलेली आहेत. त्यावर ग्रह, तारे, लघुग्रह तसेच खगोलीय साधने यांची चित्रेही आहेत.
ल्युमिनॉसिटी हा फ्रान्स-भारत यांच्या सहकार्यातून तयार केलेला कार्यक्रम मार्चपर्यंत सादर केला जाणार असून तो देशाच्या विविध शहरातही होणार आहे.
तासाचे चक्र, प्राचीन खगोलशास्त्रीय तक्ते तसेच सम्राट यंत्र, विविध प्राण्यांवर आरूढ देवता, राम यंत्र व मंडले यांची माहिती या कार्यक्रमात आहे. दिल्लीची जंतरमंतर वेधशाळा १७०० मध्ये जयपूरचे महाराजा जयसिंग द्वितीय यांनी बांधली. तिथे खगोलशास्त्रीय परिणामांवर आधारित जयप्रकाश यंत्र व मिश्रा यंत्रही आहे.

जंतरमंतरच्या प्रवेशद्वाराजवळच दृश्य कलाकार नंदिता पचौरी यांनी स्थानिक कलाकारांच्या मदतीने ‘स्लाइस ऑफ स्काय’ ही कलाकृती सादर केली आहे. त्यात इतरही वीस कलाकृतीही आहेत. ‘स्लाइस ऑफ स्काय’ कलाकृतीत आकाश हे केकच्या आकाराचे दाखवले आहे. आमच्या चंदननगर येथील चाळीस ते पन्नास कलाकारांची मदत त्यात घेतली आहे. चंदननगर हे माझे मूळ गाव ते पश्चिम बंगालमध्ये आहे. तिथे दुर्गापूजेला जुन्या पद्धतीने सजावट केली जाते. त्याच्या मदतीने आम्ही खगोलशास्त्राचे सदीप दर्शन घडवले आहे. विश्व चित्रात्मकतेतून साकारणे हे आव्हान होते. ते आव्हान लंडन व जर्मनीत असेच प्रकल्प साकारणाऱ्या कलाकाराने पेलले आहे. त्यामुळे आम्ही ‘तारे जमीं पर’ हे शब्दश: अर्थाने साकारले आहे. जंतरमंतरच्या परिसरात काळाशी संबंधित प्राचीन साधने सादर केली आहेत त्यात आजोबांचे घडय़ाळ, सूर्यघडय़ाळ, मेणबत्तीचे घडय़ाळ यांचा समावेश आहे.
                                                                                नंदिता पाल-चौधरी, दृश्यात्मकता कलाकार
दिल्लीची जंतरमंतर ही फक्त खगोलशास्त्रासाठी महत्त्वाची वेधशाळा आहे असे नाही तर विश्वातील घटकांची एकात्मता त्यातून प्रतिबिंबित होते. आता फ्रान्स व भारत यांच्या सहकार्याने त्याला आणखी उजाळा मिळाला आहे. आम्ही तुम्हाला या तारकाविश्वाच्या आणखी जवळ नेत आहोत, जिथे स्वर्ग धरतीला मिळतो असे हे ठिकाण आहे.
ऑरेली फिलीपेटी, सांस्कृतिक व दळणवळण मंत्री, फ्रान्स
येथील दृश्ये साकारताना मी लॅटिन, फ्रेंच, हिंदू, चिनी, पर्शियन प्रतीक चिन्हांचा वापर दृश्य आशयात केला आहे. काल व अवकाश यांची विश्वात्मकता ही वेगळी संकल्पना यात साकार केली आहे.
ज्युलिया डँटोनेट, व्हिडिओ आर्टिस्ट
जंतरमंतर वेधशाळेला चारशे वर्षे पूर्ण झाली, त्या प्रसंगात परंपरा व आधुनिकता एकत्र आणली आहे. जर तुम्हाला वारसा नसेल तर तुम्हाला भवितव्य नसते.
सिझर बायलर, इटालियन दूतावास