गणेश मूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करण्याला ठाम विरोध करावा. त्यापेक्षा कृत्रिम हौद बरा. त्याहूनही उत्तम उपाय म्हणजे कोरडे विसर्जन करण्याची पद्धत स्वीकारणे.

मी विचारले, ‘‘आजोबा! प्रदूषण केलेले गणपतीला चालेल का?’’ ते म्हणाले, ‘‘तुम्ही साधू बनवण्याचे ठरवले आहे का? तसे असेल तर गणपतीला तुमची कृती आवडेल! सोळा विद्या आणि चौसष्ट कलांत तो पारंगत आहे. तो कशाला म्हणेल प्रदूषण करा!’’ मी होरा मनाशी बांधला- चर्चा योग्य दिशेने जात होती. विचारले की, ‘‘आपण गणपती पाण्यात विसर्जन केलाच नाही व तोच पुढल्या वर्षीही वापरला तर?’’ आजोबांनी ठामपणाने सांगितले की, जर ज्ञानाच्या कसोटीवर कृती चूक असेल तर धर्मशास्त्राची चर्चा फिजूल आहे. ज्ञान व विवेक वापरून बेधडक सुधारणा करावी. माझ्या आजीला व आई-वडिलांना पर्यावरणपूरक गणेश उत्सवाचे पैलू समजावून सांगायला माझ्या पत्नीला अजिबात त्रास झाला नाही. गेली २४ वर्षे आमची गणेश मूर्ती पाण्यात विसर्जित झालेली नाही.

Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
origin of vangyache bharit history of brinjal bharta information you need to know
‘वांग्याचं भरीत’ हा पदार्थ नेमका आला कुठून? कसा तयार झाला हा शब्द? जाणून घ्या रंजक गोष्ट
Why a sunscreen over SPF 50 is still the best bet for the beach
तुम्हीही उन्हात जाताना ‘SPF 50’ सनस्क्रीन वापरताय का? मग त्वचारोग तज्ज्ञ काय सांगतात वाचाच
loksatta analysis adani group wins bid to redevelop bandra reclamation
विश्लेषण : मुंबईच्या पुनर्विकासावर अदानींचा वरचष्मा? धारावीपाठोपाठ वांद्रे रेक्लमेशनही?

गणेश विसर्जनाचे संकट

सन १९९३ मध्ये माझ्या मनाने घेतले की गणेश मूर्ती विसर्जन करण्याची पद्धत बदलली पाहिजे. कारणही तसेच घडले. वर्तमानपत्रात ठाण्याच्या घंटाळी तलावातील मासे मरून वर तरंगत होते व लोक चौफेर ते दृश्य पाहात आहेत असा एक फोटो गणेश विसर्जनानंतर प्रसिद्ध झाला होता. तसेच गिरगाव चौपाटीवर गणरायाच्या भंगलेल्या मूर्ती व त्यांचे भग्न अवशेष इतस्तत: पसरलेले फोटोही वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाले. मला इतक्या साऱ्या गणेश मूर्ती पाण्यात विसर्जन करणे व त्यातून नैसर्गिक परिसंस्थेचे शिरकाण होणे, हजारो लाखो मासे मरून तलावावर तरंगणे, पवित्र मूर्तीचे अवशेष चौपाटीवर विखुरलेले दिसणे हे सगळेच क्रूरपणाचे, रानटीपणाचे, अतक्र्य, निंदनीय व अपमानकारक वाटू लागले. भारतात परतल्यावर लगेचच मी पवई तलावातील प्रदूषणावर अभ्यास सुरू केला होता. १९९३ ते १९९५ या काळात माझ्या विद्यार्थ्यांनी गणपती, गौरी विसर्जन व एकंदरच गणेश उत्सवात होणारे तलावातील, हवेतील प्रदूषण यावर पुष्कळ आकडेवारी व नमुने चाचणी केली. पवई तलावातले प्रदूषण अफाट होते. मूर्ती विसर्जन हे त्याचे एक कारण निश्चित होते. माझ्या चमूने बराच अभ्यास केला व प्रश्न पर्यावरणशास्त्राच्या दृष्टिकोनातून समजावून घेतला.मात्र प्रत्यक्षात त्या ज्ञानाने बदल घडवता आला नाही. पर्यावरणशास्त्र व धार्मिक रूढी-परंपरा यांच्या जात्यात माझा आवाज व माझे निष्कर्ष कुणाच्याही मनावर परिणाम करू शकले नाहीत. त्याच काळात मला ठाण्याच्या बांदोडकर महाविद्यालयातील डॉ. नागेश टेकाळे या वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापक महोदयांशी संबंध आला. तलाव प्रदूषण, ठाणे खाडीमधील समस्या व गणेश विसर्जनासंबंधीच्या संशोधनात मी त्यांना गुरू व मार्गदर्शक मानले. त्यांचा थंडपणा, दिशाभूल व अपमान सहन करण्याची हातोटी, खुल्या दिलाने व सचोटीने पाठपुरावा करण्याचे कसब आम्हा सर्वाना त्यांच्याकडून शिकता आले. मुंबई, नवी मुंबई व ठाणे महानगरपालिकांसोबत काम करताना नोकरशाही व कॉर्पोरेटर्स या दुकलीने तर मला शहाणे करून सोडले! पाहता पाहता दहा-बारा वर्षे गेली. अनेकांच्या भेटी, अनेक ठिकाणी फिल्ड वर्क, प्रयोगशाळेत बरेच प्रयोगही केले होते. मात्र ठाण्यातील घंटाळी तलावाचा प्रश्न काही प्रमाणात सोडवण्यात यश आले. पण बाकी फार भरीव काही हातून घडले नाही.

डॉ. शुभा राऊळ या महापौर असताना व तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. जयराज फाटक यांनी पर्यावरणस्नेही गणेशोत्सवात कोणती पथ्ये पाळावीत, गणेश मूर्ती कशा असाव्यात वगैरे प्रश्न विचारले व आय.आय.टी.ला विनंती केली की अभ्यासपूर्वक मत मांडावे. महापालिका योग्य ती पावले उचलू इच्छिते. ऑगस्ट २००७ मध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी प्रयोगांच्या आधारावर आमचे निष्कर्ष मांडले व अहवाल डॉ. फाटकांना सादर केला. डॉ. राऊळ सरळ माझ्या प्रयोगशाळेत आल्या व म्हणाल्या की त्यांचे सहकारी हा अहवाल प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास उत्सुक आहेत. तुम्ही व तुमचे विद्यार्थी जमेल तेवढे सहकार्य द्या. परिणामत: २००७ सालापासून महापालिकेने सुजाण व धाडसी पावले टाकली व मनापासून प्रयत्न केले. गेल्या पाच-सात वर्षांत मात्र माझा महापालिकेच्या प्रयत्नांशी प्रत्यक्षरीत्या संबंध राहिलेला नाही.

मूर्ती विसर्जनाचे पर्यावरणाला अनुकूल उपाय

महाराष्ट्रात या विषयावर बराच काही अभ्यास करून झालेला आहे. आम्हीही यात संशोधन केले आहे व काम सध्याही चालू आहे. प्रदूषण संपूर्णत: टाळणे हाच योग्य उपाय ठरेल, असे सध्या मनाने पक्के ठरवले आहे. बहुतांश प्रयोग व नावारूपाला आलेले ‘नावीन्यपूर्ण’ उपाय हे वरवरचे व पर्यावरण विज्ञानाच्या कसोटीला न उतरणारे आहेत, असा माझ्या संशोधक चमूचा निर्वाळा राहिलेला आहे. अनेक कुटुंबांनी, सोसायटय़ांमध्ये, घर-गल्ल्यांमध्ये गणेश मंडळांमध्ये व समाजसेवी संस्थांनी केलेले प्रयोग हे आपापल्या जागी महत्त्वाचे आहेत यात शंका नाही. माझ्या संशोधनातून पुढे आलेल्या दोन पद्धती थोडक्यात मांडत आहे.

एक उपाय असा असू शकतो की, गणेश मूर्ती तात्पुरत्या बांधलेल्या हौदात विसर्जित करून लगोलग बाहेर काढून ठेवायची व नंतर तिचे चूर्ण करून त्याचा उपयोग बांधकामाच्या साहित्यात करावा. या प्रक्रियेत स्थळकाळाच्या गरजेनुसार जरून बदल करावेत. हट्टाला न पेटता, सामोपचाराने दरवर्षी सुधारणा करावी व हळूहळू आदर्श  प्रवास करावा. या उपायातील तीन महत्त्वाच्या बाजू खालीलप्रमाणे :

(अ) खुल्या नैसर्गिक जलस्रोतात मूर्ती कदापि विसर्जित करायची नाही (ब) ज्या कृत्रिम तलावाचा वापर केला, त्यातील पाणी प्रदूषण नियंत्रक यंत्रातून स्वच्छ करूनच गटारात फेकायचे व (क) कृत्रिम तलावातील गाळ व मूर्तीचे चूर्ण बांधकामाच्या साहित्यासोबत वापरावे (खालील चित्र)

दुसरा पर्याय असू शकतो तो ‘कोरडय़ा विसर्जनाचा’. मेणकापड अंथरून पार्कमध्ये, कठडय़ावर, सोसायटीतील खुल्या जागेत गणपती पूजा करून विसर्जनासाठी एकत्र कारावे. रात्री ट्रक किंवा टेम्पोवर बसवलेल्या ग्राइंडरमध्ये मूर्तीची भुकटी बनवावी व ती भुकटी विटा व बांधकामाचे साहित्य बनवणाऱ्या कारखान्याला पाठवावी. (वरील चित्र)

वर वर्णन केलेले दोन उपाय जर ‘एक गाव- एक गणपती’, ‘एक गल्ली- एक गणपती’, ‘एक सोसायटी- एक गणपती’ या सामूहिक समंजस उत्सव साजरा करण्याशी जोडले तर बहार येईल. सोबत जर गणेश मूर्ती प्रत्येकाने समजा पाच वर्षे पुन्हा पुन्हा वापरली तर आणखी पाचपट समस्या कमी होईल. करावे तेवढे थोडे आहे व असे प्रयोग ठिकठिकाणी झाले आहेत.

अनुभवसिद्ध गोष्टी

१) गणेश मंडळे व समाजातील रूढीप्रिय मंडळींमुळे होणारी अडवणूक ही नोकरशाही व राजकारण्यांच्या आपमतलबी व संधिसाधू खेळ्यांपेक्षा कमी प्रभावाची व कमी जाचक आहे. लोकमान्य टिळकांचे नाव घेत चालवलेला सार्वजनिक गणेशोत्सव किमान १२० वर्षे वयाचा झाला, पण आपण काही सुज्ञ बनलो नाही. दिवसेंदिवस बाजारीकरण वाढतेच आहे. यात पहिला बळी पर्यावरणाचा पडतो आहे याचे कुणाकुणाला भान आहे?

२) या कोलाहलात अनेक मंडळांकडून व समाजगटांकडून अनेक नावाजण्यासारखे प्रयत्न गेल्या २५ वर्षांत झालेले आहेत. अशा प्रयत्नांना माध्यमे, प्रदूषण नियंत्रण मंडळे व काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था बळ देताना दिसत आहे. गेल्या दहा वर्षांत हे प्रयत्न विशेष नियमित होताना दिसत आहेत. अनुकरण करणाऱ्यांची संख्या म्हणावी तशी वाढत नाही तरीही गणेशोत्सव पर्यावरणस्नेही बनवण्याकडे कल वाढतो आहे व प्रयोगांना प्रतिष्ठा प्राप्त होत आहे. ही मी फार मोठी जमेची बाजू मानतो. गणेश मूर्ती व सजावट कशी पर्यावरणस्नेही करता येईल व एकंदरच गणेशोत्सव कसा कमीत कमी प्रदूषणाचा करता येईल, याविषयी पुढच्या लेखात.

३) मूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करण्याला ठाम विरोध करावा. त्यापेक्षा कृत्रिम टाकी किंवा हौद बरा. पण त्याहूनही उत्तम उपाय म्हणजे कोरडे विसर्जन करण्याची पद्धत मनाने स्वीकारणे. हवे तर दूर्वा पाण्यात बुडवून मूर्तीवर पाणी शिंपडावे व विसर्जन केले म्हणावे. पर्यावरणरक्षणासाठी योग्य पद्धती गणरायाला पटवायला कितीसा वेळ लागेल? तो तर ज्ञान- कलांचा देव आहे. प्रश्न आपलाच आहे. आपण बुद्धी वापरणार की पळपुटेपणा करणार? आवाहन- तुमच्या घरी व तुम्ही सहभागी असलेल्या गणेश मंडळांत तुम्ही केलेले प्रयोग फोटो व पर्यावरणस्नेही पायंडे याविषयी ई-मेलने जरूर कळवा.

 

– प्रा. श्याम आसोलेकर

asolekar@gmail.com

लेखक आयआयटी, मुंबई येथील ‘पर्यावरण व अभियांत्रिकी केंद्रा’त प्राध्यापक आहेत. लेखातील मते त्यांची वैयक्तिक आहेत.