वयाची साठी गाठलेल्या कोल्हापुरी पैलवानासारखी आपल्या शेतीची गत. त्यात सरकारे आणि पांढऱ्या कपडय़ांतली शेतकऱ्यांची पोरेलुटायला तयारच. रथाचे चाक जमिनीत रुतल्यावर मृत्यंजयकर्णदेखील हतबल झाला, मृत्यूला सामोरा गेला. आत्महत्या करणारा शेतकरी आज अशाच प्रकारे हतबल दिसतो आहे.

दररोज सकाळी वृत्तपत्र उघडले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्येची बातमी वाचायला मिळते. आत्महत्या करण्याच्या पद्धतीत बदल झाला. आत्महत्या ठरलेल्याच आहेत. कुणी गळफास घेतो, तर कुणी विष पिऊन आत्महत्या करतो. काहींनी तर ऐकणाऱ्यांच्या अंगावर शहारे यावेत अशा पद्धतीने आत्महत्या केल्या. जगाच्या पोिशद्यावर अशी वेळ का यावी? आत्महत्या करण्याइतपत माझा बळीराजा नेभळट आहे काय? सापाच्या मुंडक्यावर पाय देऊन शेतीला पाणी देणारा, जंगली जनावरांशीही दोन हात करणारा, निसर्गाशी प्राणपणाने झुंज देणारा शेतकरी परिस्थितीशी सामना करण्यात कुठे कमी पडला? नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार सन २०१४-१५ मध्ये देशभर शेतकऱ्यांच्या आत्महत्या दोन टक्क्यांनी वाढल्या. २०१५ मध्ये एकूण ८००७ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले. त्यापकी ३०३० म्हणजे ३७.८ टक्के इतके शेतकरी महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्र देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त राज्य आहे. तेलंगणा १३५८, कर्नाटक ११९७ यांचा यानंतरचा क्रमांक लागतो. ख्यातनाम पत्रकार पी. साईनाथ यांनी महाराष्ट्राचे वर्णन ‘आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची स्मशानभूमी’ असे केले होते. त्या वेळी अनेकांना त्यांचा राग आला. परप्रांतीय पत्रकारांनी महाराष्ट्राची बदनामी केली, अशी टीका झाली; पण या जळजळीत सत्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न कुणीच केला नाही.

आजपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्येची व त्यांच्या दारिद्रय़ाची वर्णने अनेकांनी आपली साहित्यिक प्रतिभा पणाला लावून नेटकेपणाने केलेली आहेत; पण त्याच्या कारणांची चिकित्सा मात्र या प्रतिभावंतांकडून कायमच उपेक्षित राहिलेली आहे. कै. शरद जोशी, पी. साईनाथ यांचे अपवाद सोडले तर कुणाही प्रतिभावंताची चिकित्सा मूळ प्रश्नांपर्यंत पोहोचलेली नाही. ते एवढे सोपेही नाही. देशामध्ये झालेल्या हरित क्रांतीनंतरचा बदललेला शेती व्यवसाय, आजूबाजूची स्थिती, निसर्गाचे बदलते चक्र, आíथक, सामाजिक, राजकीय परिस्थिती या सर्व गोष्टींचे आकलन करून घेतल्याशिवाय या प्रश्नांची उकल कठीण आहे.

मुळात शेतीचा शोध लावला तो स्त्रियांनी. पुरुष अन्नाच्या शोधात बाहेर गेलेला असताना गुहेच्या बाहेर असलेल्या जंगलात खाण्यायोग्य वनस्पती शोधून काढल्या, त्याचे उत्पादन करण्याचे तंत्र त्यांनीच विकसित केले, त्यातून शेतीचा शोध लागला. पुढे शेती हा त्यांचा जगण्याचा व्यवसाय बनला. शेती म्हणजे काय? तर अन्नधान्याचे उत्पादन. असे अन्नधान्य मानवी शरीराला सहजगत्या पचविता येईल. त्यातून ऊर्जा व शरीर संवर्धन करणारी कबरेदके (काबरेहायर्डेट्स) व प्रथिने निर्माण करणे म्हणजे शेती. अन्नधान्याच्या उत्पादनासाठी लागणारा सूर्यप्रकाश, जमीन, हवा सहज उपलब्ध आहे; पण पावसावर कोणाचेच नियंत्रण नाही. त्याच्या अनियमिततेमुळे शेतीचे अर्थशास्त्र बिघडते. निसर्गात घडणाऱ्या अनियमित घटनांमुळे रोगराई निर्माण होते. त्याचा फटका शेती व्यवसायाला बसतो. भारतीय शेतकरी या बाबतीत हतबल आहे, तो काहीच करू शकत नाही. गेली कित्येक पिढय़ा तो शेती करत आला; पण शेतीच्या तंत्रात त्याला फारसा बदल करता आला नाही. निसर्ग हा तर श्रेष्ठच आहे. निसर्गाबरोबर जमवून घेण्यास शेतकरी कमी पडला. कारण त्याने इमानदारीने फक्त शेतीच केली. त्याने उत्पादित केलेल्या अन्नधान्याचा उपभोग घेणाऱ्यांनी मात्र त्याचा फायदाच करून घेतला. शेतकऱ्याला मदतीचा हात कुणी दिलेला आहे? शेतकरी म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, पण कोंबडीला खायला घातले तरच ती जगू शकते आणि ती जगली तरच शरीरधर्माला जागून अंडी घालणार; पण कोंबडीच्या पोटाला कुणी घालतच नाही. ज्यांनी थोडे फार घातले त्यांनी कर्ज म्हणून घातले. कर्जही फेडता येत नाही आणि अंडीही घालण्याची ताकद राहिलेली नाही, अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे.

हरित क्रांती यशस्वी झाली. देशात अन्नधान्याचे उत्पादन वाढले व पर्यायाने देश अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला. गरजेनुसार राज्यकर्त्यांनी शेतकऱ्याला वापरून घेतले व सोयीस्कररीत्या वाऱ्यावर सोडले. रासायनिक खते व संकरित बियाणे यांच्या वापराने शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले, पण त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्याला सहन करावे लागले. अधिक उत्पादन देणारे संकरित वाण सहजगत्या रोगराईला बळी पडू लागले आहे. त्यांना निसर्गात होणारे बदल आणि पाण्याचा ताण सहन होईनासा झाला. रासायनिक खताच्या अति वापरामुळे जमिनीची सुपीकता ढासळली, कीटकनाशकाचा खर्च वाढला, त्यामुळे बघता बघता शेतीचा उत्पादन खर्च शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर गेला. जेवढी काटकसर करता येणे शक्य होते तेवढी काटकसर करण्याचा केविलवाणा पण प्रामाणिक प्रयत्न त्याने केला; पण यात तो आपल्या जमिनीचे संतुलन गमावून बसला. राज्यकर्त्यांच्या शेतीमालाच्या बाजारपेठेतील अमर्याद हस्तक्षेपामुळे शेतीमालाच्या भावात प्रचंड उलथापालथी होऊ लागल्या. सरकारची मेहेरबानी ज्या पिकावर असेल त्याला चांगला भाव मिळू लागला व पर्यायाने अशा पिकांकडे शेतकरी ओढला गेला. (उदा. ऊस आणि कापूस) परिणामी शेतीशास्त्रच बिघडले. नगदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्याने स्वत:च्या कुटुंबीयांच्या गरजेपुरती ज्वारी, बाजरी, हरभरा, भुईमुगासारखी पिके घेण्याचेही टाळले आणि त्याची पावले सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानाकडे वळली. त्याचा परिणाम असा झाला की, जमिनीला विश्रांती देणे, पीक फेरपालट करणे याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष झाले. ज्वारी, बाजरी, हरभरा, भुईमूग ही पिके घेणे बंद होताच गोठय़ातील जनावरेही गायब झाली. परिणामी शेतकरी दूध विकत घेऊ लागला. जमिनीला मिळणारे हक्काचे शेणखत बंद झाले. शेतकऱ्यांबरोबर जमिनीचेही आरोग्य बिघडले. आजच्या शेतीची अवस्था कोल्हापुरी पलवानासारखी झालेली आहे. उदा. कृष्णाकाठची वांगी, भोपळे, दूध, तूप खाऊन कुस्तीचा आखाडा गाजवणारा पलवान उदरनिर्वाहासाठी शेती करू लागतो. आíथक परिस्थितीमुळे त्याचा खुराक बंद होतो. तरी तरुणपणी कमावलेल्या पीळदार शरीराच्या जोरावर तो कशीबशी पन्नाशीपर्यंत शेती करतो; पण साठी जवळ येताच त्याचे शरीर साथ देत नाही. गुडघेदुखीसारख्या अनेक व्याधींनी जर्जर होतो. मात्र त्याला धड उभेही राहता येत नाही. तशीच अवस्था आजच्या शेतीची झालेली आहे.

शेतकऱ्यांच्या लुटीचा इतिहास फार जुना आहे. ज्या काळामध्ये चारा, पशुधन व धान्याचा साठा यालाच संपत्ती मानले जात होते त्या काळात शस्त्रांच्या बळावर शेतकऱ्यांची खळी व पशुधन लुटणारा एक ऐतखाऊंचा वर्ग तयार झाला. त्यांच्यापासून शेतीचे संरक्षण करणे ही नवीन जबाबदारी शेतकऱ्यांच्या उरावर येऊन बसली. त्यातल्या त्यात बलदंड लुटारू निवडून त्याच्यावर इतर लुटारूंपासून संरक्षण करण्याच्या अटीवर वर्षांला काही प्रमाणात पशुधन व अन्नधान्य खंडणी त्याने पुरविले. त्यातूनच एक प्रकारे शेतकऱ्यांची खळी लुटण्याची वहिवाट निर्माण झाली. ती आजतागायत चालू आहे. लुटारू तेच; मात्र लुटीची पद्धत बदलली. आता शस्त्रांचा धाक दाखवण्याऐवजी कायद्याचा बडगा दाखवून लूट होते. या सर्व लुटालुटीत त्याने शिवार फुलवायचे कसब प्राप्त केले; पण बाजारपेठ त्याच्या हातात राहिलेली नाही. ज्यांनी त्यांच्या संरक्षणाची हमी दिली, त्यांनीच त्याचे बाजारपेठेवर नियंत्रण राहू नये, याची पुरेपूर काळजी घेतली. त्यामुळे शेतकरी पिकवायला शिकला, पण पिकवलेले विकणे त्याला जमलेले नाही.

शेती व्यवसायासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा शासन व्यवस्थेने त्याला कधीच पुरवल्या नाहीत. आजचे राज्यकत्रे शेतकऱ्याला जागतिक बाजारपेठेत जाण्याचा सल्ला साळसूदपणे देतात, पण त्यासाठी पायाभूत सुविधा किती उपलब्ध करून दिल्या, हा संशोधनाचा विषय आहे. जागतिक बाजाराचे सोडा, स्वत:च्या शेतापर्यंत तरी पोहोचू द्या. शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचणारा रस्ता, वीज, पाणी, पतपुरवठा आणि बाजारपेठेच्या पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी जनतेकडून कर घेणाऱ्या सरकारची आहे; पण सरकारने या पायाभूत सुविधा त्याला कधीच पुरविल्या नाहीत. त्याला पांगळे करून ठेवण्याचा उद्योग केला. देशात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली की, शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या मालावर लेव्ही बसवायची, कवडीमोल किमतीने सरकारने खरेदी करायची. हा प्रकार वर्षांनुवष्रे चालू आहे. ज्या वेळी उत्पादन कमी असते, त्या वेळी टंचाई निर्माण होते व त्यातूनच तेजी तयार होते. भाव जास्त दिसत असला तरी उत्पादनच कमी असते. त्यामुळे शेतकऱ्याला मिळायचा तेवढाच पसा मिळत असतो; पण कृत्रिम रीतीने किमती पाडल्यावर मात्र उत्पादनही कमी आणि मिळणारी किंमतही अल्प, त्यामुळे त्याच्या घरात न भरून येणारा मोठा खड्डा तयार होतो. शेतकरी अक्षरश: खड्डय़ात जातो. याउलट परिस्थिती मंदीच्या वेळी असते. उत्पादन वाढलेले असते, म्हणूनच मंदी तयार होते आणि मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला तर तेजी तयार होते. मंदीच्या काळात सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडते. तूट असली तर लूट आणि मुबलकता असली तर लिलाव हे ठरलेलेच. देशातील अन्नधान्य ग्राहकाला खूश करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांची निर्दयपणाने कत्तल करते हे या खंडप्राय शेतीप्रधान देशातल्या शेतकऱ्यांचे दुर्दैव म्हणावे; तर शेतकऱ्यांची कत्तल करणारे पांढऱ्या कपडय़ातील कसाई स्वत:ला शेतकऱ्यांचा पोरगा आहे, असे अभिमानाने म्हणवून घेतात, हे त्यापेक्षाही मोठे दुर्दैव आहे. अन्नसुरक्षेच्या नावाखाली दोन रुपये व तीन रुपये किलो धान्याच्या भंपक योजना शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जातात. त्यामुळे राजकारण्यांना भरभरून मते मिळतात, पण बळीराजा मात्र अधिकच गाळात रुतत जातो. महाभारतातल्या युद्धभूमीवर दानशूर ‘मृत्युंजय’ कर्णाचा रथ चिखलात रुततो, तो काही केल्या निघत नाही. शेवटी त्याला धनुष्य खाली ठेवून खाली उतरून चिखलातला रथच बाहेर काढायचा प्रयत्न करावा लागतो आणि नेमक्या याच वेळी नि:शस्त्र कर्णाचा बळी अर्जुन घेतो. साऱ्या जगातल्या शेतकऱ्याची गत अशीच आहे. तो हतबल असतानाच त्याचा बळी घेतला जातो.

लेखक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि विद्यमान खासदार आहेत. ईमेल : rajushetti@gmail.com