शेतीच्या प्रश्नांविषयीची मांडणी करणाऱ्या या सदरातील आजचा लेख मात्र निराळा.. आत्मपर वाटेल असा; पण शेतीचा आणि शेतकऱ्यांचा विचार करण्याची ऊर्जा कोठून मिळते हे पुरेसे उलगडणारा..

माझे गाव म्हणजे कोल्हापुरातले शिरोळ. तालुक्याचे ठिकाण. एका बाजूने कृष्णा नदीचा अर्धचंद्राकृती पडलेला विळखा आणि दुसरीकडून पंचगंगेने तिला दिलेली गळाभेट, या संगमावर माझे गाव वसले आहे. दोन्ही नद्या ओसंडून वाहणाऱ्या; साहजिकच आमचा तालुका पाणीसमृद्ध. शिरोळचा गावगाडाच दिलदार आणि मनस्वी आहे. वैर असो नाही तर प्रेम, सर्व उघड उघड सांगणारा. म्हणूनच परदेशवारी केली किंवा आधी आमदार म्हणून मुंबईला जायचो, तेव्हा आणि आता खासदार झाल्यावर दिल्लीला गेलो तेव्हा- कुठेही गेलो तरी माझ्या गावगाडय़ाकडे परतण्याचीच ओढ लागते. माझ्या गावगाडय़ाचा माझ्यावर एवढा प्रभाव आहे की, सकाळी उठल्या उठल्या पक्ष्यांची किलबिल कानावर पडल्याशिवाय, गायी-गुरांचे हंबरणे ऐकू आल्याशिवाय आणि शेणामातीचा सुरेखसा दर्प नाकात शिरल्याशिवाय मला प्रसन्नच वाटत नाही. मला शेतात राबायला आणि मातीची कालवाकालव करायला खूप आवडते. त्यामुळेच राजकीय आणि सामाजिक कामातून वेळ मिळताच सगळ्यात आधी मी माझे घर आणि शेत गाठतो.

challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
municipal administration not in favour of cut water even lowest water storage in mumbai lakes
पाणीकपातीची गरज नाही! महापालिका प्रशासनाची भूमिका
Francis Scott Key Bridge in Baltimore
जहाजाची धडक अन् नदीवरील ब्रिज पत्त्यासारखा कोसळला, VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का!

आता राजकारणात पडल्यावर शेतात काम करण्याएवढा वेळ मिळत नाही. म्हणून शेतावर काम करण्यासाठी माणसे ठेवलेली आहेत. पण शेतीशी असलेला संपर्क तुटू नये म्हणून मी पूर्णवेळ काम करणारी माणसे ठेवली नाहीत. जेणेकरून अडी-अडचणीला मला शेतात धावायला लागले पाहिजे.. आणि अशी संधी हमखास मिळते. कारण माझे राहते घर शिरोळपासून एक-दीड कि.मी. अंतरावरल्या शेतातच आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री किंवा भल्या पहाटे शेतात – गोठय़ात धावायची वेळ आली तर  मलाच धावायला लागले पाहिजे आणि अशी संधी हमखास मिळते.

मी मुळात शेतकरीच आहे. त्यामुळे शेतात खपताना किंवा गोठय़ातले शेण काढताना या कामाचे काहीच वाटत नाही. मी त्यात एकदम ‘प्रशिक्षित’ आहे. आजही कधी गावी घरी असलो आणि गाभण असलेली गाय रात्री-अपरात्री अडली, तर बायको सगळ्यात आधी मलाच उठवते, कारण अडलेल्या गायीला सोडवणे हे मोठय़ा कसबाचे काम. ते कुणालाही सहजासहजी जमत नाही. गाय अडून  हंबरत असते तेव्हा अंगावर काटा येतो. तिचे हंबरणे- विव्हळणे सहन होत नाही. पण तेव्हाच खरी तिला आपल्या मदतीची गरज असते. कारण वासराचे पाय बाहेर आलेले असतात आणि बाकी संपूर्ण शरीर गर्भाशयातच अडकलेले असते. अशा वेळी हळुवारपणे तिला कमी वेदना होतील याची काळजी घेत, वासराचे पाय खेचून त्याला बाहेर काढायचे. पण हेच काम मोठे कठीण. गर्भाशयातील द्रवामुळे वासराचे संपूर्ण शरीर बुळबुळीत झालेले असते. त्यामुळे कितीही बाहेर खेचायचे म्हटले तरी वासराचे पाय हातातूत निसटतात. अशा वेळीच, शेतात-गोठय़ात काम करणारा किती अनुभवी आहे, याची ओळख पटते. जे नियमित अडलेल्या गाईंची सोडवणूक करतात, ते जातानाच आपल्याबरोबर चुलीतील राख घेऊन जातात. हाताला राख फासायची आणि गायीच्या जननमार्गातून अर्धवट बाहेर आलेले वासराचे पाय खेचायचे. हाताला राख फासल्यामुळे वासराच्या पायावरची पकड घट्ट होते. आणि थोडा जोर लावताच ते वासरू सुखरूप बाहेर येते आणि काही क्षणांत टुण्कन उडी मारून आपल्या लटपटत्या पायावर उभे राहते. हे दृश्य लोभस असते. त्या वेळी गायीच्या डोळ्यातही कृतज्ञ भाव असतात. डोळ्यात काठोकाठ वात्सल्य भरलेली नजर मी कधीच विसरू शकत नाही. अडलेल्या काळामध्ये गाय किंवा म्हैशीबरोबर जो असतो आणि त्या अजाण जनावराला पाठीवर जो हात फिरवून धीर देतो, त्याला ते मूक जनावर कधीच विसरत नाही. विशेषत: महिलांना तर अजिबात विसरत नाही. आणि जो नेहमी त्या अडलेल्या गाई-म्हशीला मदत करतो त्यानेच आपल्या कासेत हात घालून धार काढावी, अशी त्या मुक्या जनावरांची भावना असते म्हणून कुटुंबातल्या एकाच कुणाला तरी ते धार देत असतात, जे सतत त्यांच्या सान्निध्यात असतात.

अशा अडलेल्या गाई मी आजवर अनेकदा मोकळ्या केलेल्या आहेत. तिथे मी आमदार-खासदार नसतो. तिथे मी गाईंचा गुराखी आणि शेतात राबणारा शेतकरी असतो. तिथेच माझ्यातला शेतकरी मला नव्याने गवसतो. मला माझ्या कामाची ऊर्जा अशा कामांतूनच मिळते. म्हैस व्याल्यानंतर पहिला चीक (खरवस) जो निघतो तो अतिशय पौष्टिक असतो. त्याच्यावर खरा हक्क वासराचा असतो. शेतकरी  श्रद्धेने या पहिल्या चिकातील काही हिस्सा ग्रामदैवताला आणि सगळ्याच देवांना अर्पण करतात. त्याचबरोबर शेजारी-पाजारी वाटतात. ते भांडे कुणी रिकामे परत देत नाही. त्यात काहीना काही धान्य घालून ते परत देतात. ही गावगाडय़ाची संस्कृती आहे.

मी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर भांडतो, तेदेखील याच उद्देशाने. उसाला किंवा दुधाला योग्य भाव मिळावा म्हणून मी माझ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरतो. तेव्हा मी शेतकऱ्यांचा पुढारी – नेता वगरे कुणीही नसतो. मी त्यांच्यापकीच एक असतो. शेतकऱ्यांबरोबर राहून किंवा माझ्या गावगाडय़ाच्या मातीशी इमान राखण्यातूनच मला, लढण्याची ऊर्जा मिळत असते. मुख्य म्हणजे मी जेव्हा शेतकऱ्यांसाठी लढतो. तेव्हा वेगळे काही करतोय अशी भावनाच मनात नसते. कारण मदत करणे आमच्या गावगाडय़ाच्या रक्तातच आहे.

गावगाडय़ात लागलेली ही मदतीची सवय मला महत्त्वाची वाटते. किंबहुना तीच, माणसे जिवंत असल्याची एकमेव खूण आहे. अलीकडेच कर्नाटक सीमेवर असलेल्या कुन्नूर – मांगूर गावाहून मी चाललो होतो. मांगूरला मला एक ओळखीचा शेतकरी भेटला. कोल्हापुरात त्याचा एक नातेवाईक स्वाईन फ्लूने आजारी होता आणि एका तासात त्याला रक्त न मिळाल्यास तो वाचण्याची शक्यता जवळपास नव्हतीच. त्यात त्याचा बी-निगेटीव्ह असा रक्तगट होता. त्या शेतकऱ्याने माझ्याकडे मदतीच्या अपेक्षेने पाहिले. मी लगेच माझ्या कार्यकर्त्यांना फोनाफोनी केली आणि आश्चर्य म्हणजे मी सांगितले म्हणून अवघ्या एक तासाच्या आत बी निगेटिव्ह रक्तगट असलेले आसपासच्या गावांतील चार तरुण मिळाले. खरे तर गरज एका बाटलीचीच होती. पण ऐनवेळेला गरज लागली तर म्हणून चौघेही ताबडतोब कोल्हापूरला पोहोचले. गावाकडे मदतीची ही तत्परता मला खूप महत्त्वाची वाटते.

माणूस म्हणून परस्परांवर असलेल्या विश्वासावरच तर आमचा गावगाडा चाललेला आहे. २००५ सालातल्या पावसाळ्यातली एक गोष्ट सांगतो. त्या वर्षी जुल महिन्यात मुसळधार पाऊस पडून संपूर्ण शिरोळ तालुका पाण्याखाली गेला होता. बघावे तिकडे नुसते रोरावत धावणारे पाणीच. पकी बस्तवाड गावाचा तर कित्येक दिवस पूर्णपणे संपर्कच तुटलेला होता. मदतीसाठी लष्कराला बोलावले होते. पाण्याचा रुद्रावतार बघून तेही काही करू शकले नाहीत. दिवस जात होते, तसा त्या गावातील लोकांचा धीर सुटत चाललेला होता. त्यांच्या खाण्याचेही हाल होत होते. शेवटी मीच धाडस करण्याचे ठरवले. एका होडीत घेता येईल तेवढा धान्यसाठा, औषधे आणि काही कार्यकत्रे व डॉक्टरांना सोबत घेऊन मी त्या गावाकडे निघालो. गाव तसे जवळ होते, पण जोरदार वेग असलेल्या प्रवाहाला टाळण्यासाठी आम्ही वेडीवाकडी वाट करत बस्तवाड गावी पोहोचलो. तिथली अवस्था खरोखरच फार वाईट होती. तीन-चार जण तर आजारी पडले होते. त्यांना अजूनही काही काळ डॉक्टरी उपचार मिळाले नसते तर ते वाचण्याची शक्यता नव्हती, पण वेळेत मदत मिळाली आणि सगळेच चांगले झाले. मात्र खरी कसोटी पुढेच होती. आम्ही तिथून निघालो, पण किनाऱ्याकडे पोहोचेपर्यंत मध्येच काळोख पडला. पुढचे काही दिसेना. पाण्याचा प्रवाहदेखील जोरदार. त्यात होडी कलंडता कलंडता वाचली आणि दोन झाडांच्या मध्येच बेचक्यात अडकली. मग सगळ्यांचाच धीर खचला. पाण्याचा वेगही वाढत होता. होडी जिथे झाडाकडे अडकली होती, त्या झाडाकडे आधार म्हणून पाहिले, तर त्या झाडावर साप – िवचवांचे साम्राज्य होते. आमच्या एका कार्यकर्त्यांला िवचू चावलाही, पण आरडाओरड करून काहीही फायदा नव्हता. मी साऱ्यांनाच धीर एकवटायला सांगितला. आणि थोडा जोर लावून ती होडी झाडाच्या बेचक्यातून कशीबशी बाहेर काढली. नंतर बऱ्याच वेळाने आम्ही सुखरूप किनाऱ्याला लागलो.

किनाऱ्याला लागल्यावरच मला खऱ्या अर्थाने मी उचललेल्या जोखमीची कल्पना आली. खरे तर मी बरोबर घेतलेल्या सगळ्यांनाच पोहता येत नव्हते. आणि पाण्याचा प्रवाह बघितल्यावर पट्टीच्या पोहणाऱ्याचेही पाण्यात उडी घेण्याचे धाडस झाले नसते. माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन मी धाडस केले, कारण संपर्क तुटलेल्या गावातल्या लोकांना आपल्या बरोबर कुणी तरी आहे असा विश्वास  वाटणे जरुरीचे होते. विशेष म्हणजे आम्ही किनाऱ्याला परत येईपर्यंत शासनातील एक मंत्री किनाऱ्यावर धावती भेट देऊन निघून गेले होते. पण त्यांच्यात आणि  माझ्यात तोच फरक आहे. मी आमदार नाही, मी खासदार नाही, सगळ्यात आधी मी माणूस आहे, माणुसकी जपणे माझे कर्तव्य आहे. मी तेच केले.

त्याचेच फळ मला या वेळच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मिळाले. मी माझ्या मतदारसंघात दोन सभा घेतल्या. घरोघरी किंवा गावोगावी फिरलोच नाही. फिरायची गरजच नव्हती. कारण मी शेतकरी आहे आणि माझी व माझ्या मतदारसंघाची सुखदु:खे सारखीच आहेत. ते माझ्याशी आणि मी त्यांच्याशी असा मातीने-कर्माने आणि सुखदु:खाने जोडला गेलोय, म्हणून न सांगताही त्यांनी मलाच निवडून दिले. लोकसभेतले हे यश माझ्या गावगाडय़ाचे आणि गावगाडय़ाशी माझ्या बांधिलकीचे आहे.

लेखक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि विद्यमान खासदार आहेत. ईमेल : rajushetti@gmail.com