मुलांना जाणून घ्यायला, चित्रकलेसारखं प्रभावी माध्यम नाही हा साक्षात्कार मला झाला. त्यांना आनंद देणाऱ्या या माध्यमाचा वापर त्यांच्या शिक्षणासाठी केला तर ती चटकन शिकतील हेही समजायला लागलं. कारण लहानग्यांची चित्रंही तेवढीच आणि तितकीच अर्थपूर्ण असतात. त्यांच्या चित्रातील प्रत्येक रेघ आणि रेघ आपल्याशी बोलत असते..

दहीहंडीनंतरचा दिवस होता. आदल्या दिवशी दिवसभर सगळीकडे दहीहंडीची धामधूम सगळ्यांनीच पाहिली होती. दुसऱ्या दिवशी वर्गात सगळी मुलं त्याच्याविषयीच चिवचिवाट करत होती. बहुधा सगळ्यांनी आपापल्या बाल्कनीतून, वडिलांच्या, काका-मामांच्या खांद्यावरून गोविंदाची मजा बघितली होती. वरून गोविंदांच्या अंगावर पाणी फेकलं होतं, ढॅणढॅण गाण्यांवर नाचले होते. तो उत्साह दुसऱ्या दिवशीही टिकून होता. त्यांना एक एक कोरा कागद देत सहज म्हटलं, ‘चित्र काढू या का आपण दहीहंडीचं?’ विषय सांगितला खरा, पण समोर पाच ते साडे पाच वर्षांची मुलं. काय काढू शकतील अशी जराशी शंका मनात होतीच.

ओंकार अत्यंत मस्तीखोर मुलगा होता. दोन सेकंदही एका जागेवर न बसणारा. त्या दिवशी चित्र काढायला पेपर दिल्यावर जवळ जवळ पंधरा ते वीस मिनिटं कोणाशीही काहीही न बोलता खाली मान घालून शांतपणे काहीतरी काढत होता. माझी उत्सुकता ताणली गेली. मी हळूच त्याच्या पाठीमागे जाऊन बसले आणि आश्चर्याने थक्क झाले. संपूर्ण पेपरभर भरपूर चौकोन ज्याला वरची बाजू नाही आणि त्याच्यामधे बारीक बारीक भरपूर गोल. ते एक बाजू नसलेले चौकोन हे त्याचे ट्रक होते आणि ते बारीक बारीक गोल म्हणजे ट्रकमधून येणाऱ्या माणसांची डोकी. त्याने दहीहंडीसाठी ट्रक भरभरून येणारी माणसं काढली होती. कागदावरचं चित्र बघून खरंच ते माणसं भरभरून येणारे ट्रक डोळ्यासमोर आले. असं तो पानभर काढत होता. केवढी एकाग्रता, केवढी बैठक! त्याच्या वयाच्या मुलाकडून अचंबित करणारी गोष्ट होती ती. ओंकारसारख्या मस्तीखोर मुलाकडून तर ते अशक्य कोटीतील होतं. पण एका चित्रामुळे ते त्याला जमलं होतं.

मुक्तखेळात जशी मुलं स्वत:ला व्यक्त करतात तशीच चित्रकलेतही ती स्वत:ला छान व्यक्त करू शकतात. खेळांप्रमाणेच चित्र काढणं (दिलेली ठोकळेबाज चित्र रंगवणं नाही) हेही मुलांना आनंदी करणारं माध्यम आहे हे माझ्या हळूहळू लक्षात यायला लागलं होतं. मूल केव्हा शिकतं? तर जेव्हा ते आनंदी असतं तेव्हा. मग ते आनंदी केव्हा असतं? तर जेव्हा त्याला मनासारखं वागायला मिळतं, काही करायला मिळतं, तेव्हा. म्हणजेच जेव्हा मुलांना मनासारखं वागायला आणि करायला मिळतं तेव्हा ती शिकतात असं म्हणता येईल. मग त्यांना जे करायला आवडतं तेच आपण आपल्या वर्गात का बरं करायचं नाही? एवढय़ा साध्या सोप्या विचाराने मुलांचं शिकणं सहज होतं. त्यांच्या चित्रांमधून ती आपल्याशी बोलतात, संवाद साधतात हे उमजायला लागलं. मुलांना जाणून घ्यायला, चित्रकलेसारखं प्रभावी माध्यम नाही हा साक्षात्कार मला झाला. त्यांना आनंद देणाऱ्या या माध्यमाचा वापर त्यांच्या शिक्षणासाठी केला तर ती चटकन शिकतील हेही समजायला लागलं. मोठमोठय़ा चित्रकारांची प्रदर्शनं बघताना आपण त्यांच्या चित्रातले अर्थ शोधतो, तसाच आणि तेवढाच प्रयत्न आपल्याला या लहानग्यांच्या चित्रांतला अर्थ समजून घ्यायला करावा लागतो. कारण ती चित्रंही तेवढीच आणि तितकीच अर्थपूर्ण असतात. त्यांच्या चित्रातीलही प्रत्येक रेघ आणि रेघ आपल्याशी बोलत असते. त्यांच्यामधे दडलेल्या क्षमतांची जाणीव त्या चित्रांमधून ती आपल्याला करून देतात.

प्रणव वर्गातला सगळ्यात शांत मुलगा. नेहमी विचारपूर्वक बोलायचा. निरीक्षणशक्तीही अफाट. वर्गातले छोटे छोटे बदल त्याला पटकन उमजायचे, तसं तो सांगायचाही. एकूण सगळ्याच विषयांवर विचार करण्याची त्याची वृत्ती होती. दहीहंडी म्हटल्यावर ओंकारला ट्रकभर माणसं आठवली. प्रणवने बहुतेक घरातल्या मोठय़ांच्या बोलण्यात दहीहंडीच्या दिवशी होणाऱ्या अपघातांविषयी ऐकले असावे. त्याच्या चित्रातून त्याने एक चांगला उपाय शोधून काढला होता. कागदावर वरच्या बाजूला एक लांबच लांब टांगलेली दोरी काढली. त्याच्यावर मधोमध एक हंडी टांगलेली होती. त्या हंडीच्या खाली एक लांब शिडी आणि त्यावर चढणारा एकच माणूस. बाकी खाली अजिबात माणसांची गर्दी नव्हती. बहुधा त्याला सांगायचं असावं की कशाला ते थर लावायचे, धडपडायचं आणि पडायचं. त्यापेक्षा अशी शिडी लावा काम फत्ते होऊन जाईल. त्याला समस्या समजली होती आणि त्याच्यापरीने त्याने उपायही शोधला होता.

दहीहंडीच्या चित्रांवरून आठवलं, अशीच एकदा मी मुलांना पाय तुटलेल्या चिमणीची गोष्ट सांगितली. गोष्टीत चिमणीचा पाय तुटतो. तिच्या एका पंखाला जखम होते. तिला उडता येत नाही. त्यामुळे अन्न शोधायला तिला जाता येत नाही. तिला भूक लागलेली असते, तहान लागलेली असते. तिचे नेहमीचे मित्र तिला बिचारीला मदत करत नाहीत. पण एक कोंबडा तिला मदत करतो. हे सगळं वरून सूर्यदेव बघत असतो. तो कोंबडय़ावर खूश होतो आणि बक्षीस म्हणून त्याच्या डोक्यावर लाल तुरा देतो अशी काहीशी ती गोष्ट होती. गोष्ट सांगून झाल्यावर मी मुलांना कागद दिले आणि गोष्टीचं चित्र काढू या असं म्हटलं. तेव्हा तो माझ्यासाठी नवीन प्रयोग होता. मुलं नक्की काय काढतील हे लक्षात येत नव्हतं. थोडय़ावेळानं लक्षात आलं प्रत्येकाने कागदावर काही ना काहीतरी काढलेलं होतं. त्यांच्याशी बोलले तर जाणवलं की त्या गोष्टीतली जी घटना त्यांच्या मनावर ठसली होती तिचं चित्र काढलं होतं. कोणाच्या चित्रात फक्त पाय तुटलेली आणि पंखाला जखम झालेली चिमणी होती. कोणाच्या चित्रात तिला मदत न करणारे तिचे मित्र होते. कोणी सूर्यबाप्पा काढला होता. कोणी तिला मदत करणारा कोंबडा काढला होता. अवनीने संपूर्ण गोष्टीचे चित्र काढलं होतं. सूर्यबाप्पाने कोंबडय़ाला दिलेला लाल तुरा अगदी स्पष्ट काढला होता. मुलांनी नेमकी कोणती मूल्यसंकल्पना उचलली आहे हे त्यांनी त्यांच्या चित्रांमधून अत्यंत प्रभावीपणाने सांगितलं होतं, जे कदाचित त्यांना शब्दातून सांगता आलं नसतं.

चित्रकला हा खरा म्हणजे माझा प्रांत नाही. अमूर्त चित्रकलेची प्रदर्शनं बघताना तर त्या चित्रांमधला अर्थ शोधणं माझ्यासाठी जिकिरीचं काम असतं. पण अशा अनेक प्रसंगांनंतर मला जाणवलं की मुलांच्या भावविश्वात डोकावण्यासाठी चित्रकलेसारखं प्रभावी माध्यम नाही. त्यांना समजून घेताना चित्रकला जादू करू शकते. मग मी त्याचा भरपूर वापर माझ्या वर्गात नेहमीच करत गेले. स्नेहसंमेलनात त्या वर्षी विंदांच्या कविता असा विषय होता. अर्थातच वर्गात दर दिवशी विंदांच्या कवितांचा पाऊस पडत असे. जरी स्नेहसंमेलनासाठी ‘अक्कड गावचा फक्कड राजा’ ही कविता बसवली होती तरी त्यांच्या काव्यसंग्रहातल्या सगळ्या कविता आम्ही वर्गात म्हणत होतो. ‘एटू लोकांचा देश’ तर सगळ्यांचाच आवडीचा. स्नेहसंमेलन झाल्यावर ओळख काढून आम्ही विंदांना भेटायला जायचं ठरवलं. त्यांच्या कवितांवरच्या लहान मुलांच्या कार्यक्रमाविषयी आणि एकूणच कौतुक सोहळा सांगण्यासाठी. मी मुलांना म्हटलं, ‘ज्या आजोबांनी या कविता लिहिल्या आहेत त्यांना मी तुम्हाला त्यांच्या कविता खूप आवडतात हे सांगायला जाणार आहे. त्यांच्यासाठी तुम्ही एटू लोकांची, त्यांच्या देशाची, त्यांच्या घरांची चित्र काढून द्याल का.’ गंमत म्हणजे एक दीड तासात सगळ्यांनी अनेक छान छान चित्रं काढली. जशी पुस्तकात आम्ही बघत होतो अगदी तशीच. चित्रांगने तर रात्रीच्या वेळचं बोटीनं फिरण्याचं अप्रतिम चित्र काढलं. या चित्रांनी मुलांना त्या कवितांचं किती छान आकलन झालंय याचा अंदाज आला. (विंदांना ही चित्रं दाखवली, तर त्यांनीही समाधानाने मान डोलवली.)

मुलं प्रत्येक गोष्टीचं चित्र काढू शकतात. चाळीस पाठकोरे कागद हे माझ्या शाळेच्या बॅगेमधले अविभाज्य घटक झाले. गणित, भाषा, परिसर असा विषय कुठलाही असो आम्ही चित्र काढणारच, असा आमचा फंडा झाला. मुलांनाही नंतर नंतर स्वत:हून चित्र काढायची सवयच झाली. मी काहीही गप्पा मारल्या की ती आपणहूनच विचारायला लागली आता आपण त्याचं चित्र काढू या. ‘बालनिर्णय’ या आमच्या शाळेच्या कॅलेंडरसाठी मुलांना ‘पृथ्वी वाचवा’ असा विषय देऊ  या असं वाटत होतं. हा विषय मुलांसाठी खूप जड आणि रूक्ष वाटत होता. ‘पृथ्वी वाचवा’ म्हणजे नेमकं काय वाचवायचं, तर पृथ्वीवरील नैसर्गिक संपत्तीचं जतन करायचं. वर्गात चित्र काढणारी आमची टीम आणि मी बसलो होतो. मुलांशी बोलल्यानंतर हा हा म्हणता मुलांनी पाणी वाचवा, समुद्रसंपत्तीचं संरक्षण करा, जंगलाचं रक्षण करा, झाडं लावा, प्राणी वाचवा, पक्षी वाचवा, वीज वापर नीट करा अशा प्रकारची बरोबर बारा चित्र काढली होती आणि तीसुद्धा वर्गात माझ्यासमोर. तो अनुभव माझ्यासाठी थक्क करणारा होता. ज्यांच्यासाठी हा विषय बोजड आहे असं मी समजत होते त्यांनी तो माझ्यासाठी सोप्पा करून दाखवला होता.

एकदा ही जादूची कांडी सापडल्यावर मी मुक्तहस्ताने तिचा वापर करायला लागले. भाषा शिकवताना नेहमीच्या आमच्या चित्रांवरून समान अर्थी, विरुद्ध अर्थी शब्दांची ओळख करून दिली. त्यानंतर मुलांना शब्द जोडय़ांची चित्रं काढायला सांगितली. उंच-बुटका, जाड-बारीक, आत-बाहेर, भरलेला-रिकामा एकापेक्षा एक सरस विरुद्ध अर्थी जोडय़ांची चित्रं काढली. जोडीच्या शब्दांबाबतीतही कुलूप-किल्ली, कप-बशी, बूट-मोजा अशा नेहमीच्या जोडीच्या शब्दांच्या चित्रांबरोबर, टी.व्ही.-रिमोट, पाऊस-मोर, पाऊस-छत्री, पोपट-पिंजरा, कॉम्युटर-माऊस अशा अनेक जोडय़ांची चित्रं काढली. एकवचन-अनेकवचनाची भरपूर चित्रं काढली. एकाच अक्षराची अनेक चित्रं, जसं की म- माळ, मडकं, मणी, माती, माकड, मध, मोर, मोजा, मका, मोती, मान, माणूस. अशा प्रकारे जवळपास सगळ्या अक्षरांची भरपूर चित्रं काढली. चित्ररूपी वाक्य वाचनासाठी तयार केली. तशीच चित्रं गणनपूरक संकल्पनांसाठी काढली. क्रमवारी, तुलना, एकासएक संगती, संख्याचिन्ह ओळख, मोजणी, दशक संकल्पना, सगळ्या संकल्पनांची चित्रं, मुलांनी त्यांच्या आकलनानुसार आणि कल्पनाशक्तीनुसार काढली. चढता क्रम, उतरता क्रम दोन्हीसाठी छान चित्र जिने काढले होते मुलांनी. परिसर विषयातही झाडं, हवा, पाणी, मी आणि माझे अवयव, माझं कुटुंब, भाज्या, फळं, वाहनं, फुलं, चैत्रगौर, गणपती, भोंडला आणि अजून बरंच काही. मला आठवतं आम्ही कशाचीही चित्रं काढायची बाकी ठेवत नसू.

खरं सांगायचं तर विविध संकल्पना मुलांना कळल्या आहेत किंवा नाही हे समजून घेण्यासाठी शाळांमधून वर्कशीट्स रंगवायला देतात किंवा सोडवायला देतात, तशा आमच्या या वर्कशीट्स होत्या. मला स्वत:ला याचा खूपच फायदा झाला. एखादी संकल्पना मुलापर्यंत पोहचली आहे किंवा नाही, समजली असेल तर कितपत स्पष्टपणे समजली आहे किंवा कोणाला अजून त्याबाबतीत समजावून सांगणं गरजेचं आहे याचं अचूक मार्गदर्शन मुलंच मला त्यांच्या चित्रातून करून देत असत. मला फक्त त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ज्याला मदत हवी असेल, त्याला ती करायची एवढंच काम असे.

‘मूल केव्हा शिकतं’ या प्रश्नाचं उत्तर जसं ‘त्याच्या मनासारख्या केलेल्या गोष्टींतून’ हे आहे, तसं माझ्या एवढय़ा वर्षांच्या अनुभवाने ‘मूल कसं शिकतं’, या प्रश्नाचं उत्तर ‘स्वत: काढलेल्या चित्रांतून’ असं देता येईल. खरोखरीच माझ्या लहान लहान चित्रकार मित्रांनी आपल्या ‘महान’ चित्रांतून त्यांचं जग समजून घ्यायला मला नक्कीच खूप मदत केली आहे.

रती भोसेकर

 ratibhosekar@ymail.com