खूप वेळा असं घडताना दिसतं की जेव्हा आयुष्याला प्रचंड गती असते तेव्हा नवरा-बायकोंना एकमेकांची स्वभावभिन्नता जरी खुपत असली तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मग आपापली वाट शोधली जाते. पण तरीही मन असमाधानीच असेल तर सहजीवनाचा धांडोळा घेण्याची गरज असते. सहजीवनातले तिढे सोडविणं सोपं नसलं तरी अशक्यही नसतं. त्यानं पानगळीनंतर पालवी फुटण्याची शक्यता असते.. 

‘आमचं लग्न अगदी चहा-पोहे पद्धतीनं झालेलं. गिरीश उच्चशिक्षित. आर्थिक स्थिती उत्तम. काडीचं व्यसन नाही. पण थोडय़ाच दिवसांत माझ्या लक्षात आलं की त्याला कशातच रस नाही. चित्रपट, प्रवास, खरेदी, गृहसजावट हे माझे आवडीचे विषय. लग्न झाल्या झाल्या मी आग्रहाने त्याला चित्रपटाला घेऊन गेले पण तो अध्र्यात झोपला. त्याचा आखीव-रेखीव दिनक्रम ठरलेला. पहाटे उठून व्यायाम. ९ ते ७ ऑफिस. आल्यावर बातम्या. जेवण. झोप. सेक्ससुद्धा ठरलेल्या दिवशी. ठरावीक पद्धतीनं. कुणाच्या अध्यात-मध्यात न पडण्याचा स्वभाव. त्यामुळे जगाच्या दृष्टीनं देवमाणूस. त्याला कसली आवड नसली तरी त्यानं मलाही कशाला अडवलं नाही. मी किमती वस्तूंनी घर सजवलं तरी आडकाठी नाही पण दादही नाही. पानात पालेभाजी वाढा नाही तर खास पदार्थ. तो न बोलता जेवणार. मी त्याच्या स्वभावाशी जुळवून घेतलं. मैत्रिणींबरोबर देशविदेश हिंडले. मौजमजा केली. आजकाल दोन्ही मुलं नोकरी निमित्त बाहेरगावी असतात. त्या आधी शिक्षणानिमित्त असायची. म्हणजे घरात आम्ही दोघंच असण्याची ही काही पहिली वेळ नाही. पण आजच दोन अनोळखी जीव एका घरात राहात असल्याची भावना इतक्या तीव्रतेनं का जाणवतेय? जाचतेय? पती-पत्नीच्या नात्यामध्ये ऋतुचक्राप्रमाणे बदल होत असतात. मी मात्र आयुष्यभर आमच्या नात्यात शिशिरातील पानगळ अनुभवली. आता प्रत्यक्ष शिशिर अवतरल्यावर पिकल्या पानांची परिपक्वता वाटय़ाला येणं तर दूरच पण गळून पडण्याइतकं पानही उरलेलं नाही. आताशा मी रात्र रात्र जागी असते. कोणत्याच गोष्टीत मला स्वारस्य राहिलेलं नाही. ना घर नीट ठेवावंसं वाटतं, ना उठून प्रवासाला जावंसं वाटतं, आम्ही दोघं म्हणजे दोन वठलेली खोडं. एकमेकांशी काहीही लागेबांधे नसलेली. मातीत मिसळून जायची वाट पाहात बसलेली.’

नयनाचं हे पत्र वाचताना कुणालाही वाटावं की वयाची ऐंशी वर्षे तिनं पार केली असावीत. प्रत्यक्षात मात्र तिचं वय आहे छप्पन्न आणि गिरीशचं साठ. तिच्या पत्रातून व्यक्त होणारं कमालीचं नैराश्य जाणवलं आणि मर्ढेकरांच्या ‘शिशिरागमन’ या कवितेतील काही ओळी आठवल्या.

शिशिर्तुच्या पुनरागमे, एकेक पान गळावया

का लागता मज येतसे, न कळे उगाच रडावया.

नयनाला येणारं रडू ‘उगाच आहे’ का त्यात खरंच काही तथ्य आहे हे पडताळून पाहायचं ठरवलं. तिच्या संमतीनं मी गिरीशशी संपर्क साधला. त्याच्याशी बोलल्यावर लक्षात आलं की त्याच्याबरोबरच्या संसारात नयनाला खूप पोकळी जाणवत आहे याची त्याला कल्पनाही नव्हती. नयनानं सांगितल्याप्रमाणे तो मितभाषी आणि सरळमार्गी माणूस. त्याच्या हुशारीमुळे तो नोकरीमध्ये वरच्या पदाला पोचला. घरची आघाडी सांभाळायला नयना समर्थ आहे या विश्वासानं निश्चिंत असायचा. त्याच्या दृष्टीनं तिच्या आवडीनिवडी जपायचा. दोघांचे स्वभाव भिन्न तशा आवडीनिवडीही भिन्न. तिला दूरचित्रवाणी मालिका बघायच्या असायच्या तर याला बातम्या. हे  लक्षात आल्यावर त्यानं लगेच अजून एक दूरचित्रवाणी संच घरात आणला. अशा काही बारीकसारीक गोष्टी त्यानं आठवून सांगितल्या. परंतु या गोष्टी तिला खूश करायला पुरेशा नाहीत याची त्याला जाणीव नव्हती. त्यामुळे त्याच्याबरोबरच्या संसारात ती सुखी नाही, पूर्वीही नव्हती, हे कळल्यावर त्याला प्रचंड धक्का बसला.

खूप वेळा असं घडताना दिसतं की जेव्हा आयुष्याला प्रचंड गती असते तेव्हा एकमेकांची स्वभावभिन्नता जरी दुखत-खुपत असली तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आपलं मन रमविण्यासाठी आपापली वाट शोधली जाते. खरंच ती वाट असते की पळवाट? नयनानंही आपली वाट शोधली. प्रवास, खरेदी, चित्रपट या सगळ्या गोष्टी तिला आवडतात म्हणून तिनं केल्या. परंतु त्या करताना त्यामधून कायमस्वरूपी आनंद मिळविण्यासाठी काय करता येईल याचा विचार तिनं केला का? का प्रत्येक गोष्टीकडे तिनं फक्त ‘टाइमपास’ म्हणून पाहिलं. वेळ जाण्यासाठी म्हणून चित्रपट पाहिले. पण त्यांचा आस्वाद कसा घ्यायचा असतो हे शिकण्यासाठी तिनं जर एखादा कोर्स केला असता तर आज त्यामधील तिचा रस आटून गेला नसता.

नयनाला वाटतं की दोघांमध्ये कधी संवाद निर्माण झाला नाही, कारण दोघांचे स्वभाव वेगळे आहेत त्यामुळे जगणं अस झालं आहे. प्रत्यक्षात मात्र भिन्न स्वभाव, भिन्न आवडीनिवडी यामुळे एकत्र राहणं अस होत नाही तर भिन्नता नसावी, असा आग्रह धरल्यामुळे होतं. पती-पत्नीसंदर्भात ‘मेड फॉर इच अदर’ हे विधान आपण फार उथळपणे वापरतो. दोघांचं दिसणं, शिक्षण, आर्थिक स्तर समान असेल तर त्यावर अनुरूपता ठरवली जाते. प्रत्यक्षात मात्र दोन व्यक्ती समानधर्मी असण्यापेक्षा परस्परपूरक असणं जरुरीचं असतं. एखादी व्यक्ती अतिसंवेदनशील असल्यामुळे वाहवत जाण्याची शक्यता असते. अशा वेळी तिचा जोडीदार व्यवहारी असेल तरच संसारात समतोल राखला जातो. अशा परस्परपूरक जोडय़ा अपवादानं असतात. परस्परपूरक होण्यासाठी दोघांनी मिळून प्रयत्न केले तर दोन विरुद्ध स्वभावाची माणसं समांतर आयुष्य न जगता एकमेकांसोबत जगू शकतात. हा प्रयत्न नयना आणि गिरीशनं केला पण समजून-उमजून केला नाही. नयनाच्या बाजूने तर तिनं तो नाइलाज म्हणून केला.

गिरीशच्या स्वभावातील अलिप्तता आपण स्वीकारली असं नयनाला वाटतंय. पण तोही तिचा भ्रम आहे. त्यामुळे आजही त्याच्या स्वभावातील अनेक गोष्टींविषयी तिच्या तक्रारी आहेत. तक्रारींना कधीच कोणी उत्तरं देऊ  शकत नाही. तक्रारीच्या मुळापाशी जाता आलं तर नेमकी समस्या काय आहे ते समजून घेता येतं. नयनाची मूळ समस्या आहे ती गिरीश आहे तसा स्वीकारता न येण्यामागची असहायता. याउलट गिरीशशी बोलताना जाणवलं की नयनाविषयी त्याची तक्रार नाही. तिच्या आवडत्या गोष्टी ती मनापासून करते याचा अर्थ ती संसारात सुखी आहे असं त्यानं गृहीत धरलं. त्याची चूक झाली ती असं गृहीत धरण्याची. नोकरीच्या ठिकाणी त्यानं मिळवलेलं यश वा त्याचं अफाट वाचन याचं कुणी कौतुक केलं, न केल्यानं त्याला फरक पडत नव्हता पण नयनाची अपेक्षा त्यानं तिच्या छोटय़ा-मोठय़ा गोष्टींची दखल घ्यावी अशी असायची. हे समजून घ्यायला गिरीश कमी पडला. यासाठी पती-पत्नींमध्ये जो संवाद हवा त्याचाच त्यांच्यामध्ये अभाव होता. त्याबद्दल कुणा एकाला दोषी धरणं योग्य ठरत नाही. सहजीवनाच्या सुरुवातीला एकमेकांच्या स्वभावात काय फरक आहे तो डोळसपणे स्वीकारता आला तर नवरा-बायकोमध्ये निकोप नातं निर्माण व्हायला मदत होते आणि जेव्हा एकमेकांसोबत जगताना स्वभावातील फरकांविषयी आदर वाटायला लागतो तेव्हा हे नातं अधिक दृढ आणि परिपक्व होत जातं. नयना आणि गिरीश यांनी स्वभावातील फरक मनापासून समजून घेऊन स्वीकारला नाही त्यामुळे या फरकाविषयी आदर वाटणं तर लांबच पण नयनाच्या बाजूनं चिडचिड आणि गिरीशच्या बाजूनं अलिप्ततेची भावना वाढत गेली. एकदा बोलता बोलता नयना म्हणाली की, ‘नवरा दारूडा असेल, बाहेरख्याली असेल तर न्यायालयात जाऊन दाद-फिर्याद मागता येते पण त्यानं माझ्याशी प्रेमानं वागावं म्हणून कायद्यानं सक्ती नाही करता येत.’ नयना म्हणत होती ते १०० टक्के खरं असलं तरी प्रेम कशाला म्हणायचं याबद्दल व्यक्तीगणिक वेगवेगळी मतं असू शकतात हे ती समजू शकली नाही. आपली मतं जोडीदारापर्यंत आपोआप पोचावी ही अपेक्षा करत बसली.

गिरीशनं खरंच तिच्यावर प्रेम केलं नाही, का तिला हव्या त्या पद्धतीनं त्याला व्यक्त करता आलं नाही, या प्रश्नाचं बोट धरून नयनानं त्यांच्या सहजीवनाचा धांडोळा घेण्याची गरज आहे. नयनाच्या पत्रामुळे त्यांच्या सहजीवनात तिढे पडले आहेत असं गिरीशला वाटतंय. प्रत्यक्षात मात्र हे तिढे नयनाला पहिल्यापासून जाणवत होते, ते आज त्याच्यापर्यंत पोचले आहेत. ते सोडविणं खूप सोपं नसलं तरी अशक्यही नाही. त्यासाठी भूतकाळाचं जू मानेवरून उतरवून ठेवून एकमेकांकडे स्वच्छ नजरेनं पाहता यायला हवं. हे दोघांना पटलं तर पानगळीनंतरही पालवी फुटू शकते, हा आशावाद ते जागवू शकतील.

मृणालिनी चितळे

Chitale.mrinalini@gmail.com