नेने यांनी पुनर्विवाह करायचा ठरवल्यावर त्यांची टिंगल करणाऱ्या त्यांच्या समदु:खी मित्रानं सद्गदित होऊन कबूल केलं की ‘जोडीदार हरवलेल्या सगळ्यांची इच्छा असते की घरात सुखदु:ख वाटून घेणारा समवयस्क साथीदार हवा, पण त्यासाठी पाऊल उचलण्याचं धाडस मात्र नसतं..’ हे धाडस नेने आणि सेन दोघांनीही दाखवलं..

फोनवरून वेळ ठरवून विजय नेने आले. वय सत्तरच्या आसपास असावे. पूर्णपणे पांढरे झालेले दाट केस. कौन्सिलिंगसाठी आलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर बहुतेक वेळा एक ताण जाणवतो. पण नेन्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आत्मविश्वास पाहिल्या क्षणी जाणवला. खुर्चीत बसल्या बसल्या त्यांनी विषयाला हात घातला. ‘‘मी प्रि-मॅरिटल कौन्सिलिंगसाठी आलो आहे.’’

त्यांच्या बहुधा मुलाचं वा मुलीचं लग्न लांबलेलं असणार किंवा नातवंडाच्या लग्नाबाबत काही शंका असणार, असं गृहीत धरून मी विचारलं, ‘‘ज्या व्यक्तीला लग्न करायचं आहे ती व्यक्ती पहिल्या भेटीपासून सोबत असेल तर..’’ मला वाक्य पूर्ण करू न देता ते पटकन म्हणाले, ‘‘मला स्वत:ला लग्न करायचं आहे. माझं वय अठ्ठय़ाहत्तर. माझी स्वत:ची सॉफ्टवेअर कंपनी होती. हळूहळू त्याचा पसारा मी आवरत आणला. पूर्णपणे निवृत्त झाल्यावर मी वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवलं. त्यालाही आता सहा महिने झाले. पण होतंय काय मला सगळ्या पन्नाशीच्या आसपासच्या मुली सांगून येताहेत. मला माझ्या सुनेच्या वयाची मुलगी बायको म्हणून नको आहे. ’’

त्यांची बाकीची माहिती विचारली असता ते अगदी मोकळेपणी बोलले. ते बासष्ट वर्षांचे असताना त्यांच्या पत्नीचे निधन झालं. अतिशय समृद्ध असं वैवाहिक आयुष्य त्यांना लाभलं होतं. तिच्या निधनानंतर त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा अपघाती मृत्यू झाला. दुसरा मुलगा परदेशी होता. नातवंडांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. त्यांच्या जबाबदारीतून बऱ्यापैकी मुक्त झाल्यावर आता उतारवयात सोबत मिळावी म्हणून त्यांनी लग्न करायचं ठरवलं होतं. त्यांच्या या निर्णयाचं त्यांच्या मुलानंच नाही तर नातवंडांनीही स्वागत केलं. पुनर्विवाहाचा विचार करण्यापूर्वी आपला मोठा बंगला विकून मध्यवस्तीमध्ये त्यांनी दोन बेडरूम्सचा फ्लॅट घेतला होता. त्यांच्याशी बोलताना जाणवलं, या वयात लग्न करताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे याचा त्यांनी सर्वागानं विचार करून मगच निर्णय घेतला होता. विचारामधील इतकी तर्कसुसंगता आणि स्पष्टता क्वचित पाहायला मिळते.

आजकाल स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याविषयी वाढलेली जागरूकता, साधनांची उपलब्धता यामुळे निदान विशिष्ट वर्गातील व्यक्तींचं आयुर्मान वाढलं आहे. साठीनंतरही वेगवेगळ्या क्षेत्रांत रस घेऊन समरसून जगण्याची क्षमता वाढली आहे. अशा परिस्थितीत जोडीदार जर साथ सोडून गेला तर आयुष्यात पोकळी निर्माण होऊ शकते. मुलं-मुली आपापल्या विश्वात रमलेली असतात. आजारपण आलं तर मुलं जबाबदारी घेतात पण दैनंदिन व्यवहारात त्यांची साथसोबत मिळणं शक्य असतंच असं नाही. त्यामुळे एकटं राहणाऱ्या अनेक जणांना पुनर्विवाह करावासा वाटतो. परंतु त्यासंबंधी स्वत:च्या मुलांशी बोलायचं धारिष्टय़ अनेक जणांना होत नाही. आजची तरुण पिढी आधुनिक विचारांची असली तरी साठी ओलांडलेल्या आई-वडिलांचा पुनर्विवाह अनेक जण खुल्या मनाने स्वीकारू शकत नाहीत. या पाश्र्वभूमीवर नेने आणि त्यांच्या कुटुंबीयांचे वेगळेपण जाणवले.

मला भेटून गेल्यावर नेने त्यांना येणारे अनुभव आवर्जून सांगत राहिले. वधूवर सूचक मंडळातून फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी वर्तमानपत्रात जाहिरात दिली. पहिल्याच दिवशी १०/१२ फोन आले. त्यांची उत्तम आर्थिक स्थिती, ठणठणीत तब्येत शिवाय घरची जबाबदारी नाही या गोष्टी विवाहोत्सुक प्रौढ स्त्रियांना खूप आकर्षक वाटत होत्या. परंतु त्यातील बहुतेक जणी पन्नाशीच्या आतबाहेर होत्या. त्यातील एक-दोघींनी तर त्यांना इतकी गळ घातली की ‘तुमच्यासाठी मी प्रयत्न करीन’ असं म्हणून त्यांनी आपली कशीबशी सुटका करून घेतली. कुणी कुणी आपली जात विसरायला तयार नव्हत्या तर ‘मी तुमच्या जातीची नाही म्हणून तुम्ही मला नाकारत आहात.’ असा आरोप काही जणींनी केला. ‘लग्नानंतर तुमची अर्धी मालमत्ता माझ्या नावावर करायला पाहिजे,’ अशी सूचनावजा धमकी एक जण देऊन गेली.
एक दिवस त्यांना भुवनेश्वरहून बहात्तर वर्षांच्या ज्युतिका सेन यांचा फोन आला. त्या बंगाली होत्या. एकमेकांची चौकशी करताना गप्पा चांगल्याच रंगायला लागल्या. त्यांनी सेन यांना त्यांच्या घरी येऊन घर बघण्याचं आमंत्रण दिलं. सेन यांनी ते स्वीकारलंही पण त्यापूर्वी नेन्यांना त्यांचा बायोडेटा हाताने लिहून पाठवायला सांगितला. कारण त्या हस्ताक्षरतज्ज्ञ होत्या. दोघांचे स्वभाव जुळतील की नाही हे त्यांना ताडून पाहायचं होतं. लेखी परीक्षेत नेने उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना पाहायला त्या पुण्याला आल्या. अनेक गोष्टींबाबत एकमेकांचे विचार जुळत असल्याचं दोघांच्या लक्षात आलं. ज्या आवडीनिवडी जुळत नव्हत्या, त्याचं काय करायचं याच्यावरही त्यांनी विचार केला हे विशेष. उदाहरणार्थ नेने हे पूर्ण शाकाहारी तर मासे हा सेन यांचा आवडता पदार्थ. हे लक्षात आल्यावर आपापल्या सवयी बदलायचा प्रयत्न करायचा नाही असं त्यांनी ठरवून टाकलं.

पुनर्विवाह करायचा ठरवल्यावर सेन यांनीही त्यांना आलेले अनुभव मोकळेपणी सांगितले. पती निधनानंतर त्या जरी मुलाबरोबर राहत असल्या तरी घरातले सर्व जण आपापल्या उद्योगात इतके मग्न असायचे की त्यांना एकटेपणा खायला उठायचा. त्यांनी पुनर्विवाह करावा, असं त्यांच्या मुलाला आणि मुलीला पटत नव्हतं परंतु त्यांच्या सुनेनं त्यांच्या एकाकीपणाचं दु:ख समजून घेऊन त्यांच्या लग्नासाठी पुढाकार घेतला. आपल्या नवऱ्याला समजावलं. त्यांनी वर्तमानपत्रात जाहिरात दिल्यावर त्यांना भेटायला आलेले बहुतेक जण विधुर वा घटस्फोटित होते. काही अविवाहित होते. बहुतेकांच्या बोलण्यात एक प्रकारचा केविलवाणेपणा असायचा किंवा कडवटपणा. लग्न करताना तरुणपणी असतो तेवढा चॉइस असणार नाही, याची त्यांना जाणीव होती पण आपला एकाकीपणा दूर करण्यासाठी वाट्टेल ती तडजोड करायची त्यांची तयारी नव्हती. हवा तसा जोडीदार मिळण्यासाठी त्यांना सहा र्वष वाट पाहायला लागली. दोघांनी एकमेकांना पसंत केल्यावर मात्र लवकरात लवकर लग्न करायचं त्यांनी ठरवलं. येणारा प्रत्येक दिवस त्यांच्या दृष्टीनं बोनस आहे याची त्यांना कल्पना होती.

दोघांच्याही घरून त्यांच्या निर्णयाचं स्वागत झालं. सेन यांच्या सूनबाईंनी सासूबाईंसाठी मराठी धाटणीचं मंगळसूत्र खरेदी केलं. वडिलांच्या लग्नासाठी नेन्यांचा मुलगा-सून अमेरिकेहून वेळात वेळ काढून आले. दोन्ही घरची मुलं-नातवंडं यांच्यासमवेत घरच्या घरी विवाह सोहळा संपन्न झाला. नेन्यांनी विवाह करायचा ठरवल्यावर त्यांची टिंगल करणाऱ्या त्यांच्या समदु:खी मित्रानं सद्गदित होऊन कबूल केलं की ‘जोडीदार हरवलेल्या सगळ्यांची इच्छा असते की घरात सुखदु:ख वाटून घेणारा समवयस्क साथीदार हवा, पण त्यासाठी पाऊल उचलण्याचं धाडस मात्र नसतं.’
हे धाडस नेने आणि सेन दोघांनीही दाखवलं. शिवाय लग्नाकडे केवळ सोय म्हणून न पाहता चोखंदळपणे जोडीदाराची निवड केली. उतार वयातील त्यांचं सहजीवन अर्थपूर्ण ठरणार याबद्दल संदेह असण्याचं कारण नाही.

– मृणालिनी चितळे