‘झाडांना चैत्रपालवी फुटली होती. तरीही वाऱ्याच्या झुळकीबरोबर होणारी नि:शब्द पानगळ थांबली नव्हती. दुरून कुठून तरी येणारे कोकीळसूर वसंत ऋतूची ग्वाही देत होते. वर्षांताईंच्या आयुष्यात मात्र आलेल्या वसंत नावाच्या माणसाचा चैत्रपालवीच्या कोवळिकीशी काहीच संबंध नव्हता..’ सहजीवन कसं नसावं हे सांगणारं जोडप्यांमधील नातं ..
‘‘हॅलो डॉक्टर कविता, मी नाडकर्णी बोलतोय. वसंत नाडकर्णी. म्हणजे नीनाचे बाबा. सहा महिन्यांपूर्वी तुम्ही वर्षांला म्हणजे माझ्या पत्नीला तपासायला आमच्या घरी आला होतात. आठवलं ना? तुमचे पती म्हणजे आमच्या नीनाचा आत्तेमामे भाऊ. म्हणून तुम्हाला एवढं हक्कानं सांगतोय. मागच्या वेळी तुम्ही आलात तेव्हा मी गावाला गेलो होतो. त्यामुळे आपली भेट झाली नाही. पण तुमच्या औषधाने वर्षांला जरा बरं वाटलं होतं. आता मात्र परत त्याच तक्रारी सुरू झाल्या आहेत. म्हणजे गळून गेल्यासारखं वाटणं. छातीत धडधड होणं. मधूनच कळ आल्यासारखं वाटणं. वाटणं बरं का. प्रत्यक्ष कळ येते की नाही देवालाच माहीत. गेल्या वेळी सगळ्या टेस्ट्स करून घेतल्या होत्या पण कशात काही निघालं नव्हतं. आता परत तिची भुणभुण चालू झाली आहे. कशाचा म्हणून उत्साह नाही. शिवाय..’’ नाडकर्णीच्या बोलण्याचा ओघ कसा थांबवावा हे कविताला कळेना. मोजके प्रश्न विचारून वर्षांताईंना तातडीने बघायला जायची गरज नाही ना हे तिनं जाणून घेतलं. सकाळची ओ.पी.डी. संपल्यावर येण्याचं आश्वासन तिच्याकडून घेतल्यावरच त्यांनी फोन बंद केला.
सगळे रुग्ण तपासून झाल्यावर नाडकर्णीकडे पोहोचेपर्यंत दुपारचे तीन वाजले होते. घंटा वाजविल्यावर वर्षांताईंनीच दार उघडलं. काहीही न बोलता आपल्या लांबसडक केसांचा शेपटा हलवत त्या आत चालायला लागल्या. त्या तरुण असताना खूप सुंदर दिसत असणार हे मागच्या वेळीच कविताच्या लक्षात आलं होतं. तेव्हापेक्षा आता त्या जास्त थकल्यासारख्या वाटत होत्या. कवितानं त्यांना तपासलं. वरकरणी तरी त्यांना काही गंभीर दुखणं असल्याचं वाटत नव्हतं. वसंतरावांच्या आग्रहाखातर तिनं त्यांचा ई.सी.जी. काढला. तोही व्यवस्थित होता. ‘‘पण मग हिच्या छातीत दुखण्याचं काय?’’ वसंतरावांनी विचारलं.
‘‘कधी कधी अ‍ॅसिडिटीमुळेसुद्धा अशा प्रकारचं दुखू शकतं. तुम्ही व्यवस्थित जेवता ना?’’
‘‘व्यवस्थित म्हणजे अगदी चारी ठाव जेवत असते. लग्न झालं तेव्हा कशी चवळीची शेंग होती. आता गलबत झालं आहे हिचं. गलबत कसं पाण्यावर डुगडुगत चालतं तसं आमचं गलबत जमिनीवर चालतं.’’ आपल्याच विनोदावर खूश होऊन वसंतराव गडगडाटी हसले. कवितानं वर्षांताईंकडे पाहिलं. त्या शून्यात नजर रोखूून बसल्या होत्या. हसल्यामुळे डोळ्यात आलेलं पाणी पुसत वसंतराव म्हणाले, ‘‘डॉक्टर, माझं वय आहे सत्याहत्तर. रोज पाच किलोमीटर चालतो. कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही. नाही तर आमच्या या वर्षांबेन. माझ्यापेक्षा चांगली आठ वर्षांनी लहान. पण बाहेर म्हणून पडत नाही. मी कित्येकदा सांगितलं की जरा व्यायाम कर. हालचाल हवी. म्हणजे सगळी दुखणी पळून जातील. बरोबर ना?’’ कवितानं मान हलवली.
‘‘बघ. डॉक्टर काय म्हणताहेत ते. तुला काहीसुद्धा झालेलं नाही. फक्त हालचाल हवी. जा आमच्या दोघांसाठी फक्कड चहा करून आण.’’
आपल्या मान हलविण्याचा असा परिणाम होईल याची कविताला कल्पना नव्हती. वर्षांताई नाइलाज झाल्यासारख्या उठल्या. ‘‘तुम्हाला एक निमंत्रण द्यायचं आहे डॉक्टर. येत्या वीस तारखेला आमच्या लग्नाला पन्नास र्वष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त एक पार्टी ठेवली आहे. मी नको म्हणत होतो पण मुलं ऐकेनात. त्यांनी मोठा घाट घातला आहे,’’ असं म्हणून सोनेरी वेष्टनात गुंडाळलेली पत्रिका त्यांनी पुढे केली. पहिल्या पानावर दोघांचा फोटो होता आणि त्या खाली ओळी होत्या.
‘वसंत-वर्षांचा ‘सुवर्ण’मयी संसार म्हणजे समजूतदार सहजीवनाचा मूर्तिमंत आविष्कार’ पुढेही अशाच आलंकारिक भाषेत खूप काही लिहिलेलं होतं. तिचं पूर्ण वाचून होण्याआधीच वसंतरावांनी बोलायला सुरुवात केली. ‘‘त्या दिवशी मुलं म्हणताहेत की आमचं पुन्हा लग्न लावायचं. दक्षिणेकडे म्हणे अशी पद्धत आहे. मला पसंत नव्हतं, पण मुलांचा आग्रह कसा मोडणार? त्या आधी वर्षांला पूर्ण बरं मात्र व्हायला हवं.. एवढा वेळ का लागला चहाला?’’ चहा घेऊन येणाऱ्या वर्षांताईंकडे पाहत ते म्हणाले. काहीच प्रतिसाद न देता वर्षांताईंनी दोघांच्या हातात कप दिले.
त्यांच्या हाताचा कंप कविताला जाणवला. बिस्किटाची बशी पुढे करताना त्यांचा हात अजूनच कापत होता. बशीतली एक-दोन बिस्किटं खाली पडली तशी वसंतराव गरजले, ‘‘एक काम धड करता येत नाही तुला.’’ कविताकडे बघत ते म्हणाले, ‘‘तुम्हाला म्हणून सांगतो डॉक्टर, पन्नास र्वष झाली आमच्या लग्नाला पण हे असंच चालू आहे. हिच्या रूपावर भाळलो आणि हो म्हणून बसलो. खरं तर हिची मावस बहीण शालन मला सांगून आली होती. तिला पाहायला म्हणून गेलो तर तिच्या घरी वर्षां दृष्टीस पडली. लगेच मागणी घातली. शालन पुढे कॉलेजची प्राचार्या झाली. आमच्या बाईसाहेबांची गाडी पदवीपर्यंतही पोचली नाही.’’ तेवढय़ात फोन आला म्हणून ते खिडकीपाशी जाऊन बोलायला लागले.
‘‘कॉलेजला जाऊ दिलं असतंत तर..’’ कवितानं चमकून वर्षांताईंकडे पाहिलं. वसंतरावांकडे रोखून बघत अत्यंत हळू आवाजात त्या पुटपुटत होत्या. क्षणभर त्यांच्या डोळ्यांत वैशाख वणवा पेटल्याचा भास झाला. पण क्षणभरच. पुढचे शब्द त्यांच्या घशातच अडकले असल्यासारख्या त्या थांबल्या. ‘‘काही म्हणालात?’’ कवितानं विचारलं. त्यांनी नकारार्थी मान हलवली.
‘‘चहा छान झाला आहे.’’
‘‘चहा करायला काय अक्कल लागते?’’ कोचावर पुन्हा येऊन बसत वसंतराव म्हणाले. ‘‘तुम्हाला तो बर्नार्ड शॉचा किस्सा माहिती आहे का?’’
‘‘कोणता?’’
‘‘एकदा एक अत्यंत सुस्वरूप बाई शॉसाहेबांना भेटायला आली. त्यांनी तिच्या रूपाचं भरभरून कौतुक केलं. तशी ती त्यांना म्हणाली, आपण दोघं लग्न करू या. म्हणजे काय होईल आपली मुलं माझ्याप्रमाणे सुंदर होतील आणि तुमच्याप्रमाणे विद्वान. यावर शॉसाहेब म्हणाले, समजा याऐवजी उलटं झालं तर? म्हणजे दिसायला माझ्यासारखी आणि डोक्यानं तुझ्यासारखी माठ निघाली तर? शॉसाहेब आणि त्या बाईंचं लग्न झालं नाही. आम्ही मात्र लग्न करून बसलो. आमच्याबाबत शॉसाहेबांचं भाकीत पन्नास टक्के खरं ठरलं. म्हणजे आमची नीना आणि निनाद दोघं दिसायला आईवर गेली आहेत हे चांगलं आहे. पण बुद्धीही तिचीच घेतली हो. त्यामुळे शिक्षणाच्या नावाने शंख. दोघंही कशीबशी ग्रॅज्युएट झाली इतकंच. नीनानं रूपाच्या जोरावर तिच्या आईप्रमाणे चांगला नवरा तरी पटकावला. निनादला मी माझ्या ओळखीनं बँकेत चिकटवून दिला.’’
वसंतरावांची टकळी चालूच होती. कविताची नजर अधूनमधून वर्षांताईंकडे वळत होती. त्यांचं स्वत:शी काहीबाही पुटपुटणं चालू होतं. तिच्या ते लक्षात आल्याचं वसंतरावांनी ओळखलं. ‘‘याबद्दलही तुम्हाला विचारायचंच होतं डॉक्टर. हिचं हे नवीनच सुरू झालं आहे. स्वत:शी काही तरी बोलल्यासारखं करते. धड काही सांगत नाही. एका कौन्सिलरला विचारायला गेलो तर ही त्यांच्याशी काही बोलायला तयार नाही. तशी ही पहिल्यापासून घुमी आणि अबोल. त्या शेवटी म्हणाल्या की, मला ही डिप्रेशनची केस वाटतीय. तुम्ही सायकियाट्रिस्टला दाखवून घ्या. या कौन्सिलर्सना काही अक्कल नसते. काहीही सल्ला देतात. मी म्हणतो, भरल्या घरात नैराश्य यायचं कारणच काय? तुम्ही तिला चांगलं काही तरी टॉनिक लिहून द्या. वीस तारखेपर्यंत तिला बरं वाटायलाच पाहिजे. म्हणे सायकियाट्रिस्टला दाखवा.’’
‘त्यांनाच नाही तर तुम्हालासुद्धा सायकियाट्रिस्टची गरज आहे’ हे ओठावर आलेले शब्द कवितानं कसेबसे आवरले. ‘त्यांच्या समजूतदार सहजीवनाचा आविष्कार’ तिला असह्य़ होऊ लागला. ‘‘निघते मी,’’ असं म्हणत ती उठली. वर्षांताईंनी ती निघाली असल्याची दखलही घेतली नाही. त्या खिडकीतून एकटक बाहेर बघत होत्या. झाडांना चैत्रपालवी फुटली होती. तरीही वाऱ्याच्या झुळकीबरोबर होणारी नि:शब्द पानगळ थांबली नव्हती. दुरून कुठून तरी येणारे कोकीळसूर वसंत ऋतूची ग्वाही देत होते. वर्षांताईंच्या आयुष्यात मात्र आलेल्या वसंत नावाच्या माणसाचा चैत्रपालवीच्या कोवळिकीशी वा कोकीळसुरांशी काहीच संबंध नव्हता.
chitale.mrinalini@gmail.com