‘डिअर जिंदगी’ या सिनेमाबद्दल वर्षांच्या सुरुवातीपासूनच एकेक गोष्ट समोर येत होती. त्यातलीच एक मुख्य बाब सुखद धक्का देणारी होती. ती म्हणजे आलिया भट आणि शाहरुख खान ही जोडी. हे दोघे सिनेमात एकत्र दिसणार म्हटल्यावर दोघांचाही चाहता वर्ग खूश झाला. ही जोडी पहिल्यांदाच एकत्र येतेय. शिवाय शाहरुखपेक्षा साधारण २५ र्वष लहान असलेली आलिया त्यासोबत काम करतेय. शाहरुखसोबत काम केलेल्या अभिनेत्रींपैकी वयाने सगळ्यात लहान आलियाच असावी. या सिनेमाविषयी उत्सुकता असण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे सिनेमाची दिग्दर्शक गौरी शिंदे. चार वर्षांपूर्वी आलेला ‘इंग्लिश विंग्लिश’ हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. सिनेमाची कथा अतिशय साधी असूनही त्यात स्त्रीवर, तिच्या जगण्यावर भाष्य केलं होतं. त्या सिनेमात आताच्या स्टारडम असलेल्या फळीतला कोणताही कलाकार नव्हता. तरी तो सिनेमा लोकप्रिय ठरला. त्याची मांडणी, विषय, संवाद, गाणी ही सगळीच त्यामागची कारणं आहेत. आता पुन्हा एकदा गौरी ‘डिअर जिंदगी’ हा सिनेमा घेऊन आली आहे.

कोणत्याही सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आता एक सोहळाच केला जातो. पण या सिनेमाचं पहिलं पोस्टर ट्विटरद्वारे लाँच करण्यात आलं. हे सिनेमाचं वेगळंपण. आलिया हीच या सिनेमाची हिरो आहे अशी चर्चा आहे. संपूर्ण सिनेमा आलियाभोवती, तिला पडलेल्या प्रश्नांभोवती फिरतो. शाहरुख खान सिनेमाच्या काही प्रसंगांमध्येच आहे. त्याला पाहुणा कलाकार म्हणावा इतकी लहान त्याची भूमिका नसली तरी संपूर्ण सिनेमाभर तो दिसेल असंही नाही. शाहरुखचा सिनेमा हा पूर्णपणे त्याचा असतो. प्रत्येक फ्रेममध्ये तो दिसतो. मग ती प्रेमकथा असो, अ‍ॅक्शनपट असो किंवा अन्य काही. पाहुणा कलाकार म्हणून एखाद्या सिनेमात तो असलाच तर एखाद्या गाण्यापुरतं, सिनेमातल्या एखाद्या प्रसंगामध्ये तो असतो. पण ‘डिअर जिंदगी’ हा सिनेम अपवाद ठरलाय असं म्हणता येईल. बॉलीवूडच्या बादशाहने या सिनेमात अशा पद्धतीने काम करणं हे कारणही पुरेसं आहे हा सिनेमा बघण्याचं.

आलिया भट आणि शाहरुख खान ही आगळीवेगळी जोडी पहिल्यांदा सिनेमात एकत्र दिसणार आहे. पण, यांच्यात रोमान्स नसेल असं दिसतंय. शाहरुखच्या सिनेमातल्या नायिकेसोबत तो रोमान्स करणार नाही, हे ऐकून खरंतर आश्चर्य वाटेल. पण, हा प्रयोग या सिनेमामध्ये दिसणार आहे. सिनेमामध्ये आलियासोबत कुणाल रॉय कपूर, आदित्य रॉय कपूर, अली जफर आणि अंगद बेदी हे चार नायकही आहेत. त्यामुळे सिनेमात हा मल्टीपल रोमान्स बघणं उत्सुकतेचं ठरेल. या सिनेमाचं पहिलं पोस्टर ट्विटरवरून लाँच करण्यात आलं होतं. आलिया प्रश्न विचारायची आणि शाहरुख तिच्या प्रश्नांची उत्तर द्यायचा. हा प्रश्नोत्तरांचा सिलसिला सुरू होता. याच्या शेवटी त्यांनी सिनेमाचं पहिलं पोस्टर पोस्ट केलं होतं. या हट के प्रमोशनमुळे सिनेमाविषयीची उत्सुकता आणखी वाढली. यातल्या गाण्यांची तर आधीपासूनच चर्चा सुरू झाली आहे. आजच्या तरुणाईशी निगडित अशी गाणी आताच लोकप्रिय झाली आहेत.

आलिया ही उत्तम अभिनेत्री आहे. या सिनेमात ती दिसतेही सुंदर. तिचे हायवे, टू स्टेट्स, उडता पंजाब अशा सिनेमांमध्ये तिने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहेच. ‘डिअर जिंदगी’च्या प्रोमोमधूनच तिच्या अभिनयाचं कौतुक केलं जातंय.

सिनेमाचं नावं ‘डिअर जिंदगी’, सिनेमातली जोडी आलिया-शाहरुख, सिनेमाची दिग्दर्शिका गौरी शिंदे अशा वेगळ्याच कॉम्बिनेशनमुळे हा सिनेमा वेगळा ठरेल असं दिसतंय.
प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com