आपण यावेळई उत्तर भारतातील प्रचलित कबाबच्या रेसिपी जाणून घेऊया.

घलोटी कबाब

साहित्य :

अर्धा किलो मटणाचा खिमा,

दोन टेबलस्पून आल्याची पेस्ट,

दोन टेबलस्पून लसूण पेस्ट,

एक टेबलस्पून हिरवी मिरची पेस्ट,

तीन टेबलस्पून कच्च्या पपयांची पेस्ट,

दोन ते तीन टेबलस्पून बेसन भाजून घेणे,

१ टीस्पून लाल मिरची पावडर,

अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर,

मीठ स्वादानुसार,

आवडत असेल तर चिमूटभर जायफळ पावडर.

कृती :

सर्व जिन्नस एकत्र करणे आणि पुन्हा एकदा फूड प्रोसेसर किंवा ब्लेन्डरमध्ये एकजीव करून घेणे. हे एकजीव झालेले मिश्रण अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवणे. फ्राय पॅनमध्ये तेल घालून हातावर थापून पॅटी तयार करणे. दोन्ही बाजूला चांगले लाल खरपूस भाजून घेणे.

कलमी वडा

साहित्य :

१ कप चण्याची डाळ,

अर्धा कप पिवळी मुगाची डाळ,

३ ते ४ हिरव्या मिरच्या,

मध्यम आकाराचे १ आले,

१ छोटा बारीक,

चिरलेला कांदा,

१ टेबलस्पून गरम तेल,

१ टीस्पून जीरे पावडर,

१ टीस्पून बडीशेपची जाडसर पावडर,

१ टीस्पून धण्याची जाडसर पावडर,

१ टीस्पून जाडसर मिरे,

चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती :

दोन्ही डाळी चार ते पाच तास वेगवेगळी भिजत घालणे. पाणी निखळून वेगवेगळी मिक्सरमध्ये वाटून घेणे. (यात पाणी अगदी थोडे घालावे.) एका बोलमध्ये दोन्ही डाळी एकत्र करणे व बाकीचे सर्व साहित्य त्यात घालून हातावर वडे थापून तेलामध्ये तळून घेणे. कुठल्याही हिरव्या चटणीबरोबर सव्‍‌र्ह करणे.

गुलर कबाब

साहित्य :

५०० ग्रॅम मटणाचा खिमा,

४ टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर,

दोन टीस्पून धणे पावडर,

१ टीस्पून लाल मिरची पावडर,

१ टीस्पून जिरे पावडर, चवीनुसार मीठ,

१ अंड, दोन दालचिनीच्या काडय़ा,

४ काळ्या मोठय़ा वेलची.

कबाबच्या आतले फिलिंग :

अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव कप बारीक चिरलेला पुदिना, तीन ते चार चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ टेबलस्पून आलं, १ टीस्पून आमचुर पावडर, चवीनुसार मीठ.

कृती :

कबाबचे फिलिंग मिक्सरमधून बारीक वाटून घेणे. त्याची घट्ट चटणी होईल.

मटणाचा खिमा, दालचिनीच्या काडय़ा, मोठय़ा वेलच्या पाण्यामध्ये शिजवून घेणे. सर्व खिमा कोरडा करणे. मग त्या दालचिनीच्या काडय़ा फेकून देणे. त्यात सर्व मसाला घालणे व अंडी आणि कॉनफ्लॉवर घालून ते एकजीव करणे. खिम्याचे छोटे बोल करून त्यात बनवलेली चटणी भरणे व सर्व बोल पसरट पॅटीसारखे आकार देऊन अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवणे. नंतर गरम तेलात डीप फ्राय करणे.

मायक्रो कबाब

साहित्य :

५०० ग्रॅम चिकनचा खिमा,

एक बारीक चिरलेला कांदा,

१ टेबलस्पून बारीक चिरलेलं आलं,

१ टेबलस्पून बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,

पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर,

१ टीस्पून धणे पावडर,

१ टीस्पून लाल मिरची पावडर,

अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर,

अर्धा टीस्पून वेलची,

२ टेबलस्पून लिंबाचा रस,

आवड असल्यास ३ टेबलस्पून प्रोसेड चीज,

एक अंड,

१ टेबलस्पून तेल,

चवीनुसार मीठ.

कृती :

सर्व साहित्य एकत्र करणे आणि फ्रिजमध्ये एक ते दोन तास ठेवणे. हे मिश्रण फ्रीजमधून काढून त्याला सॉसेजचा आकार देणे. मायक्रोव्हेवमध्ये १०० टक्के पॉवरवर तीन ते चार मिनिटे ठेवणे. मायक्रोव्हेव पुन्हा उघडून पलटून परत १०० टक्के पॉवरवर तीन ते चार मिनिटे ठेवणे. हिरवी चटणी व कांद्याच्या चकत्यासोबत हे कबाब सव्‍‌र्ह करणे.

टीप : जर मायक्रोव्हेववर करायचे नसेल तर फ्राइंग पॅनमध्ये श्ॉलो फ्राय करणे. कोंबडीचा खिमा असल्यामुळे लगेच शिजतो.
response.lokprabha@expressindia.com