साहित्य : १/४ वाटी उडीद डाळ, १ कांदा (बारीक चिरलेला), १/२ वाटी नाचणी (जाडसर बारीक केलेली), २ चमचे तूप, १ चमचा मोहर, १/४ चमचा हिंग, ५-६ पाने कढीपत्ता, ४-५ हिरवी मिरची (बारीक चिरलेली), १/४ जुडी कोथिंबीर (बारीक चिरलेली), मीठ चवीनुसार.

कृती :
एक दिवसभर उडीद डाळ भिजत ठेवावी, जाडसर केलेली नाचणी अर्धा तास तरी भिजत ठेवावी. एका पसरट भांडय़ात नाचणी व उडीद डाळ मायक्रो हायवर २ मिनिटे ठेवून थोडेसे भाजून घ्यावे. दुसऱ्या काचेच्या बाऊलमध्ये तूप, कांदा, मोहरी, हिंग, मिरची, कढीपत्ता घालून मायक्रो हायवर एक-दोन मिनिटे ठेवावे. मग ढवळून यात नाचणी, उडीद डाळ, मीठ व दीड वाटी पाणी घालावे. झाकून हायवर २-३ मिनिटे ठेवावे. अधूनमधून ढवळून घ्यावे. मग वरून कोथिंबीर टाकून सव्‍‌र्ह करावे. साधारणत: हा उपमा लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहे.

भरलेली कारली

साहित्य : एक वाटी मटण खिमा तयार घ्या. ऐवजी पनीर खिमासुद्धा वापरू शकता., पाच-सहा मध्यम कारली, एक वाटी ओले खोबरे, एक चमचा जिरे, अर्धा वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली, दोन-तीन चमचे साखर, पाच-सहा पाने कढीपत्ता, पाच-सहा केळीची पाने, दोरा.

कृती :
मटण खिमा किंवा पनीर खिमा आपल्या आवडीनुसार तयार करून घ्यावा. कारल्याला उभी चीर पाडून आतल्या बिया साफ करून घ्याव्यात. पाण्यात थोडे मीठ टाकून कारली अर्धा तास तरी त्या पाण्यात ठेवावी. एका बाऊलमध्ये खोबरे, जिरे, कढीपत्ता, साखर व कोथिंबीर टाकून नीट मिक्स करून घ्यावे. चिरलेल्या कारल्यामध्ये खिमा भरून घ्यावा. या काल्र्यावर तयार केलेले खोबऱ्याचे मिश्रण लावून केळीच्या  पानामध्ये रोल करावे. त्यास दोऱ्याने बांधून घ्यावे. ही सर्व तयार झालेली कारली एका पसरट भांडय़ात मायक्रो मीडियमवर पाच-सहा मिनिटे ठेवावी. दोरा काढून टाकावा व गरम गरम सव्‍‌र्ह करावी.

ग्रीन वाटाण्याची खिचडी

साहित्य : दीड वाटी हिरवे वाटाणे (फ्रेश), अर्धा वाटी शेंगदाण्याचे कूट, एक चमचा जिरे, चार-पाच हिरवी मिरची (बारीक चिरलेली), अर्धा वाटी ओले खोबरे, १/४ जुडी कोथिंबीर (बारीक चिरलेली), १ चमचा कढीपत्ता, अर्धा चमचा मोहरी, चार-पाच पाकळ्या लसूण, दोन चमचे तूप, मीठ चवीनुसार.

कृती :
हिरवे वाटाणे भिजवून ठेवावे. त्यास थोडेसे कुटून घ्यावे. एका बाऊलमध्ये तूप, कढीपत्ता, मोहरी, लसूण टाकून झाकण लावून मायक्रो मीडियमवर दोन-तीन मिनिटे ठेवावे. त्यात हिरवे वाटाणे व शेंगदाण्याचे कूट टाकून मायक्रो लोवर एक मिनिटे ठेवावे. त्यात दीड कप पाणी टाकून मायक्रो मीडियमवर तीन-चार मिनिटे ठेवावे. त्यावर कोथिंबीर व खोबरे टाकून मायक्रो हायवर एक-दोन मिनिटे ठेवावे. हिरवे वाटाणे जर एकजीव झाले नसतील तर थोडेसे ढवळून अजून एक-दोन मिनिटे मायक्रो हायवर ठेवावे.

चॉकलेट जिंजर केक

साहित्य :

१५० ग्रॅम मैदा, १५० ग्रॅम बारीक साखर, १५० ग्रॅम लोणी, ३ अंडी, १०० ग्रॅम डार्क चॉकलेट, २-३ चमचे जिंजर/आले जुस, २ चमचे आले पेस्ट,  १/२ चमचा जायफळ पावडर.

कृती :
एका बाऊलमध्ये साखर व लोणी फेटून घ्यावे. त्यात एक अंडे टाकून फेटून घ्यावे. त्यात मैदा व जायफळ पावडर टाकून मिक्स करावे. त्यानंतर त्यात मेल्ट केलेले चॉकलेट जिंजर जूस व पेस्ट टाकून हळूवारपणे एकत्र करावे. मिश्रण जाडसर वाटल्यास त्यात थोडे दूध टाकावे.

हे सर्व मिश्रण एका पसरट भांडय़ात ओतून मायक्रो हायवर  ८-१० मिनिटे ठेवावे. ( हे मिश्रण मधोमध शिजत नाही यासाठी एका ग्लासाध्ये पाणी ठेवून हा ग्लास बाऊलमध्ये ठेवून त्याच्या बाजूनी हे मिश्रण ओतावे त्यामुळे नीट शिजून येते.
विवेक ताम्हाणे – response.lokprabha@expressindia.com