आपल्या आयुष्यात कला महत्त्वाच्या, कारण आयुष्यात कला नसेल तर सर्जनशीलतेचा झराच आटल्यासारखा होईल आणि म्हणूनच लहानपणापासूनच मुलांमधील कला जोपासायला हव्यात. मुलांच्या वाढीत चित्रकलेचाही अमूल्य वाटा आहे. अगदी दहा महिन्यांच्या बाळाला देखील रेघोटय़ांच्या स्वरूपात चित्र काढण्याच्या संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. कलेचं आयुष्यातलं महत्त्व समजून घेताना अनेक प्रश्न पडणं साहजिक आहे. शाब्दिक, भाषिक संवादाच्याही आधी मूल अनेकदा चित्रातून संवाद साधत असतं आणि संवाद हे माध्यम मग आयुष्यातल्या अनेक गोष्टींना जोडतं. चित्रकलेचं मुलांच्या आयुष्यातलं महत्त्व सांगणारे सहा लेख दर पंधरवडय़ाने.

आभा भागवत चित्रकार आहेत. त्यांनी मास्टर्स ऑफ फाईन आर्ट्स (यू. एस. ए.), मास्टर्स ऑफ  इंडॉलॉजी, जी. डी. आर्ट, आणि शास्त्रीय नृत्य व कर्नाटक संगीतातील शिक्षण घेतले आहे. तसेच कलोपचार, पर्यावरणपूरक शाश्वत जीवनशैली या विषयांतील शिक्षण घेतले असून त्या लहान मुलांना वेगळा अनुभव देणाऱ्या चित्रकला कार्यशाळा व भित्तिचित्र कार्यशाळा घेतात. त्यांची लहान मुलांसाठी वेगळ्या चित्रशैलीतील काही पुस्तके लोकप्रिय आहेत. पुण्यातील गरवारे बालभवन आणि अक्षरनंदन शाळेत त्या चित्रकलेचे पाठ घेतात. याशिवाय मासिके आणि पुस्तकांसाठी चित्र व मुखपृष्ठही तयार करतात. अनेक नियतकालिकांमधून त्यांनी चित्रकलेवर लेखन केले आहे.

Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
Gangu Ramsay
व्यक्तिवेध: गंगू रामसे
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे
Review of Rohini Nilekanis book Shambharital Shahanapan on durgabai Nilekani
शंभरीतलं शहाणपण!

लहान मूल आणि चित्र यांचं नातं फारच खास आहे. ‘प्रत्येक मूल हे चित्रकार असतंच. प्रश्न असा आहे की मोठं होताना ही चित्रकला कुठेतरी लुप्त न होऊ  देता टिकवायची कशी?’ हा विचार पिकासो या प्रसिद्ध फ्रेंच चित्रकाराने व्यक्त केला. ते असंही म्हणत की मोठय़ा चित्रकारांसारखी वास्तववादी चित्रशैली आत्मसात करायला काही वर्षांची मेहनत पुरते, परंतु लहान मुलांसारखी चित्रं काढायचा मी आयुष्यभर प्रयत्न करत राहीन.

खरोखर बालचित्रकला निर्मितीचा काळ अतिशय मौल्यवान आहे. पण लहान मुलांची मोठी माणसं होताना चित्रनिर्मितीला नकळत दुय्यम स्थान केव्हा मिळतं आणि चित्रकला मागे पडते याचा पत्ता लागत नाही. दिलेल्या ठोकळेबाज आकारात भरलेले रंग, एवढीच चित्रकलेची व्याप्ती असते का? मुलांमधला चित्रकार जपायला, वाढवायला असं वातावरण कसं चालेल? आपल्याला आयुष्यातून कला नाहीशा करायच्या नाहीत कारण आयुष्यात कला नसेल तर सर्जनशीलतेचा झराच आटल्यासारखा होईल. असंही म्हणतात की, सर्जनशील माणूस म्हणजे जणू बालपण टिकून राहिलेलं मूल. ‘क्रिएटीव्ह अडल्ट इज द चाईल्ड हू सव्हाईड’ आहे तरी काय या चित्रकलेत असं दडलेलं, जे आपल्यापर्यंत अजून बहुदा पोहोचलेलंच नाही?

चित्रकलेतून लहान मूल फक्त काहीतरी रेघोटय़ा मारत नसतं. फक्त खडू हातात धरून कागदावर काढलेली चित्रं एवढा संकुचित चित्रकलेचा अर्थ नाहीच. मूल चित्र अनुभवत असतं ते पंचेंद्रियांनी. एखादी सुंदर रचना दिसली तर मूल ते डोळ्यांनी पाहातं आणि आनंदून जातं. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देतं. त्यातल्या एखाद्या भागाशी खेळू लागतं. एकदा ४ वर्षांच्या मुलांसोबत कोलाज करत असताना एकच मुलगा कागदाला डिंक लावण्यात रंगून गेला. बाकीच्या मुलांची चित्रकृती पूर्ण झाली आणि ती मुलं तिथून गेलीसुद्धा, तरी हा चिमणा डिंक आणि कागद घेऊन बसला. आजूबाजूला इतर मुलं नाहीयेत हेही भान विसरला. कागदावर डिंक ओतून त्यात बोट फिरवत मला सांगत होता, हे मी गाडय़ांचे रस्ते काढतो आहे. सर्व बाजूंना बोट हलवत मोठाल्ले सरळ रस्ते तो काढत होता. त्याचं चित्र बघण्यासाठी ती प्रक्रिया समजून घेणं जास्त महत्त्वाचं होतं. डिंक-कागदाचा खेळ पूर्ण झाल्यावर कागदावर डिंक वाळून गेल्यामुळे काहीच दिसत नव्हतं. पण त्यानं त्याला हवी तशी भरपूर अदृश्य चित्रं काढली होती. एवढं समरसून, हातात आलेल्या माध्यमाला प्रतिसाद देणारं मूल, निकालाच्या मागे असणाऱ्या पालक वा शिक्षकाला कळलंच नाही तर त्या मुलाचं नुकसानच आहे.

चित्रातून मुलांनी साधलेला संवाद विलक्षण असतो. चिमुकली दीड-दोन वर्षांची बाळं जेव्हा गोल, चौकोनाच्या रेघोटय़ा काढतात तेव्हा ‘आता मला हा आकार समजतो’, असा संवादच साधत असतात. पण रेघोटय़ांमध्ये कसलं आलंय चित्र असं म्हणून मोठेच त्या मुलाची कुवत समजून घ्यायला नकार देतात. एका तीन वर्षांच्या मुलीने गोळ्या गोळ्यांची रचना करून माणूस तयार केला आणि जणू तिला शोधच लागला की असाही माणूस दाखवता येतो. मग सर्वात जवळच्या माणसांची चित्रं – आई, बाबा, आजी, आजोबा, दादा एवढंच नव्हे तर घरातली मनीमाऊ पण गोळ्यांपासून बनू शकली. इतक्या साध्या आकारांतून क्लिष्ट मानवाकृती बनवता येण्याचा शोधच आहे तो! या छोटय़ा छोटय़ा प्रयोगांतूनच मूल सृजनशील होत असतं, स्वत: निर्णय घेत असतं.

सुंदर चित्र निर्मितीची एक अगदी साधी कृती मला सर्व वयाच्या मुलांसाठी आणि मोठय़ांसाठी घ्यायला आवडते. यात वर्तमानपत्राचे कागद पोस्टर रंगाने रंगवून, वाळवून नंतर तेच फाडून हवे तसे चिकटवून त्यापासून सुरेख कोलाज करायचं असतं. यांत हातांचं कसब, रचना कौशल्य सहज सोप्या पद्धतीने अनुभवता येते. आपली सौंदर्यदृष्टी तर प्रत्येक दृश्यागणिक बदलत असते, तयार होत असते. मुलंच काय मोठी माणसंही यात तीन तीन तास रमून जातात. यात नियम, सूचना तोडायची संपूर्ण मोकळीक असते आणि तरीही प्रत्येकाचं वैशिष्टय़पूर्ण चित्र शेवटी तयार होतं. काही विशेष गरजा असणारी मुलं जी एके ठिकाणी स्थिर बसून दोन मिनिटांहून जास्त काळ काम करू शकत नाहीत ती देखील कधीकधी तासन्तास रमतात.

नुकतीच शाळेमध्ये सहावीच्या मुलांसोबत ऑईलपेंट्सनी दोन कपाटं रंगवली. तीन दिवस रोज ३-४ तास असं आलटून पालटून सर्वानी रंगकाम केलं. मुलं स्वत:च्या चित्रक्षमता पाहून स्वत:च अवाक झाली. एरवी कुठल्याही तासाला शांत न बसणाऱ्या मुलांनी रंगून जाऊन, खूप जबाबदारीने चित्र काढलं. ते पाहून चित्रांचा थेरपीसारखा होणारा परिणाम थक्क करून गेला. लहान कागदावर फक्त हाताची बोटं आणि मनगट वापरून जी मुलं चित्र काढायला कंटाळतात ती संपूर्ण शरीर आणि खांद्यापासून हात वापरून चित्र काढू लागली की जादू तरी काय होते नेमकी?

मुलाच्या वाढीत चित्रकलेचा अमूल्य वाटा आहे. अगदी दहा महिन्याच्या बाळाला देखील रेघोटय़ांच्या स्वरूपात चित्र काढण्याच्या संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. कलेचं आयुष्यातलं महत्त्व समजून घेताना अनेक प्रश्न पडणं साहजिक आहे. शाब्दिक, भाषिक संवादाच्याही आधी मूल अनेकदा चित्रातून संवाद साधत असतं. मुलांची चित्र अभिव्यक्ती मात्र पालक-शिक्षकांना समजतेच असं नाही.

मूठभर मुलं ज्यांना चित्रकलेची गोडी असते, ती पुढे चित्रकला शिक्षण घेतात. धडपडून त्यात व्यवसाय करण्याचा, चित्रकलेला अर्थार्जनाचं साधन बनवण्याचा प्रयत्न करतात. फारच कमी जण त्यात उत्तमरीत्या यशस्वी होतात, काही जण दिशा शोधत धडपडत राहतात आणि अनेक जण चित्रकलेला छंद किंवा अगदी वाईट शब्दात टाईमपास करण्याचं साधन म्हणून जोपासतात. काही शिक्षक होतात, पण तेच तेच तसंच शिकवत राहतात. ना शिक्षणाची पद्धत बदलते, ना विद्यार्थ्यांची मानसिकता. वर्षांनुवर्षे चित्रकला हा अनाकलनीय, गूढ, उथळ कलाप्रकार म्हणून सामान्य माणसाच्या मनात घर करतो. शासनालाही चित्रकला महत्त्वाची वाटत नाही आणि कलाशिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येतात. अर्थात उत्तम कलाशिक्षकही या रेटय़ात भरडले जातात. चित्रकला शिक्षणाचा दर्जा अजूनच खालावेल की काय अशी चिंताग्रस्त परिस्थिती निर्माण होते.

चित्रकार होणं हा चांगला करियर चॉईस आहे का नाही? चित्रकला केवळ छंद म्हणून जोपासावी का? कुठल्या चित्राला चांगलं म्हणावं? दुरुस्ती करून खरंच चित्र चांगलं दिसेल का? चित्राची प्रक्रिया नेमकी कशी घडते? मुळातले कलागुण कसे ओळखायचे, त्याला कसं खतपाणी घालायचं? चित्रांतून मूल खरंच काही व्यक्त करत असतं का? आकारात रंग भरणे एवढीच चित्रकलेची संकुचित व्याख्या नसून नेमकी व्याप्ती काय आहे? सौंदर्यदृष्टी विकसित करण्यात चित्रकलेचा काय वाटा आहे? कलेकडे जास्त गांभीर्याने कसं बघावं? असे असंख्य प्रश्न पालकांना आणि शिक्षकांनाही पडत असतात.

अशा सर्व प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची, त्यातून मूल आणि मुलाची चित्रकला यांकडे बघण्याची नवी दृष्टी कशी अवगत करायची? मुलाला चित्र निर्मितीच्या संधी कशा पद्धतीने द्यायच्या? सध्याच्या चित्र शिकवण्याच्या पद्धतीत काय चुकतं आहे आणि ते लक्षात घेऊन कोणते बदल शालेय पातळीवर चित्रकला शिक्षणात करावेत? असे बदल करून पाहिल्यामुळे मुलांमध्ये काय फरक पडला? मुलांना चित्रकला अनुभव कितव्या वर्षांपासून द्यावा? चित्रकलेतील विकासाचे टप्पे कोणते? आर्ट अ‍ॅप्रिसिएशन म्हणजे नेमकं काय आणि मुलांना ते कसं शिकवता येईल? मोठे चित्रकार कोण होते? त्यांच्या चित्रांची वैशिष्टय़े कशी समजून घेता येतात? सर्वाना घरच्या घरी करून बघता येतील असे काही चित्र उपक्रम कोणते? कागदावरच्या चित्रांचा अनुभव आणि भिंतीवरच्या चित्रांचा अनुभव यांत नेमकं काय वेगळेपण आहे? मुलांना सोबत घेऊन भिंतीवर उत्तम चित्र कसं तयार करावं? लोककलांचं चित्रकलेतील स्थान, महत्त्व आणि सोपेपणा कसा समजून घ्यावा? ज्यांनी लहानपणी काही कारणांनी चित्र काढणं पूर्ण थांबवलं त्यांनी आता चित्रांकडे का आणि कसं वळावं? अशा चित्रकलेतील अनेक साध्या पण महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा या लेखमालेत करण्याचा प्रयत्न असेल.

आभा भागवत

abha.bhagwat@gmail.com