लहानपणापासून नृत्य शिकल्याने  रंगमंचावर जाण्याची भीती (स्टेज फीअर), लोकांसमोर कला सादर करण्याची काळजी उरत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आत्मविश्वास, लोकांसमोर उभं राहण्याचा विश्वास वाढतो. ज्याचा उपयोग पुढे नोकरी करताना ‘प्रेझेंटेशन’ देण्यावेळी होऊ शकतो. नृत्य शिकल्याने मेंदूचा विकास होण्याससुद्धा गती मिळते, असं विविध संशोधनांतून सिद्ध झालं आहे. एकाग्रता वाढते तसंच नृत्यातील स्टेप्स शिकणं, योग्य त्या क्रमात लक्षात ठेवणं यातून स्मरणशक्तीसुद्धा तल्लख होते.

यावर्षी गणपतीमध्ये एका नातेवाईकांकडे दर्शन घ्यायला गेले होते. त्यांच्या घरी एक तीन वर्षांची चिमुरडी मस्त बागडत होती. आरत्यांच्या तालावर अचूक ठेका धरत होती आणि त्याच लयीत सुंदर मनसोक्त नाचतसुद्धा होती. घरात सगळ्यांचंच लक्ष त्या बालिकेच्या मोहक बाललीलांनी वेधून घेतलं होतं. घरात लहान मूल म्हटलं की त्याच्या/तिच्या विविध कलागुणांचा परफॉर्मन्स ठरलेला असतोच! तसंच आरती वगैरे सगळं आटोपल्यावर त्या चिमुरडीच्या आईने विनंतीवजा आग्रह केला, ‘‘चल मृण्मयी, आता मस्त नाचून दाखव या सगळ्यांना. आमची मृण्मयी फार छान नाचते बरं..’’असं म्हणत गाण्यांना सुरुवात झाली. आधी जरा लाजत असलेली मृण्मयी, मग गाणी गात मस्त तालात नृत्य करू लागली. बघणाऱ्या सगळ्यांचीच शाबासकी मिळाली तिला! तिथे आलेल्या एका काकूंनी मृण्मयीच्या आईला विचारलं ‘‘खूप छान नाचते तुमची मुलगी.. कुठल्या क्लासला जाते का?’’ मृण्मयीची आई -‘‘नाही हो. असंच टी.व्ही.वर बघून नाचत असते दिवसभर.’’ काकू – ‘‘व्वा! थोडी मोठी झाली की नक्की डान्स क्लासला घाला हिला. अंगात छान ताल आणि लय आहे हिच्या!’’

त्यावर मृण्मयीची आई चटकन म्हणाली, ‘‘नाही नाही.. डान्स वगैरे ठीक आहे आता. दोन वर्षांनी पहिलीमध्ये गेल्यावर अभ्यास एके अभ्यास.. डान्स क्लासच्या नादापायी पुढे जाऊन अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकतं. शिवाय आजकाल रिअ‍ॅलिटी शोज आणि सगळीकडे डान्स चालू असतो. उगाचच मुलांचा या सगळ्यात वेळ वाया जातो!’’

मी हे सगळं संभाषण ऐकत होते आणि मनात मृण्मयीचा विचार करत होते. नृत्य किंवा इतर कुठल्याही अभ्यासेतर कला वा क्रीडामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं, असं अनेक पालकांना वाटतं, परंतु केवळ ‘अभ्यास एके अभ्यास’ केल्याने मुलांच्या उपजत कलागुणांकडे, आवडीकडे दुर्लक्ष होत नाही ना? याची खबरदारी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ असं म्हणतो आपण, मग तसंच अनेक दिग्गज कलाकार, खेळाडूंच्या बाबतीत पण लहानपणापासून, वेळीच त्यांचे गुण, कौशल्य निरखून; त्यांचं योग्य ते प्रशिक्षण आणि मेहनत घेतल्याने ते नावारूपाला आलेले आपण पाहिलं आहे! आपल्या पाल्याचा कल, आवड आणि गुण योग्य वयात ओळखून त्याला प्रोत्साहन देणं, यात  आईवडिलांचा फार मोलाचा वाटा असतो. कारण उपजत कलागुणांना वाव देऊन, त्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन मुलांच्या आवडी जपणं हे मुलांच्या भवितव्यासाठीदेखील अत्यंत आवश्यक असतं. आज आपण ‘नृत्यकला’ प्रशिक्षण मुलांच्या सर्वागीण विकासासाठी कसं पोषक ठरू शकतं याचा आढावा घेणार आहोत..

नृत्य ही एक अतिप्राचीन कला आहे, भाषा विकसित होण्या आधीपासून नृत्यकला अस्तित्वात आहे. नृत्यकलेत अनेक स्थित्यंतरं होत होत तिला समाजमान्य सादरीकरणाच्या माध्यमाचा दर्जा मिळाला. ‘नृत्य म्हणजे लयबद्ध शारीरिक हालचाली’. परंतु नृत्याच्या या संकल्पनेपेक्षा नृत्याचा विस्तार आणि या कलेची झेप खूप व्यापक आहे. नृत्यामध्ये पदन्यास, हस्तमुद्रा, आंगिक आणि वाचिक अभिनय, या सर्वच गोष्टींचा सुंदर मेळ साधलेला असतो. या सर्व हालचाली ठरावीक तालात, लयीत केल्या जातात. तसंच वाद्यवृंद आणि गाण्याबरोबर या हालचालींचा ताळमेळ होणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे नृत्य शिकवताना फक्त एखाद्या गाण्यावर स्टेप्स शिकत नाहीत. तर त्याबरोबर ठेका, भावमुद्रा, लवचीकता या सर्वच गोष्टी आपसूकच शिकता येतात. लहानपणापासून नृत्याचे धडे गिरवले तर नृत्याची लय, डौल अंगात भिनते आणि प्रत्येक कामात, हालचालींमध्ये ही लय उपयोगी ठरते. परंतु लहान मुलीच्या उपजत हालचालींमधील सौंदर्य जपणंसुद्धा तितकंच फायदेशीर ठरतं. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीचं प्रशिक्षण साधारणत: वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षांपासून घेण्याचा सला दिला जातो. कारण त्यामध्ये शिकवल्या जाणाऱ्या मुद्रा, ताल, शारीरिक पोजेस् समजून-उमजून करण्यासाठी शरीर व मन तयार असणं गरजेचं असतं. त्याआधी हॉबी क्लासमध्ये नृत्य शिकायला अनेक पालक पाठवतात. त्यामुळे मुलांमध्ये नृत्याची गोडी निर्माण होते.

गर्दीमध्येसुद्धा नर्तिका ओळखता येऊ शकते, कारण नर्तिकेच्या हालचालींमधील विशिष्ट गती, शरीराची ढब (पोश्चर) या सगळ्यामुळे ती गर्दीमध्ये वेगळी उठून दिसते. नृत्य शिकल्याने व्यक्तिमत्त्वात, स्वत:ला प्रेझेंट (लोकांसमोर वावरताना ठेवण्याचं भान) करण्यात एक प्रकारचा उठाव दिसून येतो. लहानपणापासून नृत्याचं सादरीकरण केलं तर रंगमंचावर जाण्याची भीती (स्टेज फीअर), लोकांसमोर कला सादर करण्याची काळजी उरत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आत्मविश्वास, लोकांसमोर उभं राहण्याचा विश्वास वाढतो. ज्याचा उपयोग पुढे नोकरी करताना ‘प्रेझेंटेशन’ देण्यावेळी होऊ शकतो. नृत्य शिकल्याने मेंदूचा विकास होण्याससुद्धा गती मिळते, असं विविध संशोधनांतून सिद्ध झालं आहे. एकाग्रता वाढते तसंच नृत्यातील स्टेप्स शिकणं, योग्य त्या क्रमात लक्षात ठेवणं यातून स्मरणशक्तीसुद्धा तल्लख होते. ‘इमॅजिनेशन म्हणजेच विविध कल्पना सुचायलासुद्धा नृत्याने चालना मिळते. सर्जनशीलता वाढण्यास नृत्याची मदत होते आणि तेदेखील मेंदूला खाद्य म्हणून पूरक ठरते. त्याचबरोबर नृत्याच्या रचना शिकताना सभोवतालच्या जागेचा विचार व अंदाज घ्यावा लागतो, त्यामुळे ‘व्हिजुओ – स्पेशिअल स्किल्स’सुद्धा वापरात येतात.

शारीरिक आरोग्यासाठीसुद्धा नृत्याचे फायदे सिद्ध झाले आहेत. नृत्य हा एक शारीरिक व्यायाम आहे. नृत्यामुळे शरीराची लवचिकता वाढते, स्नायूंची शक्ती वाढण्यास मदत होते. नृत्य हा एक उत्तम कार्डिओ (हृदयासाठी फायदेशीर) व्यायाम प्रकार गणला जातो. नृत्यांमुळे रक्तदाब व मधुमेहसुद्धा नियंत्रणात राहू शकतो असं काही तज्ज्ञांचं मत आहे. नृत्यात सर्वच शरीराचा व्यायाम होतो, त्याचबरोबर गाण्याबरोबर व्यायाम करताना व्यायामाचा ताणही येत नाही. लहानपणापासून नृत्याचा नियमित सराव केल्यास शरीर तंदुरुस्त राहण्यास मोठी मदत होऊ शकते.

मानसिक आरोग्यासाठीसुद्धा नृत्य उपयोगी ठरते. मनावरील ताण दूर करण्यास नृत्य मदत करते. लहान मुलांसाठीसुद्धा अभ्यास, परीक्षांचा ताण दूर होण्यास नृत्य फायदेशीर ठरू शकते. नृत्यकेल्याने मन प्रसन्न होतं, मनातील वाईट भावना व डोक्यातील नकारात्मक विचार कमी होतात. नृत्य हे भावना व्यक्त करण्याचंसुद्धा एक प्रभावी माध्यम आहे. नृत्यामुळे लहानपणापासून सांघिक भावनासुद्धा शिकता येते. समूह नृत्य करताना सांघिक भावना जपणं फार महत्त्वाचं असतं. समूहातील सर्वाचं भान ठेवत एकसारख्या हालचाली केल्या, तरच त्या समूहाचं नृत्य आकर्षक  करतं. ही सांघिक भावना पुढील आयुष्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी उपयोगी ठरते. घरात निर्णय घेताना, ऑफिसमध्ये काम करतानासुद्धा एकजुटीने काम करणं फायदेशीर ठरतं.

शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि व्यक्तिगत अशा विविध स्तरांवर नृत्याचे फायदे दिसून येतात. नृत्य शिकण्याबरोबरच या सर्व गोष्टी अंगात भिनू लागतात व व्यक्तीच्या सर्वागीण विकासासाठी त्या पुष्टी देतात. योग्य वयात नृत्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली तर मुलांच्या शारीरिक व बौद्धिक वाढीबरोबरच नृत्याचे विविध फायदे मिळू शकतात.. या पुढील लेखांमध्ये पोषक ठरणाऱ्या नृत्याच्या फायद्यांचा आपण आढावा घेणार आहोत!

तुमची मुलं, नातवंडं, नातेवाईक – कुणालाही नृत्याचं प्रशिक्षण घेण्याची इच्छा असेल तर विलंब करू नका.. कारण इच्छा तेथे मार्ग!

(तेजाली यांनी मुंबई विद्यापीठातून क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये एम.ए. केले असून क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून त्या कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे कथ्थक नृत्यांगना असून कोरिओग्राफीही करतात. तेजाली यांनी युनेस्कोने प्रमाणित केलेला ‘डान्स मुव्हमेंट थेरपी’मधील अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्या डान्स मुव्हमेंट थेरपिस्ट म्हणूनही काम करतात.)

तेजाली कुंटे

tejalik1@gmail.com