मुलांच्या कागदावरच्या चित्रांत कोणाचीही ढवळाढवळ असू नये. मुलं जन्मत:च अतिशय सृजनशील असतात, कारण नवीन शिकल्याशिवाय त्यांना आजूबाजूचं जग कळणारच नाही. हे जग त्यांना इतकं नवं असतं की प्रत्येकच गोष्टीचं प्रचंड कुतूहल त्यांच्या मनात असतं. आणि आपण चुकू याची भीती अजिबात नसते म्हणून तर ती नवीन गोष्टी शिकू शकतात, शोधू शकतात.

मुलांसाठी स्वयंस्फूर्तीने चित्र काढणं जेवढं आवश्यक आहे तेवढंच थोडं मोठं झाल्यावर थोडीशी दिशा दाखवत चित्रानुभव देणं हेही आवश्यक आहे. भित्तिचित्रांतूनही ही दिशा मिळू शकते हे आता शंभराहून जास्त भित्तिचित्र केल्यावर मला जाणवू लागलंय. ठरावीक पौराणिक चित्रं, थोर व्यक्तींची चित्रं, कार्टून्सची नक्कल किंवा एकसुरी पानं-फुलं यांच्या खूप पलीकडे चित्रं जायला हवीत.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Gangu Ramsay
व्यक्तिवेध: गंगू रामसे
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

मुलांसाठी म्हणून चित्र काढताना त्यांना नवा विचार करायला भाग पाडणारी चित्रं हवीत. त्यांच्या सौंदर्य निरीक्षण आणि दृश्य संकल्पनांना साद घालणारी चित्रं हवीत. निळ्या रंगाच्या असंख्य छटा तयार करता येणं शक्य असताना पालिकेने निवडलेल्या भिंतींवर कुठलातरी भडक, बोचरा निळा रंग वापरण्यापेक्षा त्यातील जास्त प्रसन्न छटा तयार करण्यावर मेहनत घ्यायला काय हरकत आहे? काहीतरी विषय आशय असणारी चित्रं नक्कीच सामान्य माणसाला समजायला सोपी जातात, त्यामुळे एकदम अमूर्त आकारांतील चित्र समोर आलं तर ते आवडत नाही, असं बरेचदा होतं. त्यामुळे समाज जर चित्रकलेच्या पहिल्या पायरीवर असेल आणि चित्रकार दहाव्या, तर चित्रकाराने काही पायऱ्या उतरून समाजाला वर चढायला प्रोत्साहन दिलं पाहिजे. सामान्यांना समजेल अशा आशयातून रंगसंगती, आकार, छायाप्रकाश, पोत यांतली मौज अलगदपणे समोर आणली पाहिजे. यासाठी भित्तिचित्रांसारखं सोपं आणि तुलनेने स्वस्त माध्यम नाही. मी दहाव्याच पायरीवर थांबणार, ज्यांना यायचं त्यांनी चढावं, बाकीच्यांना कधी चित्र म्हणजे काय हे समजणारच नाही, असं म्हणून कसं चालेल?

चांगल्या भित्तिचित्रांतून अगदी छोटय़ा मुलांपासून मोठय़ांपर्यंत सर्वाना आनंद आणि नवा विचार मिळू शकतो. गोंड शैलीतील हरणाच्या शिंगांतून आलेलं झाड, थोडे बदल करून अनेक रंगांनी विविध पद्धतींनी मी काढते. एका शाळेत भिंतीवरचं हरीण अगदी छोटय़ा मुलांच्या हाताला येईल इतकं खाली आहे. ते पाहून तीन वर्षांच्या एका मुलीने उत्स्फूर्तपणे शेजारचं गवत तोडून हरणाच्या तोंडात चारा म्हणून घातलं. दुसरा पाच वर्षांचा चिमुकला म्हणाला, ‘‘पण हरणाच्या शिंगांतून का झाड आलंय? त्यानं बी खाल्ली असणार.’’ एक नऊ वर्षांचा मुलगा म्हणाला, ‘‘या हरणाला आता सावली शोधायला हिंडावंच नाही लागणार.’’ एका चित्रात अनेक मुलं, प्राणी, पक्षी आनंदाने पुस्तकं वाचत आहेत असं दाखवलंय. चौदा वर्षांची मुलगी चित्र करताना म्हणत होती, ‘‘अजून कोणाकोणाला पुस्तक वाचायला लावायचंय?’’ झाडावर वेटोळं करून बसलेला पुस्तक वाचणारा साप पाहून एका मैत्रिणीला अजगराचं वाचवलेलं पिल्लू आठवलं. हत्तीच्या पाठीवर बसलेलं पुस्तक वाचणारं पिल्लू हेही सर्वाना खूप आवडतं. यात जर स्थानिक घटकांना वाव देता आला तर ते स्वत:चंच चित्र वाटू लागतं.

एके ठिकाणी वाचत बसलेली एक काळीसावळी मुलगी आणि तिचा फ्रॉक गुलाबी रंगाचा दाखवला आहे. तिथल्याच एका रहिवाशाने असं सुचवलं की, ‘‘गुलाबी रंग तर त्वचेचा हवा ना?’’ काळी त्वचा सुंदर नसते हा विचार आत्तापर्यंतच्या गोऱ्यापान वर्णाच्या चित्रांमुळे तयार झाला आहे, त्यालाही छेद द्यायला हवा. चित्रातली मुलं गोरीच असणं हे अगदी गैर आहे. भारतीय गहुवर्ण, सावळा आणि काळा वर्ण चित्रात येणं फार आवश्यक आहे. खरे चेहरे जाहिरातीतल्यासारखे गुळगुळीत चमकदार नसतात हेही चित्रातून मुलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. चित्र कसं असावं याच्या काही खऱ्याखुऱ्या कल्पना चित्रातून दाखवल्या पाहिजेत. नुकतंच हेमलकसाला तिथल्या मुलांसोबत चित्र काढलं. त्यांचेच गणवेश चित्रातील मुलांना दिले. सावळी, देखणी आदिवासी पोरं, काठय़ांवर उभी राहून चालत येताहेत असं ते दृश्य. शाळेतली मुलं जवळ येऊन चित्र बघून त्यात स्वत:ला आणि मित्र-मैत्रिणींना शोधू लागली. ही सर्व मुलं पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून इकडून तिकडे जायला या काठय़ांचा वापर करतात, त्यामुळे हे चित्र मुलांना अगदी आपल्या आयुष्यातलं वाटू लागलं. नदी कुठल्या रंगाची दिसते, त्यात काय काय असतं हेही मुलांनी सांगितलं आणि त्याचं चित्र तयार झालं.

आनंदवनात कर्णबधिर मुलामुलींसोबत मोठाल्ली भित्तिचित्रं केली. हात हे त्यांचं संवादाचं महत्त्वाचं माध्यम आहे त्यामुळे हाताचं मोठं चित्र, त्याचा केलेला मासा आणि माशातून आलेलं झाड दाखवलं. आणि एके ठिकाणी उंचच उंच झाडं, त्यांच्या फांद्या जणू गळ्यात गळे घालून उभ्या आहेत आणि त्यांच्या पायाशी छोटे छोटे हत्ती चालत जात आहेत असं चित्र आहे. या मुलांना दृश्यकलांमध्ये विशेष गती असते. सामान्य माणसाला चित्रं जेवढी समजत असतील त्याच्या काही पटींनी या मुलांना चित्रं भिडत होती हे जाणवत होतं. कुष्ठरोगी निवासस्थानातही कर्णबधिर मुलं चित्रं काढायला आली. कुष्ठरोग्यांचे झडलेल्या बोटांचे हात भिंतीवर ठेवून त्यांची बाह्य़रेखा वापरून त्यातून सुंदर फुलांनी बहरलेलं झाड, फुलं हे काढून, आपले तथाकथित कुरूप हातही सौंदर्यनिर्मिती करू शकतात हा आनंद त्यांना मिळाला. चित्र तयार होण्याची आणि तयार झालेल्या चित्राची दोन्हीची ताकद अजून शोधायला खूप वाव आहे.

मुलांच्या कागदावरच्या चित्रांत मात्र कोणाचीही ढवळाढवळ असू नये. मुलं जन्मत:च अतिशय सृजनशील असतात, कारण नवीन शिकल्याशिवाय त्यांना आजूबाजूचं जग कळणारच नाही. हे जग त्यांना इतकं नवं असतं की प्रत्येकच गोष्टीचं प्रचंड कुतूहल त्यांच्या मनात असतं. आणि आपण चुकू याची भीती अजिबात नसते म्हणून तर ती नवीन गोष्टी शिकू शकतात, शोधू शकतात. काही तज्ज्ञ असं मानतात की सर्जनशीलता ही साक्षरतेइतकीच महत्त्वाची आहे आणि शिक्षणात सर्जनशीलतेला तो दर्जा मिळाला पाहिजे.

केन रॉबिन्सन नावाचे ब्रिटिश शिक्षणतज्ज्ञ यांचा क्रिएटिव्हिटीवर एक ‘टेड टॉक’ आहे त्यात ते सांगतात, चित्र काढणाऱ्या एका मुलीला ‘‘काय काढते आहेस?’’ विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘देवाचं चित्र.’’ शिक्षिका म्हणाली, ‘‘पण देव कसा दिसतो कोणालाच माहीत नाही.’’ क्षणभरही न थांबता मुलगी म्हणाली, ‘‘आता कळेल माझं चित्र पूर्ण झालं की.’’ मुलांना एवढी खात्री असते स्वत:बद्दल आणि आपलं काही चुकेल याची जराही चिंता नसते म्हणूनच एवढी सर्जनशील उत्तरं मुलं देऊ शकतात. चुका करण्याची भीती ज्यांना बसते त्यांना कधीही नवीन, अस्सल काही सुचत नाही. मुलं मोठी होताना ही क्षमता हरवून बसतात. कारण आपली शिक्षण पद्धती अशी आहे की चुकलं की आपण निषेध करतो आणि चुका करणं हा मोठा गुन्हा आहे असं मुलांच्या मनावर बिंबवतो. मोठं होताना खरं तर जास्त सर्जनशील व्हायला हवं, तर आपण क्रिएटिव्हिटीपासून लांबच जातो. मुलांनी काढलेल्या चित्राला घाण म्हणणं, त्यांनी काय दाखवायचा प्रयत्न केला आहे समजून न घेता त्यातल्या आपल्याला वाटतात म्हणून चुका दाखवणं यामुळे सगळी सर्जनशक्ती चिरडली जाते, जखमी होते. मुळात मुलं एखादी कृती करतात त्यामागे अत्यंत तर्कयुक्त कारण आहे यावर मोठय़ांचा विश्वास हवा.

आपल्याकडे कुठल्या विषयाला कुठला दर्जा हेही अगदी पक्कं ठरलेलं आहे. सर्वात उच्च श्रेणी गणित, विज्ञान आणि भाषांना आणि मग तळाशी कला. त्यातही चित्रकला, संगीत श्रेष्ठ आणि नृत्य, नाटय़, अभिनयाला दुय्यम स्थान. लहानपणी जी मुलं संपूर्ण शरीर वापरून व्यक्त होत असतात ती मोठी होताना हळूहळू शरीराचा फक्त वरचा भाग वापरतात. बसून हात आणि डोकं वापरून काम करायला शिकतात. मग अजून मोठी होताना हातांचं कामही बंद होतं आणि फक्त डोकं म्हणजे मेंदू वापरून काम करू लागतात. चमकदार बोलू शकणाऱ्याची बुद्धिवान म्हणून वाहवा होते. संपूर्ण शिक्षणव्यवस्थेची रचनाच अशी असते की शालेय स्तरावर तुम्हाला काय हवंय यापेक्षा नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळावा म्हणून तयारी करणं महत्त्वाचं मानतात. मुलं खऱ्या शिक्षणापासून वंचितच राहतात. जी त्या साच्यात बसत नाहीत त्यांना आपापले मार्ग शोधावे लागतात. शिक्षणाचा त्यांना उपयोगाच होत नाही. आपली शिक्षणव्यवस्था अशा मुलांना उपयोगी पडावी यासाठी पालक आणि शिक्षकांनी खूप सजग व्हायची गरज आहे. कलांचं महत्त्व लक्षात आलं तरच यात बदल घडू शकेल.

आभा भागवत abha.bhagwat@gmail.com