संगीत अन् भावनांचा थेट संबंध आहे. अगदी लहानपणापासून म्हणजे बडबडगीतं, बालगीतं ते थेट वृद्धत्वापर्यंत म्हणजे भजन, भैरवीपर्यंत आपलं संगीताबरोबर अतूट नातं असतं. अगदी जुन्या काळात खूप हळूवार संगीत असे, म्हणजे मला माहीत असलेलं सहगल यांचं ‘बाबुल मोरा’ किंवा ‘जब दिल ही टूट गया’ ज्याच्यातून भावना हळुवारपणे व्यक्त होत. हळूहळू संगीताचा बाज बदलत गेला जसं की, गीता दत्त यांचे ‘ए दिल मुझे बता दे तू किसपे आ गया है!’ आणि मग लता दिदींचं ‘रुलाके गया सपना मेरा’, ‘वो है जरा खफा खफा’ अन् आशाबाईंची जशी ‘तिसरी मंजिल’ या चित्रपटातली सर्वच गाणी आणि अशी खूप खूप खूप.. मग जरा आधुनिक काळ, राजेश खन्ना, अमिताभ व आर. डी. बर्मन यांच्या गाण्यांचा सिलसिला सुरूच राहिला आणि मग त्यानंतर पुढे संगीत वेगाने बदललंय. म्हणजे असं की संगीताचे प्रकार जरी बदलले तरी आजही सार्वत्रिक वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या भावना संगीताद्वारे व्यक्त होतात किंवा तोसुद्धा एक मार्ग असतो. प्रेम, हर्ष, नैराश्य तर आहेच, पण देवाविषयी जी कृतज्ञता, त्याच्या वर असणारी भक्तीसुद्धा आपण आरतीरूपी व्यक्त करतो. किंबहुना ज्याला छानशी चाल असेल तेच आपल्याला भावतं. म्हणावंसं वाटतं. थोडक्यात काय तर साधारणपणे सर्वानाच गद्यापेक्षा पद्य अधिक आवडतं.

संगीताचा ज्याला कुणाला पहिल्यांदा साक्षात्कार झाला आणि ज्याने इतरांपर्यंत पोहोचवलं, त्यांनी जणू आपल्याला भावनिक भेटच अर्पण केली आहे असं मला वाटतं! अहो बऱ्याच वेळा असंही होतं की एका विशिष्ट प्रकारचं संगीत ऐकल्यावर भावनांचा उद्रेक होतो किंवा अनेकदा असं पण होतं की काही गाण्यांशी आपल्या भावना जोडल्या गेल्या असतात. उदाहरणार्थ, आपण म्हणतो की नाही की अमुक एक गाणं ऐकल्यावर मला माझे कॉलेजचे दिवस आठवले किंवा हे गाणं ऐकल्यावरच मला माझ्या आजीने भरवलेला घास खायला आवडायचा.. असं काही तरी!! म्हणजे चांगल्या किंवा दु:खद आठवणी अशा दोन्ही आपल्या त्या त्या ठरावीक संगीताशी जोडल्या गेलेल्या असतात.

अशीच एक आमच्या लहान मुलांच्या संगीत वर्गात घडलेली एक गोष्ट. लहानग्यांचा क्लास म्हटला की साधारपणे अभंग, राष्ट्रगीत, बालगीत (खूप सारी) असंच शिकवलं जातं. तर आमच्याकडे एक मुलगी यायची. असेल साधारण सात-आठ वर्षांची. कळतंय नकळतंय असंच वय होतं तिचं. साधारणपणे आमचं महिन्याला एक गाणं शिकवून होतं. तिला आमच्याकडे येऊन आठ महिने झाले होते. ती गायची छान, पण कोणात जास्त मिसळायची नाही. इतर मुलींमध्ये रमायची नाही. साधारण आठएक गाणी शिकवून झाल्यानंतर आम्ही ‘आई’ या विषयावरचं गाणं सुरू केलं. अन् काही दिवसांतच आम्हाला जाणवलं की ती मुलगी हे गाणं म्हणतच नाही. जरा दु:खी वाटायची. पण तिला थेट विचारायचं अन् तेही इतक्या लहान वयात म्हणजे थोडं कठीणच होतं. पण आपल्याला माहीत आहे की लहान मुलं जरी बोलली नाहीत तरी त्यांचा चेहरा बोलतो. पण तरीही नक्की काही समजत नव्हतं. नंतर तिच्या घरच्यांशी रीतसर संवाद साधला आणि असं समजलं की तिला आई नव्हती. ती दहाएक महिन्यांपूर्वीच वारली होती. आणि तिला विसर पडावा म्हणून तिला गाण्याच्या क्लासला दाखल केलं होतं. हे समजताच ते गाणं बदलण्यात आलं. पण हळूहळू तिच्यावर गाण्यांचा परिणाम होऊ लागला आणि ती सगळ्यांत छान मिसळू लागली. छान गाऊ लागली. सर्वाशी बोलायला, खूश राहायला लागली. संगीताची ही भेट तिला चांगलीच भावली.

तसंच अलीकडची आणखी एक सतावणारी गोष्ट म्हणजे मुलांमध्ये अतिक्रियाशीलता वा हायपर अ‍ॅक्टिव्हिटी. या मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते व ती बाकी मुलांचा जो वेग असतो त्यापेक्षा पुढेच असतात. त्यांचा बौद्धांकही सामान्य मुलांपेक्षा बरेचदा जास्त असतो. आमच्या ‘स्वरमानस’मध्ये पण अशीच एक मुलगी होती. सर्वच मुलांना आम्ही एका रांगेत बसवत असू अन् केव्हा तरी गोल करून गाणं म्हणत असू. पण ही मुलगी काही केल्या एका ठिकाणी टिकायची नाही. गाण सुरू झालं रे झालं की ती गोल गोल फिरे. इकडून तिकडे फेऱ्या आणि धावाधाव असे चालू असे अन् त्यामुळे शिक्षकांचे काहीच चालत नसे. प्रेमाने सांगून, ओरडूनही काहीच फरक पडायचा नाही. एवढंस मूलच ते, रागावणार तरी काय? पण जेव्हा आम्ही प्रत्येकाला एकटं गायला लावायचो तेव्हा मात्र आम्ही शिकवत असलेलं गाणं अगदी अचूक यायचं. तेव्हा एक कळलं की हिला गाण्याचा कंटाळा नाही तर थोडी जास्त अ‍ॅक्टिव असल्या कारणाने ती एका ठिकाणी बसूच शकायची नाही. मग आम्ही सगळ्याच मुलांकरिता थोडी ध्यानधारणा, ओंकार, दीर्घ श्वासप्रश्वास अन् क्लासच्या शेवटी छान संथ पण मुलांना आवडेल असं भजन गायचो. अन् हळूहळू आम्हाला हे दिसायला लागलं की ही छोटी शांतपणे बसायला लागलीय. ‘म्युझिक थेरपी’मध्ये पण असे लहान-मोठय़ा मुलांना शांत करणारे असे विशिष्ट राग आहेत ते या अशा प्रकारच्या मुलांना ऐकवायला काहीच हरकत नाही. त्याचा या मुलांना नक्कीच फायदा होतो.

बरं इकडे या दोन्ही मुलींना गाणं आवडायचं. पण अशी कित्येक लहान मुलं असू शकतात की ज्यांना गाणं आवडत नाही. पण मग ते एखादं वाद्य वाजवायला शिकू शकतात किंवा त्यांचं मन संयमित राहाण्याकरिता विविध प्रकारचं संगीत किंवा वादन (एखादा छान सतारीचा तुकडा) रात्री किंवा दिवसाच्या कुठल्याही प्रहरी रेडिओ किंवा सीडी प्लेअरवर ऐकवू शकतो. असं म्हणतात की रात्री झोपताना आपण जर चांगल्या मानसिक स्थितीत असू तर त्याचा दुसऱ्या दिवसावर सकारात्मक परिणाम होतो.   संगीत मुलांना एकत्र आणतं. अगदी नर्सरी म्हणजे शिशू वर्गापासून ‘एबीसीडी’ पण एका ठरावीक चालीत, लयीत शिकवलं जातं. त्यापुढे बालगीतं भरपूर हावभाव, चलनवलन करत शिकवली जातात. ज्यामुळे मुलांना ते लक्षात राहायला मदत होते. शिवाय सामूहिक गाणं, टाळ्या वाजवणं यांच्या एकसंध परिणाम मुलांच्या सर्वागीण विकासावर होतो. शिवाय जुनी-नवी गाणी अगदी लहान वयापासून कानावर पडतात. त्यामुळे सहलींमध्ये सगळे एकत्र येऊन गाण्यांच्या मस्तपैकी भेंडय़ा खेळतात. यामुळे मेंदूला चालना मिळते. भाषा, ज्ञान, स्मरणशक्ती तर वाढतेच; पण मानसिक व शारीरिक स्वास्थ्य संतुलित राहातं. शिवाय हा एक सामूहिक खेळ असल्या कारणाने मुलांचं लहान वयातच निरीक्षण वाढतं. चेहरा बोलका, व्यक्त करणारा होतो आणि आपण सर्वच हे जाणतो की हसरी व्यक्ती सगळ्यांमध्ये लोकप्रिय होते. अन् या सर्व गोष्टींमुळे संगीतामुळे सामाजिक विकास ही घडतो.

त्यामुळे जर आपल्या या समाजात एक चांगली, सहृदय, रसिक, इतरांना प्रतिसाद देणारी, कौतुक करणारी व आनंदी अशी पिढी तयार व्हावी असं जर वाटत असेल तर त्यांना अगदी जन्मापासून भरपूर विविध प्रकारचं संगीत ऐकवणं अथवा गाणं, वाद्य शिकायला लावणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या कलियुगात सर्वत्र चेतना आणि ऊर्जा निर्माण होण्यासाठी हे करायलाच हवं..

मानसी केळकर-तांबे

swarmaanas@gmail.com