परदेशातलं उच्च शिक्षण म्हणजे गलेलठ्ठ पगाराची सोय अशा समजुतीला छेद देत, दोन मराठमोळ्या तरुणांनी थेट इंग्लंडमध्ये मनोरंजनासाठी स्टार्ट-अपचं नवं प्रारूप यशस्वी केलंय.

उद्योग-व्यवसाय आणि मराठी माणूस हे समीकरण जमणं तसं अवघडच म्हणावं लागेल. त्यातही मार्केटिंगचा भाग अधिक असेल तर मग चार हात दूरच राहण्याचा आपला स्वभाव आहे. मग अशा प्रकारचा व्यवसाय तोही थेट इंग्लंडमध्येच सुरू करायचा ही कल्पनाच काहीशी न पचणारी म्हणावी लागेल. पण महाराष्ट्रातल्याच दोन तरुणांनी मनोरंजनाच्या क्षेत्रात सुरू केलेल्या व्यवसायाने आता जोर पकडला आहे.

तुळजापूर आणि पलूस या काहीशा मुख्य प्रवाहात नसणाऱ्या गावांतून इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणासाठी गेलेल्या या दोघांनी गेल्या वर्षभरापासून इंग्लंडमधील समस्त भारतीयांच्या मनोरंजनाचं समन्वय सुरू केलंय असं म्हणायला हरकत नाही. आपल्याकडे उद्योग-व्यवसायाच्या नव्या संकल्पनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारसा सकारात्मक नाही. (त्यातही हा व्यवसाय सेवा क्षेत्रातील असेल तर आणखीनच कठीण.) पण प्रतीक शेलार ज्या विद्यापीठात शिक्षण घेत होता तेथे अशा संकल्पनांना मार्गदर्शन केले जाते. ते प्रारूप व्यवसायपूरक असेल तर त्याच्या विकासासाठी वेळ दिला जातो. थोडक्यात म्हणजे एनक्यूबेट केले जाते. त्यातूनच २०१५ मध्ये इंडियन मूव्ही फ्रेन्ड या वेबपोर्टलची सुरुवात झाली. आज या पोर्टलवर १० हजार ग्राहक या सुविधेचा लाभ घेत आहेत.

हा साराच प्रवास खूप रंजक असा आहे. प्रतीकला उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली म्हणून तो २०१२ मध्ये कॉव्हेन्ट्री विद्यापीठात गेला. शिक्षण संपल्यावर त्याला भारतात नोकरी शोधायला लागली असती. कारण इंग्लंडमध्ये पूर्वी उच्च शिक्षणानंतर तीन वर्षांचा व्हिसा मिळायचा त्या काळात तुम्ही तेथे सहज नोकरी करू शकायचा. पण २०१२ मध्ये ही सुविधा बंद करण्यात आली होती. त्याच वेळी एक नवीन सुविधादेखील सुरू झाली. जर तुमच्याकडे उद्योग-व्यवसायाचे असे एखादे प्रारूप असेल ज्यातून पुढे त्या व्यवसायाची वृद्धी होऊ शकते तर ते प्रारूप तुम्ही संबंधित विद्यापीठाला सादर करू शकता. आणि ते प्रारूप कार्यान्वित करण्यासाठी पुढील दोन वर्षांचा व्हिसा मंजूर केला जातो. या नव्या सुविधेचा फायदा त्याने घेतला. इंग्लंडमध्ये दरवर्षी फक्त एक हजार विद्यार्थ्यांना हा व्हिसा दिला जातो.

प्रतीक जेव्हा इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेला तेव्हा त्याच्या लक्षात आले की येथे भारतीयांच्या मनोरंजनाच्या सुविधा अनेक आहेत. भारतीय भाषेतील चित्रपटदेखील येथे सहज पाहता येतात. पण त्या सर्वच सुविधांची माहिती एकत्रितपणे एकाच ठिकाणी उपलब्ध नाही. दुसरीकडे मराठी वर्गदेखील बराच आहे, पण तो विखुरलेला आहे. त्यातूनच त्याच्या डोक्यात या पोर्टलने जन्म घेतला. भारतीय भाषांतील सर्वच्या सर्व चित्रपटांची माहिती एकाच ठिकाणी द्यायची. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची प्रसिद्धीदेखील करायची. आणि ज्यांना हे चित्रपट पाहायचे आहेत त्यांच्यासाठी तिकिटांची सुविधादेखील द्यायची. त्याने मांडलेले व्यवसायाचे हे प्रारूप त्याच्या विद्यापीठातील एनक्यूबेशन सेंटरला पटले. ते त्यांनी स्वीकारले. प्रतीकला दोन वर्षांचा व्हिसादेखील मिळाला. स्वप्नीलनेदेखील त्याच विद्यापीठात शिकत असताना आयुर्वेदिक उत्पादनांच्या आयात-निर्यातीचे एक प्रारूप सादर केले होते. त्यासाठी त्याला एक वर्षांचा व्हिसा मंजूर झाला. हे सारे २०१४च्या मध्यापर्यंत सुरू होते. त्यानंतर प्रतीकने जवळपास वर्षभर मार्केटचा अभ्यास केला आणि २०१५च्या सुरुवातीस हे पोर्टल सुरू केले.

आज या वेबपोर्टलने चांगलाच जम बसवला आहे. ‘बाहुबली’, ‘सूर्या’ अशा ११ चित्रपटांच्या जनसंपर्काचे काम त्यांनी केले आहे, तर आजवर हजारो तिकिटांची विक्री झाली आहे.

हे दोघेही मराठी असल्यामुळे त्यांच्याकडून मराठी चित्रपटासाठी काही विशेष प्रयत्न झाले नसते तर नवलच म्हणावे लागेल. इंग्लंडमध्ये हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम, पंजाबी, बंगाली आणि काही प्रमाणात उर्दू चित्रपटांसाठीची वितरण व्यवस्था चांगलीच विकसित झाली आहे; पण मराठीसाठी अशी काही वितरण व्यवस्था नाही. तेथील महाराष्ट्र मंडळांच्या माध्यमातून हे काम केले जात असे. डॉ. महेश पटवर्धन या कलाप्रेमी डॉक्टरांच्या मदतीने काही चित्रपटांचे प्रदर्शन होत असे; पण ते ठरावीकच खेळांपुरते आणि ठिकाणांपुरते मर्यादित असे. याच पटवर्धन डॉक्टरांच्या मदतीने त्यांनी ‘कटय़ार. आणि ‘नटसम्राट’ हे दोन चित्रपट वितरित केले, मार्केटिंग केले.

वितरणाचे काम हा त्यांच्या पोर्टलचा मूळ उद्देश नाही; पण मराठीच्या प्रेमापोटी त्यांनी तो प्रयोग केला. त्यामुळे आत्ता यापुढे भारतातील प्रदर्शनाबरोबरच तो इंग्लंडमध्येदेखील करायची संकल्पना त्यांच्या डोक्यात आहे.

खरे तर वितरण ही खूपच किचकट प्रक्रिया आहे. वेगवेगळ्या चित्रपटगृहांच्या भाडय़ाचे वेगवेगळे दर, कोणाला नफ्यात भागीदारी हवी असते, तर कोणाला भाडे आणि नफा दोन्ही सांभाळायचे असते; पण हे सारे त्यांनी जुळवून आणलेय. त्यापूर्वी ‘नागरिक’ आणि ‘अनुराग’ या चित्रपटांसाठी हा प्रयोग अजमावून झाला होता; पण ‘नटसम्राट’च्या वेळी त्यात सुधारणा करण्यात आल्या. शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवशी मिळून संपूर्ण इंग्लंडमध्ये पाच सिनेमागृहांत ११ खेळ करण्यात आले. त्यामुळे इंग्लंडमधील अनेक रसिकांनी आनंद घेतला.

अर्थातच हा त्यांचा जोड व्यवसाय म्हणावा असा भाग आहे, कारण त्यांचा भर आहे तो मनोरंजन क्षेत्रातील बातम्या, ब्लॉग, मुलाखती, जनसंपर्क आणि तिकिटविक्री यावर. व्यवसायाला फायदा करून देणारे हे घटक महत्त्वाचे आहेत. जाहिरात करणाऱ्यांकडेच तिकिटांची विक्री होत असल्यामुळे तिकिटांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचे प्रतीक सांगतो.

एकंदरीतच या व्यवसायात असणाऱ्या संधीमुळे स्वप्निलनेदेखील पूर्णवेळ यावरच लक्ष केंद्रित केले आहे. नजीकच्या भविष्यात ऑनलाइन मूव्ही स्ट्रीमिंगची सुविधादेखील ते या पोर्टलवरून देण्याची योजना आहे.

त्यांच्या उद्योग व्यवसायाचं गाडं व्यवस्थित चालू आहे हे दर्शविणारी एक घटना नुकतीच घडली. प्रतीक आणि स्वप्निल या दोघांना जो विशेष व्हिसा मंजूर झाला होता, त्याची मुदत या वर्षी संपली आहे. आत्ता त्यांना इंग्लंडमध्ये व्यवसाय करायचा असेल तर बिझनेस व्हिसा घ्यावा लागणार आहे. मात्र त्यासाठी तेथील बाजारपेठेत तुमची दोन कोटी रुपयांची गुंतवणूक असणे गरजेचे असते. हे दोघे विशेष व्हिसामुळे तेथे आहेत, त्यामुळे त्यांना पन्नास लाख रुपयांची गुंतवणूक गरजेची असते. आज त्यांच्या कंपनीत पंधरा लोक काम करतात. पाच जण इंग्लंडमध्ये, तर १० जण भारतातून हे काम सांभाळतात.

पण एकंदरीतच ऑनलाइन व्यापारातील आपल्याकडील परिस्थिती ही सध्या तरी गुंतवणूक अधिक आणि निव्वळ नफा कमी अशीच आहे. इंग्लंडसारख्या देशात हा प्रकार रुळला असला तरी या दोघांचे ग्राहक हे भारतीयच आहेत. सध्या तरी विविध चित्रपटांच्या प्रसिद्धीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न हाच त्यांचा स्रोत आहे; पण भविष्यात त्यांना अभारतीय प्रेक्षकांनादेखील या क्षेत्राकडे वळवायचे आहे. प्रतीकच्याच शब्दात सांगायचे तर मागील वर्षी असणारी १५० हजार पौंडाची उलाढाल या वर्षी ९०० हजार पौंडांपर्यंत वाढवण्याचे टार्गेट ठेवले आहे. थोडक्यात काय, तर त्यांची जिद्द आणि व्यावसायिकता चांगलीच आक्रमक आहे.

खरे तर प्रतीक आणि स्वप्निल हे दोघेही टिपिकल मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेले. ज्या गावात वाढले तेथे मुंबई-पुण्यासारखे वातावरण नाही. ऑनलाइनसारख्या व्यवसायाचं वारं पुरेसं पोहोचलेलं नाही. व्यवसाय करायचा तर त्यात बुडालो तर काय करायचे, हाच पहिला प्रश्न विचारला जाणाऱ्या सामाजिक रचनेत त्यांची वाढ झालेली. परदेशात शिकायला जायचे म्हणजे इकडे आल्यावर गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीची खात्री हीच येथील मानसिकता. त्यामुळे प्रतीकने जेव्हा शेवटच्या सुट्टीत आपल्या व्यवसायाच्या संकल्पनेबद्दल घरी सांगितले तेव्हा त्याचा स्वीकार होणे शक्यच नव्हते. अखेरीस वडिलांबरोबर भांडूनच त्याला निघायला लागले. अर्थातच सर्वसामान्य घरातून आलेला असल्यामुळे त्याला स्वत:ला कोणत्याही श्रमाची लाज वाटत नव्हती, की कसले चोचले नव्हते. त्यामुळे व्यवसाय सुरू करण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात बाजारपेठेचा अभ्यास करताना त्याला बऱ्याच संकटांना तोंड द्यावे लागले.

मराठी माध्यमातील शिक्षण, गावाकडची पाश्र्वभूमी त्यातून या दोघांनी सुरू केलेला हा व्यवसाय म्हणूनच कौतुकास पात्र ठरतो.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com, Twitter – @joshisuhas2