स्टार्ट-अप आणि तंत्रज्ञान हे समीकरण गेल्या काही वर्षांत रूढ झाले आहे. एखादा स्टार्ट-अप सुरू झाला की तो तंत्रज्ञानाशीच संबंधित असेल अशी सर्वसाधारण समजूत झाली आहे. त्याची कारणेही तशीच आहेत. बऱ्याच सर्वेक्षणांवरून असे दिसून आले आहे की, अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा कल उद्योजकतेकडे पर्यायाने स्टार्ट-अपकडे आहे. देशातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये स्टार्ट-अपसाठी पोषक वातावरणनिर्मिती केली जात आहे. उदाहरणार्थ आयआयटी मुंबई, दिल्ली, कानपूर येथे मार्गदर्शन केंद्रे उभारण्यात आली आहेत. भारतातील तंत्रज्ञानस्नेही शहरांमध्ये स्टार्ट-अप उद्योग वेगाने वाढत आहेत. इतकेच नाही तर तंत्रज्ञानाशी संबंधित स्टार्ट-अप्सना प्रसारमाध्यमांकडून चांगली प्रसिद्धी मिळत असल्याने या क्षेत्रातील स्टार्ट-अप्स लोकप्रिय आणि लक्षवेधी ठरत आहेत. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे या स्टार्ट-अप्सच्या यशस्वितेचे प्रमाण. डिजिटल विश्वात सुरू होणारे सगळेच स्टार्टअप्स अल्पावधीत यशस्वी होतातच असे नाही आणि म्हणूनच तंत्रज्ञानाशी संबंधित स्टार्ट-अप सुरू करण्यापूर्वी जाणकारांकडून योग्य सल्ला घेणे आवश्यक असते. प्रत्येकाला असा सल्ला व्यक्तिगत पातळीवर मिळतोच असे नाही, मात्र वेगवेगळ्या माध्यमांद्वारे तज्ज्ञ व्यक्ती त्यांचा सल्ला देत असतात. तंत्रज्ञानाशी संबंधित स्टार्टअप्ससाठी काही उपयुक्त माहिती, आवर्जून विचारात घ्यावेत असे मुद्दे येथे देत आहोत.

उद्योगाचे स्थान

Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती
Harsh Goenka shares video of new palm payment method in China Tech continues to simplify our lives
चीनमध्ये आता तळहात स्कॅन करून दिले जातात पैसे! ‘Palm Payment’चा व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी
Pavan Davuluri IIT Madras graduate is new head Or Boss of Microsoft Windows and Surface
आयआयटी मद्रासचे माजी विद्यार्थी मायक्रोसॉफ्ट विंडोजचे ठरले नवे बॉस; जाणून घ्या पवन दावुलुरीबद्दल

तंत्रज्ञानाशी संबंधित स्टार्ट-अप्ससाठी त्याचे नेमके स्थान महत्त्वाचे असते. आपल्याला असे दिसून येईल की, भारतातील तंत्रज्ञान स्टार्ट-अप उद्योग मुंबई, दिल्ली या शहरांच्या जोडीने बंगळुरू, हैदराबाद, पुणे यांसारख्या शहरांतही विस्तारत आहे. याचे कारण म्हणजे समविचारी माणसांचे सान्निध्य. तंत्रज्ञानाशी संबंधित उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ सहज उपलब्ध होते. आपल्या क्षेत्रातील सगळ्या घडामोडींची अद्ययावत माहिती असण्यासाठी आणि आपण नेमके काय करतोय, हे समजण्यासाठी कुशल माणसे आजूबाजूस असणे चांगले. भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरू या शहरापासून काही किलोमीटरवर असलेले ‘कोरमंगलम’ हे स्टार्ट-अप गाव म्हणून नावारूपास आले आहे.

सातत्यपूर्ण स्व-अध्ययन – तंत्रज्ञान हे नेहमीच बदलत असते आणि तेही वेगाने. त्यामुळे एखादा विचार डोक्यात आल्यापासून तो प्रत्यक्षात येईपर्यंतच्या कालावधीतही एखादे तंत्रज्ञान बदललेले असू शकते किंवा ते अद्ययावत झालेले असू शकते. अशा वेळी आपल्या क्षेत्रातील सर्व घडामोडींची माहिती आणि त्यानुसार काय व्यवसाय करता येईल, हे माहीत असणे आवश्यक आहे. यासाठी डोळे आणि कान उघडे असावेत.

उत्पादन दाखल करण्याची वेळ (लाँच टायमिंग)

तंत्रज्ञान क्षेत्रात लाँच टायमिंग अतिशय महत्त्वाचे ठरते. याची अनेक कारणे असू शकतात. एकतर आपण जो विचार केला आहे, तो इतर कुणीही केला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या उत्पादनाचा यू.एस.पी. शोधणे आवश्यक आहे. आपले उत्पादन बाजारपेठेत सादर करण्यासाठी नेमकी कुठली वेळ योग्य ठरेल, आपल्या उत्पादनासाठी बाजारपेठ अनुकूल आहे का, आपले नेमके ग्राहक कोण असतील, आणि  हे तपासण्यासाठी मार्केटिंगची मदत होते. उदाहरणार्थ स्मार्टफोनच्या एखाद्या अ‍ॅप्लिकेशनसाठी जर वेगवान इंटरनेट सुविधा (फोर जी, इ.) आवश्यक असेल तर त्यासाठी बाजारपेठ आणि ग्राहक किती प्रमाणात सुसज्ज आहे, याचा अभ्यास असणे आवश्यक आहे.

माहितीचे विश्लेषण

आपण जे अ‍ॅप्लिकेशन ग्राहकांसाठी तयार करतोय, त्याचा ग्राहक कसा आणि किती वापर करत आहेत, किती वेळ अ‍ॅप्लिकेशन वापरत आहेत, याविषयीची माहिती निर्माणकर्त्यांकडे असल्यास त्याला आपल्या उत्पादनाविषयी अथवा सेवेविषयी नेमका प्रतिसाद मिळेल. आवश्यक त्या सुधारणा किंवा अद्ययावत करण्यास मदत होईल.

तंत्रज्ञानविषयक स्टार्ट-अप सुरू करताना स्वत:चा गृहपाठ सातत्याने करत राहणे अपेक्षित आहे. आपल्या उत्पादनाविषयी ग्राहकांचा अभिप्राय लक्षात घेऊन त्यात अधिकाधिक सोयी कशा देता येतील, याचा विचार केला जावा.
ओंकार पिंपळे – response.lokprabha@expressindia.com