पाणी कमी प्यायल्याने मूतखडा, सिस्टायटिस असे आजार उद्भवतात. मूत्राशय, मूत्रनलिका, किडनी यांचे वेगवेगळ्या प्रकाराचे आजार असले तरी इन्कॉण्टिनन्स या आजाराविषयीही जाणून घेणे अत्यंत गरजेचं आहे.

परोमिता व्होरा नावाच्या एका तरुणीने बनवलेली क्यू टू पी नावाची एक डॉक्युमेंटरी काही महिन्यांपूर्वी आमच्या महाविद्यालयात दाखवली होती. लिंगभेद आणि अनारोग्य याचा संबंध कसा असतो यावर ही डॉक्युमेंटरी विचार करायला लावते. यासाठी तयारी करत असताना परोमिताने जे सर्वेक्षण केले त्यात असे आढळून आले की महिलांसाठी असलेली स्वच्छतागृहे सशुल्क असतात आणि पुरुषांसाठीची नि:शुल्क! महिलांसाठीची स्वच्छतागृहे रात्री बंद असतात. कारण त्यांच्या चालकांच्या समजुतीप्रमाणे रात्री महिला बाहेर पडत नाहीत; त्यांना स्वच्छतागृहांची काय गरज? आपल्या रेल्वेच्या डब्यांमध्ये महिलांसाठी राखीव डब्यातसुद्धा रात्री उशिरानंतर पुरुषांना प्रवेश असतो. कदाचित अतिगर्दीच्या पुरुषांच्या डब्यांवरचा ताण थोडा कमी व्हावा असा हेतू असेल; पण हाच निकष स्वच्छतागृहांना लावणे आणि रात्री पुरुषांना राखीव स्वच्छतागृहे वापरायला देणे यामागचे शहाणपण पामरांना नकळे।

मुंबई कधी न झोपणारे शहर! काही वर्षांपूर्वी आम्ही मालाडहून सिद्धिविनायक दर्शनासाठी रात्री चालत गेलो. तीन-साडेतीन वाजता माहीमला पोहोचलो. पोलीस चौकीच्या बाजूच्या मोठय़ा व स्वच्छ स्वच्छतागृहाला कुलूप होते. शिवाजी पार्कमधल्या स्वच्छतागृहालासुद्धा कुलूप होते. याचा अर्थ फक्त पुरुषांना रात्री रस्त्यांवर फिरण्याचा हक्क आहे!

जरी उघडे मिळाले तरी स्वच्छतागृहात पाणी, वीज (लाइट्स) असणे आवश्यक आहे. पाणी आणि वीज चोरीबद्दल तर बोलूच नका! मग ही स्वच्छतागृहे अस्वच्छ, दरुगधीपूर्ण असतात यात नवल ते काय?

ओ.पी.डी.त येणाऱ्या बऱ्याच तरुणी, शाळकरी मुली आणि वयस्क महिलांना त्यांच्या पाणी पिणे, लघवीचे त्रास इ. बद्दल विचारले असता मिळणारे उत्तर एकच असते. ‘‘बाहेर लघवीला जायला सोयीस्कर जागा नाही म्हणून पाणी कमी पितात.’’ यातून मूतखडा, सिस्टायटिस (मूत्राशयाचे इन्फेक्शन) असे आजार उद्भवतात. मूत्राशय, मूत्रनलिका, किडनी यांचे वेगवेगळ्या प्रकाराचे आजार असले तरी आज आपण इन्कॉण्टिनन्स (लघवी करण्याच्या क्रियेवर ताबा नसणे व लघवी आपोआप होणे) वर चर्चा करू.

अनेकजणी लघवीची जळजळ, वेदना, इन्फेक्शनने येणारा ताप या तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे जातात; पण लघवी रोखणे किंवा योग्य वेळेस करणे या क्रियांवर ताबा नसणे, ही सर्वासाठीच क्लेशकारक बाब असते. अचानक कपडे ओले होणे, आपल्या शरीराला लघवीचा दर्प असणे यांनी आपल्या सेल्फईमेज, अस्मिता यांचे खच्चीकरण होते, लैंगिक संबंध, कामेच्छा यांच्यावरही परिणाम होतो. नैराश्य येते. गुप्तांगाच्या त्वचेवरसुद्धा परिणाम होतात. हे सर्व वैयक्तिक खासगी पातळीवर होते. पण आपण स्वत:ला समाजाचा उपयुक्त घटक म्हणून जी भूमिका बजावतो, बाहेर कामाला वगैरे जातो, त्या सगळ्याच गोष्टींवर बंधने येतात. प्रवास करतानासुद्धा कपडे, पॅड्स, डायपर्स याच गोष्टींचा पगडा सतत मनावर, मेंदूवर असतो. घरचे समजून घेतात; पण लहान मुलासारखी झालेली ही अनियंत्रित शारीरिक स्थिती सर्वानाच लाजिरवाणी वाटते. इन्कॉण्टिनन्सचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. जेव्हा मूत्राशय, मूत्रनलिका इ. ना इजा होते व ती जखम भरून येत नाही तेव्हा त्या अवयवात कायमस्वरूपी छिद्र निर्माण होते. याला फिस्च्युला म्हणतात. इजा शस्त्रक्रियेत झालेली असू शकते किंवा प्रसूतीच्या वेळेस होऊ शकते. कधी कधी कॅन्सरच्या आजारात रेडिओथेरपी दिली असताना कर्करोगग्रस्त भाग झडून गेल्यावर फिस्च्युला निर्माण होतो. रेडिएशन फिस्च्युला वगळता इतर फिस्च्युले शस्त्रक्रियेने बरे होऊ शकतात. अगदी क्वचितप्रसंगी मूत्रनलिकेच्या जन्मजात व्यंगाने असा फिस्च्युला आढळतो.

20-lp-health

इन्कॉण्टिनन्सचा दुसरा अधिक प्रमाणात पाहिला जाणारा वर्ग म्हणजे स्ट्रेस इनकॉण्टिनन्स, अर्ज इनकॉण्टिनन्स. काही जण याला ‘ओव्हर अ‍ॅक्टिव्ह ब्लॅडर’ असेही संबोधतात. स्ट्रेस इनकॉण्टिनन्स हा खूप जणींना सतावणारा पण छुपा आजार आहे. खोकले, शिंकले, जोरात हसले, धावले तरी थोडीशी लघवी सुटते. याबाबतचे प्रचलित गैरसमज अनेक आहेत.

प्रसूतीनंतर थोडय़ाफार प्रमाणात लघवी गळणे हे स्वाभाविक आहे असे अनेकजणी मानतात. मेनोपॉज (रजोनिवृत्ती) जवळ आला की स्ट्रेस इन्कॉण्टिनन्स स्वाभाविक आहे असेही अनेक जणी मानतात. हे गैरसमज फक्त आपल्याच समाजात आहेत असे नाही. पाश्चात्त्य समाजात पण अशाच धारणा आहेत.

एका अमेरिकन युरोगायनॅकॉलॉजिस्टच्या मते साधारणत: २५ दशलक्ष पुरुष व महिलांना हा त्रास वेगवेगळ्या स्वरूपात आणि प्रमाणात असतो. आपल्या देशातील वेगवेगळ्या ठिकाणच्या संशोधनात रुग्णालयात येणाऱ्या २५ टक्के  महिलांची इन्कॉण्टिनन्सची तक्रार असते. त्यातील ८५ टक्के महिला हा वाढत्या वयाचा भाग म्हणून सहन करतात. शिवाय आजही खेडय़ापाडय़ांतून पुरुष डॉक्टरच मोठय़ा प्रमाणात असल्याने या महिला भिडेपोटी बोलत नाहीत. प्रसूतीच्या वेळेस योनीमार्ग व मूत्राशय यांना विभागणाऱ्या पडद्याचे स्नायू ताणले जातात व योग्य त्या आराम व व्यायामाअभावी ते कालांतराने सैल पडतात. त्यामुळे मूत्राशय व मूत्रमार्ग खाली सरकतात व जोर केल्यास लघवी सुटते. या स्ट्रेस  इन्कॉण्टिनन्सची इतर कारणे म्हणजे स्थूलपणा, बद्धकोष्ठ, दीर्घकाळ चाललेला खोकला. ज्या गोष्टींमुळे पोटाच्या पोकळीत दाब वाढतो;  त्यामुळे हा विकार बळावू शकतो. यासाठी प्रतिबंधक उपाय हा सर्वात सोपा मार्ग आहे. गरोदरपणात व प्रसूतीनंतर पेल्व्हिक फ्लोअर (ओटीपोटाचा तळ)चे व्यायाम हे फारच फायदेकारक असतात. आपण या इलाजांकडे अनावश्यक खर्च या दृष्टीने पहातो; पण याचे दूरगामी फायदे अनेक आहेत.

शस्त्रक्रिया हा जरी स्ट्रेस इन्कॉण्टिनन्सच उपाय असला तरी त्यातील अर्ज (मूत्राशयाच्या आतल्या पटलाच्या अति संवेदनशीलतेमुळे होणारा) इन्कॉण्टिनन्सच्या भागाचे निदान व्हावे लागते. यासाठी लघवीच्या काही तपासण्या कराव्या लागतात; तसेच ‘युरोडायनामिक स्टडीज’ नामक एक विशिष्ट तपासणी करावी लागते. पूर्णत: निदान झाल्याशिवाय शस्त्रक्रिया केल्यास रिटेन्शन (लघवी अडकणे) संभवते.

बायोफीडबॅक ट्रेनिंग : बायोफीडबॅक म्हणजे शारीरिक प्रक्रियेच्या तपासणीचे निष्कर्ष कॉम्प्युटरमार्फत व्यक्तीला कळवणे. आधी उल्लेख केलेले पेल्व्हिक फ्लोअरचे व्यायाम (केगेल्स एक्सरसायझेस) करताना योग्य स्नायूंचेच आकुंचन होत आहे व इतर स्नायू कार्यरत होत नाहीत याची खात्री बायोफीडबॅकद्वारा करता येते. एनसच्या (गुदद्वार) बाजूच्या त्वचेवर व पोटाच्या त्वचेवर स्नायूंचे आकुंचन मोजणारी उपकरणे-सेन्सर्स-लावले जातात व मिळणारी माहिती व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला कळवली जाते व योग्य ते  फेरबदल केले जातात. अध्र्या तासाच्या चार ते सहा सेशन्समध्ये हे शिकवले जाते.

समाजातली आपली सक्रिय भूमिका बजावण्यासाठी, मोकळेपणाने वावरण्यास इन्कॉण्टिनन्ससारख्या तक्रारींना वेळेवर आळा घातला पाहिजे.
डॉ. पद्मजा सामंत – response.lokprabha@expressindia.com