स्पा इंडस्ट्री ही अलीकडे फार मोठय़ा प्रमाणात वाढत असलेली दिसत आहे. डे स्पा शहरात ठिकठिकाणी आपल्याला दिसत आहेत. अनेकदा मनात या स्पा इंडस्ट्रीबद्दल विविध शंका असल्यामुळे आपण याकडे बघतही नाही. रोजची धावपळ आणि दगदग यामध्ये शरीराचे हाल खूप होतात. हा शिणवटा घालवण्यासाठी आणि थोडे स्वतचे लाड करून घेण्यासाठी स्पाची पायरी चढायला हरकत नाही. पॅम्पर करून घेणं हे केवळ लहान मुलांचं काम नाही तर पॅम्परिंग करण्याची खरी गरज आपल्या शरीराला आहे. रोजच्या धावपळीच्या आणि दगदगीच्या जीवनशैलीत शरीराला आणि मनाला उसंत मिळणंच कठीण झालेलं आहे.
मग अशा वेळी कधीतरी वीकेण्डला एखादा चित्रपट पाहाणं किंवा हॉटेलमध्ये जाणं हे होतंच. पण मग शरीराचं काय? शरीराचे लाड पुरवणं ही सुद्धा एक गरज आहे. अनेकदा ऋतुमानानुसार आपल्या शरीरावर त्याचे परिणाम होत असतात. पण आपण मात्र बाह्य़सौंदर्यावर अशावेळी भर देतो. शरीराला वंगण हवं असतं याची जाणीव नसल्यामुळे अनेक दुखण्यांना तोंड द्यावं लागतं. पूर्वीच्या काळी याकरता मसाज हा एक उत्तम उपाय मानला जात असे. थकल्यावर आयुर्वेदिक तेलांचा मसाज हा शरीरासाठी उत्तम ठरतो असं मानणारे अनेकजण आपल्याला आजही माहीत आहेत. सध्या या मसाजला एक वेगळं आणि आधुनिक नाव प्राप्त झालेलं आहे ते म्हणजे ‘स्पा’. स्पाच्या माध्यमातून आपण आपल्या शरीराचे लाड पुरवू शकतो. हे लाड केवळ शरीराचे नाहीत तर सौंदर्याच्या दृष्टीनेही हे लाड तितकेच महत्त्वाचे आहेत.
स्पामध्ये आज अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जागोजागी दिसणारी डे स्पा पार्लर्स आपलं लक्ष वेधून घेतात. पण याठिकाणी जाऊन नेमकं काय करायचं याचीच अनेकदा आपल्याला माहीत नसते. त्यामुळेच स्पाकडे न जाण्याचा कल असतो. प्रत्येक स्पाची स्वतची अशी एक खासियत असलेली आपल्याला दिसून येईल. त्यांच्या मसाजचे एकूण प्रकार, मसाज करण्याच्या पद्धती, मसाजसाठी वापरण्यात येणारं तेल या अशा गोष्टी प्रत्येक स्पागणिक बदलताना दिसतील. पण हे असं असलं तरी मुख्य म्हणजे शरीराला मिळणारा आराम हासुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे.
आयुर्वेदिक स्पा, सिग्नेचर स्पा असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. केवळ इतकंच नाही तर काही ठिकाणी खास पाठदुखी, अंगदुखी यावरही उपचार केले जातात. त्यामुळे केवळ आरामदायी उपायच नाहीत तर आरोग्याच्या दृष्टीनेही स्पाचे महत्त्व वाढू लागले आहे.
खास पायाच्या तळव्यांना आराम मिळावा म्हणूनही थाय मसाज आज मुंबईसह अनेक शहरांमध्ये उपलब्ध आहे. तेल लावून मसाज देण्याकरता अरोमा ऑईलचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो. यामध्ये विविध प्रकारची ऑइल्स बाजारातही उपलब्ध आहेत. प्रत्येक ऋतूंच्या मागणीनुसार स्पामध्ये वापरण्यात येणाऱ्या स्क्रबमध्येही बऱ्यापैकी वैविध्य आणले जाते. आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याचा स्क्रब वापरला जातो. तर उजळपणा येण्यासाठी चंदन स्क्रबचा वापर केला जातो.
शहरातील सध्याच्या हवामानात मोठे बदल होत असताना स्पा करवून घेणं हे केव्हाही श्रेष्ठ असं म्हटलं जातं. शरीराच्या निरनिराळ्या तापमानांना अनुसरून वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी आणि मसाज आपल्याला मिळत असल्याने या आधुनिक पॅम्पर सेंटरला जाऊन स्वतचे लाड पुरवायलाच हवेत. अलीकडे शहरामध्ये काही स्पा सेंटर्स घरी येऊनही स्पा ट्रिटमेंटस् देऊ लागल्या आहेत. काळाची गरज ओळखूनच आता स्पा आपल्या दारी आपले लाड पुरवण्यासाठी येऊ लागले आहे.

स्पामधील मसाजच्या पद्धती
हॉट स्टोन मसाज, अ‍ॅन्टी सेल्युलाइट मसाज, हेड मसाज, बॅक मसाज, अरोमा मसाज, डिप टिश्यु मसाज, डि स्ट्रेस मसाज, फुट रिफ्लेक्सोलॉजी याशिवाय इतर अनेक वैशिष्टय़े प्रत्येक डे स्पाची ठरलेली आहेत.

स्पामध्ये वापरण्यात येणारे स्क्रब
रोझ पॉलिशिंग, कोकोनट क्रिम, हर्बल, फ्रुट, ब्राऊन शुगर स्क्रब असे विविध पर्याय स्क्रबमध्ये उपलब्ध आहेत.

स्पामधील काही प्रसिद्ध बॉडीरॅप्स
चॉकलेट बॉडी रॅपिंग, हायड्रेटिंग रॅप, उटण्याचे रॅप, अ‍ॅन्टी सेल्युलाइट रॅप