मराठी भावगीतांच्या प्रवासात आकाशवाणीवरील ‘भावसरगम’ या कार्यक्रमाचे लक्षवेधी योगदान आहे. ‘भावसरगम’ने दिलेली गाणी, गायक-गायिका, गीतकार, संगीतकार हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. ‘भावसरगम’मध्ये गीते लोकप्रिय झाली आणि नंतर कंपनीने ती गाणी तबकडीबद्ध केली असे अनेक वेळा घडले. रसिकांच्या आवडीचे झालेले गाणे त्यांना हवे तेव्हा ऐकायला मिळावे यासाठी रेकॉर्ड कंपन्या शोधक नजरेने काम करीत. त्यामुळे गायक, वादक, गीतकार, संगीतकार असे सर्वच नावारूपाला येऊ लागले. मुंबई आकाशवाणीवरील या कार्यक्रमाप्रमाणे सर्व केंद्रांवरील सुगम संगीताच्या नव्या गीतांच्या कार्यक्रमांनीही अनेक कलाकार दिले. काही संगीतकारांनी पंचाहत्तर टक्के काम आकाशवाणीवर केले, तर पंचवीस टक्के काम ध्वनिमुद्रिकांसाठी केले. यात मराठी भावगीते गाणारे, स्वरबद्ध करणारे अमराठी कलाकारसुद्धा आहेत. ज्यांची मातृभाषा मराठी नाही अशा गायक-गायिकांनी भावगीते गायली. ती लोकप्रियही झाली. अशा गीतांमध्ये एका त्रयीचे गीत चटकन् आठवले. ती त्रयी म्हणजे गीतकार वसंत निनावे, संगीतकार बाळ बरवे आणि गायक तलत महमूद. ते गीत – ‘घे झाकून मुख हे चंद्रमुखी..’

गंगाधर नारायण बरवे तथा संगीतकार बाळ बरवे हे मूळचे नागावचे. काही निमित्ताने बरवे कुटुंब नाशिकला आले. त्यांच्या घरात संगीताचे वातावरण अजिबात नव्हते. बाळ बरवे लहान असताना त्यांच्या मुंजीत त्यांना भेट म्हणून बासरी मिळाली. मग ती वाजवण्याचा प्रयत्न सुरू झाला. हळूहळू  बासरी वाजवणे त्यांना जमू लागले. त्यांच्या बासरीवादनाचे घरात फारसे कौतुक झाले नाही. बी. ए.पर्यंत शिक्षण झाल्यावर ते नोकरीनिमित्ताने मुंबईत आले. सोबत बासरीवादन सुरू होतेच. हळूहळू संगीत क्षेत्रात काम मिळू लागले. पं. पन्नालाल घोष यांची वादनशैली बाळ बरवे यांनी आत्मसात केली होती. संगीतकार सुधीर फडके यांच्याकडे त्यांना बासरीवादनाची संधी मिळाली. हळूहळू एखादे गीत संगीतबद्ध करणेही सुरू झाले. कलाकाराकडून गाणे गाऊन घेताना ते आधी बासरीवर वाजवायचे, हे ठरूनच गेले. नंतर त्यांनी हार्मोनियम विकत घेतली.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
vidya balan express adda
Video: विद्या बालन व प्रतीक गांधी यांची ‘दो और दो प्यार’ चित्रपटाच्या निमित्तानं खास मुलाखत, पाहा LIVE
jayant patil govinda eknath shinde
“चालणारा नट…”, गोविंदाच्या शिवसेना प्रवेशावरून जयंत पाटलांचा टोला; म्हणाले, “त्यांचा शेवटचा चित्रपट…”

पुढे त्यांनी मुंबई आकाशवाणीवर संगीतकाराची ‘ऑडिशन’ दिली. त्यात ते उत्तीर्ण झाले. हळूहळू नावाजलेल्या संगीतकारांकडे ‘सहाय्यक’ म्हणून काम मिळू लागले. नंतर आकाशवाणीवर स्वतंत्र संगीतकार म्हणून काम मिळाले. संगीतकार म्हणून कारकीर्दीमध्ये त्यांनी आकाशवाणीसाठी अगणित गाणी केली. चाळीस ते पन्नास गायक-गायिकांनी त्यांची गाणी गायली. अनेक गीतकारांचे शब्द बाळ बरवे यांनी स्वरबद्ध केले. बाळ बरवे- वसंत निनावे- तलत महमूद या त्रयीची दोन गाणी ध्वनिमुद्रिकांतून चांगलीच लोकप्रिय झाली. त्यांनी रेकॉर्ड खपाचा उच्चांक केला. त्यातले एक गीत-

‘घे झाकून मुख हे चंद्रमुखी

प्रीतीस लागे दृष्ट सखी।

गंध प्रीतीचा असतो हळवा

टाळ वादळे दुष्ट सखी

चंद्र असू दे अर्धामुर्धा

तिमिरी प्रीती पुष्ट सखी।

अमिट सूर जरी ऊरी उमटले

मिट आपुले ओष्ठ सखी

शब्दावाचून कळे प्रीतीला

डोळ्यातील उद्दिष्ट सखी।

प्रीत असो पण रीत असू दे

प्रीतीवर जग रुष्ट सखी

सरळ संथ हा पंथ जनांचा

प्रेमिक हे पथभ्रष्ट सखी।’

हिंदी चित्रपटांत पाश्र्वगायक म्हणून तलत महमूद यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केलेले होते. आवाजातील हवेहवेसे कंपन आणि मखमली स्वर यामुळे ते श्रोत्यांच्या मनातील गायक झाले. मराठी भावगीतांना हा आवाज मिळाला आणि त्या गीतांनी लोकप्रियता मिळविली. गीतकार वसंत निनावे यांचे शब्द पुन:पुन्हा वाचावे असे आहेत. मुखडय़ामध्ये येणाऱ्या ‘दृष्ट’ या शब्दाला सर्व अंतऱ्यांमध्ये ‘दुष्ट, पुष्ट, ओष्ठ, उद्दिष्ट, रुष्ट, पथभ्रष्ट’ हे तसे कठीण शब्द वाटले तरी गीतभावनेला अनुकूल असे शब्द मिळाले. असे शब्द सुचणे व ते गीतभावनेत मिसळून जाणे हे गीतकाराचे यश होय. या आगळ्या शब्दांच्या पुढे प्रत्येक वेळी ‘सखी’ हा गोड शब्द आला आहे. आणि अंतरा संपताना किंवा पुन्हा साइन लाइनवर येताना ‘सखी’ या शब्दाला ताल थांबल्यामुळे चालीला उठाव आलेला दिसतो. या गीतातील प्रत्येक कठीण शब्दांत पोटफोडय़ा ‘ष’ आहे. त्यामुळे त्यांचा लक्ष देऊन उच्चार करावा लागतो. या शब्दांना  पहिल्या अंतऱ्यात ‘अर्धामुर्धा’ हा शब्द येऊन मिळाला आहे. बाळ बरवे यांच्या अप्रतिम संगीतरचनेमध्ये हे शब्द भावनेच्या ओघात अचूक आले आहेत. तलत महमूद यांनीही गाताना या गोष्टी उत्तम जपल्या आहेत. त्यांनी या गीतातला भावनिक आत्मा ओळखला आहे. अर्थात ही त्यांची खासियतच आहे. शिवाय गाण्यात सर्व म्युझिक पीसेसची उत्तम जोड आहे.

याच त्रयीचे दुसरे गीत-

‘जेव्हा तुला मी पाहिले, वळूनी पुन्हा मी पाहिले।

काही न आता आठवे, होतो कधी का भेटलो

पटता खुणा या वाद का, होतो कधी का भेटलो

या सागराने का कधी होते नदीला पाहिले।

जाणी तुझे नच नांव मी, प्रीती अनामिक जन्मता

वारा विचारी का फुला हा गंध आहे कोणता

तू ऐस कोणी कामिनी, मी स्वामिनी तुज मानिले।

होऊन एकच चालणे या दोन वाटा संपती

उंचावते तेथे धरा आभाळ येई खालती

हरताच दोघेही जिथे, कोणी कुणाला जिंकिले।’

या भावगीतामध्ये ‘वळूनी पुन्हा मी पाहिले’ ही खास बात आहे. मुखडय़ामध्ये गाताना ‘वळूनी’ हा शब्द चार वेळा गायलेला दिसतो. वळूनी आणि पुन्हा पुन्हा.. हे त्यातले मर्म आहे. गीतकाराने शब्दांत व्यक्त केलेली भावना संगीतकाराने नेमकी पकडली आणि चालीतून तिचा अर्थ उलगडला. प्रत्येक अंतऱ्यात फॉलो म्युझिक आहे. अंतऱ्याची सुरुवात अ‍ॅडलिब पद्धतीची आहे. ‘या सागराने का कधी, वारा विचारी का फुला, उंचावते तेथे धरा..’ या कवीच्या कल्पना आवर्जून दाद देण्याजोग्या आहेत.

आकाशवाणीसाठी बाळ बरवे यांच्याकडे असंख्य गायक-गायिकांनी गाणी गायली. कुमुद भागवत, रजनी जोशी, विठ्ठल शिंदे, कुसुम सोहनी, कुंदा बोकील, निर्मला गोगटे, प्रमिला दातार, कृष्णा कल्ले, रामदास कामत, के. जयस्वाल, रवींद्र साठे अशा नामवंतांचा त्यात सहभाग आहे. वंदना खांडेकर यांनी बाळ बरवेंकडे एक गीत गायले. ‘सांजवात लाविता उजळते घर माझे सानुले..’ हे ते गीत. अभिनेत्री भक्ती बर्वे यांचे हे आवडते भावगीत होते. संत परिसा भागवतांचे ‘अणुमाजि राम, रेणुमाजी राम’ हे गीत गायक सुधीर फडके यांनी गायले. तसेच माणिक वर्मा यांच्या स्वरातील ‘सूर हरवला होता माझा ऊर हरवला होता, राधा उरली नव्हती राधा, शाम हरवला होता’ हे गीतही श्रोत्यांची दाद मिळवणारे ठरले. एच. एम. व्ही. कंपनीने गायक सुरेश वाडकर यांच्या स्वरात केलेली ‘गाथा कवनीचा मोरया’ ही ध्वनिमुद्रिका तुफान गाजली. सुधीर मोघेंची कविता ‘जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का..’ ही पॉप संगीताचा आधार असलेली रचनाही गाजली. कोंकणी भाषेतीलही काही गीते बाळ बरवे यांनी स्वरबद्ध केली. कर्णबधिर मुलांसाठीच्या मुंबईतील अलियावर जंग संस्थेसाठी केलेली व चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेली गीते खूप गाजली. त्यातील ‘कानानं बहिरा मुका परि नाही’ किंवा ‘टाळी वाजविता बाळ आइकेना’ ही गीते रसिकांना आवडली. डॉ. हेडगेवार हा विषय घेऊन ‘केशव अर्चना’ हा अल्बम केला. अजित कडकडे, भीमराव पांचाळे, अनुराधा पौडवाल, हरिहरन, अनुप जलोटा, अपर्णा मयेकर या गायक-गायिकांनीही बरवेंकडे गीते गायली. मला तीन- चार वर्षे बरवे यांनी सुगम गायन शिकवले हे माझ्यासाठी आनंदाचे क्षण होते.

गीतकार वसंत निनावे हे मूळचे भंडाऱ्याचे. शिक्षणासाठी ते नागपूर आणि नंतर मुंबईत आले. काही वर्षे त्यांनी माहिती व जनसंपर्क खात्यामध्ये नोकरी केली. त्यानंतर अनेक वर्षे सहकारी बँकेत पी.आर.ओ. म्हणून काम केले. ग. दि. माडगूळकरांचे काव्य त्यांना विशेष आवडे. आकाशवाणीसाठी लेखन करता करता बाळ कुडतरकर, नीलम प्रभू आणि संगीतकार यशवंत देव या मंडळींशी त्यांचा दृढ परिचय झाला. आकाशवाणीवरील ‘मासगीत’ या कार्यक्रमासाठी त्यांनी गीतलेखन केले. विविध संगीतकारांनी ती स्वरबद्ध केली व प्रसारित झाली. कॅसेट्स, डीव्हीडीचा तो काळ नव्हता. संगीतकार दत्ता डावजेकर, बाळ बरवे यांच्याशी त्यांचे सूर जुळले. शामा चित्तार यांनी गायलेले ‘नच साहवतो भार’ आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेले ‘पाण्यातली परी मी’ ही दोन्ही गीते वसंत निनावे यांनी लिहिलेली आहेत. ‘चुकचुकली पाल एक’ हे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेले गीत निनावे यांचेच. हे गीत ऐकल्यावर पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी निनावे यांना शंभर रुपयांची नोट स्वाक्षरी करून दिली. ही दाद त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची होती. निनावे यांचे मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व होते. ते उत्तम अनुवाद करायचे. चिनी गीतावर त्यांनी ‘ही माराही’ हे गीत लिहिले. अनेक नामवंत गायक-गायिकांनी त्यांची गीते गायली. त्यात रामदास कामत, पुष्पा पागधरे, सुधीर फडके, आशा भोसले यांचा समावेश आहे. ‘बैजू बावरा’, ‘शिवरायांचे आठवावे रूप’ ही नाटकेही निनावे यांनी लिहिली. बच्चेकंपनीसाठी ‘गोल गोल राणी’ हे बालनाटय़ लिहिले. त्यांनी आकाशवाणीसाठी लिहिलेल्या ‘आकाशप्रिया’ या मुक्तछंदातील एकांकिकांच्या संकलनाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. कौटुंबिक जबाबदाऱ्या व नोकरी यामुळे ‘मैं तुलसी तेरे आंगन की’ या चित्रपट लेखनाची चालत आलेली संधी मात्र ते घेऊ शकले नाहीत.

वसंत निनावेंची कन्या रोहिणी निनावे आज लेखन क्षेत्रात सक्रीयआहेत. संगीतकार बाळ बरवे यांच्या कुटुंबीयांमध्ये त्यांची कन्या गायिका सुचित्रा भागवत हे नाव रसिकांमध्ये लोकप्रिय आहे. ‘स्वामी’ मालिकेसाठी सुचित्रा यांनी गायलेले ‘माझे मन तुझे झाले’ हे गीत प्रत्येकाच्या मनामनातले झाले. जावई माधव भागवत हे कवी सुरेश भट यांची शाबासकी मिळवलेले गायक-संगीतकार आहेत. बाळ बरवेंची दुसरी कन्या अश्विनी कुलकर्णी यादेखील गातात. ुपुत्र हेमंत बरवे यांना गायन, अभिनय या क्षेत्रांची आवड आहे. गीत-संगीत कार्यक्रमांच्या निवेदन क्षेत्रात ते स्थिरावले आहेत.

बरवे-निनावे या जोडीने उत्तम भावगीते केली. त्या वाटचालीत त्यांना येऊन मिळाला तो ‘तलत’ स्वर.. खरे म्हणजे तरल स्वर!

विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com