सासर-माहेर, नववधू, राधाकृष्ण, रामभक्ती, निसर्ग, दर्यागीतं, आकाशगंगा, शृंगारगीतं, प्रियकर-प्रेयसी असे अनेकविध विषय भावगीतांतून आले. सर्वच भावगीतं लोकप्रिय झाली. याचं मुख्य कारण असं, की यातला प्रत्येक विषय हा हवाहवासा वाटणारा आहे. तुमच्या-आमच्या मनातलीच ती भावना आहे. ही भावना सुगम पद्धतीने शब्द-स्वरांत आली, हेच या भावगीतांचं यश आहे. कुणीही कधीही गाऊ शकतो अशा स्वातंत्र्याची ती गाणी आहेत. आणि यातच भावगीत पुढे पुढे जात राहण्याची बीजेही आहेत.

‘माझिया माहेरा जा..’ या गीतामुळे कवी राजा बढे, संगीतकार पु. ल. देशपांडे आणि गायिका ज्योत्स्ना भोळे ही सुरेल त्रिवेणी रसिकांसमोर आली. वाचत राहावा असा राजा बढे यांचा प्रत्येक शब्द, पु. ल. देशपांडे यांची भावानुकूल स्वररचना आणि ज्योत्स्ना भोळे यांची मन आकर्षित करणारी गायनशैली यामुळे या गीताला उदंड लोकप्रियता मिळाली. तशात माहेर हा विषय असंख्य श्रोत्यांची मनं काबीज करणाराच आहे. आजूबाजूचं सर्व काही विसरायला सहजगत्या भाग पाडेल असा हा विषय! कुणाचं माहेर हे कुणाचं सासर असतं, तर कुणाचं सासर हे आणखी कुणाचं तरी माहेर असतं. यात सगळीकडे सख्खेपणा भरून राहिलेला दिसतो. भावगीतातला विषय म्हणजे जणू आपला नातलगच असतो. या नातलगाचे मानपान करावे तेवढे थोडेच. आपण आनंदाने ते करीत असतो. ‘माहेर’ हा केवळ शब्द नाही, तर माझा जवळचा ‘स्वर’ आहे असं म्हटलं जातं. आता मात्र शब्द आणि स्वर हे माहेरपणाला आले अशी भावना मनात येते. अशा गोड भावनेच्या गाण्यामध्ये स्वरातील ‘ज्योत्स्नाबाईपण’, विषयाचं नातं घट्ट करणारी पु. ल. देशपांडे यांची स्वररचना आणि राजा बढे नावाच्या ‘राजा’ माणसाचे शब्द हे सर्व एकत्र आलं आणि या गाण्याने पिढय़ान्पिढय़ा बांधून ठेवल्या. सर्वार्थाने सशक्त अशी गीतनिर्मिती रसिकांना मिळाली.

The Phenom Story Music Surili Maithili thakur YouTube channel
फेनम स्टोरी: सुरिली मैथिली
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
marathi actress Sharmishtha Raut journey as a poducer
शर्मिष्ठा राऊत: अभिनेत्रीची निर्माती होताना…
Kaanta Laga girl Shefali Jariwala
एक सुपरहिट गाणं, सलमान खान-अक्षयसह केलं काम; फिटमुळे करिअरवर झाला परिणाम, अभिनेत्रीने १० वर्षांपूर्वी…

‘माझिया माहेरा जा, रे पाखरा

माझिया माहेरा जा!

देते तुझ्या सोबतीला, आतुरले माझें मन

वाट दाखवाया नीट, माझी वेडी आठवण

मायेची माऊली, सांजेची साऊली

माझा गं भाईराजा, माझिया माहेरा जा!

माझ्या रे भावाची उंच हवेली

वहिनी माझी नवी नवेली

भोळ्या रे सांबाची, भोळी गिरिजा

माझिया माहेरा जा!

अंगणात पारिजात, तिथं घ्या हो घ्या विसावा

दरवळे बाई गंध, चोहींकडे गावोगावा

हळूच उतरा खाली फुलं नाजूक मोलाची

माझ्या माय माऊलीच्या काळजाच्या की तोलाची

‘तुझी गं साळुंकी, आहे बाई सुखी’

सांगा पाखरांनो, तिचिये कानी

एवढा निरोप माझा

माझिया माहेरा जा!’

हे गीत वाचता वाचता आपण गाणं मनात म्हणू लागतो, गुणगुणतो किंवा चालीसकट मोठय़ा आवाजात म्हणूही लागतो. पाखराला केलेली आर्जवी स्वरातली विनंती आपल्या मनाला भिडते. माहेर ओळखण्याच्या खाणाखुणा आपल्याला आवडतात. संपूर्ण गीतात ‘माहेर’ या भावनेची पकड कुठंही सैल झालेली नाही. त्यातून उत्तम दर्जाचं काव्य समोर येतं. या भावनेचा तोल संगीतरचनेतही सांभाळला आहे. संगीतकार पु. ल. देशपांडे यांनी अगदी नेमक्या ठिकाणी स्वररचनेचे व तालाचे  आणि लयीचे बदल केले आहेत. गाता गाता योग्य तिथे ताल व गायन थांबते व पुन्हा सुरू होते. ‘हळूच उतरा खाली’ या ओळीच्या स्वररचनेत पायऱ्या खाली उतरून आल्यासारखं वाटतं. गाण्यातील शब्द व सुरावट ऐकताना बऱ्याचदा ऐकणाऱ्यास गहिवरून येतं. संगीतकाराने चाल बांधताना ‘पिलू’ रागाचा उपयोग केलेला आहे. मधे मधे ‘शिवरंजनी’चा रंग मिसळला आहे. एकूणच गाता गाता विस्तार करण्याची शक्यता असणारी ही चाल आहे. पु. ल. देशपांडे उत्तम हार्मोनियमवादक होते. गायक होते. उच्च दर्जाचं गाणं त्यांनी वर्षांनुर्वष ऐकलं होतं. अनेक गायकांना हार्मोनियमची साथ केली होती. इतकं सारं करूनही ते पूर्णवेळ संगीतकार नव्हते. तेवढीच त्यांची ओळख आहे असं नव्हतं. हा त्यांचा एक पैलू होता. त्यातही त्यांचं उत्कृष्ट असं काम दिसतं. संगीतकाराला राजा बढे यांचे शब्द मिळाले आणि गीत गाण्यासाठी गायिका ज्योत्स्ना भोळे. समेवर दाद द्यावी असा हा क्षण आहे. रसानुकूल चाल म्हणजे काय, हे या गीतातून समजतं.

‘माझिया माहेरा..’ या गीताला जोडून कवी राजा बढे यांची आणखीही दोन माहेरगीतं आहेत.

 

‘उंच डोंगराच्या आड, कसा डोळ्यानं दिसावा

जीव लागला गं तिथं, कशी जाऊ माझ्या गावा।’

आणि दुसरं गीत-

‘ती माहेरपणाला येते तेव्हा..

दारी फुलला मोगरा, साळू आली गं माहेरा

आली शेवंता बहरा..

मांडवाखालून येता, खाली चमेली गं जरा

एकमेकी मिसळल्या, मायलेकीचा गजरा।’

 

या दोन्ही गीतांचे संगीतकार केशवराव भोळे म्हणतात, ‘या तिन्ही चाली अगदी सख्ख्या बहिणी-बहिणी वाटतात.’

राजाभाऊ बढे यांचं आणखी एक भावगीत ज्योत्स्नाबाईंनी गायलं..

‘झाली पहाट पहाट, विरे काळोखाचा वेढा,

चांद वळला वाकडा

पहा उजळल्या कडा, डुले दारीचा केवडा

भवती जंगल दाट, दाट, झाली पहाट पहाट..’

या कवितेला पु. ल. देशपांडेंनी चाल द्यायला सुरुवात केली आणि जेवढी चाल तयार झाली ती ज्योत्स्नाबाईंना शिकवली. पुढे केशवराव भोळे यांनी ती चाल पूर्ण केली. यालाच संगीतातले आदानप्रदान म्हणता येईल.

गायिका ज्योत्स्ना भोळे यांची कन्या व गायिका वंदना खांडेकर यांच्याशी झालेल्या संवाद-गप्पांमध्ये त्या आई-वडिलांबद्दल भरभरून बोलल्या. ‘आईच्या गाण्यात तिचं व्यक्तिमत्त्व उतरल्याचा स्पर्श होता. गायनाची जाण व गायनाचं भान हे ज्योत्स्नाबाईंचे विशेष गुण. ज्योत्स्नाबाई म्हणायच्या- माझी गाणी कुणी फारसं गाताना आढळत नाही! ती गाणी इतर कुणी गाताना त्यांच्या गायनात ‘ज्योत्स्नाबाईपण’ असणं महत्त्वाचं आहे. गीताचं मर्म समजलं पाहिजे. त्यासाठी ऐकणाऱ्याचा सखोल विचार हवा. गाण्यामध्ये भावना ही एक-दोन शब्दांपुरती नसते. भाव हा संपूर्ण गाण्यात विहरला पाहिजे, हे मर्म ज्योत्स्नाबाईंच्या स्वरांत, लगावात होतं. हे ज्याला समजलं त्याला ज्योत्स्नाबाईंचं गाणं गायला जमलं. आमचे पापा- म्हणजे केशवराव भोळे हे आमच्यासाठी गायन-तत्त्वाचे आदर्श होते. १९२७-२८ सालात मुंबईत त्यांनी भावगीत- गायनाच्या खासगी बैठका केल्या. काव्यगायन व भावगीत या संकल्पनेला पुढे नेणाऱ्यांपैकी ते एक महत्त्वाचं नाव होतं. ते म्हणत- ‘गीतातील शब्दांमध्ये रंग भरला पाहिजे. गाणे सात-आठ मिनिटांतच पूर्ण झालं पाहिजे. आणखीन हवं होतं अशी हुरहुर वाटली पाहिजे.’ स्वरवंदना प्रतिष्ठान, पुणे या संस्थेतर्फे ‘बोला अमृत बोला’ हा दृक् श्राव्य कार्यक्रम, ‘ज्योत्स्ना नावाचं गाणं’ हा मंचीय प्रयोग सादर होतो. शीर्षक संकल्पनेसह वंदना खांडेकर यांची निर्मिती असलेली ‘ज्योत्स्ना अमृतवर्षिणी’ ही डीव्हीडीसुद्धा रसिकांसाठी उपलब्ध आहे. ज्योत्स्नाबाईंच्या नातवंडांमध्ये ऑस्ट्रेलियात राहणारा समीर भोळे हा आजीच्या गाण्यांवर अपार प्रेम करणारा व अमेरिकेत राहणारा सलील भोळे हा गिटारवादनात पारंगत आहे. ज्योत्स्नाबाईंची नात रावी ही सुगम संगीत गाते, बडोद्यात राहते. ती क्रिकेटपटू किरण मोरेंची पत्नी आहे.

‘माझिया माहेरा..’ या गीताच्या निमित्ताने या गीताचे कविराज राजा बढे यांचे बंधू बबनराव बढे (आज वय वर्षे ८४) यांच्याशी संवाद झाला. ते म्हणतात, ‘आज मी जो आहे तो माझ्या भावामुळे. राजाने कुटुंबासाठी जो त्याग केला त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. असंख्य गुणांचा समुच्चय त्याच्यापाशी होता. एवढं असूनही प्रसिद्धी व पैसा यामागे तो कधीही नव्हता.’ त्यांना म्हटलं, ‘भय्यासाहेब, मी तुम्हाला लंडनला नेईन.’ त्यावर राजाभाऊ म्हणायचे, ‘तिथेही मी माझ्या झब्बा व धोतर याच पोशाखात येईन.’

येत्या ७ एप्रिलला कवी राजा बढे यांचा ४० वा स्मृतिदिन आहे. राजा बढे या विषयाचा आवाका, व्याप्ती खूप मोठी आहे याची जाणीव आहे. सोपानदेव चौधरी त्यांना ‘काव्य-मानससरोवरातील राजस राजहंस’ असं म्हणत. रवींद्र पिंगे ‘राजा बढे : एक राजा माणूस’ म्हणत. वा. रा. कान्त त्यांना ‘चांद्रवती कवी’ म्हणत, तर रामूभैया दाते यांनी ‘राजाभाऊ बढे रहो’ असं म्हटलं आहे.

एका माहेरगीताच्या निमित्ताने तीन महान कलाकारांच्या आठवणीने अंतर्मन उजळून निघालं. भावगीतांच्या प्रवासातील या ‘माहेरवाटा’ खरं म्हणजे ‘प्रकाशवाटा’ आहेत.. भावगीत पुढे नेण्यासाठी!

विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com