घराणे म्हणजे गुणवैशिष्टय़ांमुळे निर्माण झालेली स्वतंत्र वाटचाल. सर्वसामान्यांची घराणी ही रक्ताच्या नात्यातून येतात. कलाप्रांतातील घराणी प्रज्ञावंताच्या वाटचालीमुळे निर्माण होतात. असे घराणे एखाद्या प्रभावशाली गुरूच्या आवाजधर्मावर आधारलेले असते. अशा घराण्यात एक शिस्त असते. कायदे असतात. कलेसाठी रियाज आणि मेहनत करण्यावर व करवून घेण्यावरचा कटाक्ष असतो. गुणधर्म असणारे आवाज मिळतात. ते आवाज सहज आणि अकृत्रिम असतात. रक्ताच्या नात्यातून निर्माण झालेल्या एका गुणसंपन्न घराण्याने आपल्याला भरपूर आनंद दिला आहे.

ते घराणे म्हणजे ‘मंगेशकर’ घराणे. घरातील सर्वाच्या आयुष्यावर प्रभाव असणारा कलाकार म्हणजे पाचही भावंडांचे बाबा.. मा. दीनानाथ. उद्या २४ एप्रिल या दिवशी मा. दीनानाथांचा स्मृतिदिन असतो. मा. दीनानाथ हे गाणे होतेच व ‘तत्त्व’ही होते. ते तंबोऱ्याला साधुपुरुष म्हणत. त्यांच्याकडे हजारो चीजांचा संग्रह होता. गायनात स्वतंत्र विचार होता. विलक्षण वेगवान तान होती. त्यांच्या आवाजाची ‘तीन सप्तके’ रेंज होती. त्यांच्या आवाजाला धार होती आणि गायनात अनुकरण करायला कठीण असे खटके व मुरक्या असत. मा. दीनानाथांचे स्मरण करणे म्हणजे प्रत्यक्ष मंगेशाच्या पायाशी नतमस्तक होण्यासारखे आहे. त्यांच्या स्मृतिदिनाची आठवण झाली आणि मराठी भावगीतातील अजरामर गाणे नजरेसमोर आले. ते म्हणजे- ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेलां..’

BJP Demands Action, Against Sanjay Raut, for Insulting navneet rana , Campaign Speech, sanjay raut controversial statment, amravati lok sabha seat, lok sabha 2024, bjp, shivsena,
“वस्त्रहरणाच्या वेळी भीष्माचार्य, द्रोणाचार्य जसे चूप बसले तसेच काल संजय राऊत…”.
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
bjp keshav upadhyay article targeting sharad pawar uddhav thackeray and praskash ambedkar
संगीत खंजीर कल्लोळ…
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र

६० वर्षांपूर्वीचे हे गीत म्हणजे एक भावावस्था आहे. गीतकार पी. सावळाराम यांनी मा. दीनानाथांच्या स्मृतिदिनाच्या संदर्भात हे गीत लिहिले. संगीतकार वसंत प्रभूंनी चाल दिली व गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ते गायले.

या गीताची एक आठवण आहे. गाण्याचा मुखडा तयार झाल्यावर गीतकार पी. सावळारामांनी सर्वप्रथम तो लतादीदींना ऐकवला. त्यानंतर फोनवर, ‘दादा’ म्हणजे पी. सावळाराम हे प्रतिसादाची वाट पाहात होते.. काही सेकंदांनंतर पलीकडून ऐकू आला तो ‘हुंदका’. लतादीदी म्हणाल्या, ‘दादा.. गाणे पुढे बांधा.’ या प्रतिसादानंतर दादांनी गाणे लिहून पूर्ण केले व संगीतकार वसंत प्रभूच्या हाती दिले. काही वर्षांपूर्वी कलासरगम – संवाद निर्मित ‘अक्षय गाणी’ या कार्यक्रमात ही आठवण मी निवेदकाकडून ऐकली. त्या कार्यक्रमामुळे नावारूपाला आलेले निवेदक नरेंद्र बेडेकर ही आठवण सांगत आणि संगीतकार राजू पोतदार यांच्या संयोजनात हे गीत सादर होई. उत्तम शब्द, उत्तम स्वररचना व भावपूर्ण गायन यामुळे लतादीदींचे हे गीत प्रचंड लोकप्रिय झाले. पी. सावळाराम व वसंत प्रभू या गीतकार- संगीतकार जोडीच्या शेकडो लोकप्रिय गीतांपैकी हे एक अविस्मरणीय गीत आहे.

‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेलां

वैभवाने बहरून आला, याल का हो बघायाला।

तुम्ही गेलां आणिक तुमच्या देवपण नावां आले

सप्तस्वर्ग चालत येता, थोरपण तुमचे कळले

गंगेकाठी घर हे अपुले, तीर्थक्षेत्र काशी झाले

तुम्हाविण शोभा नाही, वैभवाच्या देऊळाला।

सूर्य चंद्र तुमचे डोळे, दुरुनीच ते बघतात

कमी नाही आता काही कृपादृष्टीची बरसात

पाच बोटे अमृताची, पंचप्राण तुमचे त्यात

पाठीवरी फिरवा हात, या हो बाबा एकच वेळा।’

ध्वनिमुद्रिकेतील साडेतीन मिनिटांच्या वेळेच्या मर्यादेमुळे या गीताचे दोनच अंतरे घेण्यात आले. तिसरा, रेकॉर्ड न झालेला अंतरा मला सावळारामदादांचे सुपुत्र संजय पाटील यांनी दिला.

‘तिन्ही सांजा येऊन मिळता, सांजवात लावित असता

हात जोडलेले तुम्हां, माई सांगे तुमची गीता

दु:ख मित्र तुमचा प्यारा, आठवण देऊन जाता

मिठी आईची ती कंठी, थांबेनात अश्रुमाला।’

या अंतऱ्यातील शेवटच्या ओळीसाठी ‘तुमच्याच मूर्तीला हो आम्ही घालू अश्रुमाला’ ही पर्यायी ओळ दादांनी लिहून ठेवली होती.

अंत:करण हेलावून टाकणारे हे शब्द आहेत. ‘याल का हो बघायाला’ हे आर्जव ऐकताच गहिवरून येते. सप्तसुरांसाठी सप्तवर्ग, डोळ्यांसाठी सूर्य-चंद्र, पाच बोटे अमृताची, पंचप्राण.. या प्रतिमांसाठी काव्यप्रतिभेला दाद द्यावीच लागेल. यातील ‘पाच बोटे अमृताची, पंचप्राण तुमचे त्यात’ या कल्पनेत पाचही मंगेशकर भावंडे आणि मा. दीनानाथ.. या शब्दांसाठी गीतकार पी. सावळाराम यांना ‘सलाम’ करावाच लागेल.

lr03‘गंगेकाठी घर’ या शब्दप्रयोगातून कोल्हापूरच्या पंचगंगेजवळील घरात सर्वाचे वास्तव्य हे लक्षात येते. ‘पाठीवरी फिरवा हात, या हो बाबा एकच वेळा’ ही ओळ ऐकताना डोळे पाणावले नाही अशी एकही व्यक्ती नाही. वसंत प्रभूंची चाल आणि लतादीदींचे भावपूर्ण गायन असा सुरेल संगम आहे. ‘वैभवाच्या देऊळाला’ आणि ‘या हो बाबा एकच वेळा’ हे- दोन्ही अंतरे संपतानाचे शब्द- ‘तीन वेळा’ गायले आहेत व तेही तीन वेगवेगळ्या चालीत आहेत. तिथे भावना अधिक उत्कट झाली आहे. आज हे गाणे पुन्हा ऐकावे लागेल. ते आवश्यक आहे. लतादीदींनी प्रत्येक शब्दाचा केलेला उत्तम उच्चार हा अभ्यासाचा विषय होऊ शकतो. या भावनेत सूर कसा जपलाय, सांभाळलाय ते ऐका. कल्पना करा, की या गीताच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी लतादीदींच्या मनाची अवस्था काय असेल? यालाच ‘हृदया’चे गाणे म्हणतात. कुणालाही, केव्हाही हे गीत गायचे असेल तर या सर्व भावनांचा विचार व्हावा. मूळ गाणे हे पुन्हा पुन्हा ऐकावे. हे गाणे मंगेशकर भावंडांचे आहेच, पण सर्वासाठी ते ‘प्रातिनिधिक’ झाले आहे. उत्तम भावगीत हे पिढय़ान्पिढय़ा बांधून ठेवतेच.

पी. सावळारामांचे सुपुत्र संजय आणि स्नुषा गीता यांनी दादांच्या असंख्य आठवणी सांगितल्या. गीता हे नाव त्यांनीच सुचविले होते. संजय आणि गीता ही महाभारतातील संबंधित नावे त्यांच्या कविकल्पनेच्या भरारीची जाणीव करून देतात. दादांनी आपल्या मुलींची नावे प्रतिभा व कल्पना अशी काव्याला स्फूर्ती देणारी ठेवली. कविता आणि गीत यातील फरक सांगताना दादा एकदम सोपे उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे, ‘‘माते मला भोजन दे’ ही कविता झाली तर ‘आई मला वाढ’ हे गीत झाले.’ दादांनी शेकडो गाणी लिहिली. संगीतकार वसंत प्रभू पेटीवर सूर धरत असत. तो स्वर पकडत दादा त्यावर गीते ‘बांधत’ (हा त्यांचाच शब्द!). एकदा गाणे हातात पडल्यावर वसंत प्रभू त्याला अनेक चाली लावत असत. एखादी चाल नक्की करताना कधी दोन दिवस लागत. जनांसाठी, जनांकरिता, जनांच्या व्यथा दादा आपल्या काव्यातून मांडत. जनांचे सोपे शब्द आपल्या काव्यशैलीत मांडत. तीच त्यांची प्रतिभा होती आणि म्हणूनच ते ‘जनकवी’ होते. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी सावळारामांचा ‘जनकवी’ म्हणून गौरव केला. दादांच्या अशा कविता की ज्या स्वरबद्ध झाल्या नाहीत त्या संजय पाटील यांच्याकडे आहेत.

‘देहूला कळस, पाया आळंदीला

माझ्या मराठीच्या चला माहेराला

ज्ञानेशाची ओवी होता ती अभंग

देहू गावी झाला तुका पांडुरंग।’

अशा उत्तमोत्तम कविता आहेत.

वसंत प्रभू व पी. सावळाराम या जोडगोळीच्या गीतांचा जन्म कधी काटकरांच्या लिंबाच्या वखारीत, कधी तबलजी मारुती कीर यांच्या खांडके चाळीतील खोलीत, तर कधी संगीतकार मित्र बाळ चावरे यांच्या घरात असे.

वसंत प्रभूंच्या सुमधुर चालींनी रसिकमनावर असंख्य वर्षे राज्य केले आहे. त्यांची गीते फक्त वाद्यांवर वाजवतानासुद्धा खूप आनंद मिळतो असे असंख्य वादक सांगतात.

कल्पवृक्ष कन्येसाठी.. हे लतादीदींनी गायलेले गीत जेव्हा जेव्हा ऐकणे होते तेव्हा तेव्हा मा. दीनानाथ मंगेशकर नावाच्या संगीतक्षेत्रातील महान कलासाधनेचे स्मरण होते.

‘वैभवाने बहरून आला, याल का हो बघायाला?’ हा प्रश्न किंवा ‘पाठीवरी फिरवा हात, या हो बाबा एकच वेळा..’ ही आर्त हाक म्हणजे हजारो माणसांच्या हृदयातील भावना झाली आहे. तरीसुद्धा टाहो फोडून विचारावेसे वाटते, की जीवनमरणाच्या मैफलीत ‘वन्समोअर’ घेता येत नाही, असे का म्हणतात?

विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com