भावगीतांच्या प्रवासात एक आवाज आपल्या मनाच्या तळापर्यंत पोहोचला. तो आवाज  आपल्या अंतर्मनात कायम गुणगुणता राहिला. चित्तवृत्ती प्रसन्न करणारा हा आवाज आहे. अंतर्मनात असल्याने हृदयाच्या तारा छेडणे हे सहज घडले. मनात विचार आला की, या आवाजातले  प्रत्येक गाणे आपल्या आवडीचे कसे होते? याच आवाजातील हजारो गाणी आठवताना तुमच्या-आमच्या  मनातल्या प्रत्येक भावनेचे  गीत या आवाजात हवेहवेसे का वाटते? त्यांनी  गायलेले प्रत्येक भावगीत ऐकताना ‘हे माझे गाणे आहे’ असे वाटते. त्यांनी गायलेलं गाणं म्हणजे जणू माझंच मन बोलतंय असं वाटतं. कारण हा आवाज म्हणजे भावभावनांचा महासागर आहे.  शिंपले वेचणं आपलं काम आहे. गाण्यासाठी हाच स्वर संगीतकाराने निवडण्याचं श्रेय  त्या- त्या संगीतकाराकडे जातं. पण प्रत्येक संगीतकाराची वेगवेगळी शैली आत्मसात करून गीत गाणं, हा अभ्यासाचा भाग गाणाऱ्याकडे जातो. पण या एका आवाजात  जेव्हा आपण असंख्य गाणी ऐकतो तेव्हा ‘हे गाणे याच आवाजात असायला हवे’ हे मनात ठसते. अमुक एक गाणे आणि हाच  आवाज हे समीकरण निर्माण होते. या आवाजातील हजारो गाण्यांनी आपल्याला अपरिमित आनंद दिला आहे. असा हा गायनातील  बारमाही हिरवा ऋ तू म्हणजे श्रेष्ठ गायिका आशा भोसले.

वयाने लहान असलेल्या संगीतकाराची रचना असो किंवा वयाने मोठय़ा अशा संगीतकाराची रचना असो; गाण्यासाठी आशा भोसले यांचा स्वर मिळाला की  गाण्याला वेगळी उंची प्राप्त झालीच म्हणून समजा. भक्तिगीतांपासून नृत्यगीतांपर्यंत, भावगीतांपासून पॉप संगीतापर्यंत, नाटय़गीतांपासून चित्रगीतांपर्यंत हा आवाज सर्वव्यापी आहे. खरे म्हणजे विश्वव्यापी आहे. वय विचारात घेतले तर आजही आशा भोसले यांच्याकडे तरुणाईला हरवेल असा उत्साह आहे. त्यांच्या स्वरातील बालगीत ऐकले तर आपण लहानाहून लहान होतो. भावगीत ऐकले तर प्रत्येकाला ते स्वत:चेच गाणे वाटते. नाटय़पद ऐकले की सर्व सप्तकात फिरणारी तान  आपल्याला थक्क करते. नृत्यगीत डोलायला लावते. चांगले ऐकणे हीसुद्धा कला आहे. आशा भोसले यांच्या आवाजाने श्रोत्यांमध्ये ही कला रुजवली.. घडवली.

Unveiling of Ram Garjana song by MLA Sanjay Kelkar
लोकसभा निवडणुक काळात भाजपाची राम गर्जना, आमदार संजय केळकर यांच्या हस्ते ‘राम गर्जना’गीताचे अनावरण
pm narendra modi speaks to sandeshkhali rekha patra
पश्चिम बंगालच्या संदेशखाली येथील रेखा पात्रा यांना भाजपाची उमेदवारी; पंतप्रधान मोदी फोन करत म्हणाले, “शक्ती स्वरूप…”
Ram Satpute Answer to Praniti Shinde
प्रणिती शिंदेंच्या पत्राला राम सातपुतेंचं उत्तर, “धर्म आणि जातींमध्ये फूट पाडून इतकी वर्षे…”
aam aadmi party protest kolhapur marathi news
ईडीच्या नावाने बोंब मारून कोल्हापुरात केजरीवालांच्या अटकेचा निषेध; आपची प्रतीकात्मक होळी

भावगीताच्या प्रांतामध्ये आशा भोसले यांनी अगणित गाणी गायली. पण त्यांनी गायनाच्या आरंभकाळातील दोन गाणी संगीतकार दत्ता डावजेकर यांच्याकडे गायली. त्यातील अफाट लोकप्रियता मिळालेले गीत म्हणजे ‘कुणी बाई गुणगुणले..’ या रेकॉर्डचे कपलिंग गीत ‘थांबते मी रोज येथे मी तुझ्यासाठी..’ हे आहे. त्यात ‘कुणी बाई’ या गीताने अमाप लोकप्रियता मिळवली. पूर्वीच्या काळी मंगलप्रसंगी घरातील मुलीला ‘गाणे म्हण’ म्हटल्यावर प्रत्येक मुलगी हेच गीत गायची. या गीतात शब्द व चाल उत्तम जमले होते. त्यास आशा भोसले यांचा ‘तयारी’चा स्वर येऊन मिळाला. याचे शब्द व संगीत हे दोन्ही दत्ता डावजेकरांचे आहे.

‘कुणी बाई गुणगुणले

गीत माझिया हृदयी ठसले ग।

मोद भरे उमलल्या कुमुदिनी

शांत सरोवरी तरंग उठले

बाई, गुणगुणले।

मानस मंदिर आनंदले

रम्य स्वरांनी  मोहित केले

बाई गुणगुणले।

चंद्रकरांनी क्षणोक्षणी

अंबर अवघे पुलकित झाले

बाई, गुणगुणले।’

जोगकंस रागातील स्वरांनी सजलेले हे गीत. पहिल्या अंतऱ्यामध्ये ‘कुमुदिनी’ हा शब्द आठ वेळा गायला आहे. या शब्दातील आरोही-अवरोही जागा कान देऊन ऐकण्यासारख्या आहेत. ‘कुमुदिनी’ हा शब्द म्हणजे या गाण्यातील आकर्षणाची जागा आहे. त्यापुढच्या ओळीत ‘सरोवरी’ हा शब्द असा गायलाय, की ‘तरंग’ हा पुढचा शब्द या ‘सरोवरी’ शब्दात दिसतो. नंतरचे अंतरे वरच्या सप्तकाकडे जाणारे आहेत. ‘आनंदले’ या शब्दानंतरचा आलाप व त्याला जोडलेली छोटय़ा तानेची जागा यासाठी संगीतकार व गायिका या दोघांच्या प्रतिभेला दाद द्यावीच लागेल. एकूणच हे ‘गुणगुणणे’ हवेहवेसे झाले आहे. संपूर्ण गाणे ऐकल्यानंतर हे गाणे म्हणून बघण्याचा मोह होतोच. हे या गाण्याचे यश आहे.

‘कुणी बाई..’ या गीताचे कलपिंग गीतसुद्धा ऐकावे असे आहे. ध्वनिमुद्रिका निघाली की त्या रेकॉर्डच्या मागच्या बाजूचे गीत कोणते, हा प्रश्न हमखास विचारला जाई. त्याला ‘कपलिंग गीत’ म्हणतात. हे गीत तयार झाल्याशिवाय रेकॉर्ड पूर्ण कशी होणार? गीतकार, संगीतकार कोण आहे? गायक-गायिका कोण आहे? या प्रश्नांची उत्तरे मिळाली की मग ही रेकॉर्ड आपल्या संग्रहात असलीच पाहिजे, हा विचार मनात येतो. म्हणजे आपल्याला हवे तेव्हा गाणे ऐकता येईल. रेकॉर्डमधील गाणे स्वत: ऐकणे व इतरांनाही ते ऐकवण्याचा आनंद व समाधान अनोखेच.

‘थांबते मी रोज येथे मी तुझ्यासाठी

बोलणे ना बोलणे रे, ते तुझ्या हाती।

मधुर स्वप्ने मीलनाची, लाविती मज वेड साथी

रंगविण्या स्वप्न माझे, पाहिजे मज तोच रे

रंगवी ना रंगविणे, ते तुझ्या हाती।

आळविते मजला तयांनी, टाकिते झिडकारूनी

आळविते तुज, कान भरुनी याचनेची रागिणी

ऐकणे ना ऐकणे रे, ते तुझ्या हाती।

उपवनी सुमने उमलती, भ्रमर ते मधुगंध लुटती

हृदयपुष्प तुला दिले ते एकदा उमले

चुंबिणे ना चुंबिणे रे, ते तुझ्या हाती।’

रूपक तालाचा पॅटर्न घेऊन सजलेले हे गीत आहे. साधे शब्द, सोपी चाल हा या गीताचा विशेष. पहिल्या अंतऱ्यात ‘स्वप्न माझे’ या शब्दानंतर आलेला ‘एकारा’तील आलाप लक्षवेधी आहे. ‘झिडकारूनी’ या शब्दानंतर छोटी तानेची जागा निर्माण केली आहे. तिसरा अंतरा तारसप्तकात जातो. आता शब्दांची गंमत बघा. ‘मी तुझ्यासाठी रोज  येथे थांबते..’ हे वाक्य आहे. या वाक्यातील  शब्दांचे स्थान  बदलण्याचे  स्वातंत्र्य कवीने घेतले आणि ‘थांबते मी रोज येथे मी तुझ्यासाठी’ असे गीत निर्माण झाले. प्रत्येक अंतऱ्यामधील ‘ते तुझ्या हाती’ या शब्दांमुळे हे काव्य ‘गजल’बाज धरू पाहते असे वाटते. हे कपलिंग गीतसुद्धा ऐकावे असेच आहे.

संगीतकार दत्ता डावजेकर यांचे वडील बाबूराव डावजेकर हे उत्तम तबलावादक व पखवाजवादक होते. डीडींच्या शालेय शिक्षणात ‘संगीत’ हा विषय शिकणे प्रत्यक्षात झाले नसले तरी ते ज्ञान घरातील तालवाद्यांमुळे त्यांना मिळाले. १९२९-१९३५  या काळात उत्सवप्रसंगी मेळे होत. त्यात डीडींना तबलासाथ करायची संधी मिळे. वाजवायला हार्मोनियम उपलब्ध असे. एकदा गोवर्धन कन्या मेळ्यात गाणी बसवण्याच्या निमित्ताने चाल देण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्यानंतर ते त्यांच्या सवयीचे व आवडीचे काम झाले. पुढील काळात डीडींनी सुरेशबाबू माने, गोविंदराव टेंबे यांच्याकडे साहाय्यक म्हणून काम केले. सुरेशबाबू माने व तिरखवाँसाहेबांना ते आदर्श मानत. डीडींनी अनेक संगीतकाराकडे अनेक वर्षे अ‍ॅरेंजर म्हणून काम केले. सी. रामचंद्र यांच्याकडे जवळपास दहा वर्षे त्यांनी काम केले. चित्रगुप्त, एस. एन. त्रिपाठी, प्रेमधवन, रोशन व अलीकडे आनंद-मिलिंद यांच्याकडे त्यांनी अ‍ॅरेंजर म्हणून काम केले. प्रामुख्याने गाण्याचे नोटेशन लिहिणे, तालमी घेणे हे महत्त्वाचे काम त्यांच्याकडे असे. डीडींनी स्वत: संगीत देताना कधी पाच वाद्ये, तर कधी पंचवीसहून अधिक वाद्यांचा वापर केला. इंग्लिश धर्तीची चाल किंवा दाक्षिणात्य संगीताची छाप असेल अशी चाल असे अनेक प्रयोग त्यांनी केले. त्यांनी गीते लिहिणे, चाली देणे व गाणे असे तिहेरी कामही केलंय. गायिका आशा भोसले यांनी डीडींकडे गायलेल्या गीतांची संख्या शंभरच्या आसपास नक्कीच आहे. संतवृत्तीच्या डीडींनी कोणतेही काम पुरस्कार मिळविण्याच्या ईष्र्येने केले नाही. ‘संगीतातले काम म्हणजेच ईश्वर’ असा त्यांच्या मनी भाव असे.   आपल्या सर्वाच्या मनात उत्सुकता निर्माण होते की- गीत तयार होण्यासाठी शब्द त्यांच्याकडे चालत यायचे, की त्या शब्दांत दडलेली चाल ही शब्दांतून त्यांच्याकडे चालत येत असे! मुळात ही दोन्ही कामे हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. डीडींना सहज गुणगुणण्यातून शब्द सुचत असे वाटते. गुणगुणणे या क्रियेमध्ये चाल अध्याहृत असतेच. अशा प्रक्रियेतून त्यांना हा मुखडा सुचला असावा.. ‘कुणीबाई गुणगुणले, गीत माझिया हृदयी ठसले गं!’ आणि म्हणूनच गीताच्या अंतऱ्यामध्ये ‘रम्य स्वरांनी मोहित केले’ असा आनंदाचा क्षणसुद्धा आहे. प्रयोगशीलता ही डीडींच्या आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट होती.

‘कुणीबाई गुणगुणले’ हे गीत ऐकले आणि भावगीतांच्या प्रवासात आशा भोसले यांनी अनेक संगीतकारांकडे गायलेली शेकडो गाणी आठवली. त्यांनी गायलेले प्रत्येक गाणे म्हणजे कान व मन तृप्त करण्याचा सोहळा असतो. आपणा प्रत्येकाच्या मनातला भाव त्यांनी स्वरांतून गायलाय. आशा भोसले यांची गाणी म्हणजे भावभावनांचा सुरेल असा महासागर आहे. हे गाणे टिपू की ते गाणे वेचू, असा प्रश्न पडतो. आणि हाती जे लागेल त्याने आपले आयुष्य सार्थकी लावू. हजारो गीतांनी  भरलेला खळाळता महासागर तुमच्यासमोर आहे. मग उशीर कशाला? आवडता, अभिमानाचा,आनंद देणारा प्रश्न विचारा.. पाण्या तुझा रंग कसा?

विनायक  जोशी vinayakpjoshi@yahoo.com