मराठी भावगीताने नव्वद वर्षे पूर्ण केली ही संगीतविश्वातील एक महत्त्वाची घटना. आकाशवाणीवर भावगीते ऐकत तीन-चार पिढय़ा घडल्या. भावगीत एप्रिल १९२६ मध्ये ध्वनिमुद्रिकेच्या रूपात प्रथम अवतरले आणि शब्दप्रधान गायकीचे नवे दालन खुले झाले. भावगीतांच्या प्रवासातील गाजलेली गाणी, त्यांचे संगीत संयोजन, ध्वनिमुद्रण तंत्र, पाश्चात्त्य संगीताचा प्रभाव, आकाशवाणीचा त्यांच्या प्रसारातील सहभाग अशा अनेक गोष्टी या सदरात येतील..  पण हे कालानुक्रमे असेलच असे नाही.

‘हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला..’

freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
Muslim League, Hindu Mahasabha, coalition government, pre independence alliance
मुस्लीम लीग आणि हिंदू महासभेने मिळून स्थापली होती प्रांतिक सरकारे… स्वातंत्र्यपूर्व काळातील आघाडीबद्दल इतिहास काय सांगतो?
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : दावा हास्यास्पद; पण दुर्लक्ष नको..

मराठीतील पहिल्या ध्वनिमुद्रित भावगीताचा मान या गीताकडे जातो. विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन-तीन दशकांत रंगमंचावर संगीत नाटक व संगीत मैफली ऐन बहरात होत्या. रसिकांवर त्याचा पुरेपूर प्रभाव होता. त्याचवेळी- म्हणजे १९२३ मध्ये महाराष्ट्रात रविकिरण मंडळाची स्थापना झाली, ही एक सूचक घटना ठरली. भा. रा. तांबे, बालकवी व केशवसुतांच्या कवितांचा प्रभाव ज्या इंग्रजी भाषा जाणणाऱ्या सुशिक्षित युवकांवर होता, त्यांनी एकत्र येऊन रविकिरण मंडळाची स्थापना केली आणि कवितावाचन करण्याचे ठरविले. कविता जनमानसात पोहोचण्यासाठी हे कवितावाचन आणि कवितागायन उपयुक्त ठरले. कवी यशवंत, कवी गिरीश व माधव ज्युलियन हे रविकिरण मंडळाचे प्रमुख आधारस्तंभ होते. या मंडळातील संजीवनी मराठे, सोपानदेव चौधरी हे आपल्या कविता गाऊन सादर करत असत. कविता नुसती वाचण्यापेक्षा कवितागायन प्रभावी ठरते, हा त्यांचा अनुभव खरा ठरला.

आणि नेमका हाच भावगीताच्या उगमाचाही काळ आहे. एकीकडे संगीत नाटके व दुसरीकडे सिनेमा बोलू लागला होता. तशातच भावगीताची पहाट झाली आणि पहिले भावगीत रंगभूमीवरील विख्यात अभिनेत्याच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाले. गायक होते व्यंकटेश बळवंत पेंढारकर तथा बापूराव पेंढारकर व गीतकार होते- गोविंदाग्रज अर्थात सुप्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी. गीताचे बोल होते- ‘हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला..’ गोविंदाग्रजांच्या ‘वाग्वैजयंती’ या काव्यसंग्रहातील जुलै १९१२ मध्ये लिहिलेली एकूण १८ कडव्यांची ही कविता! त्यापैकी चार कडवी गीतासाठी म्हणून निवडण्यात आली. हे सारे नाटय़संगीताने भारलेल्या जमान्यात घडले.

अवघ्या मराठी नाटय़रसिकांनी अभिमान बाळगावा अशी एक बुजुर्ग नाटक मंडळी (कंपनी) म्हणजे ललितकलादर्श नाटक मंडळी. संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी १९०८ साली ती स्थापन केली. आपण हयात नसलो तरी आपल्या पश्चातही आपली ही नाटय़संस्था दिमाखात सुरू राहिली पाहिजे असा त्यांचा विचार होता व तसे मृत्युपत्र त्यांनी करून ठेवले होते. त्यानुसार बापूराव पेंढारकरांना आपल्या पश्चात ललितकलादर्शचे वारसदार म्हणून त्यांनी नियुक्त केले होते. पुढे बापूरावांनी रंगभूमीवर स्वत:चे एक युग निर्माण केले, हे सर्वज्ञात आहे. रुंद, सुरीला आवाज, स्पष्ट शब्दोच्चार, आवाजाचा उत्तम पल्ला ही बापूरावांच्या गायनाची खासीयत होती. कवनातली शब्दशक्तीची त्यांना उत्तम समज होती. त्या काळात विविध रागांवर आधारलेल्या बापूरावांच्या नाटय़पदांच्या ध्वनिमुद्रिका चांगल्याच लोकप्रिय होत्या. त्याची संख्या जवळपास ८० इतकी भरेल. ‘संन्याशाचा संसार’, ‘शहा शिवाजी’, ‘सत्तेचे गुलाम’, ‘हाच मुलाचा बाप’, ‘तुरुंगाच्या दारात’, ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’, ‘कृष्णार्जुनयुद्ध’, ‘शिक्काकटय़ार’, ‘मूकनायक’, ‘नेकजात मराठा’, ‘सोन्याचा कळस’ या नाटकांतील बापूरावांची पदे लोकप्रिय होती. नाटकांतल्या त्यांच्या पदांमुळे ग्रामोफोन कंपनीचेही ते लोकप्रिय कलाकार होते. नाटकात त्यांनी स्त्री-भूमिकासुद्धा केल्या. केशवराव भोळे यांनी लिहिलंय.. ‘तीनही सप्तकांत बापूरावांचे स्वर खडे लागतात. तारसप्तकातील स्वर लावताना त्यांना मुळीच कष्ट होत नाहीत. स्वराला चिकटून गाण्यामुळे त्यांचे गाणे उठावदार होते. स्वरांचे आकुंचन व भरणा केल्यामुळे भावना-दिग्दर्शन उत्तम होते आणि नावीन्याकडे कल असल्यामुळे ‘राजहंस माझा निजला’ हे काव्य (Lyric) त्यांनीच प्रथम रेकॉर्डमध्ये दिले व ते लोकप्रिय झाले. ‘ललितकलादर्श’ या नाटय़संस्थेचा नायक भावगीताच्या दुनियेत प्रवेश करतो व पुढे या भावगीत क्षेत्रात नवे पर्व निर्माण होते, ही संगीतप्रेमींसाठी उत्तम घटना आहे.’

मराठी भावगीतांच्या नव्वदीमध्ये या पहिल्या ध्वनिमुद्रित गीताचा विचार होणे आवश्यक आहे. नाहीतर हे गीत कोणाकडून ऐकले जाणार नाही. गायक, संगीतकार, संगीत संयोजक व श्रोते या सर्वानीच या पहिल्या भावगीत ध्वनिमुद्रिकेचा मान राखला पाहिजे. बापूराव पेंढारकरांबरोबरच नाटककार व कवी राम गणेश गडकरी यांनाही या गाण्याबद्दल ‘सॅल्यूट’ करायला हवा. कविता वाचण्यापेक्षा गायन प्रभावी ठरते, हा विचार पुढे आला आणि भावगीताचा जन्म झाला. हा सलाम ध्वनिमुद्रिका कंपनीलासुद्धा आहेच.

१९२६ या वर्षी बापूराव फोर्ट भागातील स्टुडिओत गेले व ही कविता ध्वनिमुद्रित करून आले, अशी आठवण भालचंद्र पेंढारकरांनी सांगितली होती. ते गीत म्हणून ध्वनिमुद्रित झाले. ध्वनिमुद्रिकेच्या लेबलवर ‘पिलू’ (Lyric) असे छापले गेले.

पतिनिधनानंतर अल्पावधीतच बापडीवर एकुलत्या मुलाचे निधन पाहण्याचा प्रसंग आल्यावर असा भ्रम होणार नाही का?

‘हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला

का असले भलते सलते, बोलता अमंगळ त्याला

छबकडय़ावरुनी माझ्या या, ओवाळुनि टाकुनी सकला

घेते मी पदराखाली, पाहुच नका लडिवाळा

मी गरीब कितीही असले, जरी कपाळ माझे फुटले

बोलणे तरीही असले, खपणार नाही हो मजला

या अध्र्या उघडय़ा नयनी, बाळ काय पाहत नाही?

या अध्र्या उघडय़ा तोंडी, बाळ काय बोलत नाही?

अर्थ या अशा हसण्याचा, मज माझा कळतो बाई

हे हसे मुखावर नाचे, जणु बोल दुग्धपानाचे,

की मुक्या समाधानाचे

इतुकेही कळे न कुणाला, राजहंस माझा निजला’

हे गीत मुद्दामहून ऐकावेच लागेल. अनेक ध्वनिमुद्रिका संग्राहकांकडे ही ‘kHMV P 7366’ क्रमांकाची काळ्या लेबलची लाखेची ध्वनिमुद्रिका आजही आहे. ती मुद्दाम ठरवून ऐकावी, कारण ‘पिलू’ या रागात ही रचना आहे. या रागात करुणा, भक्तिरस वा आनंद अशा संमिश्र भावनांमध्ये रचना झाल्या आहेत. अर्थात ही रचना करुण भाव अधिक गडद होण्याकडे जाते. रागातील गंधार-निषाद-धैवत या कोमल स्वरांचा व शुद्ध गंधाराचा उपयोग या गीतात दिसतो. या गाण्याच्या शब्दांमधील स्वरसमूहाच्या जागा मनातील भाव तीव्र करतात. उत्तम गायन व भावना यामुळे हे मराठीतले पहिलेवहिले भावगीत ऐकणाऱ्याच्या मनाचा ठाव घेते.

बापूराव पेंढारकरांच्या गायनशैलीत ‘बिलंपित’ गायन ही त्यांची खासईयत होती. ख्यालगायनातील विलंबित म्हणजेच ‘बिलंपित’ होय. उत्तरेकडे या शब्दाचा वापर अधिक होतो. आपण जसे ‘ठाय’ लय म्हणतो, तसे उत्तरेकडे ‘ठाह’ असे म्हणतात. दाद द्यावीशी वाटते या गोष्टीला, की त्याच बापूरावांनी शब्दप्रधान भावगीतसुद्धा उत्तम गायले. रसोत्पत्ती हा त्यांचा गायनगुण इथेही छान जमला आहे. कवीला अभिप्रेत असलेले उद्गारचिन्ह, प्रश्नचिन्ह, पूर्णविराम हे सारे त्यांच्या गायनात अचूक दिसते. ‘राजहंस माझा निजला’ या शब्दातील भ्रम व आत्मविश्वासाचा खेळ त्या दुर्दैवी आईच्या भावनेत नेमका दिसतो/ व्यक्त होतो. विशेषकरून गीतामधील ‘छबकडय़ावरून माझ्या या’ किंवा ‘अर्थ या अशा हसण्याचा’, ‘इतुकेही न कळे कुणाला’ या शब्दांचे उच्चार व स्वररचना आवर्जून लक्षात राहते.

हे सारे आपल्याला महत्त्वाचे वाटते, कारण हे गीत ऐकण्यासाठी आजही उपलब्ध आहे. अनेक उत्तम भावगीते आपण आजही मनाशी गुणगुणतो याचे श्रेय या संग्राहक मंडळींनाही द्यायला हवे, हे निर्विवाद.

विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com