पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने विराट कोहलीचे नाबाद अर्धशतकाच्या जोरावर सहा विकेट्सने विजय मिळवला. या विजयाचे श्रेय सारे कोहलीला देत असताना भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीही त्यामध्ये मागे नाही. कोहली हा धावांचा भुकेला आहे. त्याला आव्हाने स्वीकारायला आवडतात आणि आव्हान पूर्ण करण्यासाठी तो तशी मानसिकताही बनवतो आणि त्यानुसार खेळतो, असे धोनी या सामन्यानंतर म्हणाला.
‘‘ कोहली हा नेहमीच चांगली कामगिरी करण्यासाठी भुकेला असतो. प्रत्येक सामना हे माझ्यासाठी आव्हान आहे, असा विचार करून तो ते आव्हान पूर्ण करण्याच्यादृष्टीने पावले टाकतो. माझ्यामते ही एका क्रिकेटपटूसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याकडून कशी चांगली कामगिरी करता येईल, याचा नेहमीच तो विचार करत असतो,’’ असे धोनी म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, ‘‘ कोणत्या खेळपट्टीवर कशी फलंदाजी करायला हवी, हे कोहली उत्तमरीत्या जाणतो. जेव्हा तो स्थिरस्थावर होतो तेव्हा त्याच्याकडून नेहमीच मोठी खेळी पाहायला मिळते. युवा खेळाडूसाठी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.’’

पाकिस्तानविरुद्धच्या इतिहासाचे दडपण येते
पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात भारतीय संघ कधीही पराभूत झालेला नाही. आतापर्यंत ११ पैकी सर्वच सामने भारताने जिंकले आहेत. पण प्रत्येकवेळी हे होईलच असे नाही. पाकिस्तानविरुद्धच्या इतिहासाचे दडपण येते, असे धोनी म्हणाला.