न्यूझीलंडविरुद्धच्या मोहाली येथील सामन्यातील वक्तव्यामुळे पाकिस्तानी संघाचा कर्णधार आफ्रिदी पुन्हा एकदा वादात सापडला आहे. या सामन्यातील नाणेफेकीच्यावेळी आफ्रिदीला मोहालीत पाकिस्तानला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनाबाबत विचारण्यात आले. या प्रश्नाला उत्तर देताना आफ्रिदी म्हणाला की, होय आम्हाला मोहालीत प्रेक्षकांकडून मोठ्याप्रमाणावर प्रोत्साहन मिळत आहे. यामध्ये काश्मीरमधून आलेले अनेक प्रेक्षक आहेत. आम्हाला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचे आभार मानत असल्याचेही आफ्रिदीने सांगितले. मात्र, काश्मीरच्या मुदद्यावरून भारत-पाक यांच्या ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर आफ्रिदीचे हे वक्तव्य वाद निर्माण करणारे ठरू शकते. दरम्यान, आफ्रिदीच्या या वक्तव्यानंतर प्रेक्षकांमधूनही ‘विथ लव्ह फ्रॉम काश्मीर’ असे फलक झळकताना दिसले.
‘आफ्रिदी आणि वकार टीकेचे धनी’ 
ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघाने भारतामध्ये पाऊल ठेवल्यावर लगेचच भारतप्रेमाच्या वक्तव्यामुळे आफ्रिदी पुन्हा एकदा गोत्यात सापडला होता. भारतासारखे चाहत्यांचे प्रेम आम्हाला मायदेशातही मिळत नाही, असे बोलून आफ्रिदी टीकेचा धनी झाला होता. त्यानंतर भारताविरूद्धच्या सामन्यातील पराभवामुळे पाकिस्तानी चाहत्यांचा आफ्रिदीवरील रोष आणखीनच वाढला होता.
दबावात कसे खेळावे ते भारताकडून शिकावे – शाहीद आफ्रिदी