‘‘तुम्ही ख्रिस गेलचे नाव ऐकले आहे का?’’ अशी सुरुवात जेव्हा विराट कोहलीबाबतच्या प्रश्नावर वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमीने पत्रकार परिषदेमध्ये केली, तेव्हा साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण या वाक्याने सॅमीला कोहलीबद्दल जास्त काही बोलायचे नसल्याचे स्पष्ट झाले. तुमच्याकडे जर कोहली असेल तर आमच्याकडे गेल आहे, हा त्याच्या वक्तव्याचा अन्वयार्थ होता. विराट कोहली सध्या अफलातून फॉर्ममध्ये आहे. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे प्रतिस्पध्र्याचे धाबे दणाणले आहेत. पण सॅमीने आम्हाला कोहलीचे दडपण नाही, परंतु त्याला दुर्लक्षित करून चालणार नसल्याचे सांगितले.
कोहलीबाबत पुन्हा विचारले असता तो म्हणाला की, ‘‘विराट हा एक चांगला फलंदाज आहे आणि चांगल्या फॉर्मातही आहे, पण त्याचे दडपण आमच्यावर नाही. आम्ही या सामन्यात खास रणनीती आखली आहे आणि त्याची योग्य अंमलबजावणी झाली तर हा सामना आम्ही जिंकू शकू.’’
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावत कोहलीने भारताला सामना जिंकवून दिला होता. त्यानंतर मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील त्याची नाबाद ८२ धावांची खेळी अविस्मरणीयच होती. मोहालीच्या संथ खेळपट्टीवर त्याने जेम्स फॉकनरसारख्या गोलंदाजाची दैना उडवली होती. त्यामुळे सध्याच्या घडीला विराटचा फॉर्म हा अविश्वसनीय असल्याचे म्हटले जात आहे.
भारताच्या संघाचे संचालक रवी शास्त्री यांनीही कोहलीवर स्तुतीसुमनांचा वर्षांव केला. ते म्हणाले की, ‘‘कोहलीची मोहालीतील खेळी अद्भुत अशीच होती. आतापर्यंतच्या ट्वेन्टी-२० क्रिकेटमधली सर्वोत्तम खेळी, अशी त्याच्या खेळीची गणना करता येऊ शकते. तो ज्या पद्धतीने फटके खेळला ते सारे अफलातून असेच होते.’’
कोहलीबाबत ते पुढे म्हणाले की, ‘‘मी जेव्हा संघातील स्थान सांभाळले, तेव्हा कोहलीचा फॉर्म चांगला नव्हता. पण तो चांगली कामगिरी करेल, यावर माझा विश्वास होता. फक्त मानसिकता बदलण्याची गरज होती. भारतीय संघात विराट हा सर्वाधिक मेहनत घेतो. गेल्या १८ महिन्यांमध्ये सातत्याने तो दमदार फलंदाजी करत आहे. स्वत:च्या गुणवत्तेवर विश्वास ठेवत मेहनत घेणाऱ्या कोहलीचेच हे श्रेय आहे.’’