नुकत्याच झालेल्या रेल्वे तिकिटांच्या दरवाढीमुळे नाराज असलेल्या सर्वसामान्यांना यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात आणखी काय मिळणार याकडे लक्ष लागलेले आहे. या पाश्र्वभूमीवर रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी विविध राज्यांमध्ये वातानुकूलित डबल डेकरसह १०० नव्या गाडय़ा सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने तयार केला असून २०१३-१४ च्या रेल्वे अर्थसंकल्पात त्यांची घोषणा केली जाणार आहे. याशिवाय रेल्वे गाडय़ांमधील स्वच्छतेला अधिक प्राधान्य देण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली जाणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
यंदाच्या अर्थसंकल्पात ६०० एलएचबी डब्यांसह चार हजार २०० नवे डबे बनवण्याची घोषणाही केली जाणार आहे. शिवाय २० सीएनजी इंजिनांसह ६७० नवीन इंजिने आणि १६ हजार नव्या व्ॉगनच्या निर्मितीचा प्रस्तावही या अर्थसंकल्पात मांडण्यात येणार आहे.
प्रत्येक राज्याच्या लोकप्रतिनिधींनी नव्या गाडय़ांची मागणी केली आहे. या पाश्र्वभूमीवर सर्व राज्यांना नव्या गाडय़ांचा लाभ देण्याचा प्रयत्न म्हणून १०० नवीन गाडय़ांची घोषणा केली जाणार आहे. नवीन गाडय़ांचा हा आकडा मोठा वाटत असला तरी यातुलनेत गेल्या वर्षी १७५ नवीन गाडय़ांची घोषणा करण्यात आली होती.
रेल्वे गाडय़ांमधील तसेच रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला असून विकलांग प्रवासी तसेच महिलांचा प्रवास अधिक सुखकारक  तसेच सुरक्षित होण्यासाठी अधिकाधिक सुविधा पुरविण्यासह स्वच्छतेच्या कामासाठी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल विशेष घोषणा या २६ फेब्रुवारीच्या रेल्वे अर्थसंकल्पात करण्याची शक्यता रेल्वे सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार ५४३ गाडय़ांची निवड करण्यात आली असून शौचालयांची तसेच डब्यांमधील एकूणच स्वच्छता करण्यासाठी ऑन बोर्ड हाऊस कीपिंग स्कीम या योजनेचीही घोषणा होण्याची शक्यता आहे. प्रवाशांना देण्यात येणाऱ्या चादर तसेच ब्लँकेट धुण्यासाठी १० नवीन लाँड्री सुरू करण्यात येणार असून रेल्वेतून प्रवास करणाऱ्या दृष्टिहीन प्रवाशांसाठी सोयीचे जावे यासाठी ब्रेल लिपीतील स्टीकर्सही डब्यात लावण्याचा प्रस्ताव असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, रेल्वे मंत्रालयापुढे मोठय़ा प्रमाणात आर्थिक चणचण असून या नव्या घोषणांच्या खर्चाचा ताळमेळ बसवताना रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे मंत्र्याची चांगलीच दमछाक होणार आहे.