सतत कसली तरी घाई करत, कशाच्या तरी मागे धावणाऱ्या, कुणाशी तर स्पर्धा करत जगणाऱ्या व्यक्ती बरोबर मानायच्या की आपण बरं आणि आपलं काम बरं असं म्हणत, जगाबरोबर धावायला नाकारणाऱ्या व्यक्ती बरोबर मानायच्या?

‘‘या विद्यार्थ्यांवरील अन्यायाचा विरोध झालाच पाहिजे! आपणच याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे.. गरज पडल्यास मोर्चाही काढायला पाहिजे. न्यायाच्या बाजूने असाल तर मला पािठबा द्या!’’ सोनाली बाकावर उभी राहून घोषणा करत होती. सोनाली, फक्त आमच्याच वर्गाचीच नाही तर अख्ख्या कॉलेजची ‘ताई’ आहे. हे असं मोठय़ानं बोलणं, घोषणा करणं, जमावाला एकत्र करून आपलं बोलणं ऐकायला लावणं आणि वेळ आलीच तर सुपरवुमन बनत हात उचलणंही जमत हिला! खरं तर कमी उंचीची, काटक.. पण तिच्या अशा ‘ताईगिरी’वाल्या रूपात बघितलं तर उंच, धिप्पाड मुलंदेखील सोनालीपासून घाबरून राहतात. मला सोनालीमधील सगळ्यात जास्त गोष्ट आवडते ती म्हणजे तिच्याकडे असलेल्या या धडाडीचा, धडाकेबाज स्वभावाचा कधी गरवापर करत नाही; ही मत्रीण एक अजब रसायन आहे! बिनधास्त कोणाशीही बोलायला न घाबरणारी तर ती आहेच, पण त्याशिवाय तिला स्पर्धा करायलाही खूप आवडतं. ही स्पर्धात्मक वृत्ती फक्त अभ्यासातच नाही तर कला, संगीत, खेळ अशा इतर गोष्टींमध्येसुद्धा तिच्या वागण्यातून दिसून येते. बरेचदा ही स्पर्धात्मक वृत्ती सोनालीसारख्या ध्येयवादी मुलीला तिचं लक्ष्य गाठण्यास मदत करते. पण कधीकधी मात्र अगदी साध्या साध्या गोष्टींमध्येसुद्धा स्पर्धा, चढाओढ, तुलना केल्याने तिलाच अधिक ताण सहन करावा लागतो. हिला वेळेचीसुद्धा सारखी घाई असते!! कुठे पोहोचायची घाई असते तशीच काम करायची (संपवायची) घाई, निघायची घाई  आणि आपलं बोलणं बोलायची, सांगून टाकण्याची पण घाई!! या घाईघाईत ती थोडय़ा वेळात इतर लोकांपेक्षा जास्त गोष्टी करते, पण पूर्ण वेळ देऊन, नीट पूर्ण करण्याचा संयम तिच्यात नाही. त्यामुळे एका वेळेला जास्तीत जास्त कामं कशी होतील याचा विचार तिच्या डोक्यात चालू असतो आणि एक काम संपत आलं की लगेच दुसऱ्या कामाच्या तयारीला सोनाली लागलेली असते. निवांत बसून कधी आराम करताना, शांतपणे बसून विचार करताना मी तिला कधी आजपर्यंत पाहिलं नाही. ‘जगातली सगळी कामं आणि सगळ्या चिंता सोनालीलाच सोडवायला दिल्या आहेत’ अशी तिची मस्करी पण करतो आम्ही कधी.

गंमत अशी ही सोनालीची जी बेस्ट फ्रेंड आहे ती सोनालीच्या अगदी विरुद्ध- एक्झ्ॉक्टली अपोझिट! ‘मीनल’ – जगाचं तर सोडाच, पण स्वत:चसुद्धा तिला कधी टेन्शन नाही येत. खुशालचेंडू, आरामात आयुष्य जगणारी मीनल ‘टेन्शन नही लेने का, ऑल इज वेल बोलने का’ कॅटेगरीमध्ये बसणारी! एका वेळेला एकाच कामाकडे लक्ष देऊन, आरामात स्वत:चा वेळ घेऊन काम करते. घाई, स्पर्धा हे शब्द तर तिच्या शब्दकोशातसुद्धा नाहीत. म्हणूनच सोनाली मीनलशीसुद्धा कधी-कधी स्पर्धा करत असली तरी मीनलला त्याचा काही फरक पडत नाही; कारण हार-जीतमध्ये ती तिचं समाधान आणि आनंद मोजतच नाही! ‘आपण भलं आणि आपलं आयुष्य भलं’ हा मीनलच्या जीवनाचा जणू मूलमंत्र. स्वत:हून इतरांशी बोलायला ती जात नाही, कुणी बोलायला आलं तरी सुरुवातीला मोजकाच संवाद साधून ती तिची स्पेस सांभाळते. विशेषत: परीक्षेच्या वेळेला या जोडीला बघण्यात सॉलिड मजा येते. शेवटच्या क्षणापर्यंत सोनाली वाचत असते, उजळणी करत असते, प्रचंड टेन्शनमध्ये हातात पुस्तक घेऊन सगळीकडे फिरत असते, आणि मधूनमधून मीनलला ‘‘तुझा किती झालाय गं अभ्यास? बापरे!! तो धडा पण वाचलास तू? मेले मी. आज मी नापास होणार’’ असे नेहमीचे प्रश्न आणि संवाद होतात. (त्यातूनसुद्धा स्पर्धात्मक वृत्ती झळकत असतेच.) आणि याच्या अगदी विरुद्ध मीनल, परीक्षेच्या दिवशी पेपरच्या आधी एक-दोन तासापूर्वी सगळी पुस्तकं बंद करून शांत बसते. इतके दिवस जो अभ्यास झाला नाही तो शेवटच्या एक-दोन तासांत काय होणार? असं स्वत:ला पटवत मस्त गाणी ऐकत, गप्पा मारत निवांत बसलेली असते. मीनलच्या इतक्या ‘कूल’ स्वभावाचा हेवा वाटतो बरेचदा! आयुष्यात काही कठीण ध्येय वगरे साध्य करण्याची महत्त्वाकांक्षा नाही.. आहे त्यातच समाधानी असते ही.. कामं वेळेवर झालीच पाहिजेत, वेळेवर पोहोचलं पाहिजे असं काही ती मानतच नाही जणू. त्यामुळे वेळ पाळण्यासाठी होणाऱ्या धडपडीमधूनसुद्धा मीनलची सुटका होते!! अशा संपूर्णपणे परस्परविरोधी असलेल्या सोनाली आणि मीनलच्या घट्ट मत्रीचं नवल वाटलं नाही तरच नवल!!

अशी दोन माणसं इतकी वेगळी कशी असू शकतात, आणि तरी त्याचं एकमेकांशी कसं काय इतकं छान पटतं हे एक कोडं लोकांना बरेचदा पडतं. आणि या कोडय़ाच्या उत्तराच्या शोधात आपण पोहोचतो ते ‘पर्सनॅलिटी थीअरिज’/ व्यक्तिमत्त्वाच्या सिद्धांतांपर्यंत! मुळात पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्त्व म्हणजे काय याची व्याख्या सांगणं फारच कठीण आहे. अनेक मानसशास्त्रज्ञांनी विविध प्रकारांनी मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाची व्याख्या सांगण्याचा, त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे, संशोधन केलं आहे. तरी अजूनही या विषयातील संशोधन अविरत चालूच आहे! मुळात ‘पर्सनॅलिटी’ हा शब्द ‘पर्सोना’ या शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ बाह्य़रूप, स्वत:ला लोकांसमोर ठेवताना घेतलेली भूमिका असा आहे, पण खरं तर ‘व्यक्तिमत्त्व’ या शब्दात बराच मोठा अर्थ व्यापलेला आहे. व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘मनुष्याची विचार, वर्तन करण्याची पद्धत, भावना, संवेदना यातील पॅटर्न, जो इतर व्यक्तींपेक्षा वेगळा असतो, अशा विविध स्वभाव वैशिष्टय़ांनी युक्त बनत असते’. व्यक्तिमत्त्व समजून सांगणारे बरेच सिद्धांत आहेत, त्यातीलच एक म्हणजे ‘अ’ व ‘ब’ व्यक्तिमत्त्व प्रकार! सोनाली ही ‘अ’ व्यक्तिमत्त्व प्रकाराचं उत्तम उदाहरण आहे, तर मीनल ‘इ’ व्यक्तिमत्त्व गटात मोडणारी, असंही मानलं जातं किंवा संशोधनातून सिद्ध झालं आहे की, वयाच्या १६/१८ वर्षांनंतर आपल्या व्यक्तिमत्त्वात विशेष बदल घडून येत नाहीत, किंबहुना येऊ शकत नाहीत. त्यामुळे मुलाच्या वाढीची र्वष व्यक्तिमत्त्व घडवण्यात खूप मोठा वाटा उचलतात. याचाच आधार घेत आजकाल ‘व्यक्तिमत्त्व विकासा’चे क्लासेस आणि केंद्रं फोफावली आहेत, शाळेतसुद्धा हा विषय अनिवार्य आहे, परंतु व्यक्तिमत्त्व विकास हा त्याचे धडे वाचून किंवा केवळ क्लासला जाऊन होत नाही, तर त्यासाठी त्या गोष्टी वर्तनात आणण्याची गरज असते! आपलं व्यक्तिमत्त्वच खऱ्या अर्थाने आपली ‘व्यक्ती’ म्हणून ओळख घडवत असतं. व्यक्तिमत्त्व हे सापेक्ष असतं, त्यात बरोबर किंवा चूक असा सरळसरळ भेद करता येत नाही. काही प्रसंगी काही प्रकारचं व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्ती आवश्यक असतात, तर काही प्रसंगी त्याचं व्यक्ती अडथळा बनू शकतात. टाइप ‘अ’ व्यक्तिमत्त्व गटातील व्यक्ती स्पर्धात्मक वृत्तीच्या, ध्येयवादी, सतत घाईत असणाऱ्या, छोटय़ामोठय़ा गोष्टींचा ताण घेणाऱ्या, साहसी वृत्ती करणाऱ्या असतात; तर उलटपक्षी ‘इ’ गटातील व्यक्ती संथ, आहेत त्या सुख मानून निर्थक स्पर्धा न करणाऱ्या, उच्च ध्येय गाठण्याची महत्त्वाकांक्षा नसलेल्या, एका वेळेला एकच काम हाती घेणाऱ्या अशा असतात. अर्थातच या व्यक्तिमत्त्वाचे काही फायदे आणि काही तोटे विविध प्रसंगी व्यक्तींना अनुभवायला मिळतात. संशोधनातून असं सिद्ध झालंय की ‘अ’ प्रकारच्या व्यक्ती जास्त यशस्वी असल्या तरी हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता त्यांच्यात ‘इ’ गटातील व्यक्तींपेक्षा दुप्पट असते!! तर ‘ब’ गटातील व्यक्ती ध्येयवादी नसल्याने, विशेष यशस्वी, धाडसी कृती करण्यास धजावत नाहीत, त्यामुळे अशा प्रकारच्या क्षणांपासून त्या दूर राहतात.

या व्यक्तिमत्त्व प्रकारात चूक आणि बरोबर असं काही नसेल, तर सुखी, यशस्वी आयुष्य जगण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या व्यक्तिमत्त्व वैशिष्टय़ांचा अतिरेक व्हायला नको याची दक्षता आपण घ्यायला हवी. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आपण अभ्यास केला तर स्वत:ला जास्त चांगल्या प्रकारे ओळखण्यात मदत तर होईलच, पण त्याशिवाय धोके टाळता येतील व कुठल्याप्रसंगी कुठे, कसं वर्तन असावं याचा अंदाज आल्याने आपल्यात काही सकारात्मक बदल करता येऊ शकतील. आपलं व्यक्तिमत्त्व हे आपल्या बाह्य़रूपावरून ठरत नाही तर आपल्या स्वभाव, विचार, वर्तनावरून ठरत असतं याची जाणीव मात्र कायम आपल्याला असायला हवी, कारण असं म्हणतात की, ‘ब्युटी गेट्स अटेन्शन; बट पर्सनॅलिटी विन्स हार्ट’! एखाद्याचं लक्ष वेधून घेणं नव्हे, मन जिंकणं जास्त महत्त्वाचं आहे, नाही का?
तेजाली कुंटे – response.lokprabha@expressindia.com