कुणा ‘ती’बद्दल लिहू असं म्हणता म्हणता लक्षात आलं की या सगळ्या त्या ‘ती’ आहेत, ज्यांनी मला जगणं शिकवलं, ज्यांनी अक्षरश: माझं मन घडवलं. आणि नुसत्या याच नाही, अशा आणखी कितीतरी ‘ती’. काही माझ्या नात्यातल्या, काही मैत्रीतल्या, काही ओळखीच्या, काही अनोळखी. व्यथांच्या केवढय़ा दाहक रांगोळ्या रेखलेल्या असतात यांच्या भाळावर !

‘ती’ प्राध्यापक होती. म्हणजे आहे अजूनही. पण ‘प्राध्यापक’ हा उल्लेख हल्ली तिला त्रासदायक वाटतो फार. तासिका तत्त्वावर तिची नेमणूक झाली त्याला आता नऊ वर्षे उलटून गेली. वयाच्या तेविसाव्या वर्षी पदव्युत्तर शिक्षण संपलं तिचं. मग बी.एड.सारख्या काही व्यावसायिक अर्हता. पंचविशीत तिला ही नेमणूक मिळाली. नवरा काहीबाही उद्योग करतो, त्याच्या तुटपुंज्या उत्पन्नात जमेल तसं घर भागवते. तिला स्वत:ला आठवडय़ात काहीतरी चार-पाच तासिका असतात. प्रतितास शे-दीडशे रुपये मोबदला. महिन्याचे फारतर तीनचार हजार होतात. मात्र ते दर महिन्याला मिळत नाहीत. तासिका घेतल्याचे रिपोर्ट सादर करावे लागतात, नंतर कधीतरी टर्मच्या शेवटी सगळं बिल एकत्रित मिळतं. घर सांभाळून, दरम्यान झालेली दोन मुलं सांभाळून ती सेट-नेट वगैरेच्या आणि लोकसेवा आयोगाच्या वगैरे परीक्षा देत राहते. इतक्या धकाधकीतून त्यात काही यश मिळण्याची खात्री नसतेच. मग ती जिवाला खात राहते स्वत:च्या. नवऱ्यावर राग काढता येत नाही. मग तो मुलांवर निघतो. मागची सलग दहाएक वर्षे ती अक्षरश: करवादलेली असते. आता तर भविष्याच्या काळजीने तिला रात्र रात्र झोप येत नाही. टक्क डोळे उघडे ठेवून छताकडे पाहत ती सकाळ होण्याची वाट पाहते. सकाळी अगदी लवकर उठून चहापाणी स्वयंपाक करून, पोरांच्या शाळेचे डबे, स्वत:ला-नवऱ्याला खायला करून धावपळ करत कॉलेज गाठते. हे असं रहाटगाडगं सलग दहाएक वर्षे. ती काम करते त्याच, किंवा आसपासच्या इतर संस्थेत ‘जागा’ निघतात, दरवेळी ती अर्ज करते, इंटरव्ह्य़ू देते, निवड प्रक्रियेच्या अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचते आणि मग इतर कुणाची तरी निवड होते. आपण जाणीवपूर्वक डावलले जातो, आपल्याजवळ वशिला नाही, कुणाला लाच द्यायला काही लाखांच्या घरातली रक्कम नाही, आपलं कधीच काही होऊ शकत नाही, हे लक्षात येऊन दरवेळी ती कणाकणाने मरत राहते. दुसऱ्या सकाळी त्राण एकवटून पुन्हा जगण्याशी भिडायला सज्ज होते..

Astrology By Date Of Birth Number 5, 14 and 23 nature and personality
Astrology By Date Of Birth : ५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो? जाणून घ्या सविस्तर
How do you make sure there is no worm in a cauliflower
फक्त काही सेंकद फुलकोबी गॅसवर ठेवा, झटक्यात बाहेर येईल अळी किंवा किडे; पाहा भन्नाट Kitchen Jugaad
loksatta kutuhal artificial intelligence introduction of computer vision
कुतूहल : संगणकीय दृष्टी म्हणजे काय?
this is true love old couple eating in one plate
याला म्हणतात खरं प्रेम! एका ताटात जेवणाऱ्या आजी-आजोबांचा व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावूक

एक ‘ती’ आहे. म्हणजे होती. खूप सुंदर, खूप हळवी, संवेदनशील. विशीत तिचं लग्न झालं. लग्नापूर्वी तिची काही स्वप्नं होती, आईबापाने लादलेल्या लग्नाखातर तिने ती विझवून घेतली स्वत:च्या हाताने. दारातलं माप ओलांडून तिने कुणा तिऱ्हाईताचा संसार फुलवायला घेतला. एकदा नवरा म्हणाला, ‘‘आपण सगळं विश्वासानं शेअर करू यात. माझा काहीतरी भूतकाळ होता. एक मुलगी होती, मला आवडायची. तिच्याशी माझं लग्न होऊ शकलं नाही. मला हे तुझ्यापासून लपवून ठेवायचं नाहीय. तुझंही काही असेल तर ते लपवून ठेवू नकोस. तुझ्यामाझ्यात आता काही आडपडदा नको.’’ ती काही बोलली नाही. त्याने खोदून खोदून विचारलं, परस्पर नात्यातल्या विश्वासाच्या शपथा घातल्या, तेव्हा ती हळूहळू मोकळी झाली. वयानुरूप काही साहजिक कोवळ्या धाग्यांनी तिच्याही मनात घर केलेलं होतंच कधीतरी. मग त्याने सांगितलं तेच तिनंही सांगितलं, ‘‘पण आता मी तुमच्यासोबत आनंदात आहे, मला त्या आठवणी आता नको आहेत.’’  त्यानं ऐकून घेतलं. मग काही दिवसांनी त्यांच्यात भांडणं चालू झाली. बदफैलीपणाचा आरोप करत त्याने तिला धारेवर धरायला सुरुवात केली. ती सगळं निमूट सोसत गेली. मग एके दिवशी त्यानं तिच्यावर रॉकेल ओतलं आणि पेटती काडी तिच्यावर टाकली. साठसत्तर टक्के जळून गेलेल्या अवस्थेत दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये भेटायला गेल्यावर ती म्हणाली.. छे ! काहीच म्हणाली नाही ती. तिला बोलताच येत नव्हतं. तिच्या पापण्यांतून थोडंसं पाणी ओघळलं आणि त्यानंतरच्या एका रात्री ती मरून गेली.

एक ‘ती’ आहे. माझ्या रोजच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावर असलेल्या एका दग्र्याच्या बाहेरच्या दगडी भिंतीला टेकून भुईवर विमनस्क बसलेली दिसते. हातात एक बारीक काडी असते तिच्या आणि त्या काडीने दुसऱ्या हाताच्या मनगटावर ती ओरखडे काढत काहीतरी रेखाटत असते. नियतीने तिच्या भाळावर विचित्रपणे काढलेली ती रेखाटनं वाटतात मला. एकदा माझ्या लक्षात आलं की ती नुसती बसलेली नसते, तिचे ओठ हलत असतात, ती पुटपुटत असते काही. तिच्याकडे लक्ष नाही असं दाखवत मी जवळ भिंतीला टेकून उभा राहतो क्वचित कधीतरी, कानात जीव एकवटून ती बोलते ते ऐकण्याचा प्रयत्न करतो, पण ती फारच अस्फुट पुटपुटत असते. काहीच ऐकू येत नाही. काहीच कळत नाही. कधीतरी एकदा मी म्हणेन तिला, ‘‘बाई, तू थोडय़ा मोठय़ानं मन उकल तुझं. तुझी कहाणी ऐकू दे जगाला. कसल्या दु:खांनी तुझ्या आतडय़ांना गाठी मारून ठेवल्या आहेत, कळू देत, बाये..’’ ती बोलणार नाही हे मला माहीत आहे, कदाचित मी बोललेलं तिच्या आत झिरपणारच नाही. पण तिचं ते अव्यक्त आंतरिक जळणं मला जगण्यातली एक गहिरी जखम देऊन जातं..

अजून एक ‘ती’ आहे. ती सरळसोट वेडी आहे. कुणी कुठल्या क्षणी तिच्यावर लादलेल्या गर्भारपणातून उमलून आलेलं एक बाळ असतं तिच्या काखेत नेहमी. बहुधा बसस्टँडवर दिसते. ती कशी जगते माहीत नाही, ती बाळाला कशी जगवते माहीत नाही; पण बाळाला उंच हवेत अस्ताव्यस्त फेकून पुन्हा झेलताना मी तिला पाहिलं आहे, एकदा बसस्टँडवरच्या सिमेंटच्या बाकडय़ावर जोरकस फेकून देताना आणि एकदा आनंदी चेहऱ्याने त्याचे लाड करतानाही ती दिसली होती. तिने बाळाला उंच फेकून देताना माझे प्राण कंठाशी आले होते, तिनं बाळाला बाकावर फेकून देताना पाहिलं तेव्हा प्रचंड भयावह दु:खाने मी कळवळलो होतो. नंतर कित्येक रात्री मी नीट झोपू शकलो नव्हतो. तिच्या हातून ते बाळ हिसकावून घ्यावं आणि त्याची कुठेतरी नीट सोय लावावी, असं मला तीव्रतेने वाटून जायचं, पण खास मध्यमवर्गीय वांझ कर्मदारिद्रय़ामुळे ते ओझं अंगावर घेता आलं नाही. आपण अतोनात कचखाऊ आहोत, विच्छिन्न वास्तवासमोर ठामपणे उभं राहण्याचं धैर्य आपल्यात नाही, थोडक्यात; आपण उच्च श्रेणीचे सामाजिक षंढ आहोत, ही जाणीव माझ्यात तीव्रतर करण्यात त्या वेडीचा आणि तिच्या बाळाचा मोठाच वाटा आहे. मी आयुष्यभर तिला विस्मरू शकणार नाही. केवळ तिच्यामुळे, तिच्या त्या कसलेही भविष्य नसलेल्या अजाण बाळामुळे माझ्या आतल्या एका कोपऱ्यात बुद्धाची करुणा थोडीबहुत उजळून आली आहे.

एक ‘ती’ आहे. वाचनाच्या छंदामुळे ती माहीत झाली आणि तिच्याशी थोडीबहुत मैत्री झाली. खूप सुखात आहे. तिच्या आयुष्यात काहीही विपरीत घडलेलं नाहीय आजवर. तिचं कुंवारपण गोड होतं, तिचं विवाहित आयुष्य छान आहे. तिची दोन मुलंही गोड आहेत. सगळ्या सुखांनी ती तृप्त असावी असं वाटतं. एकदा कशासाठी तरी मी तिच्या घरी गेलो, तेव्हा सोफ्यावर बसून ती गदगदून रडत होती, मी तिथे दिसल्यावर तिने स्वत:ला सावरून घेतलं. तिच्या घरी त्या वेळी कुणीही नव्हतं, त्यामुळे त्या नेमक्या क्षणी तिचा नवऱ्याशी किंवा आणखी कुणाशी काही भांडणतंटा झालेला असण्याची शक्यता नव्हती. मुळात तिचा नवराही खूप समंजस आहे, हे मला माहीत होतं. मी तिला काहीही विचारलं नाही, पण इतकं उन्मळून रडावं अशा कोणत्या जहरी दु:खानं तिच्यावर आक्रमण केलं होतं, या विचाराने मी स्वत:ला पोखरून घेत राहिलो दीर्घकाळ. आता, ती हसत असताना, तृप्त दिसत असताना, तिचा छान सुबक संसार बाहेरून पाहत असताना, ‘ती सुखीच आहे’ असा मी स्वत:चा समज करून घेतो आणि पुढे चालत राहतो..

एक ‘ती’ आहे. माझ्या स्मरणात पहिल्यांदा मी तिच्या छातीशी दूध पिताना आठवतो मला. तिची असंख्य रूपं, असंख्य मुद्रा, असंख्य आनंद आणि असंख्य विवशता मी पाहिलेल्या; नाही, तिच्यासोबत मनोमन भोगलेल्याही आहेत. तिचे आनंद ती क्वचित सांगते आणि तिच्या दु:खांना ती उलगडत नाही कधीच. तिच्या डोळ्यांतून आसवं ओघळत आहेत अशा कित्येक सायंकाळी मी पाहिलेल्या आहेत. पारंपरिक पुरुषप्रधान संस्कृतीचा अजाण वाहक असलेल्या नवऱ्याकडून लाकडाने मार खाताना कसलाही प्रतिकार न करता फक्त अश्राप गायीसारखं अंग चोरून घेताना आणि मूकपणे आक्रंदताना मी पाहिलं आहे तिला आणि नवऱ्याच्या, पोरांच्या बारक्या बारक्या यशांनी फुलून आलेलंही! चाळीशीपार गेलेल्या मुलांच्या काळजीने आजही ती व्याकूळलेली असते. ती सगळ्याची काळजी करते, नवऱ्याची, पोरांची, पोरांच्या पोरांची. तिचा सगळ्यांवर जीव आहे, नवऱ्यावर, पोरांवर, पोरांच्या पोरांवर. याबाहेरचं जग तिला माहीत नाही फारसं. जगते त्याच मर्यादित जगाने तिला शोषून घेतलेलं आहे पुरेपूर.

‘ती’बद्दल लिहायचं होतं मला. कुणा ‘ती’बद्दल लिहू असं म्हणता म्हणता लक्षात आलं की या सगळ्या त्या ‘ती’ आहेत, ज्यांनी मला जगणं शिकवलं, ज्यांनी अक्षरश: माझं मन घडवलं. आणि नुसत्या याच नाही, अशा आणखी कितीतरी ‘ती’. काही माझ्या नात्यातल्या, काही मैत्रीतल्या, काही ओळखीच्या, काही अनोळखी. सांज कलताना डोक्यावर गच्च जडशीळ पाटी घेऊन दिवसभराच्या कष्टांनी शिणल्या पावलांनी घराकडे परतणाऱ्या ‘ती’, घरातल्या सगळ्या उस्तवाऱ्या करून पुन्हा रानाशिवारात झोंब्या घेणाऱ्या, खूप लहानशा सुखांनी कोवळं हसणाऱ्या, खूप तीव्रतर वेदनांना छातीवर झेलणाऱ्या, पदराआड आभाळ पेलणाऱ्या. डोक्यावरचा पदर ढळू न देता कायम काळोखात आयुष्य काढणाऱ्या आणि पोटाची आग विझवण्यासाठी पदर ढळू देणाऱ्या कितीतरी हजार प्रकारच्या ‘ती’. किती व्यथांच्या केवढय़ा दाहक रांगोळ्या रेखलेल्या असतात यांच्या भाळावर. आणि या सगळ्या ‘ती’ आपल्या भोवतालात असतात, काही अदृश्य धाग्यांनी आपल्याशीही बांधलेल्या. आपल्या मनात वस्तीला राहून आपल्याशी नातं सांगणाऱ्या.

या सगळ्यांनी मिळून तयार होते ती ‘ती’. माझ्या आत असलेली ती.

इथे मला तिच्याबद्दल सांगायचं होतं.

बालाजी सुतार – majhegaane@gmail.com