माझं विशिष्ट असणं माझ्या नजरेला बदलवत जात असतं. मी ‘मोहरा’मधली रवीना टंडन पाहायचो आता डायण्ड्रा सोरस पाहतो हे असं इतकं साधं आहे का? ‘स्वाभिमान’मधल्या किट्टू गिडवाणीतलं सेक्स अपील मी साक्षी तन्वरमध्येही शोधतोच, हे कसं? हे बघून आतल्या आत कबुली दिली पाहिजे माझ्या पुरुषी असण्याची. मग मी शोधत राहिलो माझ्या नजरेतली ती. कोणय ती?

तो कोण आहे? तो कुणी असा एकजिनसी घटक असतो का? ‘ती’ कोण आहे? तीदेखील अशी एकजिनसी असते का? तर नाही! परंतु इथे या दोन सर्वनामांपैकी पहिल्याचं विशिष्ट नाम अपेक्षित आहे. ‘मी’ म्हणजे ‘तो’ आणि माझ्या नजरेतली ‘ती’ म्हणजे ‘ती’. आता माझ्या नजरेचा काही विशिष्ट ‘स्वभाव’ असू शकतो आणि पुरुष म्हणून काही ‘सामायिक भाव’ असू शकतो. शिवाय या दोन्हींची सरमिसळ तिला पाहताना होणारच नाही याचीही खात्री नाही.

Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….

शिवाय त्याचा म्हणजेच माझा अनुभव तो किती? मी किती जग पाहिलंय? नव्वदीच्या दशकात जन्माला आलेल्या संक्रमणातल्या पिढीच्या या शहरी पुरुषाला हातचं सगळं (चाटून जाऊन) सुटत असताना ती आज कशी दिसते? त्यात आता थोडाफार स्त्रीमुक्तीचा अभ्यास केल्यावर ती कशी दिसते? अभ्यास केल्याने, आदर्श पुरुष म्हणून नजर सेट केली की जशी दिसायची तशीच ती दिसणार! पण कुणा एका पुरुषात फक्त माणूसच आहे; पुरुष नाहीच असं त्याच्याबाबतीत कधी झालंच नाही; हे असं इतकं १०० टक्के कुणाबाबत होऊ शकतं का? माहीत नाही.

शिवाय नजरेचा असा लसावि आणि मसावि काढता येणार नाही. मी आणि माझी नजर स्थिर कुठे आहे? जिच्यातून मला ती स्पष्ट दिसू शकते? माझी नजर यासाठी अशी मांड ठोकून बसायला हवी. ती तशी नाही. पुन्हा माझ्या नजरेवर माझ्यावरच्या संस्कारांचे, समाजाचे कृत्रिम प्रभाव अहोरात्र कार्यरत असतात. मीच संक्रमणाच्या या टप्प्यात घरंगळत असताना तिला माझ्या नजरेतून पूर्ण आकळत अशी कशी साधारणीकरणाची बाहुली बनवून ठेवू, हे मला कळत नाही. एकतर माझ्या नजरेतून तिला का पाहायचं? समजा पाहायचंच तर शोषणाच्या या पायरीवर आपण सर्वच एकमतात आहोत याची सिद्धता दिल्यासारखे ते असणार आहे, याचा कबुलीजबाब आधी दिला पाहिजे. शिवाय वयाच्या पंचविशीत कुणी असं किती अनुभव घेऊ  शकतं. फारच कमी. त्यातही पुरुष. या पुरुषी समाजाच्या आणि जातीच्या इमारतीवर उभा राहून पुरुषत्वाचे पूर्वग्रह समजावून घ्यायलाच कितीतरी वर्षे निघून गेली. सोळाव्या वर्षीच्या धोक्यात तर भाबडा का असेना, पुरुषी असलेला पुरुषच मी होतो. यात माझ्या नजरेत ती कशी असणार? झालंच तर ‘प्रेमातली फुलराणी’ नाही तर ‘पोर्नोग्राफिक शरीरांच्या चेहऱ्याची मादी’! या दोहोत हिंदकळणारा तो पुरुष आणि त्याच्या नजरेतली ती. या पौगंडावस्थेत कशीही पाहा, खोटीच!

शिवाय मी कविता लिहितो म्हणून माझ्या नजरेतून ती काय आहे हे जाणून घ्यायचे आहे वाचकाला. मी जे काही लिहितो त्याला कविता म्हणतात हे मला इतरांमुळे ऐकून, वाचून कळले. त्यामुळे मी आता कविता लिहितो. लिहिताना आता मला नीट कळतं की मी कविता लिहितोय. तर या अशा कविता लिहिणाऱ्या कवीच्या नजतेतून ती पाहायची आहे. म्हणजे जो कुणी कविता लिहितो त्याला ती कशी दिसते असं काहीसं. पण इथे थोडी गडबड आहे. माझ्यासाठी आज कविता लिहिणे हे काय आहे हा प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो. ते आधी नजतेली ‘ती’ लिहिण्याआधी स्पष्ट केले पाहिजे. मुळात कविता ही एका विशिष्ट क्षणाची निर्मिती आहे. ओकारी, जुलाब, थुंकी काहीही म्हणा. चांगलं-वाईट अशा कोणत्याच विशेषणात मी ते जोडू इच्छित नाही. त्या-त्या क्षणांची प्रामाणिक अभिव्यक्ती जी भाषा नावाच्या अर्जित माध्यमातून व्यक्त होते तिला मी कविता म्हणतो आहे. मग अशा काही मोजक्या क्षणांमधून निर्माण झालेल्या प्रतिमेच्या नजरेतून ती कशी पाहता येईल? कारण त्या क्षणांमध्ये उन्नतीची आदिम आकांक्षा आणि पुरुषी विकार यांच्या संघर्षांचं समकालीन प्रकटीकरण प्रामुख्याने होत असतं. आता त्याच निर्मितीच्या बिंदूवरून तिला पाहायचं तर त्या पोझिशनला जायला हवं. तेवढी आध्यात्मिक बैठक लागू शकेल? माहीत नाही. शिवाय विकारी पुरुषाचे सगळे अपराधगंड सांगितले नाहीत तर ती कशी पूर्ण होणार? असा सगळा मामला आहे. तेव्हा कविता वगैरे लिहिणाऱ्या पुरुषाच्या नजरेतली ती या हजार शब्दात व्यक्त करणं अवघडच नाही तर अशक्य आहे याची आधी कबुली दिली पाहिजे. त्यामुळे हा सगळा अर्धामुर्धा मामला राहणार आहे हेही स्वीकारायला हवे.

शिवाय कधी कधी कवितांमध्ये स्त्रीचं चित्रण वगैरे आलं की लिहिणारा पुरोगामीच आहे असा गोड गैरसमजही रूढ होण्याचा धोका आहे. माझ्या बाबतीत माझी कला ही पूर्णपणे voyeurism  मधून मुक्त आहे असे मला आज तरी म्हणता येत नाही. त्यामुळे कविता लिहिणे आणि स्त्रीबद्दल बोलण्याचा अधिकार मिळणे याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही हेही लक्षात घ्यायला हवे. कलावंत म्हणजे कुणी उच्चकोटीतला प्राणी असतो या भंपक समजातून बाहेर येत, असल्या महत्त्वाच्या विषयांवर त्याचा संस्थात्मक अभ्यास असल्याशिवाय, त्याला बोलायला लावणे ही काही फारशी चांगली रीत नाही!

शिवाय माझ्या या १६ ते २७ या वयात माझ्या आजूबाजूला अशा कितीशा स्त्रिया येणार? मध्यमवर्गीय मराठी पुरुषाचा भवताल तो काय- शाळा, महाविद्यालय, नोकरीची शहरं, देश, थोडाफार विदेश यात आल्या त्या स्त्रिया. आणि आता या मोजक्या बायांमध्ये काय दिसलं मला? तर ज्या सुरक्षित वातावरणात मी होतो, तिथे तर पुरुषासारखेच त्यांचेही विकार दिसले, त्याचा स्वभाव, चांगला, वाईट असाच काहीसा. ग्रे शेड म्हणतो तसा. यात बळजबरीचा वुमन स्टडीजचा डेटा का म्हणून टाकायचा? हा खरं तर माझ्यासमोरचा प्रश्न आहे.

माझं विशिष्ट असणं माझ्या नजरेला बदलवत जात असतं. मी ‘मोहरा’मधली रवीना टंडन पाहायचो, आता डायण्ड्रा सोरस पाहतो हे असं इतकं साधं आहे का? मी ‘रोजा’तली मधुही पाहायचो कुणकुणात; आज ‘इंग्लिश विंग्लिश’ची श्रीदेवी तशीच पाहतो. ‘स्वाभिमान’मधल्या किट्टू गिडवाणीतलं सेक्स अपील मी साक्षी तन्वरमध्येही शोधतोच, हे कसं? हे बघून आतल्या आत कबुली दिली पाहिजे माझ्या पुरुषी असण्याची. मग मी शोधत राहिलो माझ्या नजरेतली ती. कोणय ती? इतक्या प्रामाणिकपणे मला हे मांडता येणार आहे का हा महत्त्वाचा मुद्दा. वर्तमानपत्रात कन्फेशन होऊ शकतं का? आणि झालंच तर ते स्वीकारलं जाऊ  शकतं का? आणि तसं ते होत नसेल तर त्याची नजर करुणा, प्रेम, दया, अनुकंपा, समानता, स्वातंत्र्य या सर्व मूल्यांच्या पापण्यांनी काही काळ झाकली जाण्याचा धोका आहे. मग या उच्च मूल्यांच्या मागची नजर दिसणार कशी? मुद्दा संघर्षांचा आहे. तिच्याविषयीची वासना आणि तिच्याबद्दलचं अशारीर प्रेम यांच्यातील आदिम संघर्षांने तयार झालेली नजर आहे ही. ती नजर कधीकधी तिच्यापासून माझी नजर चोरते. संघर्षांत प्रभाव वाढला की नजर दाहक बनते आणि पड खाल्ली की नजर चोरू लागते. जिथे संधी मिळेल तिथे समानतेच्या पापण्यांनी आपल्याला मिटून घेते.

त्याचं असणं एक वेगळी बाब आहे. त्याच्या उन्नतीच्या आकांक्षा आणि त्याच्या नजरेवरची त्याची हुकमत यांचा ताळमेळ बसेलच असे नाही. शिवाय या पुरुषी वर्चस्वाने हातून झालेल्या चुकांना आपसूक पचवल्यामुळे मी मानसिक गंडाच्या कचाटय़ात अडकतो; परंतु व्यावहारिक शिक्षेच्या नाही. त्यामुळे माझी नजर या गंडाचीही असते.

त्यात माझं यश-अपयश, माझं अध्यात्म-विकार, माझी संपत्ती-दारिद्रय़ हे असं सगळं चर अस्तित्व सोबत असताना ती तीच राहिली, तरी नजर बदलत राहणं अपरिहार्य आहे! त्यामुळे नजरेतून तिचा शोध घेताना आपसूक माझं असणं विशिष्ट म्हणून महत्त्वाचं ठरून जातं. मुळात कुणाच्या नजरेतून कुणाला पाहणं ही कृती मुळातच शोषणात्मक आहे. पण बघावं लागतं म्हटल्यावर शोषणाच्या पुढच्या पायऱ्या मान्यच!

या नजरेच्या खोबणीत डोळे आहेत की स्तन? नजरेचं अतिवास्तववादी चित्र वगैरे काढलं तर एक तर रुद्राक्षाच्या माळा नाहीतर पोर्न चित्रमाला यापैकी एक किंवा एकामागोमाग या दोन्ही मुद्रा येतील काय? संक्रमणातील सिनेमे पाहिले तरी टोक गाठणे ही आमची खासियत झाली आहे. आम्ही एक तर सिनेमाच्या भाषेतील ‘हंटर’ असतो नाही तर ‘वायझेड’मधला मीच मला व्यालेलं तेजस शरीर – या दोन्ही अवस्थांमध्ये मी माझीच मुक्ती शोधतो, तिला कुठून पाहणार. की तिचे काय चालले आहे? तिला कदाचित या दोन्ही अवस्थांच्यामधले आम्ही हवे असू तर काय करणार?

खरं तर ती आहे तशीच आहे. न कळलेली. ती हजारो वर्षांपासून तीच आहे. ती प्रेमच शोधते आहे. हे ठाऊक नाही असे नाही. यामुळेच खरं तर त्याच्या नजरेतल्या ठहरावाची मर्यादा वाढत जाते. तो ताणत जातो त्याच्या परिपक्वतेचे पदर आणि अडकवून टाकतो तिला.

यामुळेच माझ्या नजरेतली ती- ती नाहीच असं मला आज सतत वाटतं. कारण ‘मी’ ‘मी’ नाही यावर मी ठाम आहे. माणूस असणं, सामाजिक दबाव आणि पूर्वग्रह झुगारून देऊन बंड करत भाषा, संस्कृती या सगळ्यांचं ‘अनइन्स्टॉलेशन’ करत जेव्हा मी पुन्हा मागे जाईन तेव्हा ‘मी’ ‘मी’ असेन आणि ‘ती’सुद्धा तिथे ‘ती’ असेल. जिथे केवळ शारीरिक फरक उरेल. तिच्या आणि माझ्या ठेवणीतला, बांध्यातला, अवयवांमधला तो आदिम फरकच केवळ असेल तिथे. आम्ही सुरू करू एकमेकांशी संवाद तिथे. मी म्हणेल मला असं असं वाटतंय. तिथे मला हे असं असं जाणवतंय. जे आहे जस्सं आहे ते तिथे आम्ही एकमेकांना पाहत राहू. तेव्हा लिहीन मी हा लेख.. माझ्या नजरेतून ती!.म्हणजे बघा ना पुन्हा हे रोमँटिक झालं. जुनंच झालं. पार सिमोनची भाषा पुन्हा आली. म्हणजे गाडा खूप मागेच रुतलाय. त्यात हल्ली रोमँटिक म्हणजे शिवीच झालीय पुन्हा. पण असं मनमोकळं, खरंखुरं काही घडवून आणायचं म्हणजे रोमँटिक व्हावंच लागतं, नाही का?

स्वप्निल शेळके swapnil.shelke20@gmail.com