आकर्षक रंगसंगती आणि दृश्यात्मक परिणामकारकता यामुळे आकर्षक वाटणाऱ्या ‘अँड्रॉइड लॉलिपॉप’ला उणेपुरे सहा महिने होण्याच्या आतच गुगलने ‘अँड्रॉइड एम’ ही नवीन कार्यप्रणाली जगासमोर मांडली आहे. अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये गेल्या आठवडय़ात झालेल्या परिषदेत गुगलने ‘अँड्रॉइड एम’चे सादरीकरण केले. ‘लॉलिपॉप’या प्रणालीतील त्रुटींतून धडा घेत ‘अँड्राइड एम’ ही अधिक यूजरफ्रेंडली आणि कार्यक्षम प्रणाली कशी असेल, यावर गुगलने भर दिल्याचे या प्रणालीची वैशिष्टय़े पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी जाणवते. अँड्रॉइड कार्यप्रणालीवरील ‘गुगल प्ले’मधून दररोज लाखोंच्या संख्येने डाऊनलोड आणि इन्स्टॉल होणाऱ्या अ‍ॅप्सवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने वापरकर्त्यांच्या गोपनीयतेलाच तिलांजली मिळत असल्याची टीका होत असताना नव्या कार्यप्रणालीतून या टीकेला उत्तर देण्याचा गुगलचा मनसुबा दिसतो. अ‍ॅप्सच्या परवानगी प्रक्रियेतील बदल, सुरक्षेसाठी ‘फिंगरप्रिंट’ तंत्रज्ञानाचा अवलंब, मोबाइल पेमेंटसाठीची सुरक्षित सुविधा, अधिक जलद ब्राऊजिंगचा अनुभव यांमुळे ‘अँड्रॉइड एम’ आधीच्या ऑपरेटिंग सिस्टीमपेक्षा वेगळी आणि उपयुक्त कार्यप्रणाली ठरू शकते. ही कार्यप्रणाली बाजारात येण्यासाठी या वर्षांच्या अखेरच्या महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे. मात्र, सॅनफ्रॅन्सिस्कोमधील परिषदेत गुगलने या कार्यप्रणालीचे सादरीकरण करताना मांडलेली वैशिष्टय़े आपल्याला पाहता येतील.
१. परवानगी प्रक्रिया पारदर्शक: आतापर्यंत ‘गुगल प्ले’वरील कोणतेही अ‍ॅप इन्स्टॉल होत असताना त्या अ‍ॅपला लागणाऱ्या फोनमधील प्रक्रियांसाठीच्या परवानग्या (अ‍ॅप परमिशन) विचारल्या जात होत्या. मात्र, वापरकर्त्यांना त्यांचे गांभीर्य समजत नसल्याने ती केवळ औपचारिकता म्हणून पाळली जात होती; परंतु आता प्रत्यक्ष अ‍ॅप वापरताना अशा परवानग्या विचारल्या जाणार आहेत. उदाहरणार्थ, व्हॉट्सअ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही ज्या वेळी या अ‍ॅपमधून एखादे ‘व्हॉइस रेकॉर्ड’ करत असाल, तेव्हा पहिल्यांदा यासंबंधीची परवानगी तुमच्याकडे मागितली जाईल. अशा प्रकारे, प्रत्येक प्रक्रियेसाठी स्वतंत्र परवानगी मागितली जाईल. यामुळे वापरकर्त्यांना आपल्याला हव्या त्याच ‘परमिशन’संबंधित अ‍ॅपला मान्य करता येतील.
२. ब्राऊजिंग जलद: आतापर्यंत कोणत्याही अ‍ॅपमधील एखादी ‘वेबलिंक’ क्लिक केली की, ‘क्रोम’चे अ‍ॅप ओपन होऊन त्याद्वारे वापरकर्त्यांना ब्राऊजिंग करता येत होते. मात्र, आता ‘क्रोम कस्टम टॅब’ची सुविधा ‘अँड्रॉइड एम’मध्ये पुरवण्यात आली असून ‘वेबसाइटची लिंक’ क्लिक करताच ‘क्रोम’ अ‍ॅप ओपन होण्याऐवजी केवळ एक ‘विंडो’ खुली होईल. यामुळे वेब ब्राऊजिंग जलद आणि कमी डेटा व मेमरी खाणारे होऊ शकेल.
३. ‘फिंगरप्रिंट’ची सुरक्षा: आपल्या मोबाइलची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी ‘फिंगर पिंट्र’ स्कॅनिंगसारखी दुसरी सुविधा नाही. आजवर ‘फिंगरप्रिंट’च्या नावाखाली अनेक बनावट अ‍ॅप गुगल प्लेवर झळकले आहेत. मात्र, आता ‘अँड्रॉइड एम’मध्ये प्रत्यक्षात तशी सुविधा कार्यान्वित होऊ शकेल. या सुविधेच्या मदतीने तुम्ही फोन ‘लॉक/अनलॉक’ करण्यासोबतच मोबाइलवरून शॉपिंग करू शकता. अर्थात यासाठी तुम्हाला ‘फिंगरप्रिंट’ हार्डवेअरची आवश्यकता भासेल.
४. मोबाइल पेमेंट सहज सोपे: अँड्रॉइडच्या माध्यमातून मोबाइल पेमेंटची सुविधा अधिक सहज, सोपी आणि सुरक्षित करण्यासाठी गुगलने ‘अँड्रॉइड पे’ ही सुविधा सुरू केली आहे. या सुविधेच्या माध्यमातून अ‍ॅप्सची खरेदी करण्यासोबतच अन्य शॉपिंग करण्याची सुविधाही वापरकर्त्यांना उपलब्ध होणार आहे.
५. स्मार्टफोनची पॉवर वाचणार: स्मार्टफोनचा वापर नसताना तो स्टँडबाय मोडमध्ये जातो. मात्र, ही व्यवस्था फारशी परिणामकारक नसल्याने गुगलने ‘अँड्रॉइड एम’मध्ये ‘डोझ’ नावाची नवीन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेअंतर्गत वापरात नसताना स्मार्टफोन चक्क ‘स्लीपिंग मोड’मध्ये जाऊन त्यातील बहुतांशी प्रक्रिया बंद राहतील. ठरावीक वेळेपेक्षा जास्त काळ स्मार्टफोनचा वापर न झाल्यास ही सुविधा आपोआप कार्यान्वित होते. या सुविधेमुळे मोबाइलची बॅटरी सध्यापेक्षा दुप्पट क्षमतेने कार्य करेल, असा गुगलचा दावा आहे.
६. ‘रॅम’चे व्यवस्थापन: आपल्या स्मार्टफोनची मेमरी कोणते अ‍ॅप्स जास्त वापरत आहे, याची वापरकर्त्यांना अचूक माहिती व्हावी, यासाठी गुगलने ‘अँड्रॉइड एम’मध्ये ‘रॅम मॅनेजर’ ही सुविधा पुरवली आहे. या सुविधेनुसार प्रत्येक अ‍ॅपच्या मेमरी वापराचा विस्तृत तपशील पुरवण्यात येईल. त्यानुसार जास्त मेमरी वापरणारे अ‍ॅप काढून टाकण्याची सोय वापरकर्त्यांना उपलब्ध होईल.
– आसिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com