स्मार्टफोनच्या बाजारात अनेक कंपन्यांमध्ये स्पर्धा असली तरी सर्वात मोठे युद्ध गुगलची अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम आणि अ‍ॅपलचे आयफोन यांच्यातच आहे. एकीकडे, दररोज वाढत असलेले आणि कोणाशीही संबंध न ठेवता ऐटदारपणे वाटचाल करणारा आयफोन यांच्यात सातत्याने स्पर्धा चाललेली असते. तसे पाहता या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिममध्ये अनेक फरक आहेत. एकीकडे, अँड्रॉइड हे ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे, तर दुसरीकडे आयफोनवर ‘अ‍ॅपल’ला हवे असेल तेच वापरकर्त्यांना मिळेल. अँड्रॉइड फोनच्या सुरक्षिततेबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित होत असतात, तर दुसरीकडे आयफोन आपल्या मालकाची प्रत्येक माहिती गोपनीय ठेवतो. अशा अनेक फरकांमुळे अँड्रॉइड आणि आयफोन स्वतंत्रपणे स्मार्टफोन बाजारात अधिराज्य गाजवत आहेत. मात्र अँड्रॉइड की आयफोन, असा प्रश्न ग्राहकाला नेहमीच सतावत असतो. अनेकदा अँड्रॉइड वापरणाऱ्यांना आयफोनचा हेवाही वाटत असतो. पण तुमच्या अँड्रॉइड फोनवर असेही काही अ‍ॅप्स आहेत जे तुमच्या स्मार्टफोनला आयफोनपेक्षाही स्मार्ट बनवू शकतात. अशाच काही अँड्रॉइड अ‍ॅप्सविषयी:

म्युझिई  (Muzei)
tech02
   म्युझिई हा म्युझियम किंवा संग्रहालय या शब्दाचे रशियाई भाषांतर आहे. जगभरातील ख्यातनाम चित्रे तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर आणून देणारे हे लाइव्ह वॉलपेपर अ‍ॅप आहे. या अ‍ॅपमुळे तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर दररोज नवनवीन लाइव्ह वॉलपेपर पाहायला मिळतील. विशेष म्हणजे, हे वॉलपेपर बॅकग्राऊंडलाही काम करतात. त्यामुळे तुम्ही मेन्यू किंवा आयकॉन्स स्क्रोल करत असता, तेव्हा अतिशय पारदर्शीपणे हे वॉलपेपर तुमच्या स्क्रीनवर दिसते. शिवाय या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही तुमच्या गॅलरीतील फोटोही ‘लाइव्ह वॉलपेपर’ म्हणून ठेवू शकतात. तुमच्या निवडीनुसार हे फोटो ठरावीक तासांनी अथवा दिवसांनी आपोआप बदलले जातात. म्युझिई हे पूर्णपणे मोफत अ‍ॅप आहे.

हॉवरचॅट (HoverChat)
tech03स्मार्टफोनवरील मल्टिटास्किंग ही सध्याची सर्वात मोठी गरज बनली आहे. विशेषत: एखादा गेम खेळताना आलेले मेसेज पाहण्यासाठी तुम्हाला गेममधून एक्झिट करावे लागते किंवा मेसेज नंतर वाचावा लागतो. ‘हॉवरचॅट’ ही कमतरता बऱ्याच अंशी पूर्ण करते. ‘हॉवरचॅट’च्या साह्य़ाने संदेशाची देवाणघेवाण करणे अतिशय सहज होते. ‘हॉवरचॅट’चा उपयोग केवळ मोबाइलवर येणाऱ्या मेसेजेससाठीच होतो. मात्र, तुम्ही वेबब्राऊजिंग करत असाल किंवा एखादा व्हिडीओ पाहात असाल तरी, त्यात कोणताही खंड पडू न देता तुम्हाला तुमच्या मोबाइलवर आलेला एसएमएस वाचणे सहज शक्य होते. विशेष म्हणजे, हॉवरचॅटच्या पॉपअप स्क्रीनचा आकार आपल्या मर्जीनुसार कमी-जास्त करता येतो. शिवाय तो पारदर्शीही करता येतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हॉवरचॅट तुमचे एसएमएस गुप्त ठेवतो. सध्या अनेक अ‍ॅप्लिकेशन्स वापरकर्त्यांचे एसएमएस चोरून आपल्या सव्‍‌र्हरला पाठवतात, असे उघड झाले आहे. या पाश्र्वभूमीवर ही गोपनीयता उपयुक्त ठरते.

गुगल कीप  (Google Keep)
tech04प्रत्येक स्मार्टफोनमध्ये वा साध्या फोनमध्येही ‘मेमो’ नावाचे एक अ‍ॅप्लिकेशन असते. येणाऱ्या दिवसांतील महत्त्वाच्या अपॉइंटमेण्ट्स, कार्यक्रम, कामे यांची आठवण राहण्यासाठी त्याची नोंद या ‘मेमो’मध्ये करता येते. एकप्रकारे ती आपली डिजिटल ‘डायरी’च असते. पण ‘मेमो’ला काही मर्यादा आहेत. ‘गुगल कीप’ या सर्व मर्यादांवर मात करणारे अ‍ॅप आहे. या अ‍ॅप्लिकेशनमध्ये तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या नोंदी किंवा अचानक सुचलेली कल्पना नंतर पाहण्यासाठी नोदवून ठेवू शकता. रस्त्यावरून जाताना एखादे पोस्टर वा एखादा महत्त्वाचा फोननंबर दिसला की तो ‘कीप’मध्ये टिपून ठेवता येतो. अगदी एखादे ‘व्हॉइस रेकॉर्डिग’ही या अ‍ॅपमध्ये साठवून ठेवता येते. विशेष म्हणजे, आपण नोंदवलेल्या सर्व गोष्टी एकाच वेळी या अ‍ॅपवरून दिसतात. त्यांना विशिष्ट ‘कलरकोड’ देण्याची सुविधाही या अ‍ॅपमध्ये आहे. त्यामुळे एका क्लिकवर तुम्हाला अपेक्षित माहिती मिळवता येते.

tech05कव्हर लॉक स्क्रीन
(Cover Lock Screen)
फक्त अँड्रॉइडवर उपलब्ध असलेले हे अ‍ॅप हा आणखी एक चमत्कार आहे. हे अ‍ॅप्लिकेशन आपल्याला हव्या त्या वेळी हवे ते अ‍ॅप्लिकेशन लॉकस्क्रीनवरच उपलब्ध करून देते. म्हणजे, तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर ‘ई-मेल, ऑफिस, कॅलेंडर’ असे अ‍ॅप्लिकेशन्स तुम्हाला चटकन डिस्प्लेवर मिळतात. तर प्रवासात असताना ‘मॅप्स, जीपीएस, गेम्स’ असे अ‍ॅप आपल्याला ‘लॉक स्क्रीन’वर दिसतात. त्यामुळे प्रत्येक वेळी एखाद्या अ‍ॅप्लिकेशनसाठी तुम्हाला मेन्यूमध्ये जाऊन शोधाशोध करावी लागत नाही. हे सगळे ‘कव्हर’ केवळ तुमच्या जीपीएस लोकेशनच्या आधारे तुम्ही कोठे आहात, यावरून ठरवते. सध्या हे अ‍ॅप काही ठरावीक स्मार्टफोन्सवरच उपलब्ध आहे.