तरुण ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक कंपन्यांनी समाजमाध्यमांचा वापर करण्यास कधीच सुरुवात केली आहे. विविध निमित्ताने तर ब्रँड्स या माध्यमांचा पुरेपूर वापर करून घेत असतात. सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकातील सामन्यांच्या वेळा आणि कार्यालयीन वेळा यात साम्य असल्यामुळे क्रिकेटप्रेमींची होणारी अडचण या ब्रँड्सच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे. क्रिकेट सामन्यातील महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तसेच धावांची माहिती मिळवण्यासाठी क्रिकेटप्रेमी सध्या समाजमाध्यमांचा मोठा वापर करत आहेत. हेच जाणून कंपन्यांनी त्यांना टॅग करून ट्विपण्णी करणाऱ्यांसाठी किंवा सामन्यांबाबत ठोकताळे बांधणाऱ्यांसाठी विशेष सवलती किंवा बक्षिसे देऊ केली आहेत.
ट्विटर या समाजमाध्यमाने क्रिकेट विश्वचषकाची धूम सुरू झाल्यापासून केलेल्या सर्वेक्षणात अनेक आश्चर्यकारक बाबी समोर आल्या आहेत. पहिल्याच आठवडय़ात पार पडलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात सामन्याच्या काही वेळ आधीपासून ते सामना संपेपर्यंत तब्बल अकरा कोटी ऐंशी लाख ट्वीट्स आले. या दिवशी नाईकी हा ब्रँड आघाडीवर होता.  म्हणजे या ब्रँड्सतर्फे करण्यात आलेल्या ट्वीट्सना सर्वाधिक रिट्वीट करण्यात आले. त्याखालोखाल स्टार स्पोर्ट्स होते, तर त्यानंतर किटकॅट, क्लब महिंद्रा आणि अ‍ॅक्सिस बँक या ब्रॅड्सचा पहिल्या पाचमध्ये समावेश होता. या ब्रँड्सतर्फे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी प्रलोभने ठेवण्यात आली होती.  पहिल्या आठवडय़ात नाईकीच सर्वात आघाडीवर होते, कारण क्रीडा उत्पादने बनविणाऱ्या आणि भारतीय क्रिकेट संघाचे टी-शर्ट पुरविणाऱ्या या ब्रँडने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक हॅश टॅग तयार केला होता. त्याच्या माध्यमातून क्रिकेटप्रेमींच्या गोष्टी याचबरोबर सेलिब्रिटींच्या काही क्रिकेटविश्वातील आठवणी शेअर केल्या जात होत्या. याचबरोबर त्यांनी क्रीडापटूंचे वैयक्तिक टी-शर्टही या माध्यमातून विकले.  क्रिकेट सामन्यांचे अधिकृत प्रक्षेपण करणारी वाहिनी स्टार स्पोर्ट्सनेही काही स्पर्धा ठेवल्या होत्या. त्यांच्या स्पध्रेत विजयी ठरणाऱ्याला भारतीय संघाची जर्सी भेट मिळणार होती. अशा प्रकारची प्रलोभने इतरही ब्रँड्सनी केली होती. दर आठवडय़ाला पहिल्या पाच क्रमांकांसाठी ब्रँड्सची चढाओढ सुरू असायची.  ट्विटरच्या माध्यमातून विपणन करणाऱ्या ब्रॅण्ड्समध्ये वित्तीय ब्रॅड्समध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याचबरोबर ऑटोमोबाइल कंपनीनेही आपल्या अल्टो ८००ची जाहिरात क्रिकेट विश्वचषकाच्या निमित्ताने केली आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या सामन्यामध्ये साडेसात अब्ज ट्वीट्स आले. या दिवशी अल्टो या ब्रँडने दुसरा क्रमांक मिळवला होता. या ब्रँडतर्फे प्रथमच गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी आणि प्रथमच अल्टो खरेदी करणाऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स देऊन दिवसभर खिळवून ठेवले होते. याचबरोबर यानिमित्ताने काही बक्षिसांचेही त्यांनी वाटप केले.
याशिवाय पेप्सी, लेज यांसारख्या कंपन्यांनीही आपल्या विपणनासाठी यंदा समाजमाध्यमांचा वापर केला. संपूर्ण विश्वचषकात समाजमाध्यमांचा वापर करून विपणन करणाऱ्या विविध क्षेत्रांतील १४ ब्रँड्स प्रामुख्याने झळकत होते. या माध्यमांचा वापर करून कंपन्यांना त्यांचा समाजातील प्रभाव आलेख तपासणे सोपे जाते. विश्वचषकाच्या कालावधीत बहुतांश लोक समाजमाध्यमांचा वापर करतात. यामुळे या कालावधीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणे सोपे जाते म्हणून कंपन्यांनी या पर्यायाचा निवड केल्याचे समाजमाध्यम विश्लेषण कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

समाजमाध्यमांतील पसंती
ब्रँड्सना समाजमाध्यमांवर कशा प्रकारे प्रसिद्धी मिळते हे जाणून घेण्यासाठी ब्रँड्सला आलेले मेंशन्स आणि त्याला मिळालेले नेट सेंटिमेंट्स याचा विचार केला जातो. मेंशन्स म्हणजे कुणीही समाजमाध्यमांवर व्यक्त होत असताना त्यासंबंधित ब्रँडचा उल्लेख करून आपली भावना मांडली आहे. याचबरोबर त्या ब्रँडविषयी ते किती आपुलकीने बोलतात किंवा किती वाईट बोलतात याची वजाबाकी करून हे नेट सेंटिमेंट्समध्ये गणले जाते. यावरून त्या ब्रँडचे समाजमाध्यमांवरील गुणांकन काढले जाते. उदाहरणार्थ १३ मार्चच्या आसपास पेप्सिको या ब्रँडला ३३ हजार २४ मेंशन्स आले आहेत व नेटसेंटिमेंट्स १८ टक्के आहे. म्हणजे या ब्रँडचे समाजमाध्यमांवरील गुणांकन ५९, ४४, ३२ इतके होते. या संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये नाईकी हा सोशल स्टार म्हणून दिसून येत आहे, कारण या हंगामात या ब्रँडचा सर्वाधिक उल्लेख म्हणजेच मेंशन्स असून सेंटिमेंट्सच्या बाबतीतही ब्रँड आघाडीवर आहे. इतर ब्रँड्सपैकी अनेक ब्रँड्सबाबत लोकांनी उल्लेख केला आहे. मात्र त्यांना सोशल सेंटिमेंट्स फार चांगले मिळत नसल्यामुळे ते मागे राहत आहेत. या बाबी डिजिटल विश्लेषण कंपनी टू द न्यू डिजिटलने सादर केलेल्या अहवालात स्पष्ट होत आहे.

अर्थकारण
समाजमाध्यमांतील वावरामुळे  स्टार स्पोर्ट्ससारख्या कंपन्यांना खास डिजिटल मीडियासाठी जाहिरातीही मिळू लागल्या आहेत. यंदा कंपनीच्या समाजमाध्यमातील वावरामुळे लुफ्तांजा, अ‍ॅक्सेंच्युअर, कारट्रेड, टिस्टो आणि हिरोसारख्या ब्रँड्सच्या जाहिराती मिळाल्या आहेत. याशिवाय एकूण ऑनलाइन माध्यमावर कंपनीला ३५ ते ४८ ब्रँड्सच्या जाहिराती मिळाल्या आहेत. यापैकी २० टक्के जाहिराती या केवळ डिजिटल माध्यमासाठीच असल्याचेही कंपनीच्या सूत्रांकडून समजते. यामुळे डिजिटल माध्यमांतील उत्पादनातही वाढ झाल्याचे कंपनीच्या सूत्रांनी स्पष्ट केले. या विश्वचषक स्पध्रेत कंपन्यांनी सुरू केलेल्या समाजमाध्यमांतील ब्रँडिंग्जमुळे या माध्यमातील आर्थिक उलाढाल तब्बल ४० ते ४५ टक्क्यांनी वाढल्याचे समाजमाध्यम विश्लेषण कंपन्यांचे म्हणणे आहे. याचबरोबर यापूर्वी कंपन्या डिजिटल माध्यमांद्वारे विपणन करण्यासाठी दोन ते तीन टक्क्यांची तरतूद करत असे. ही तरतूद यंदा १२ ते १५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचा अंदाजही विश्लेषण कंपन्यांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.
– नीरज पंडित