इंटरनेटवरच्या गुन्ह्यांच्या म्हणजेच सायबर गुन्हेगारी आणि सायबर दहशतवादामध्ये सातत्याने वाढ होत आहे. हे सायबर गुन्हेगार नेमके काय करतात, त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचा आपल्याला कसा फटका बसतो याबाबत माहिती करून घेऊ या. याचबरोबर या गुन्ह्यांपासून सावध राहण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करता येऊ शकतील हेही जाणून घेऊ या.
सायबर गुन्हेगारीचा फटका अगदी सामान्य माणसापासून ते एखाद्या देशाच्या मोठय़ा बँकेलाही बसू शकतो. निष्पाप माणसे या प्रकाराला सतत बळी पडतात. या प्रकारात इंटरनेटवरचे भामटे लोकांना भुलवणारा ई-मेल पाठवतात. उदाहरणार्थ त्या ई-मेलमध्ये ‘तुमच्या इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड एका हल्लेखोराने मिळवला आहे. त्यामुळे निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी लगेच तुमचा पासवर्ड बदला..’ असे लिहिलेले असते. त्यासाठी या ई-मेलमध्ये एक ‘िलक’ दिलेली असते. त्या िलकवर आपल्या संगणकाचा माऊस नेऊन त्यावर क्लिक केले की आपल्यासमोर आपल्या बँकेची वेबसाइट उघडली जाते, असे आपल्याला वाटते. खरे म्हणजे ही आपल्या बँकेची वेबसाइट नसतेच मुळी. ती तर त्या भामटय़ाने तयार केलेली स्वत:ची वेबसाइट असते. पण ती हुबेहूब आपल्या बँकेच्या वेबसाइटसारखी दिसत असल्यामुळे आपल्याला ती आपल्या बँकेचीच वाटते! तिथे ‘तुमचा पासवर्ड बदलण्यासाठी सध्याचा पासवर्ड भरा’ वगरे गोष्टी लिहिलेल्या असतात. आपण ही माहिती भरतो आणि आपल्याला जो नवीन, बदललेला पासवर्ड हवा आहे तोही तिथे टाइप करतो. मग ‘पासवर्ड बदलल्यामुळे आता सगळे ठीकठाक आहे, असे आपल्याला आपल्या संगणकाच्या पडद्यावर दिसते आणि आपल्याला हायसे वाटते. भामटय़ाने हा ई-मेल आपल्याला स्वत:च आपल्या बँकेच्या नावाने पाठवलेला असतो. त्यातही त्याने माहिती अशा प्रकारे लिहिलेली असते की आपला त्यावर चटकन विश्वास बसावा. तसेच हा ई-मेल त्याने अगदी आपल्या बँकेचा वाटेल अशा ई-मेल आयडीवरून पाठवलेला असतो. त्यामुळे तो खरेच आपल्या बँकेकडून आलेला आहे, असे आपल्याला वाटते. तसेच त्या ई-मेलमध्ये त्या भामटय़ाने दिलेली ‘लिंक’ आपल्याला आपल्या बँकेच्या वेबसाइटवर घेऊन जाते असे आपल्याला वाटत असले तरीही ती प्रत्यक्षात मात्र आपल्याला त्या भामटय़ाच्या बोगस वेबसाइटकडे नेत असते. मग तिथे आपण आपल्या बँकेचा युजर आयडी आणि पासवर्ड टाइप केला की तो त्या भामटय़ाच्या हाती लागतो! मग तो भामटा ही माहिती वापरून स्वत: आपल्या बँकेच्या वेबसाइटवर जातो आणि तिथे आपल्याकडून मिळवलेला आपला खरा युजर आयडी आणि पासवर्ड वापरून आपल्या खात्यातले सगळे पसे स्वत:च्या खात्यात वळवतो.
दुसरा प्रकार सायबर दहशतवादाचा असतो. यात एखाद्या माणसाचे नुकसान करण्याऐवजी मोठमोठय़ा वेबसाइट्स हॅक करणे, अतिरेक्यांनी आपले घातपाताचे संदेश गुप्तपणे इंटरनेटचा वापर करून एकमेकांना पाठवणे असे प्रकार केले जातात. सध्याच्या जगात कॉम्प्युटर्स तसेच इंटरनेट या तंत्रज्ञानावर जगभरातले अनेक व्यवहार अवलंबून असल्यामुळे या तंत्रज्ञानावर केलेले हल्ले खूपच धोकादायक ठरू शकतात. उदा. मोठय़ा बँकांना प्रचंड नुकसान पोहोचवण्यातही अतिरेक्यांना अधूनमधून यश येत असते. अनेक देशांच्या किंवा अधिकृत पातळीवरच्या वेबसाइट्सवर अपमानास्पद मजकूर टाकण्याचे प्रकारही घडत असतात. आपल्या देशात अजूनही सायबर गुन्हेगारी किंवा सायबर दहशतवाद यांना नेहमीच्या जगातली गुन्हेगारी तसेच दहशतवाद यांच्याइतके महत्त्व दिले जात नाही ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे.
सर्वसामान्यांनीसुद्धा इंटरनेट वापरतानाचे धोके लक्षात घेऊन आपण या सायबर हल्ल्यांना बळी पडणार नाही यासाठीची काळजी घेतली पाहिजे.
सायबर गुन्हेगारी आणि सायबर दहशतवाद या गोष्टी थांबवणे शक्य नसले तरी त्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी सगळ्यांनीच एकत्रितरीत्या प्रयत्न करणे गरजेचे आहे हे नक्की!
-तरुण वर्गात चॅट करणे खूप वाढले आहे. सायबरचोर तुमच्याशी दोस्ती वाढवून तुमचा पासवर्ड व इतर खाजगी माहिती मिळवू शकतात. तुम्ही चॅटवर टाइप केलेला कुठलाही मजकूर त्या वेळी इंटरनेटवर असणाऱ्या सर्व प्रयत्नशील व्यक्तीना कळू शकतो. म्हणूनच कॉम्प्युटर सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही महत्त्वाची माहिती चॅट करताना टाइप करू नका. उदाहरणार्थ- क्रेडिट कार्ड नंबर, पॅन, तुमची जन्मतारीख इत्यादी. तुम्ही जर चॅट करताना मायक्रोफोन व वेब कॅमेरा वापरत असाल तर त्यामार्फत तुम्हाला नकळत तुमच्या हालचाली, फोनवरची बातचीत, तुम्ही की बोर्डवरची कुठली बटने दाबलीत हे सायबरचोर थोडय़ा प्रयत्नांती समजू शकतो व त्या माहितीचा उपयोग करून तुमचा पासवर्ड पण चोरला जाऊ शकतो. यावर सोपा उपाय म्हणून मायक्रोफोन व वेब कॅमेरा काम झाल्यावर बंद करा किंवा झाकून ठेवा.
-आजकाल संगणक वायरसपेक्षा स्पायवेअरचा धोका खूप वाढला आहे. काही ई-मेल उघडल्यावर लगेचच तुमच्या संगणकामध्ये स्पायवेअर शिरू शकते. विविध प्रकारांनी स्पायवेअर तुमच्या नकळत तुमच्या संगणकामध्ये शिरते आणि त्यातील माहिती चोरण्याचे काम सुरू करते. तुमची खाजगी माहिती, काय पासवर्ड टाइप केले, कुठले प्रोग्रॅम वापरले, कुठल्या वेबसाईटना भेटी दिल्या ही माहिती स्पायवेअरच्या साह्याने सायबरचोरांच्या हाती लागू शकते. काही प्रकारचे स्पायवेअर तर भयंकर धोकादायक संगणक प्रोग्रॅम तुमच्या संगणकामध्ये कायमस्वरूपी टाकू शकतात. त्याने तुमचा कॉम्प्युटरचा स्पीड कमी होऊ शकतो तर कधी कधी तुमच्या कॉम्प्युटरचा पूर्ण ताबा पण जाऊ शकतो. काही स्पायवेअर हे इतक्या खुबीने स्वतला लपवतात की त्यांना शोधणे व काढणे मुश्कील होऊन बसते.
(लेखक बंगळुरूच्या विश्वेश्वरैय्या तंत्रज्ञान विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक आहेत.)

सायबर गुन्हेगारी आणि सायबर दहशतवादवर उपाय
आपण संगणक वापरताना थोडी काळजी घेतली तर ह्या सायबरचोरांवर मात करणे अजिबात अवघड नाही.
* आर्थिक व्यवहार सायबर कॅफेमधून किंवा दुसऱ्याच्या संगणकावरून करू नका.
* अनोळखी संकेतस्थळांना भेटी देण्याचे टाळा.
* चॅट करताना कुठलीही महत्त्वाची माहिती टाइप करू नका. वेब कॅमेरा काम झाल्यावर बंद करा किंवा झाकून ठेवा.
* संगणक वापरताना जागरूक राहा. अनोळखी व अनावश्यक गेम्स व प्रोग्रॅम लोड करू नका.
* स्पायवेअर व वायरस यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तुमच्या कॉम्प्युटरमध्ये चांगला अँटी व्हायरस आणि अँटी स्पायवेअर प्रोग्रॅम बसवून घ्या.
* दर दोन किंवा तीन दिवसांनी संगणकाच्या वापरामुळे जमा झालेली तात्पुरती डाउनलोडेड माहिती व जुनी वेब पेजेस कायमस्वरूपी काढून टाकत चला.
* पासवर्ड असे ठेवा की जे सहज ओळखायला कठीण राहतील.