व्हॉट्सअ‍ॅप, स्नॅपचॅट यांसारख्या मोबाइल सोशल मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशनच्या वाढत्या लोकप्रियतेने सोशल नेटवर्किंगमध्ये ‘बाप’ असलेल्या फेसबुकसमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या अ‍ॅप्सशी स्पर्धा करण्यासाठी फेसबुकने वारंवार प्रयत्न केले आहेत. फेसबुकचे मेसेंजर अ‍ॅप यात अपयशी ठरल्यानंतर आता फेसबुकने ‘स्लिंगशॉट’च्या माध्यमातून नवीन ‘पिल्लू’ बाजारात सोडले आहे. स्नॅपचॅटशी साधम्र्य असलेले हे अ‍ॅप रंजक आहे; पण फेसबुकनेच त्याभोवती अटींच्या भिंती उभ्या केल्या आहेत.
व्हॉट्सअ‍ॅप, चॅटऑन, स्नॅपचॅट, स्काइप अशा सोशल चॅट/मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन्सचा सध्या बोलबाला आहे. आजच्या धकाधकीच्या जमान्यात कॉम्प्युटरवरील इंटरनेटपेक्षाही मोबाइलवरील इंटरनेटचा वापर वाढत चालला आहे. या पाश्र्वभूमीवर खास मोबाइल प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या अ‍ॅप्लिकेशन्सनी फेसबुक, ट्विटर यांना तगडे आव्हान दिले आहे. फेसबुक वा ट्विटर यांनी काळानुरूप मोबाइल अवतार धारण केला असला तरी व्हॉट्सअ‍ॅप किंवा तत्सम अ‍ॅप्सची सर त्यांना आलेली नाही. पटकन मेसेज पाठवून झटकन कॉमेंट मिळवून देणाऱ्या आणि २४ तास ऑनलाइन राहूनही कमी डेटा वापरणाऱ्या अ‍ॅप्सपुढे सोशल नेटवर्किंगमध्ये ‘बाप’ म्हणवले जाणारे फेसबुक, ट्विटर मागे पडत आहेत. म्हणूनच या कंपन्यांकडून मोबाइल प्लॅटफॉर्मवर काही तरी नवीन देण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात. फेसबुकने अलीकडेच बाजारात दाखल केलेले ‘स्लिंगशॉट’ असाच एक प्रयत्न आहे. आपले फोटो किंवा व्हिडीओ एकाच वेळी असंख्य मित्रांशी शेअर (किंवा या अ‍ॅपच्या भाषेत स्लिंग) करू देणारे हे अ‍ॅप्लिकेशन म्हणजे ‘स्नॅपचॅट’ची नक्कल आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, मात्र कोणी तरी आपल्याशी ‘स्लिंग’ केलेला फोटो किंवा व्हिडीओ पाहण्यासाठी आपण त्या व्यक्तीला एखादा फोटो किंवा व्हिडीओ स्लिंग करण्याची सक्ती ‘स्लिंगशॉट’ करते. ज्या काळात सोशल मीडिया सर्व प्रकारच्या भौगोलिक, राजकीय, भाषिक मर्यादा ओलांडून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे, त्या काळात आपल्याच मित्रांनी शेअर केलेले पाहण्यासाठी करावी लागणारी ही माथेफोड ‘डोक्याला शॉट’ वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘स्लिंगशॉट’ आहे तरी काय?
फोटो, व्हिडीओ शेअर करण्यासाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ‘स्नॅपचॅट’च्या यशाने दिपून गेलेल्या फेसबुकने एके काळी ३ अब्ज डॉलर मोजून ही कंपनी खरेदी करण्याची तयारी दाखवली होती, मात्र ती बोलणी फसली. फेसबुकने व्हॉट्सअ‍ॅपही खरेदी केले. त्यानंतर ‘स्नॅपचॅट’च्याच धर्तीवर फेसबुकने ‘पोक’ची निर्मिती केली. तो प्रयत्नही अपयशी ठरला. या पाश्र्वभूमीवर फेसबुकच्या क्रिएटिव्ह लॅबमधील तंत्रज्ञांनी ‘स्लिंगशॉट’ला जन्म दिला. अँड्राइड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमवर हे अ‍ॅप मोफत उपलब्ध आहेत.
स्लिंगशॉट डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही तुमचा मोबाइल नंबर किंवा फेसबुकच्या यूजर आयडीच्या साह्य़ाने अ‍ॅप्लिकेशन ओपन करू शकता. त्यानंतर तुमच्या फोनबुक किंवा फेसबुकमधील सर्व कॉन्टॅक्ट्स स्लिंगशॉटमध्ये समाविष्ट होतात. अ‍ॅप्लिकेशन ओपन होताच तुम्ही कॅमेरा मोडमध्ये जाता. तेथे शूट आणि सेल्फ ही दोन बटणे दिसतात. याद्वारे तुम्ही एखादा फोटो काढून तुमच्या मित्रमंडळींशी थेट स्लिंग करू शकता.
आहे मनोहर तरीही..
‘स्लिंगशॉट’ची वैशिष्टय़े पाहिली तर त्याबद्दल आकर्षण वाटते, पण या अ‍ॅपमधील काही गोष्टी हे आकर्षण पुसट करतात. सर्वप्रथम म्हणजे, अँड्रॉइड ४.१ किंवा त्याहून प्रगत ऑपरेटिंग सिस्टमवर हे अ‍ॅप चालू शकते. म्हणजे, तुमचा फोन आयस्क्रीम सँडविच किंवा त्याखालचा असेल तर तुमच्यासाठी स्लिंगशॉट काही कामाचे नाही. दुसरी वाईट बाजू म्हणजे, प्रत्येक वेळी तुम्हाला कोणा मित्राने एखादा फोटो वा व्हिडीओ स्लिंग केला तर तुम्हाला तो मेसेज ओपन करण्यासाठी त्या मित्राला काही तरी फोटो वा व्हिडीओ स्लिंग करावा लागतो. म्हणजेच, जर तुम्ही तसे करू शकला नाहीत, तर तुम्हाला त्या मित्राचा मेसेज पाहताही येणार नाही. ही जरा जाचक अट आहे. ‘वापरकर्त्यांनी केवळ दुसऱ्याचे अनुभव पाहण्याऐवजी स्वत:चे अनुभवही शेअर केले पाहिजे’ असा यामागचा हेतू असल्याचे फेसबुकचे म्हणणे आहे, पण प्रत्येक वेळी अशी देवाणघेवाण केवळ गैरसोयीचीच नव्हे तर डोकेदुखीचीही ठरू शकते.

अ‍ॅपची वैशिष्टय़े
* एकाच वेळी अनेक फोटो, व्हिडीओ अनेकांशी शेअर करण्याची मुभा.
* फोटोवर ड्रॉइंग करून तो एडिट करण्याची सुविधा.
* फोटो किंवा व्हिडीओ कॅप्शनसाठी आकर्षक सुविधा.
* स्लिंग’ केलेले फोटो एकदा पाहिल्यानंतर डिलीट होत असल्याने मेमरीतील जागा वाढण्याचा धोका नाही.