होय, ऑनलाईन बाजारातील बलाढ्य ‘फ्लिपकार्ट’ संकेतस्थळावर सध्या चीनच्या ‘झीओमी’ मोबाईल कंपनीच्या ‘झीओमी एमआय३’ या स्मार्टफोनने धुमाकूळ घातला आहे. मागील आठवड्यात भारतीय बाजारपेठेत दाखल झालेल्या या स्मार्टफोनच्या २०,००० प्रती ऑनलाईन बाजारात विकल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे, मंगळवारी दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास ‘फ्लिपकार्ट’ संकेतस्थळावर हा स्मार्टफोन दाखल होताच पुढील अवघ्या पाच सेकंदात साठा संपला. फ्लिपकार्ट जवळील या मोबाईलच्या सर्वप्रती अवघ्या पाच सेकंदात विकल्या गेल्या. इतकेच नाही, तर तब्बल २,५०,००० ग्राहक फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर एकाचवेळी हा स्मार्टफोन खरेदी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले आहे.
‘झीओमी’या चीन बनावटीच्या मोबाईल कंपनीचे भारतातील मुख्यालय बंगळुरूमध्ये आहे. ‘झीओमी’ या मोबाईल कंपनीची चीनमधील ‘अॅपल’ मोबाईल अशी बाजारपेठेत ओळख आहे. कंपनीच्या भारतातील उपाध्यक्ष हुगो बारा म्हणाले की, भारतात झीओमीला मिळालेल्या प्रतिसादावर आम्ही भरपूर खूश आहोत. या मोबाईलचे उत्पादन भागीदार आणि स्थानिक विक्रेत्यांशी समन्वय साधून मोबाईल बाजारपेठेत सोयीस्कररित्या उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. असेही ते म्हणाले.

* ‘झीओमी एमआय ३’ची खास वैशिष्ट्ये-
१. पाच इंचाची स्क्रिन
२. दोन जीबी रॅम, १६/६४ जीबी इंटरनल मेमरी
३. १३ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, २ मेगापिक्सल द्वितीय कॅमरा
४. अँड्राईड ४.३ (जेलीबीन) 
५. किंमत- १३,९९९ रु.