संगणक आणि लॅपटॉपमध्ये विंडोजची आठवी आवृत्ती येऊ लागली आता लवकरच दहावी आवृत्तीही येईल. सुरुवातीला मोफत वारता येणारे अनेक सॉफ्टवेअर्स आता अधिकृतपणे विकत घ्यावे लागणार आहेत. यामुळे कदाचित संगणक वापरण्याचा खर्चही वाढू शकतो. या प्रस्थापित सॉफ्टवेअर्सना ओपन सोर्सचा आग्रह धारणाऱ्यांनी अनेक पर्याय शोधून काढले आहेत. यामुळे प्रस्थापितपणेच काम करणारे अनेक सॉफ्टवेअर्स बाजारात उपलब्ध झाले आहेत. पायरेटेड सॉफ्टवेअर्स घेण्यापेक्षा हे मोफत सॉफ्टवेअर अधिकृतपणे वापरणे केव्हाही योग्य ठरू शकते. पाहुयात हे मोफत सॉफ्टवेअर्स कोणते आहेत.

अपाचे ओपन ऑफिस
मायक्रोसॉफ्ट ऑफिसला पर्याय ठरेल असे हे सॉफ्टवेअर आहे. openoffice.org <https://www.openoffice.org/>या संकेतस्थळावरून हे सॉफ्टवेअर तुम्हाला मोफत उपलब्ध होऊ शकते. यामध्ये वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशिट्स, प्रेझेंटेशन्स, ग्राफिकस, फॉम्र्युला एडिटर आणि डेटाबेस व्यवस्थापनासारखे अनेक पर्याय उपलब्ध होतात. मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसमध्ये उपलब्ध असलेले बहुतांश पर्याय यातही उपलब्ध आहेत. तसेच वापरण्याची पद्धती शॉर्ट कीज त्याचप्रमाणे आहेत. यामुळे हे सॉफ्टवेअर वापरण्यासाठीही अगदी सोपे आहे.

फायफॉक्स
इंटरनेट एक्स्प्लोररला पर्याय म्हणून फायरफॉक्स ब्राऊझरच्या पर्यायांचा विचार केला जातो. जगभरातील सुमारे ३० टक्के इंटरनेट वापरकर्ते या ब्राऊझरचा वापर करतात. तसा इंटरनेट एक्स्प्लोररला पर्याय म्हणून गुगल क्रोमही आहे. मात्र क्रोम वापरताना अनेकदा संगणक स्लो होतो. क्रोममध्ये अनावश्यक टेंप फाइल्स निर्माण होतात आणि त्याचा परिणाम संगणकाच्या वेगावर होतो. फायरफॉक्समध्ये पॉपअप थांबविण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. यामुळे आपल्याला अनावश्यक असलेले पॉपअप आपण थांबवू शकतो. प्रस्थापित एक्स्प्लोररला धक्का देऊन सर्वाना उपलब्ध होईल, असा ब्राऊझर निर्माण करण्याच्या उद्देशाने काही तरुण एकत्र आले आणि त्यांनी मॉझिला या संस्थेची स्थापना करून फारफॉक्सची निर्मिती केली. आता या कंपनीने अनेक मोफत सॉफ्टवेअर्स आणि मोबाइल ऑपरेटिंग प्रणाली विकसित केली आहे. लोकांनी दिलेल्या देणग्यांमध्ये कंपनीचे काम चालते तसेच अनेक तंत्रस्वयंसेवकांच्या माध्यमातून सॉफ्टवेअर्स विकसित केले जाते. यामुळेच हे सर्व सॉफ्टवेअर्स मोफत उपलब्ध करून देणे कंपनीला शक्य होते. हे ब्राऊझर mozilla.org/firefox <https://www.mozilla.org/firefox/&gt; या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

थंडरबर्ड
मायक्रोसॉफ्ट आऊटलूक किंवा युडोरा सारख्या ई-मेल ब्राऊझिंग सुविधांना पर्याय म्हणून मॉझिला या कंपनीने थंडरबर्डची निर्मिती केली आहे. यामध्ये इतर सर्व ई-मेल ब्राऊझर्सप्रमाणेच याचेही ब्राऊझिंग होत असल्यामुळे हा एक उत्तम पर्याय ठरतो. याशिवाय हे सॉफ्टवेअर संगणकात साठवून ठेवण्यासाठी क्षमताही कमी लागते. यात विविध प्रकारचे फिल्टर्स याचबरोबर स्पॅम, ट्रॅश यांसारखे पर्याय आणि सर्चची सुविधाही देण्यात आली आहे. याचबरोबर फिशिंग ई-मेल्सपासूनचे संरक्षण कवचही या सॉफ्टवेअरमध्ये देण्यात आले आहे. म्हणजे जर तुम्ही वेबबेस्ड सोल्युशन वापरत नसाल तर तुम्हाला या पर्यायांचा नक्कीच विचार करता येईल. हे सॉफ्टवेअर या mozilla.org/en-US/thunderbird <https://www.mozilla.org/en-US/thunderbird/>  लिंकवर उपलब्ध असेल.

पीडीएफ क्रीएटर
घरच्या संगणकावर अनेकदा पीडीएफ रीडर असते मात्र क्रीएटर नसते. यामुळे अनेकदा फाइल पीडीएफ करण्यासाठी बहुतांश लोक ऑनलाइन पर्यायांचा विचार करतात. पण तेथेही एका वेळी एकच फाइल आपण पीडीएफ करू शकतो. दुसरी फाइल कन्व्हर्ट करण्यासाठी तुम्हाला काही तासांचा वेळ घ्यावा लागतो. हे पीडीएफ क्रीएटर अ‍ॅडॉब अ‍ॅक्रोबॅटला पर्याय ठरू शकते. या सॉफ्टवेअरमध्ये पीडीएफ, इमेज क्रीएटर याशिवाय अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तसेच यामध्ये तुम्ही एखाद्या फाइलला पासवर्ड देऊन सुरक्षितही करून ठेवू शकता. हे सॉफ्टवेअर pdfforge.org/pdfcreator <http://www.thesimpledollar.com/30-essential-pieces-of-free-and-open-software-for-windows/www.pdfforge.org/pdfcreator>  येथे उपलब्ध होईल.

व्हच्र्युअल बॉक्स
हे साफ्टवेअर एकदम वेगळे असून याचा वापर करून आपण आपला संगणक कुठूनही वापरू शकतो. यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या फाइल्स सतत पेनड्राइव्हमध्ये किंवा ई-मेल्सवर बाळगण्याची गरज भासणार नाही. याशिवाय जर आपली हार्ड डीस्क क्रॅश झाली आणि माहिती हरविण्याची भीती असेल तरीही या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण आपली माहिती परत मिळवू शकतो. कारण या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपली माहिती कंपनीच्या माहिती केंद्रात साठवलेली असते. अनेक कंपन्या ही सेवा पैसे घेऊन देतात. पण येथे ही सेवा मोफत असणार आहे. हे सॉफ्टवेअर virtualbox.org <https://www.virtualbox.org/>  येथे उपलब्ध आहे.

व्हीएलसी मीडिया प्लेअर
मायक्रोसॉफ्ट विंडोज प्लेअरला पर्याय म्हणून हे सॉफ्टवेअर काम करू शकते. यामध्ये तुम्ही एमपीईजी-१, एमपीईजी-२, एमपीईजी-४, डीआयव्हीएक्स, एमपीथ्री फाइल्स प्ले करू शकता. याचबरोबर कोणत्याही फॉरमॅटमधील सीडी, डीव्हीडीही प्ले करू शकता. याचबरोबर या सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही वेबकॅम किंवा तसे कोणतेही उपकरण संगणकावर वापरू शकता. हे सॉफ्टवेअर videolan.org/vlc <http://www.thesimpledollar.com/30-essential-pieces-of-free-and-open-software-for-windows/www.videolan.org/vlc/index.html>  येथे उपलब्ध आहे.

गिंप
फोटोशॉप आणि पेंटशॉप प्रो या प्रस्थापित सॉफ्टवेअर्सना पर्याय ठरणारे हे साफ्टवेअर आहे. जीएयू इमेज मॅन्युप्युलेशन प्रोग्राम असे याचे पूर्ण नाव असून फोटोशॉपच्या मोफत पर्यायांमध्ये अगदी लोकप्रिय आहे. यामध्ये फोटोशॉपसारख्या अनेक गोष्टी करणे शक्य असते. यात आपण फोटोच्या शेड्स बदलण्यापासून ते फोटो मर्जिगपर्यंत अनेक गोष्टी करू शकतो. हे सॉफ्टवेअर gimp.org <http://www.thesimpledollar.com/30-essential-pieces-of-free-and-open-software-for-windows/www.gimp.org/&gt; येथे उपलब्ध आहे.

– नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com