सध्या बाजारात स्मार्ट टीव्ही येऊ लागले आहेत. याला चांगला डिमांडही मिळतोय. पण एचडीमध्ये दिसणारा कंटेंट कोण उपलब्ध करून देणार यासाठी आता बाजारात चढाओढ सुरू झाली आहे. कंटेन्ट उपलब्ध नसल्यामुळे थ्रीडी टीव्ही जसे केवळ शोभे पुरतेच उरले आहेत तशीच अवस्था एचडी किंवा अल्ट्रा एचडी टीव्हीची होऊ नये यासाठी आता टीव्ही उत्पादन कंपन्या आणि सेटटॉप बॉक्स किंवा डीटीएच पुरविणाऱ्या कंपन्यांनी हात मिळवणी सुरू केली आहे. यामुळे डीटीएच कंपन्यांमध्येही चांगलीच चढाओढ सुरू झाली आहे. सध्याच्या सणांच्या दिवसांमध्ये सुरू होणाऱ्या खरेदी उत्सवाकडे लक्ष ठेवत टीव्ही कंपन्यांबरोबरच डीटीएच कंपन्यांनीही आकर्षक सुविधा आणल्या आहेत.
सध्या बाजारात मोठय़ाप्रमाणावर एचडी कंटेंटची मागणी असून ती पुरविण्यासाठी डीटीएच कंपन्या पुढे सरसावत असल्याचे देशातील जुनी डीटीएच ऑपरेटिंग कंपनी डीश टीव्हीचे सीओओ सलील कपूर यांनी स्पष्ट केले. सामान्यत: लोकांना क्रीडा वाहिन्या बघण्यास जास्त रस असतो. यामुळे क्रीडा वाहिन्या अधिकाधिक असलेल्या पॅकेजेसना मागणी असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. तर इतर वाहिन्यांसाठी एचडी वाहिन्यांना मोठी मागणी असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले आहे. यामुळे सध्या बहुतांश कंपन्या एचडी वाहिन्या अधिकाधिक देण्याचा प्रयत्न करत आहे. डीश टीव्ही ३७ एचडी वाहिन्या पुरवीत असून बाजारात ही संख्या जास्त असल्याचेही त्यांनी नमूद केले. ग्राहकांची आवड लक्षात घेऊन पॅकेज तयार करण्यासाठी कंपन्या सज्ज होत आहेत. डीश टीव्हीतर्फे तयार करण्यात आलेल्या काही नव्या पॅकेजेसमध्ये सहा क्रीडा वाहिन्या तर काही पॅकेजेसमध्ये ११ क्रीडा वाहिन्या देण्यात आल्या आहेत. यामुळे अधिकाधिक लोकांना विविध क्रीडा प्रकार एन्जॉय करता येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. डीश टीव्ही प्रमाणेच एअरटेल, टाटा स्काय, व्हिडीओकॉन यांसारख्या कंपन्याही २५च्यावर एचडी वाहिन्या पुरवत असून सध्या ग्राहकांना एचडी वाहिन्या घेण्यासाठी मोठी संधी आहे.