आयबॉल या संगणक उपकरणांच्या क्षेत्रातील कंपनीने गेल्या अनेक महिन्यांमध्ये टॅब्लेटच्या क्षेत्रात जोरदार मुसंडी मारली आहे. तरुणाईची नस नेमकी ओळखून त्यांनी टॅब्ज बाजारात आणले आहेत. आता अगदी अलीकडे त्यांनी डय़ुएल सिम असलेला थ्रीजी टॅब बाजारात आणला आहे. आयबॉल स्लाइड थ्रीजी ७३३४ या मॉडेलचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यात एफएम रेडिओची सुविधाही देण्यात आली आहे.
हा डय़ुएल सिम थ्रीजी टॅब कॉर्टेक्स ए९ १ गिगाहर्टझ् प्रोसेसरवर काम करतो. सध्या डय़ुएल सिम सुविधा देणारे काही टॅब्ज बाजारात आहेत. मात्र त्यात एक सिम थ्रीजी तर दुसरे टूजी वापरावे लागते. यात मात्र दोन्ही सिम कार्डे थ्रीजी वापरण्याची सोय अंतर्भूत आहे. या थ्रीजी डाऊनलोडींगचा वेग ७.२ मेगाबाईटस् प्रतिसेकंद असून अपलोडींगचा वेग ५.७६ मेगाबाईटस् प्रतिसेकंद आहे.
दोन कॅमेऱ्यांची सुविधाही देण्यात आली आहे. मागच्या बाजूस असलेला कॅमेरा २ मेगापिक्सेल तर समोरच्या बाजूस असलेला कॅमेरा व्हीजीए आहे. याला सात इंचाचा एचडी स्क्रीन असून त्याचे रिझोल्युशन १०२४ ७ ६०० आहे. शिवाय तो मल्टिटचही आहे.
यामध्ये ३६० अंशांमध्ये पॅनोरमा टिपण्याची सुविधाही देण्यात आली आहे. शिवाय त्याला जीपीएस आणि एजीपीएसची जोडही आहेच. सध्याच्या तरुणाईचे प्रेम एफएम रेडिओवर अधिक आहे, हे गृहीत धरून कंपनीने एफएम रेम्डिओ ऐकण्याची सोय या टॅबमध्ये दिली असून एफएम असलेला हा पहिला टॅब आहे. अँड्रॉइड आइस्क्रीम सँडविच ही ऑपरेटिंग सिस्टिम वापरण्यात आली असून त्यात व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, निम्बुझ, झोमॅटो आदी प्रीलोडेड अ‍ॅप्सही देण्यातआ ली आहेत.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : १०,९९९ /-