फोन किंवा लॅपटॉप चोरीला गेला की ती वस्तू गेली याचे वाईट तर वाटतेच, पण त्याहीपेक्षा जास्त त्यातील माहिती चोरीला जाणे आपल्यासाठी जास्त धोकादायक ठरू शकते. आपण पैसे खर्च करून ती वस्तू परत घेऊ शकतो. याचबरोबर सिंक केलेली माहितीही परत मिळवू शकतो. मात्र सर्वच माहिती सिंक असते असे नाही. तसेच आपल्या माहितीचा दुरुपयोगही होऊ शकतो. यामुळे आपली सर्व माहिती एन्क्रिप्ट करून ठेवणे कधीही योग्य ठरते.

एन्क्रिप्टेड कशासाठी?
तुम्ही तुमची सर्व ई-खाती किंवा सर्व उपकरण पासवर्डने सुरक्षित केले असले, तरी ते खऱ्या अर्थाने सुरक्षित आहेत असे आपण म्हणू शकत नाही. जर कोणी तुमच्या उपकरणातील माहिती चोरी करायची ठरवली तर तुमच्या पासवर्डचे कवच भेदून ती माहिती चोरीला जाऊ शकते. मोबाइलबरोबरच संगणकालाही हा धोका कायम आहे. अँड्रॉइड फोन किंवा टॅबलेट तसेच संगणकबाह्य उपकरणांच्या मदतीने बूट करता येऊ शकतात. ज्याच्या साह्याने सर्व माहितीही मिळवता येऊ शकते. हे झाल्यावर तुम्ही विविध सॉफ्टवेअर्सच्या माध्यमातून तुमची माहिती पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला तरी ती अनेकदा मिळणे अवघड असते. यामुळे तुम्ही तुमच्या संगणकातील किंवा फोनमधील माहिती ज्याला लोकल स्टोअरेज म्हणता येईल अशा स्टोअरेजमध्ये असलेली माहिती एन्क्रिप्ट केली तर माहिती चोरी करणे खूप अवघड होते. ते अशक्य आहे असे म्हणता येणार नाही. पण अवघड मात्र नक्कीच होते. हे अवघड कामही एखाद्याने केले तरी त्याला ती माहिती वाचता येणे शक्य होणार नाही. कारण ती माहिती एन्क्रिप्टेट असेल. यात एक नुकसान असते ते म्हणजे जर आपला एखादा ड्राइव्ह करप्ट झाला आणि आपण रिकव्हरी सॉफ्टवेअर्सच्या माध्यमातून माहिती मिळवली तर ती उपयोगात येणे अनेकदा अवघड असते. पण यापेक्षा जास्त फायदेच आहेत. विविध ऑपरेटिंग प्रणालीमध्ये माहिती कशाप्रकारे एन्क्रिप्ट करता येते ते आपण पाहुयात.

आयओएस
आयओएस ही सर्वाधिक सुरक्षित मानली जाणारी ऑपरेटिंग प्रणाली आहे. आयओएस ८ मध्ये पासकोड देण्यात आलेला आहे. ज्याच्या माध्यमातून तुमची माहिती एन्क्रिप्टेड असते. यानंतर म्हणजे आयओएस ८.३बाबत अ‍ॅपलने श्वेतपत्रिका जाहीर केली आहे. ज्यामध्ये सुरक्षेबाबत सर्व स्पष्टीकरण करण्यात आले आहे. या श्वेतपत्रिकेनुसार या प्रणालीतील अ‍ॅप्स उदाहणार्थ मेसेजेस, मेल, कॅलेंडर, कॉन्टॅक्ट्स, फोटो आणि आरोग्य या विषयाच्या माहितीला अंतर्गत सुरक्षाकवच देण्यात आले आहे. आयओएस ७ किंवा त्याच्या पुढील आवृत्तीमध्ये जे तुम्ही बाहेरचे अ‍ॅप्स डाऊनलोड कराल त्या सर्वाना सुरक्षा दिली जाते. सध्या बाजारात उपलब्ध असेलेल्या सर्व आय उपकरणांमध्ये फ्लॅश स्टोअरेज आणि सिस्टीम मेमरीच्या डीएमए पाथमध्ये एईएस २५६ क्रिप्टो इंजीन देण्यात आले आहे.

अँड्रॉइड
गुगलने यापूर्वी मान्य केले असले तरी आजही बाजारात येत असलेली अँड्रॉइड उपकरणे स्वत:हून एन्क्रिप्टेड होत नाहीत. यामध्ये डिफॉल्ट एन्क्रिप्शनचा पर्याय गुगलच्या नेक्सस या फोनमध्येच उपलब्ध आहे. नुकतीच काही कंपन्यांनी हा पर्याय देण्याची सुरुवात केली आहे. असे असले तरी तुम्ही तुमची माहिती एन्क्रिप्ट करू शकता. तुमच्या फोनमध्ये सेटिंग्जमध्ये जाऊन अ‍ॅप्सचा पर्याय निवडा. यानंतर एन्क्रिप्टेड फोनचा पर्याय निवडा. मग तुमच्या माहितीची एन्क्रिप्शनची प्रक्रिया सुरू होईल. जर माहिती खूप जास्त असेल तर कदाचित तुम्हाला फोन चार्जिगला लावण्यास सांगितले जाईल. कारण एन्क्रिप्शन करताना मध्येच फोन बंद पडला तर सर्व माहिती उडण्याची भीती असते. जर तुम्ही तुमच्या फोनला पीन किंवा पॅटर्न पासवर्ड दिला नसेल तर तो तुम्हाला द्यावा लागेल. यानंतर तुमची ऑपरेटिंग प्रणाली बूट होऊन तुमची माहिती सुरक्षित होईल. तुमचा फोन एन्क्रिप्टेड झाला आहे का हे तपासण्यासाठी तुम्ही पुन्हा सेटिंगमध्ये जाऊन सिक्युरिटीमध्ये जा. तेथे तुम्हाला ‘एन्क्रिप्टेड’ असा छोटा आयकॉन किंवा संदेश दिसेल. तुमच्या फोनच्या रॅम आणि फ्लॅश मेमरीच्या क्षमतेनुसार फोनच्या वेगावर परिणाम होऊ शकतो. तुमच्या फोनमध्ये जर ६४ बीट एआरएमव्ही ८ हा प्रोसेसर असेल, तर एन्क्रिप्शनच्या भानगडीत पडू नका. तुमचा फोन काम करायचा बंद करेल. एन्क्रिप्शनसाठी चांगला प्रोसेसर, रॅम आणि फ्लॅश मेमरीची आवश्यकता असते. इतक्या वर्षांच्या प्रवासानंतर अखेर अँड्रॉइडने त्यांच्या नवीन मार्शमॅलो ऑपरेटिंग प्रणालीमध्ये बाह्य साठवणुकीसाठीही एन्क्रिप्शनचा पर्याय दिला आहे.
विंडोज ८.१
विंडोजही सुरक्षित ऑपरेटिंग प्रणाली मानली जाते. पण विंडोज ८.१ फोनची प्रणाली जरा विचित्र आहे. यामध्ये एन्क्रिप्शन होते, पण फक्त तेव्हाच होते जेव्हा विशिष्ट प्रकारचे डिव्हाइस मॅनेजमेंट सव्‍‌र्हर ‘एन्क्रिप्ट इटसेल्फ’ असे विचारते तेव्हाच होते. यामुळे शेवटच्या वापरकर्त्यांला त्याला पाहिजे तेव्हा उपकरण एन्क्रिप्ट करता येऊ शकत नाही. विंडोज १०च्या फोनमध्ये बिटलॉकर एन्क्रिप्शनचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यामुळे हा फोन असलेल्यांना ते शक्य होते किंवा ८.१ ऑपरेटिंग प्रणालीवर चालणारे फोन अद्ययावत केल्यावर वापरकर्त्यांना माहिती एन्क्रिप्ट करता येणे शक्य होणार आहे.

विंडोज संगणक ऑपरेटिंग प्रणाली
विंडोजची संगणकावरील ऑपरेटिंग प्रणाली ही खूप गुंतागुंतीची आहे. जी विविध हार्डवेअर्सवर अवलंबून असते. यामुळे एन्क्रिप्शनही तितकेच अवघड आहे. यामुळे विंडोजच्या नवीन आवृत्त्यांमध्ये देण्यात आलेल्या अंतर्गत टूल्सचा वापर करून आपल्याला माहिती एन्क्रिप्ट करता येते. विंडोज ऑपरेटिंग प्रणालीमध्ये आपल्याला डिफॉल्ट एन्क्रिप्शन उपलब्ध असणे हे अत्यंत अवघड आहे. यामुळे आपल्याला यात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जर आपल्या संगणकामध्ये चांगल्या दर्जाचे आणि अद्ययावत हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असेल तर आपण माहिती एन्क्रिप्ट करू शकतो. विंडोज ८.१ आणि विंडोज १०मध्ये आपण एन्क्रिप्शन तेव्हाच करू शकतो जेव्हा आपले विंडोजमध्ये नोंदणीकृत नाव असेल आणि आपल्या संगणकामध्ये खालीलप्रमाणे हार्डवेअर असेल.

सिक्युअर बूटला सपोर्ट
ट्रस्टेड प्लॅटफॉर्म मॉडय़ुल (टीपीएम). याचे टीपीएम २.० हे व्हर्जन असावे. सध्या अनेक संगणकांमध्ये टीपीएम १.२ हे व्हर्जन वापरले जाते.
विंडोजच्या इंस्टंट गो ला सपोर्ट करणारे हार्डवेअर आणि फर्मवेअर असावे. इंस्टंट गोमध्ये ऑपरेटिंग प्रणाली बंद करून ती ठरावीक वेळाने रिफ्रेश होऊ शकते. स्मार्टफोनमध्ये असा प्रकार सातत्याने होत असतो.

यासाठी सॉलिड स्टेट बूट व्हॉल्युम, नेटवर्क इंटरफेससाठी एनडीआयएस ६.३० आणि मेमरी सोल्डर मदरबोर्ड असणे आवश्यक आहे.

हे सर्व असेल तर बिटलॉकर वापरून तुम्ही एन्क्रिप्शन करू शकता.

प्रथम विंडोज अधिक आर ही दोन्ही बटणे एकदम दाबावीत.

यानंतर  gpedit.msc.असे टाइप करावे.

यानंतर संगणकाच्या कॉन्फिग्रेशनमध्ये जा. नंतर अ‍ॅडमिन्स्रिटेटिव्ह टेम्पलेट्समध्ये जा. तेथे विंडोज कंपोनंट निवडा मग बिटलॉकर ड्राइव्ह एन्क्रिप्शनमध्ये जा.

तेथे ऑपरेटिंग सिस्टीम ड्राइव्ह फोल्डर निवडा.

त्यावर डबल क्लिक करा. मग ऑथेंटिफिकेशन पूर्ण होईल.

यांनतर ‘एनेबल’वर क्लिक करा. मग तेथे ‘अलाव बिटलॉकर विदाऊट कॉम्पिटेबल टीपीए’चा पर्याय निवडून ओके करा.

यानंतर तुमचा डेटा एन्क्रिप्टेड होऊ शकतो. मग तुम्ही त्याला विशेष पासवर्ड देऊन संगणक सुरू होताना बूट होण्यापूर्वी तुम्हाला हा पासवर्ड द्यावा लागेल. हा पासवर्ड दिल्यावरच तुमचा संगणक सुरू होईल.

नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com