आपल्यापकी प्रत्येकाला स्वत:च काही तरी नवीन करून बघण्याची इच्छा असते. हे नवं म्हणजे काहीही असू शकतं. एखादा खाद्यपदार्थ, गृहसजावटीसाठी तयार केलेली एखादी वस्तू किंवा आपल्या प्रियजनांना देण्यासाठी स्वत: बनवलेल्या भेटवस्तू इत्यादी. आपल्या कल्पक बुद्धिमत्तेतून साकारलेल्या कलाकृतीचे कौतुक व्हावे आणि ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी असेही वाटत असते. त्याचबरोबर बनवलेली कलाकृती लोकांसमोर ठेवून आपल्यासारख्याच इतर हौशी लोकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळू शकेल असाही उद्देश असतो.
आज आपण अशी एक साइट बघणार आहोत ज्याद्वारे हे सर्व करता येऊ शकते. या साइटचे नाव आहे http://www.instructables.com/.
या साइटवर जगभरातल्या हौशी मंडळींनी स्वत: केलेल्या नावीन्यपूर्ण गोष्टी साहित्य व कृतीसह चित्रे आणि व्हिडीओजद्वारे लोकांसमोर ठेवलेल्या आहेत. या सर्व गोष्टींमध्ये प्रचंड वैविध्य आहे. उदाहरणार्थ कॉम्प्युटरशी संबंधित ISO  इमेजच्या साहाय्याने िवडोज किंवा लिनस्कची बुटेबल USB  ड्राइव्ह तयार करणे, लॅपटॉपच्या जुन्या बॅटरीजचा उपयोग करून पॉवरबँक तयार करणे, गृहोपयोगी तसेच सजावटीशी संबंधित विविध आकाराच्या लँपशेड्स, शोभेच्या वस्तू, विणकामाचे विविध प्रकार, दागिन्यांचे प्रकार, कागदापासून तयार केलेली विविध प्रकारची फुले, विविध प्रकारचे प्रयोग करून तयार केलेले नवे खाद्यपदार्थ.
कुठलीही नवी वस्तू तयार करताना एखादा मार्गदर्शक असेल तर सोन्याहून पिवळे. या साइटवर मार्गदर्शन करताना वस्तू बनवण्यासाठी लागणारे साहित्य तसेच प्रत्येक टप्प्यावर करायची कृती दिलेली आहे. प्रत्येक टप्प्यावर ती वस्तू कशी दिसेल याचे फोटोदेखील आहेत, तर काही ठिकाणी त्याचे व्हिडीओज आहेत.
गुंतवणूक कशी करावी, घरातील वायिरग किंवा प्लम्बिंग कसे करावे, स्वत:चा कॉम्प्युटर कसा तयार करावा, चांगले फोटो कसे काढावेत याच्या टिप्स येथे बघायला मिळतात. कागदावर टेक्स्ट किंवा चित्र कसे िपट्र होते हे तुम्हाला माहीतच आहे. परंतु 3D  िपट्रर कसे कार्य करतात, ते कसे बनवले जातात याचे प्रात्यक्षिक तुम्हाला येथे दिसेल. अँड्रॉइड मोबाइलमधील उपलब्ध असलेली विविध अ‍ॅप्स आपण रोजच बघतो, डाऊनलोडही करून घेतो, परंतु तुम्हाला स्वत:चे एखादे अ‍ॅप बनवून बघायचे असेल तर त्याची छोटी टय़ुटोरियल्सदेखील येथे उपलब्ध आहेत.
या उपक्रमात तुम्हालाही सहभागी होता येते. तुम्ही काही वैशिष्टय़पूर्ण गोष्ट करून पाहिली असेल व ती इतरांसमोर ठेवायची असेल तर ती तुम्ही येथे शेअर करू शकता. त्यासाठी तुम्हाला या साइटवर लॉगिन करणे आवश्यक आहे. नंतर साइटच्या मुख्य पानावरील ‘create’ या पर्यायाचा उपयोग करून तुमच्या प्रोजेक्टची कृती अपलोड करता येईल.
सर्वप्रथम तुम्हाला प्रोजेक्टला नाव देऊन त्याचा प्रकार, उपप्रकार इत्यादी निवडायचा असतो. त्यानंतर प्रोजेक्टसाठी आवश्यक असलेले फोटो, व्हिडीओज आणि इतर फॉरमॅटमधील फाइल्स जसे की, pdf, doc फाइल्स वगरे अपलोड करता येतात. आवश्यक असलेल्या सर्व स्टेप्स येथे टाइप करून तुमचे प्रोजेक्ट ह्या साइटवर प्रसिद्ध करता येते.
या साइटवर विविध विषयांवर आधारित काही स्पर्धाही आयोजित केल्या जातात आणि विजेत्यांना आकर्षक बक्षिसेदेखील दिली जातात.
सतत काही तरी नवीन करू इच्छिणाऱ्यांना, आपले ज्ञान आणि कला इतरांसमोर मांडून त्याचा जास्तीत जास्त लोकांना वापर करता यावा अशी इच्छा असलेल्या सर्वासाठी हे अतिशय प्रभावी माध्यम आहे.

– मनाली रानडे
manalirande84@gmail.com