Ted Talk ‘ हे असे व्यासपीठ आहे जिथे जगभरातील अनेक बुध्दिमान लोक आपले विचार, अनुभव, नव्या संकल्पना सर्वासमोर मांडतात. करमणूक, डिझाईन, याचबरोबर विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, जागतिक प्रश्न यासारखे विषय देखील येथे हाताळले जातात.

https://ted.com/ या साईटवर विविध वक्त्यांची 2000 पेक्षा अधिक लेक्चर्स विनामूल्य बघता येतात.व्याख्यान म्हटल्यावर नाक मुरडणा-या मंडळींसाठी विशेष माहिती की ही सर्व व्याख्याने ओघवती, थोडक्यात आणि मुद्देसूद असतात. प्रत्येक वक्त्याकडे व्याख्यानासाठी जास्तीत जास्त 18 मिनिटांचा अवधी दिलेला असतो. नवनवीन संकल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवून त्यांचा दृष्टिकोन, आयुष्य आणि जग बदलण्याची ताकद या व्याख्यानांमधे आहे.
चार पंख असलेले छोटुकले हेलिकॉप्टर आपण थ्री इडियटस या सिनेमात किंवा आयडिया मोबाईलच्या जाहिरातीत पाहिले आहेच. असे तळहातावर मावणारे हेलिकॉप्टर सदृश अनेक यंत्रमानव पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत विजयकुमार यांनी बनवले. असे छोटे आणि चपळ यंत्रमानव एकमेकांशी संयोजन करत,गटागटाने विविध प्रकारच्या कसरती आणि कामे करू शकतात.या तंत्रज्ञानाचा उपयोग अनेक ठिकाणी होऊ शकतो. विजयकुमार ह्यांनी आपल्या भाषणात हे प्रात्यक्षिकासहित दाखवले आहे जे अतिशय थक्क करणारे आहे.

http://www.ted.com/talk/vijay kumar robots that fly and cooperate?language=en#t-21729
अशाप्रकारची अनेक कल्पक प्रेरणादायी, चित्तवेधक, गंमतीशीर, धाडसी प्रयोगांविषयी आणि माहितीपूर्ण भाषणे येथेउपलब्ध आहेत.ह्या साईटवर तुम्ही तुमच्या पसंतीच्या विषयानुसार लेक्चर शोधू शकता. ही इंग्रजी भाषेत आहेत. येथे व्हिडिओ सोबत सबटायटल्स दिसतील. ही सबटायटल्स 100 पेक्षा अधिक भाषांमधे भाषांतरित केली जातात. यात मराठीचाही समावेश आहे. तुम्ही हवी ती भाषा निवडू शकता. तुम्हाला भाषणाची संपूर्ण स्क्रिप्ट देखील वाचता येते. व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सोयही आहे. फेसबुक, इमेल, ट्विटर इत्यादी द्वारे आपल्या मित्रमंडळीमधे शेअर देखील करू शकता.

टेड टॉकच्या मंचावरील बहुतांशी भाषणे इंग्रजी भाषेत असली तरी काही अन्य परदेशी भाषांमधेही आहेत. ही उत्तमोत्तम भाषणे जास्तीत जास्त श्रोत्यांपर्यंत पोहोचावीत म्हणून भाषांतराचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. तुम्ही देखील या प्रकल्पात सहभागी होऊ शकता. तुमचे एखाद्या भाषेवर प्रभुत्व असेल आणि तुम्हाला आवडलेल्या भाषणाचे भाषांतर उपलब्ध झालेले नसल्यास ते भाषांतर करून तुम्ही हा प्रकल्पाला हातभार लावू शकता.

<http://ed.ted.com/> हा टेड टॉकया साईटचाच एक भाग आहे.येथे अनेक कोड्यात टाकणा-या आणि विचार करायला लावणा-या प्रश्नांची उत्तरे एॅनिमेशनच्या सहाय्याने दाखवली गेली आहेत.

उदाहरणार्थ,दूरदर्शनवरील जाहिरातींमधे गरोदरपणाची चाचणी करण्यासाठी असलेली साधने दाखवली जातात. परंतु ही चाचणी कशाप्रकारे कार्य करते, काही व्यक्ती डावखो-या का असतात? कुत्रा त्याच्या नाकाने सर्व काही बघतो म्हणजे काय? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्सुकता आपल्याला असते. त्यांची उत्तरे माहितीपूर्ण पध्दतीने उत्तम प्रकारे येथे मिळू शकतील.

व्हिडिओ सोबत तुम्हाला त्यातील विषयाशी संबंधित काही प्रश्न विचारलेले असतात. काहींची उत्तरे पर्याय निवडून द्यायची असतात तर काही प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहायची असतात. तसेच एखादा विषय सखोल जाणून घ्यायचा असेल तर त्यासाठी िलक्स आणि लेखही येथे उपलब्ध करून दिलेले आहेत.

नाविन्याचा ध्यास घेऊन आपल्या कल्पनांना मूर्त स्वरूप देणा-या आणि त्याद्वारे जग बदलू पाहणा-या ध्येयवेड्या माणसांच्या जगात ही साईट तुम्हाला घेऊन जाईल.

– मनाली रानडे
manaliranade84@gmail.com