स्मार्टफोनच्या दुनियेत अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमद्वारे आपली दादागिरी कायम ठेवणाऱ्या गुगलने अलीकडेच अँड्रॉइडची नवीन आवृत्ती कंपन्यांना पुरवण्यास सुरुवात केली आहे. गुगलच्या इक्लेअर, जिंजरब्रेड, आइस्क्रीम सँडविच, किटकॅटनंतर आलेली अँड्रॉइडची नवी आवृत्ती अतिशय आकर्षक आणि वापरण्यास सहजसोपी आहे. सध्या काही निवडक स्मार्टफोनवरच उपलब्ध असलेले हे ‘लॉलीपॉप’ लवकरच मध्यम किंमत श्रेणीतील स्मार्टफोनवरही उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

गुगलने गेल्याच आठवडय़ात अँड्रॉइड ५.० ची आवृत्ती बाजारात आणण्याची घोषणा केली. अँड्रॉइड ‘एल’ किंवा ‘लॉलीपॉप’ या नावाने प्रसिद्ध करण्यात आलेली ही आवृत्ती सध्या गुगलच्याच नेक्सस ६ या स्मार्टफोन आणि नेक्सस ९ या टॅब्लेटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच येत्या आठवडय़ात नेक्सस ४,५,७ आणि १० श्रेणींतील स्मार्टफोन-टॅब्लेटवरही ‘लॉलीपॉप’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय एचटीसी, एलजी, अ‍ॅसूस, सोनी या कंपन्यांच्या स्मार्टफोन व टॅब्लेटवरही लवकरच ‘लॉलीपॉप’ ऑपरेटिंग सिस्टीम असणार आहे.
अँड्रॉइड ‘लॉलीपॉप’च्या घोषणेपासूनच तंत्रजगतात त्याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळेच सध्या ‘नेक्सस ९’ टॅब्लेटच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी सुरू आहे. ‘लॉलीपॉप’मध्ये केवळ बाह्यस्वरूप न बदलता अंतर्गत रचनाही अधिक सुटसुटीत आणि आकर्षक करण्यावर गुगलने भर दिला आहे.
मटेरियल डिझाइन : अँड्रॉइडच्या नव्या आवृत्तीची घोषणा करताना गुगलने नव्या ऑपरेटिंग सिस्टीमचे दृश्यस्वरूप पूर्णपणे बदललेले दिसेल, असे जाहीर केले होते. तो शब्द गुगलने पाळल्याचे ‘लॉलीपॉप’कडे पाहिल्यावर दिसून येते. ‘लॉलीपॉप’ ऑपरेटिंग सिस्टीम दिसायला अधिक स्वच्छ, आकर्षक आणि भरपूर अ‍ॅनिमेशन्सचा वापर असलेली आहे. यातील नेव्हिगेशन आणि स्टेटस बार पूर्णपणे बदललेला आहे. विशेष म्हणजे, स्टेटस बारचे स्वरूप आधीच्या अँड्रॉइडसारखेच असले तरी त्याचा रंग बदलण्याची किंवा तो पारदर्शी ठेवण्याची सुविधा वापरकर्त्यांला मिळते. नोटिफिकेशन बारमध्येच असलेला ‘क्विक सेटिंग’चा मेनू अधिक व्यापक करण्यात आला असून त्याद्वारे एका टचवर वापरकर्त्यांला फ्लॅशलाइट, हॉटस्पॉट, कास्ट स्क्रीन कंट्रोल, ब्लूटुथ हाताळता येते. याशिवाय ‘लोकेशन सव्‍‌र्हिस’साठीही ‘सेटिंग’मध्ये पर्याय देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हे सर्व हाताळण्याचा अनुभव अधिक सोपा आणि मजेशीर आहे. एकंदरीत ‘लॉलीपॉप’वर आधारित स्मार्टफोन आधीच्या अँड्रॉइडच्या तुलनेत अधिक वेगळे आणि आकर्षक दिसतात.

‘नोटिफिकेशन्स’चे स्वरूप
अँड्रॉइड ५.०च्या ‘लॉक स्क्रीन’च्या मध्यभागी सर्व नोटिफिकेशन्स दिसतात. त्यामुळे फोन अनलॉक न करता आलेले मेसेजेस किंवा ई-मेल वाचणे सहज शक्य आहे. नको असलेले ‘नोटिफिकेशन्स’ केवळ स्वाइप केले तरी हटवता येतात. शिवाय तुम्ही एखाद्या अ‍ॅपचा वापर करत असाल, अथवा गेम खेळत असाल तरी तुम्हाला समोर ‘नोटिफिकेशन’ पाहता येते. त्यामुळे प्रत्येक वेळी आलेला मेसेज वाचण्यासाठी चालू असलेल्या ‘अ‍ॅप’मधून बाहेर पडण्याची गरज नाही. नोटिफिकेशनचा प्राधान्यक्रम ठरवण्याची सुविधाही वापरकर्त्यांला पुरवण्यात आली आहे. याशिवाय नको असलेले नोटिफिकेशन किंवा कॉल्स बंद ठेवण्याची सुविधाही प्रथमच अँड्रॉइडवर पुरवण्यात आली आहे.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोणताही कॉल आला तर चालू असलेल्या अ‍ॅपमधून बाहेर न पडताही वापरकर्त्यांला तो हाताळता येतो. शिवाय कॉल चालू असतानाही ते आपल्या अ‍ॅपचा वापर चालूच ठेवू शकतात.

सुरक्षितता वाढली
अँड्रॉइडच्या फोनमधून होणारी माहितीची चोरी हा नेहमीच चिंतेचा विषय ठरला आहे. स्मार्टफोनवरील सर्व माहिती मॅन्युअली डिलीट केल्यानंतरही ती माहिती काढता येऊ शकत असल्याने वापरकर्त्यांच्या ‘प्रायव्हसी’वर मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते. मात्र गुगलने ‘लॉलीपॉप’मध्ये ‘फॅक्टरी रिसेट प्रोटेक्शन’चा पर्याय पुरवला आहे. त्यानुसार एखाद्या वापरकर्त्यांला आपल्या स्मार्टफोनवरील सर्व डाटा हटवायचा असल्यास गुगल ‘लॉग इन’च्या साह्याने फोन पूर्णपणे ‘फॅक्टरी रिसेट’ करता येतो.
याशिवाय अँड्रॉइड लॉलीपॉपमध्ये ‘एसईलिनक्स’च्या साह्याने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. याशिवाय वापरकर्त्यांना ‘अँड्रॉइड स्मार्ट लॉक’ची सुविधा पुरवण्यात आली आहे.

नवीन मेसेंजर
गुगलने ‘लॉलीपॉप’च्या माध्यमातून ‘नेक्सस ६’मध्ये नवीन मेसेंजर अ‍ॅपही पुरवला आहे. या अ‍ॅप्लिकेशनच्या साह्याने अँड्रॉइडवरून एसएमएस आणि एमएमएस पाठवणे अधिक सोपे होणार आहे. व्हिडीओ, व्हॉइस चॅटिंगसाठी असलेले ‘हँगआऊट’ अ‍ॅपही ‘लॉलीपॉप’मध्ये पुरवण्यात आले आहे.

बॅटरीची बचत
गुगलने ‘लॉलीपॉप’मध्ये नवीन ‘बॅटरी सेव्हर’ नावाची सुविधा सुरू केली असून त्याद्वारे स्मार्टफोनची बॅटरी दीड तास अधिक चालू शकते, असा दावा करण्यात आला आहे. याशिवाय बॅटरी संपायला किती वेळ शिल्लक आहे, हे दर्शवण्याची व्यवस्थाही ‘लॉलीपॉप’मध्ये पुरवण्यात आली आहे.