पॅथॉलॉजी लॅब ही संकल्पना दवाखान्याइतकीच आपल्या सर्वाना परिचित आहे. आरोग्याच्या तक्रारी घेऊन आपण डॉक्टरांकडे जातो. जर दोन-चार दिवसांच्या प्राथमिक उपचारांनंतर आजाराचे निवारण न झाल्यास किंवा डॉक्टरांना एखाद्या विशिष्ट आजाराची शंका आल्यास ते निदान करण्यासाठी आपल्याला काही पॅथॉलॉजीच्या चाचण्या करण्यास सांगतात. एखादी जखम लवकर भरून येत नसल्यास त्या व्यक्तीस मधुमेह आहे की काय हे बघण्यासाठी त्याच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण बघावे लागते किंवा एखाद्याला श्वसनाचा त्रास वारंवार होत असल्यास त्याला काही अ‍ॅलर्जी आहे का, यासंबंधीच्या चाचण्या करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. डॉक्टरांना अपेक्षित असलेल्या चाचण्यांची नावे ते लिहून देतात आणि पेशंट लॅबमध्ये जाऊन ब्लड, युरीन, स्टुल, थुंकी इत्यादी देऊन एक-दोन दिवसांत त्याचा रिपोर्ट आणतो. आलेल्या रिपोर्टनुसार कोणते उपचार करायचे ते डॉक्टर ठरवतात.आपल्यापकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की, अशा किती चाचण्या आहेत? या चाचण्यांतून डॉक्टरांना नेमके काय समजते? कुठल्या रोगाचे निदान करण्यासाठी कोणत्या चाचण्यांची गरज असते? इत्यादी.     वैद्यकीय शास्त्र दिवसेंदिवस प्रगत होत आहे. वैद्यकीय चाचण्यांचे तंत्रज्ञानदेखील अद्ययावत होत आहे. यातील काही चाचण्या सोप्या असतात आणि त्यांचा रिपोर्ट लगेच मिळतो. उदाहरणार्थ, प्रेग्नन्सी, मधुमेह. रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण घरच्या घरी चटकन पाहण्यासाठी छोटी यंत्रे उपलब्ध आहेत हे तर सर्वानाच माहीत आहे. तर काही चाचण्यांमधील रासायनिक प्रक्रिया गुंतागुंतीच्या किंवा वेळखाऊ असतात. उदाहरणार्थ, दोन व्यक्तींमध्ये नातेसंबंध आहे का ते पाहण्यासाठी घेतली जाणारी डीएनए टेस्ट किंवा एखाद्या आजारात कोणती अँटिबायोटिक्स उपयोगी पडतील हे सांगणारी कल्चर टेस्ट. त्याचे निष्कर्ष कळण्यासाठी काही दिवस थांबावे लागते.डॉक्टरांनी लिहून दिलेल्या चाचण्या का करायला सांगितल्या आहेत हे समजून घेण्याची काही लोकांना उत्सुकता असते. हे डॉक्टरांनी समजावून सांगणे खरे तर अपेक्षित असते. परंतु वेळेची मर्यादा, रोग्याची आणि त्याच्या नातेवाईकांची मानसिकता, त्यांची समजून घेण्याची क्षमता अशा अनेक गोष्टींचा विचार डॉक्टरांना करावा लागतो. त्यामुळे बऱ्याचदा आपले हे कुतूहल आपल्या मनातच राहते.https://labtestsonline.org  या साइटच्या माध्यमातून आपल्या अनेक शंकांचे निरसन होऊ शकते. या साइटवर वैद्यकीय शास्त्रात उपलब्ध असलेल्या चाचण्यांची तपशीलवार माहिती देण्यात आलेली आहे. चाचण्यांच्या नावानुसार ही माहिती तुम्ही शोधू शकता. उदाहरणार्थ, ग्लुकोज ही चाचणी निवडल्यावर हीच चाचणी आणखी कोणत्या नावाने ओळखली जाते, तसेच ही का आणि कधी करायला सांगितली जाते, या चाचणीसाठी ब्लड, युरीन इत्यादीपकी कोणते सँपल घेतले जाते, या तपासणीसाठी कोणत्या पूर्वतयारीची गरज आहे, अशी सर्व माहिती येथे दिलेली आहे. चाचणीत नक्की काय तपासले जाणार याचबरोबर रिपोर्ट कसा समजून घ्यावा, याचेही मार्गदर्शन येथे मिळेल.येथे आजारानुसार म्हणजेच मधुमेह, कावीळ इत्यादींची नावे देऊन तुम्ही शोध घेऊ शकता. आजाराची लक्षणे, त्याचे प्रकार आणि संबंधित चाचण्या हे येथे सविस्तरपणे दिलेले आहे.

येथे सामान्यत: आपल्या मनात येणाऱ्या प्रश्नांचीउत्तरे दिलेली आहेतच; परंतु याखेरीज तुम्हाला काही आणखी प्रश्न विचारायचे असतील तर ते येथे तुम्ही विचारू शकता.आपल्या आरोग्याशी निगडित असलेल्या प्रश्नांवर उत्तरे देणारी ही साइट नक्कीच समाधान देऊन जाईल.

मनाली रानडे
manaliranade84@gmail.com