एखादे तंत्रज्ञान बाजारात येत असताना त्याच्या जोडीला ती सुविधा उपभोगण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणेही बाजारात येणे आवश्यक आहे. सध्या दूरसंचार क्षेत्रात ‘फोर जी’ची चांगलीच चर्चा रंगली आहे. पुढच्या वर्षांच्या अखेरीपर्यंत ‘फोर जी’ सामान्यांपर्यंत पोहचेलही. पण हे ‘फोर जी’ वापरण्यासाठी तसे हार्डवेअर मोबाइलही असणे गरजेचे आहेत. ग्राहकांची हीच आगामी गरज लक्षात घेऊन सध्या बाजारात ‘फोर जी’ मोबाइल्स गर्दी करू लागले आहेत. ग्राहकही थ्रीजीपेक्षा ‘फोर जी’ सुविधा असलेल्या मोबाइल्सना पसंती देऊ लागले आहेत. यामुळे २५ हजार रुपयांपेक्षा स्वस्त ‘फोर जी’ सुविधा असलेले सध्या बाजारात उपलब्ध असलेले व लवकरच बाजारात येणारे मोबाइल पाहू या.

नोकिया ल्युमिया ६३८
tec02मायक्रोसॉफ्ट या कंपनीने ग्राहकांची गरज ओळखून नोकिया ल्युमिया ६३८ हा मोबाइल नुकताच भारतीय बाजारपेठेत दाखल केला आहे. हा मोबाइल ‘फोर जी’साठी उपयुक्त हार्डवेअर असलेला असून तो खूप स्वस्तही आहे. या मोबाइलच्या विक्रीसाठी कंपनीने अ‍ॅमेझॉन या ई-व्यापार संकेतस्थळाशी सहकार्य केले आहे. या ठिकाणी ग्राहकांना हा मोबाइल अधिक चांगल्या किंमतीमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे. विंडोज ८.१ या ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणारा हा मोबाइल असून याचा डिस्प्ले ४.५ इंचांचा आहे. यात क्वाड कोर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असल्यामुळे तो अधिक जलद काम करू शकतो. यामध्ये व्हॉट्स अ‍ॅप, इंस्टाग्रामसारखे अ‍ॅप्स जलद गतीने काम करू शकतात असा कंपनीचा दावा आहे. या फोनमध्ये बॅटरी क्षमता १८३० एमएएचची देण्यात आली आहे. यामुळे दिवसभर मोबाइल वापरूनही बॅटरी कमी संपते. यामध्ये पाच मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला असून त्यामध्ये ल्युमिया कॅमेरा आणि सिनेमाग्राफ हे दोन खास फोटो अ‍ॅप्स देण्यात आले आहेत. या फोनमध्ये एक जीबी रॅम देण्यात आली असून यात आठ जीबी अंतर्गत मेमरी देण्यात आली आहे. ही मेमरी आपण एसडी कार्डच्या साह्य़ाने १२८ जीबीपर्यंत वाढवू शकतो.
किंमत : ८,२९९ रुपये. (अ‍ॅमेझॉनवर)

एचटीसी डिझायर ८२०
tec03एचटीसी या कंपनीने बर्लिन येथे २०१४ च्या सुरुवातीला सादर केलेला हा मोबाइल आता बाजारात आला आहे. या फोनला ५.५ इंचाची स्क्रीन आहे. यामध्ये ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६१५ प्रोसेसर आहे. याचबरोबर एड्रेन ४०५ जीपीयू आहे. यामध्ये अँड्रॉइडची किटकॅट ही अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टिम असून फोन अँड्रॉइडच्या नव्या लॉलीपॉप या ऑपरेटिंग सिस्टिमवरही काम करू शकतो. या फोनची खासियत म्हणजे या फोनमध्ये तब्बल १३ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, तर फोनचा फ्रंट कॅमेरा आठ मेगापिक्सेलचा आहे. यामुळे सेल्फीजसाठी हा फोन अधिक चांगला ठरतो. हा फोन एक सिम कार्ड आणि दोन सिम कार्ड सुविधेमध्ये उपलब्ध आहे.
किंमत : याची किंमत विविध ई-रिटेल संकेतस्थळांवर वेगवेगळी आहे. ती २१ हजारपासून ते २५ हजार रुपयांपर्यंत आहे.

लिनोवा वाइब एक्स २
tec04लिनोवा या कंपनीने वाइब एक्स २ हा ‘फोर जी’ फोन बाजारात आणला आहे. या फोनमध्ये पाच इंचाची स्क्रीन असून त्याला तीन पातळय़ांची आकर्षक डिझाइन आहे. या फोनमध्ये दोन गीगाहार्टझचा ऑक्टा कोर मीडिया टेक एमटी ६५९५ प्रोससर आहे. हा फोन अँड्रॉइड किटकॅट या ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करतो. या फोनला १३ मेगापिक्सेलचा ऑटो फोकस रेअर कॅमेरा असून त्याला एलईडी फ्लॅशही आहे. याला फ्रंट कॅमेरा पाच इंचाचा आहे. हा फोन डय़ुएल सिमचा आहे. यात दोन जीबी रॅम आणि ३२ जीबीची अंतर्गत मेमरी स्टोअरेज स्पेस आहे. यामध्ये बॅटरी २३०० एमएएचची देण्यात आली आहे.
किंमत : हा फोन फ्लिपकार्ट या संकेतस्थळावर उपलब्ध असून याची किंमत १९,९९९ रुपये इतकी आहे.
    
एलजी जी ३ बीट
tec05एलजीने जी ३ हा फोन या वर्षांतच बाजारात आणला आहे. या फोनची पुढची आवृत्ती जी ३ बीट या नावाने आणली असून यामध्ये फोर जी जोडणी होऊ शकणार आहे. पाच इंचाचा एचडी डीस्प्ले असलेल्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ४०० प्रोसेसर १.२ गीगाहार्टझ क्वाडकोरसह आहे. यात एक जीबी रॅम असून अंतर्गत मेमरी आठ जीबी आहे. ही मेमरी आपण एसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबीपर्यंत वाढवू शकतो. यात मुख्य कॅमेरा आठ जीबी देण्यात आला असून त्याला लेझर ऑटो फोकसची सुविधा आहे. फोर जी जोडणी असल्यामुळे त्याला बॅटरी क्षमताही अधिक असणे अपेक्षित आहे. यामुळे या फोनला २५४० एमएएच इतकी बॅटरी देण्यात आली आहे. यात अँड्रॉइड किटकॅट ही ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे.
किंमत : याची किंमत विविध ई-रिटेल संकेतस्थळांवर वेगवेगळी आहे. ती १५ हजारपासून ते १८ हजार रुपयांपर्यंत आहे.    

झोलो एलटी ९००
tec06झोलो या कंपनीने त्यांचा पहिला फोर जी सुविधा असलेला स्मार्टफोन बाजारात आणला आहे. या फोनमध्ये ४.७ इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यऋत आला आहे. यामध्ये १.५ गीगाहार्टझचा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन एस ४ डय़ुएल कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये एक जीबी रॅम आणि आठ जीबीअंतर्गत मेमरी देण्यात आली आहे. याची मेमरी आपण ३२ जीबीपर्यंत वाढवू शकतो. यात एलईडी फ्लॅश असलेला आठ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे तर फ्रंट कॅमेरा एक मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे.  फोनच्या बॅटरीची क्षमता १८१० एमएएच इतकी आहे.
किंमत : हा फोन बाजारात आला तेव्हा याची किंमत १७ हजाराहून जास्त होती. आता ती १२,४९९ इतकी आहे.

जिओनी व्ही ६ एल आणि पी ५एल
tec08   जिओनी या कंपनीने फोर जीवर चालणारे दोन फोन बाजारात आणले आहेत. यातील व्ही ६ एल हा फोन पाच इंचाच्या डिस्प्लेसह उपलब्ध आहे. याची जाडी ६.९ इतकी आहे. यामध्ये अँड्रॉइड किटकॅट ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. या फोनमध्ये एक जीबी रॅम आणि आठ जीबी अंतर्गत मेमरी देण्यात आली आहे. ही मेमरी आपण एसडी कार्डच्या सा’ााने १२८ जीबीपर्यंत वाढवू शकतो. यात क्वाड कोर १.२ गीगाहार्टझचा प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये आठ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. फोनची बॅटरी १९५० एमएएच इतकी आहे. कंपनीचा पी5एल हा फोन ४.७ इंचाचा असून यातही क्वाड कोर १.२ गीगाहार्टझचा प्रोसेसर देण्यात आला आहे. यात कॅमेरा पाच मेगापिक्सेलचा आणि बॅटरी क्षमता १८०० एमएएच इतकी आहे.
किंमत : जिओनी व्ही ६ एल ८ हजार ५०० ते १० हजार ५०० दरम्यान आणि पी५ एल ची किंमत पाच ते सहा हजार दरम्यान आहे.