जगभरातील मोबाइल कंपन्यांना आपली उत्पादने सादर करण्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये यंदाही भविष्यातील उत्पादनांची झलक पाहावयास मिळाली. तंत्रज्ञान आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे याचा अनुभव बार्सेलोन येथे पार पडलेल्या या परिषदेत आला. तंत्रप्रेमी आणि तंत्र उद्योगांसाठी तर ही पर्वणीच ठरली. या परिषदेमध्ये यंदा प्रथमच सॅमसंग आणि अॅपल याव्यतिरिक्त अन्य कंपन्यांनीही आपली छाप सोडली, तर गुगल आणि फेसबुक या कंपन्यांनी ही उपकरणे वापरण्यासाठी उपलब्ध पर्यायांबद्दल लोकांना माहिती दिली.

महागडी उपकरणे
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने या परिषदेमध्ये गॅलेक्सी एस६ या फोनचे अनावरण केले. या फोनमध्ये कॅमेराचा दर्जा वाढवण्यात आला असून त्याला अधिक स्टायलिश लुक देण्यात आला आहे. याचे कव्हर आपण प्लास्टिकचे किंवा धातूचे किंवा काचेचेही ठेवू शकणार आहोत. जेव्हा आयफोन ६ आणि ६ प्लस बाजारात आले त्या वेळेस अॅपलने सॅमसंग मोठय़ा आकाराचा फोन देते म्हणून त्याला जास्त ग्राहक मिळत असल्याचा निष्कर्ष काढला होता. म्हणूनच आयफोन ६चा आकार हा आत्तापर्यंतच्या आयफोनच्या तुलनेत मोठा होता. यामुळे सॅमसंगला अॅपलच्या कॅमेरा आणि रचनेला आव्हान द्यायचे होते. यामुळेच गॅलेक्सी एस ६ आणि एस ६ एज हे दोन मॉडेल्सचे त्यांनी अनावरण केले. ६एजमध्ये वर्तुळाकार डिस्प्ले देण्यात आला आहे. त्यामुळे कुठूनही आपल्याला डिस्प्ले दिसू शकणार आहे. याचबरोबर अॅपलने या फोन्समधून मोबाइल पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ‘अॅपल पे’ला स्पर्धा निर्माण करण्यासाठी हा पर्याय उपयुक्त ठरणार आहे.
एचटीसी या मोबाइल कंपनीने आपल्या एचटीसी वन या मालिकेतील एम९ या फोनचे अनावरण केले. या फोनमध्ये उत्तम दर्जाचा कॅमेरा आणि धातूची आकर्षक रचना देण्यात आली आहे. यापूर्वीचे एचटीसी वन फोनमध्ये चार मेगापिक्सेलचा कॅमेरा असायचा. तसेच त्या कॅमेराचा दर्जाही तुलनेत कमी होता. नव्या फोनमध्ये २० मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सॅमसंग आणि एचटीसीच्या फोनची किंमत ही आयफोन ६च्या आसपास असणार आहे.

मध्यम किमतीतील फोन्स
लिनोवा या कंपनीने वाइब शॉट या फोनचे अनावरण केले. या फोनमध्ये महागडय़ा फोन्समध्ये वापरण्यात येणाऱ्या कॅमेरा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या फोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. याचबरोबर फोटो शेक होऊ नये म्हणून ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझरचाही वापर करण्यात आला आहे.
सोनी या कंपनीने एक्सपेरिया एम४ अॅक्वा या फोनचे अनावरण केले. हा फोन वॉटरप्रूफ असून तो तुलनेत स्वस्त उपलब्ध असणार आहे. याचबरोबर एलजी कंपनीनेही मध्यम किमतीचे मेग्ना, स्पिरिट, लीओन आणि जॉय या फोन्सचे अनावरण केले.

स्वस्त आणि मस्त
मायक्रोसॉफ्टने लुमिया ६४० आणि ६४० एक्सएल या स्मार्टफोनचे अनावरण केले. हे फोन मोठे आणि कमी किमतीत जास्त दर्जाच्या कॅमेराची सुविधा देणारे आहेत. या फोनमध्ये आठऐवजी १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये विंडोज १०चाही वापर करता येऊ शकणार आहे. विंडोज १० ही ऑपरेटिंग प्रणाली या वर्षांअखेरीस बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.
लिनोवा या कंपनीने ए ७००० डॉल्बी ऑडिओ तंत्रज्ञानाची सुविधा असलेल्या फोनचे अनावरण केले. केवळ स्टीरीओ आवाज न देता हेडफोनमध्ये थ्रीडी आवाजाचा अनुभव घेता येणार आहे. याचबरोबर कंपनीने फायर एचडीएक्स ८.९ टॅबलेटचीही घोषणा केली. मागच्या आठवडय़ातच लिनोवाचीच उपकंपनी मोटोरोलाने मोटो ई हा नव्या रूपात बाजारात दाखल केला आहे. यामध्ये कॅमेराच्या फोकसचा दर्जा वाढविला असून फ्रंट कॅमेराही अधिक चांगला दिला आहे. जिओनी या कंपनीनेही इलिफ एस५.१ या फोनचे अनावरण केले. या फोनची जाडी ५.१५ इतकी आहे, तर याचे वजन निव्वळ ९७ ग्रॅम आहे.
याशिवाय या काँग्रेसमध्ये हुवाईसारख्या कंपन्यांनी आपले स्मार्टवॉचचेही अनावरण केले. तसेच अनेक स्मार्ट उपकरणांचे प्रदर्शन या वेळी ठेवण्यात आले होते. यामध्ये स्मार्ट ग्लासेसपासून ते आभासी हँडसेटपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश होता. एचटीसी या कंपनीने आभासी हँडसेटची उपयुक्तता या परिषदेत सामावून दिली. एचटीसीच्या या उपकरणाची घोषणा ही अनपेक्षित आणि धक्कादायक होती.

उपकरणांव्यतिरिक्त
मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये उपकरणांव्यतिरिक्तही अनेक चांगल्या मुद्दय़ांवर चर्चा आणि विचारविनिमय झाला. फेसबुकचे सीईओ मार्क झुकबर्ग यांनी त्यांच्या मोफत इंटरनेट सुविधेबाबत जगाला माहिती दिली. ज्या देशांमध्ये इंटरनेटचा वापर कमी आहे अशा देशांमध्ये इंटरनेटचा वापर व्हावा यासाठी ही योजना हाती घेतल्याचे झुकेरबर्ग यांनी स्पष्ट केले. याशिवाय आता घाना, केनिया, टांझानिया, झांबिया, कोलंबिया आणि भारत या सहा देशांमध्ये आरोग्य, रोजगार आणि इतर माहिती सेवांचे अॅप्स वापरण्यास मोफत म्हणजे इंटरनेटचाही खर्च येणार नाही अशा स्वरूपात उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक देशाच्या गरजेनुसार अॅप्समध्ये बदल केले जाणार असून सध्या तेथील मोबाइल नेटवर्क सुविधा पुरवीत असलेल्या कंपन्यांसोबतच फेसबुक काम करत असल्यामुळे त्या कंपन्यांचेही कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे ते म्हणाले.
गुगलचे उपाध्यक्ष सुंदर पिचाई यांनी मोबाइल नेटवर्क पुरविण्यासाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या ड्रोन विमानांची कल्पना मांडली. या विमानांच्या साहय़ाने अतिदुर्गम भागात तसेच आपतकालीन परिस्थितीमध्ये मोबाइल नेटवर्कची सुविधा पुरविली जाऊ शकते असे स्पष्ट केले. गुगलने याआधी हातात घेतलेल्या लून प्रकल्पाअंतर्गत जगातील अनेक दुर्गम भागांत इंटरनेट सुविधा पोहोचणे शक्य झाल्याचे पिचाई यांनी स्पष्ट केले. याचबरोबर गुगल अमेरिकेत स्वत:ची मोबाइल नेटवर्क सुविधा पुरविणारी सेवा सुरू करण्यात येणार असल्याचेही पिचाई यांनी स्पष्ट केले. याबरोबर अँड्रॉइड पे ही मोबाइल पेमेंट सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचेही पिचाई यांनी सांगितले.
नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com