उन्हाळा आला की आरोग्य जपा असं नेहमीच सांगितलं जातं. यंदा उन्हाळाही खूपच जास्त आहे. यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे हे आपल्यासाठी क्रमप्राप्त आहेच. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्यावर नेहमी लक्ष ठेवणारी एक व्यक्ती मिळणार नाही. आपण दिवसभरात काय खातो, काय पितो, किती चालतो इथपासून ते आपला रक्तदाब किती आहे. हे तपासण्यासाठी काय आपण रोज दवाखान्यात जाऊ शकत नाही. या सर्व गोष्टी आता आपला सगळ्यात जवळचा सखा म्हणजे आपला मोबाइल करू शकणार आहे. आपले आरोग्य जपणारे अ‍ॅप्स आणि गॅजेट्स सध्या बाजारात मोठ्याप्रमाणावर उपलब्ध आहेत. पाहुयात एक झलक अशाच काही अ‍ॅप्स आणि गॅजेट्सची.

कॅलेरी काऊंटर
मी काही कॅलेरी कॉन्शस नाहीए. असे अनेकजण म्हणत असतात. पण या कॅलेरीज आपल्या आरोग्यात अनेक गोष्टी घडवत आणि बिघडवत असतात. यामुळे आपल्या शरीरातील कॅलेरिजची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. ही माहिती करून घेण्यासाठी आपण या अ‍ॅपचा वापर करू शकतो. या अ‍ॅपमध्ये आपल्याला तीन लाखांहून अधिक पदार्थाची माहिती आणि त्यांच्या कॅलेरीजची माहिती देण्यात आली आहे. यातील अमेिझग फास्टफूड आणि एर्क्‍ससाइज एंटी या दोन गोष्टींमुळे आपण आपल्या खाण्यावर नियंत्रणही आणू शकतो. यातील वेबसाइटच्या जोडणीच्या माध्यमातून ट्विटर आणि फेसबुकवरही आपल्या कॅलेरीजचे स्टेटस अपडेट होत राहते. हे अ‍ॅप अँडॉइड आणि आयओएसवर मोफत उपलब्ध आहे.

रन कीपर
तुम्ही दिवसभरात किती धावतात, किती चालतात, किती बाईक चालवतात कितीवेळ बसतात या सर्वावर लक्ष ठेवण्यासाठी तुम्हाला हे अ‍ॅप मदत करू शकते. इतकेच नव्हे तर तुमच्या चालण्याने तुमच्या किती कॅलेरीज खर्च झाल्या याची आकडेवारीही यामध्ये येते. याशिवाय हे अ‍ॅप जीपीएसशी जोडले गेल्यामुळे तुम्ही कशाप्रकारे आणि कुठे चालत आहात याचा तपशीलही तुम्हाला तुमच्या मोबाइलवर दिसू शकतो. हे अ‍ॅप आपले चालणे, बायकिंग, पायया चढणे उतरणे आदी गोष्टींवर लक्ष ठेऊन असते. इतकेच नव्हे तर आपण यामध्ये एकदा सेटिंग केले की आपण किती वेळ व्यायाम करायचा हेही ते आपल्याला सुचविते. आपल्या हृदयाचे ठोके मोजण्याचे कामही हे अ‍ॅप करत असते. यामध्ये तुम्ही तुमचे ध्येयही निश्चित करून ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला इतक्या दिवसांमध्ये इतके वजन वाढवायचे आणि किंवा कमी करावयाचे आहे. त्यानुसार हे अ‍ॅप आपल्याला मार्गदर्शन करते आणि वेळोवेळी अलर्ट करत राहते. आपल्या हे अ‍ॅप मोफत उपलब्ध आहे.

इंस्टंट हार्ट रेट
हे अ‍ॅप तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करा आणि तुमच्या हृदयाचे ठोके वेळोवेळी तपासा. या अ‍ॅपमध्ये तुम्हाला शास्त्रशुद्धरित्या हृदयाचे ठोके मोजून देते. डॉक्टरांच्या निरीक्षणानंतर तयार करण्यात आलेल्या या अ‍ॅपमध्ये तुम्ही तुमच्या प्रत्येक कृतीच्यावेळी तुमचे ठोके किती जलद अथवा धीम्या गतीने चालतात यावर लक्ष ठेवू शकतात. हे अ‍ॅप तुम्हाला मोफत उपलब्ध आहे.

नाईके फ्युएल बँड
जसे मोबाइलमधील अ‍ॅप्स आपले आरोग्य सांगू शकतात तसेच काही गॅजेट्स तयार करण्यात आले आहेत. जे आपल्या हातात किंवा इतर ठिकाणी ठेवले की आपल्याला आपल्या आरोग्याचा अंदाज येऊ शकतो. त्यातील एक म्हणजे नाईके फ्युएल बँड. याचा वापर करून आपण आपल्या शरीरातील विविध घडामोडींवर अचूक लक्ष ठेवू शकतो. एकदाका हा बँड आपण आपलया हातात घातला की, आपल्या शरीरातील सर्व घडामोिडचा अपडेटेड अहवाल आपल्याला पाहिजे त्या वेळेला मिळू शकतो. यासाठी ब्लूट्यूथने हा बँड आपल्या मोबाइलशी जोडला जातो. यानंतर आपण आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड केलेल्या त्याच्याशी संबंधित अ‍ॅपमध्ये आपल्याला शारीरिक घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळत राहते. यात आपल्या हृदयाचे ठोके, कॅलेरीजची माहिती आदी गोष्टींचा समावेश आहे. तसेच याच माध्यमातून आपण आपल्या आरोग्याची माहिती आपल्या परिजनांशी शेअरही करू शकतो.
किंमत 12,500

एलजी लाइफ बँड
नाईकेप्रमाणेच एलजी या कंपनीनेही लाइफ बँड बाजारात आणले आहेत. हे बँड्स आपण आपल्या मनगटात अडकविले की आपण किती चालतो, किती कॅलेजरीज जळल्या, दिवसभर किती अंतर कापले अशा विविध माहितींसोबत आरोग्यविषयक सांख्यिकी आपल्या मोबाइलमध्ये उपलब्ध करून दिली जाते. हा बँड नाईके आणि फिटबीट फोर्स या सध्या मार्केटमध्ये मातब्बर असलेल्या बँड कंपन्यांना स्पर्धक ठरू शकेल असा अंदाज आहे. हा बँड पाण्यातही काम करू शकतो. याला ओएलईडी टच डिस्प्ले देण्यात आला आहे. अ‍ॅडॉइड आणि आयओएसवर हे अ‍ॅप काम करते.
लवकरच बाजारात.

वेल्लो
अमेरिकास्थीत अझोई या कंपनीने नुकतेच भारतीयांसाठी वेल्लो हे आरोग्यावर लक्ष ठेवणारे गॅजेट बाजारात आणले आहे. या गॅजेटचा वापर तुम्ही आयफोनचे सुरक्षा कव्हर म्हणूनही करू शकता. तसेच वेगळे गॅजेट म्हणूनही करू शकता. आपल्या हातात फोन आणि ते गॅजेट या दोन्ही गोष्टी नकोत म्हणून कंपनीने फोनच्या कव्हरची कल्पना लढवली. या कव्हरवर आपलयाला एक बटण देण्यात आले आहे. त्यावर आपण एक मिनिटे बोट दाबून धरले की, आपल्या फोनमधील अ‍ॅपमध्ये आपल्याला त्याचे निकाल दिसतात. यामध्ये आपल्याला रक्तदाब, ईसीजी, हृदयाचे ठोके, शरीराचे तापमान, रक्तातील ऑक्सिजनची पातळी, आतड्यांचे कार्य आदी गोष्टींचा तपशील मिळतो. या सर्व गोष्टी एकत्र देणारे सध्यातरी हे एकमेव गॅजेट आहे. यामध्ये आणखी निरीक्षणे देण्याचा कंपनीचा मानस आहे.
किंमत 12,350